Saturday 4 April 2015

कविता

एक कविता...

मी मराठी शाळेत शिकवतोय.
इंग्रजी शाळेकडे जाणारा लोंढा वाढत असताना,
मी मराठीतून शिकवतोय.
मी भाषा नाही 
जगण्याचं एक अंग शिकवतोय.
मी माती अन्
पायांना लागणारा चिखल शिकवतोय.....
मी मायेनं आईनं 'गोदीत घेणं'
काजळाची तीट लावणं
अन पोटाला चिमटा घेऊन स्वत:च्या,
लेकराच्या मुखी घास भरवणं ं शिकवतोय...
मी मराठी शिकवतोय.
बोली अन प्रमाण या वादाच्या पलिकडचं
वांझोट्या समीक्षे पलिकडचं 
"बहुभाषिकतेचं" स्वप्न उराशी घेऊन
काही "आपलसं" शिकवतोय
मी जीवनभाषा शिकवतोय....

मी खेड्या-पाड्यातनं 
पहिल्यांदा शाळेत येणा-या पिढ्यांना
हात धरून शिकण्याच्या वाटेवर नेतोय,
त्यांना स्वत:ची ओळख न पुसू देता
नवी ओळख बनवायला हात देतोय
मी स्वप्नांचे पंख देतोय...

मी मराठी शिकवतोय
धडे अन कवितांसोबतच
पुरोगामी महाराष्ट्राचे
छोटे छोटे बी मनामनात रूजवतोय..
मी मराठी शिकवतोय...
मी मराठी शाळेत शिकवतोय.....

  - फारूक एस.काझी
(इथं मराठी मंजे महाराष्ट्राच्या कानाकोप-यात बोलली जाणारी हर त-हेच्या मराठीची रूपं असा घ्यावा. केवळ प्रमाण (माध्यम) भाषा असा घेऊ नये)

No comments:

Post a Comment