Wednesday, 7 October 2026

मुख्याध्यापक बशीर तांबोळी यांचा पुस्तक फाउंडेशनतर्फे गौरव

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करून वाचन संस्कृती रुजविण्यासाठी रचनात्मक कार्य करणारे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आळणी येथील प्रयोगशील मुख्याध्यापक बशीर तांबोळी यांचा पुस्तक फाउंडेशनच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त गौरव मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

धाराशिव येथे पार पडलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुस्तक फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष समाधान शिकेतोड होते. सचिव अलका शिकेतोड, संचालक भैरवनाथ कानडे आणि सेवानिवृत्त वरिष्ठ अधिव्याख्याता नवनाथ धुमाळ प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

प्रयोगशील मुख्याध्यापक बशीर तांबोळी यांनी प्रशासकीय जबाबदाऱ्यांसोबतच ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. ‘समकालीन प्रकाशन, पुणे’ यांच्या सौजन्याने धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी सुमारे १४ लाख रुपयांची उत्कृष्ट ग्रंथसंपदा उपलब्ध करून देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या या कार्याची दखल घेत पुस्तक फाउंडेशनतर्फे त्यांना गौरव मानपत्र प्रदान करण्यात आले.अध्यक्षीय भाषणात समाधान शिकेतोड यांनी ग्रामीण भागात वाचन संस्कृती रुजविण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली. घरोघरी ग्रंथालयाची निर्मिती करून प्रत्येक घरामध्ये वाचन संस्कृती तयार व्हायला हवी. मुलांना दर्जेदार बालसाहित्य वाचण्यासाठी उपलब्ध करून द्यायला हवे. एकमेकांना पुस्तके भेट द्यायला हवी. पुस्तकांवर चर्चा करायला हवी. असे त्यांनी सांगितले.
पुस्तक फाउंडेशनच्या सचिव अलका शिकतोड सांगितले की, प्रयोगशील मुख्याध्यापक बशीर तांबोळी यांनी ग्रामीण भागातील मुलांच्या हातात उत्तम दर्जाचे बालसाहित्य देऊन वाचन संस्कृती रुजविण्याचे रचनात्मक कार्य केले आहे. ज्ञानाची नवी क्षितिजे खुली करणाऱ्या अशा प्रयोगशील मुख्याध्यापकांचा गौरव करताना पुस्तक फाउंडेशनला अभिमान वाटतो.  

यावेळी भैरवनाथ कानडे यांनी वाचन संस्कृती संवर्धनासाठी सामुहिक प्रयत्नाची गरज असल्याचे सांगितले. त्यांनी मानपत्राचे वाचन केले. 

कार्यक्रमास आकाशवाणीचे सेवानिवृत्त अधिकारी  तानाजी शिनगारे, संदीप लेखापाल अस्मिता भातभांगे, डॉ.रुपेशकुमार जावळे, विवेकानंद कदम, नेताजी चव्हाण, दिलीप चौधरी, डॉ. रोहन आनंदगावकर, डॉ. रोहन जगताप, प्रतापसिंह खुणे, विष्णू ढेरे, प्रा.ज्ञानेश्वर पवार, शंकर मोरे,  तसेच परिसरातील वाचक, साहित्यप्रेमी व नागरिक उपस्थित होते. नवनाथ धुमाळ यांनी आभार मानले.

Wednesday, 23 September 2026

गप्पा, कविता आणि दासू वैद्य सर

काल दासू वैद्य सरांना भेटायचा योग आला! सरांच्या कविता वाचायला जेवढी मजा येते, तेवढीच मजा त्यांच्याशी प्रत्यक्ष गप्पा मारताना आली. खूप गप्पा झाल्या, साहित्यावर बोलणं झालं आणि एक ऊर्जा मिळाली. ही भेट नेहमीच स्पेशल राहील! सरांचे खूप आभार! 

 सरांच्या गप्पांसोबतच एक भारी सरप्राईज मिळालं! सरांनी मला एक शाईचा पेन भेट दिला. सरांच्या लेखणीचा हा वारसा असाच पुढे नेण्याचा प्रयत्न करेन. ही भेट माझ्यासाठी आयुष्यभर स्मरणात राहणारी आहे! सरांचे खूप खूप आभार!

#DasuVaidya #NewGift #InkPenLove #ग्रेट_भेट 
 #गप्पाआणिकविता  
#गप्पा #मराठीभावना #साहित्यप्रेमी

लेखक आपल्या भेटीला

लेखक आपल्या भेटीला या उपक्रमांतर्गत आज उमरगा तालुक्यातील अनुसूचित जाती मुलांची शासकीय निवासी शाळा मुरूम व ग्रामीण प्रशाला माडज या दोन्ही शाळेत प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम संपन्न झाला. 

दोन्ही शाळेतील कार्यक्रम खूप छान झाले. मुलाखतीच्या माध्यमातून माझं बालपण, शालेय जीवन, माझ्या साहित्य लेखनाची प्रेरणा, ग्रंथालयावर आधारित राबविलेले विविध उपक्रम, मुलांच्या अभिव्यक्तीच्या विकासासाठी राबविलेले विविध उपक्रम, मी लिहिलेले बालसाहित्य, वाचनाचे महत्त्व, सोशल मीडियाचा वाचनावर होणारा परिणाम, मुलांनी कोणते वाचन करावे अशा विविध विषयांवर चर्चा घडून आली.

 मराठी भाषेला मिळालेला अभिजात भाषेचा दर्जा, मराठी भाषेच्या समृद्धीसाठी, अभिवृद्धीसाठी, संवर्धनासाठी राबविलेले उपक्रम याबद्दलही चर्चा झाली.

या मुलाखतीमधून मुलांना प्रेरणा मिळाली. मुलाखतीच्या कार्यक्रमात मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. मुलाखत ऐकताना विद्यार्थी अंतर्मुख झाले होते. मुलांशी संवाद साधताना मलाही खूप आनंद वाटला. 

दोन्ही शाळेचे मुख्याध्यापक, आमचे मित्र साहित्यिक डॉ. बालाजी इंगळे, सर्व शिक्षक यांनी या मुलाखतीच्या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. या सर्वांना भेटून खूप आनंद वाटला. 

#बालसाहित्य #मराठीभाषा #मुलाखत #शाळा #वाचनचळवळ #ग्रंथालय #उपक्रमशील_शाळा

Saturday, 15 August 2026

शैक्षणिक चर्चासत्र संपन्न

आज शिक्षण संस्कृती विकास परिषदेमार्फत शैक्षणिक चर्चासत्र संपन्न झाले. या चर्चासत्रात मुलांना वाचतं लिहितं करताना या माझ्या पुस्तकाचा परिचय निर्मितीचा प्रवास सांगितला. प्राथमिक शिक्षण, बालसाहित्य, मराठी भाषा, ग्रंथालयावर आधारित उपक्रम या विषयांवर केलेल्या रचनात्मक कामाचे अनुभव कथन केले. 

या चर्चासत्रात दैनिक लोकसत्ताचे पत्रकार सुहास सरदेशमुख यांनी सध्याच्या शिक्षण व्यवस्थेबद्दल परखड मत व्यक्त केले. शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी, त्यावरील उपाय योजना याबद्दल त्यांनी मत मांडले. त्यांनी अत्यंत मुद्देसूद व अभ्यासपूर्ण विचार मांडले. सरकारी शाळांच्या दुरावस्था, शिक्षणाचे बाजारीकरण थांबविण्यासाठी शाश्वत उपाय योजना करण्यासाठी संशोधनात्मक काम करायला हवे असे त्यांनी सांगितले. 

हरीती प्रकाशनाचे राहुल लोंढे यांनी Hariti Publications ने प्रकाशित केलेल्या सामाजिक, शैक्षणिक विषयावरील पुस्तकांचा परिचय करून दिला.

संत साहित्याच्या अभ्यासक रवी निंबाळकर यांनी उत्तम पालकत्व या विषयावर विचार मांडले. जीवन व्यवहारातील उदाहरणे देऊन अतिशय उत्तम विषयाची मांडणी केली. या चर्चासत्रात डॉ.स्मिता शहापूरकर, रमाकांत गायकवाड, प्रसाद अतनूरकर या अभ्यासकांनी शिक्षण या विषयावर आपापले विचार मांडले. सुनील बडुरकर यांच्या पुढाकारातून हे चर्चासत्र यशश्री क्लासेस, धाराशिव या ठिकाणी संपन्न झाले.

 #शिक्षण #प्राथमिक_शिक्षण #education #गुणवत्तापूर्ण_शिक्षण

Friday, 14 August 2026

शालेय ग्रंथालयाची पाहणी

ज्यांची सहाय्यक समाजकल्याण आयुक्त या पदावर निवड झालेली आहे. ते राघुचीवाडी गावातील तरुण अधिकारी श्री. संदीप पाटील यांनी शाळेला भेट दिली. त्यांनी आवर्जून शाळेतील ग्रंथालय पाहिले. शाळेत राबवत असलेल्या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. शाळेच्या विकासासाठी भविष्यात प्रयत्न करू. गावातील तरुण, नोकरदार वर्ग, शिक्षणप्रेमी यांच्या माध्यमातून शाळेला मदत करू. मुलांच्या गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न करू. या बाबींवर चर्चा झाली.