Monday 11 May 2015

कार्यप्रेरणा कार्यशाळा

              ★  कार्यप्रेरणा ★

सातारा जिल्ह्यातील पं.स.सातारा अंतर्गत 40 शाळांचं कुमठे बीट म्हणजे ज्ञानरचनावादाचं नंदनवनच!  आणि ख-या अर्थानं इथं ज्ञानरचनावादाचं बीज पेरून त्याचा महावृक्ष/आधारवड निर्माण करणा-या अग्रदूत म्हणजेच तिथल्या शिक्षण विस्तार अधिकारी आदरणीय प्रतिभा भराडे मँम होत.
शासकीय स्तरावरून अधिकृतरित्या ज्ञानरचनावाद स्विकारण्याअगोदरच स्वत: एका शाळेत विद्यार्थी बनून 8 दिवस ज्ञानरचनावादी शिक्षण समजून घेऊन गेल्या 11 वर्षांपासून सतत समर्पणभावनेनं स्वत:ला या महत्कार्यास झोकून देऊन, तहानभूक विसरून, स्वत:च्या सुखाचा विचार चार हात दूर ठेवून, येणा-या अनेक समस्या, असंख्य संकटांवर मात करत सर्व शिक्षकांना विश्वासात घेऊन, विद्यार्थ्यांना लळा लावत मा. प्रतिभा भराडे झपाटल्यासारखं काम करताहेत. राज्यस्तरीय कार्यप्रेरणा प्रशिक्षणाच्या निमित्तानं या महान कामाची आणि आदरणीय व्यक्तित्वाची ओळख झाली. या कामासाठी त्यांना मानाचा मुजरा!!!

40 शाळा, सुमारे 60 वैविध्यपूर्ण ज्ञानरचनावादी नवोपक्रम, प्रत्येक वर्गखोली शैक्षणिक साहित्यानं समृद्ध अन् सुसज्ज, भिंतन् भिंत विद्यार्थ्यांशी संवाद साधणारी, कोपरान् कोपरा विद्यार्थ्यांना ज्ञानाची 'कवाडे उघडणारा', प्रत्येक शाळेला उपलब्ध जागेनुरूप बालोद्यान, प्रत्येक शाळेत सेंद्रीय खतांचा वापर होत असलेली परसबाग, प्रत्येक शाळेत फक्त ज्ञानरचनावादी शिक्षण, 40 पैकी 39 शाळांमध्ये एकही अप्रगत विद्यार्थी नाही! !!

दि.30 एप्रिल 2015 रोजी कुमठे बीटमधल्या जि.प.प्रा.शा. आरे या शाळेला या प्रशिक्षणानिमित्तानं भेट देण्याचा योग आला. 43 पटसंख्येची , तीन वर्गखोल्या असलेली, छोटंसं पण सुंदर उद्यान असलेली, द्विशिक्षकी स्वच्छ सुंदर शाळा! मी, श्रीमती वाशिंबे, श्रीमती पदकोंडे, श्री. देंडगे, श्री. मोरे व इतर अशा 10 जणांची आम्हा विस्तार अधिका-यांची टीम शाळेच्या कमानीतून आत प्रवेश करताच हातात एकेक फूल घेऊन अत्यंत प्रसन्न प्रफुल्लित मुलं आमच्या स्वागतासाठी धावत आली आणि ज्ञानरचनावादाचा प्रयोग याचि देही याचि डोळा अनुभवण्यास सुरूवात झाली. जवळपास पन्नाशी ओलांडलेल्या चव्हाण मँम व चाळीशीतल्या होनराव मँम या दोन अत्यंत उत्साही कार्यरत शिक्षिका. अतिशय संवेदनशील मनाच्या चव्हाण मँम यांनी त्यांच्या अनुभवी दृष्टीतून आम्हाला शाळेची, विद्यार्थ्यांची, ज्ञानरचनावादी शिक्षणाची अत्यंत आपुलकीनं ओळख करून दिली. त्या म्हणाल्या, "सुरूवातीला या ज्ञानरचनावादाची भिती वाटायची. आता या कामाचा अभिमान वाटतो. शिक्षणक्षेत्राला, पेशाला न्याय दिल्याचं समाधान वाटतं." आम्ही पाहिलं कि मुलं स्वत: शिकताहेत, गटागटानं सगळ्यांना सोबत घेऊन ज्ञानाची रचना करताहेत, उपलब्ध शैक्षणिक साहित्यासोबत हसतखेळत रमून जाऊन ज्ञानार्जन करताहेत, प्रत्येक विषयातील पाठांचे मराठी, इंग्रजीत मनोवेधक नाट्यीकरण करताहेत, चिंचोके वापरून स्वत:च पाढे तयार करताहेत, अगदी पहिली दुसरीचे विद्यार्थीसुद्धा इंग्रजी-मराठी शब्दकोशाचा प्रत्यक्ष कौशल्यपूर्ण वापर करताहेत, विद्यार्थी स्वत:च गणिताची व्यावहारिक उदाहरणं तोंडी सांगून अचूक सोडवून दाखवत आहेत, मोठमोठ्या संख्यांचं विस्तारित रूप पटापट सांगताहेत, दिलेल्या कोणत्याही चार शब्दांपासून अतिशय मनोरंजक, चांगलं साहित्यमुल्य असलेली कथा दहाच मिनिटांत लिहून दाखवताहेत, दिलेल्या विषयावर छानशी कविता करताहेत, इंग्रजीतून संभाषण करताहेत, इंग्रजी पाठ्यपुस्तकातील कुठलाही परिच्छेत अस्खलित वाचताहेत, गाणी म्हणताहेत, गोष्टी सांगताहेत, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक गीतांवर सुंदर नृत्य करताहेत!!!  अत्यंत प्रसन्न, प्रफुल्लित, आत्मविश्वासू, निर्भिड पण तितकेच निरागस गुणी विद्यार्थी!!!  मुली प्रत्येक बाबीत मुलांच्या पुढं!!! ओळखीपाळखीची गरज नाही, मनात लाजाळूपणा, भितीचा लवलेश नाही, चेह-यावर कुठलाही ताणतणाव नाही, शिस्तीचं अवडंबर नाही, दप्तराचं ओझं नाही!!!  सर्वच विद्यार्थी बोलके, नटखट अन् कलाकार!!!

ऐन 30 एप्रिललासुद्धा 95% विद्यार्थी उपस्थीती, काही मुलं परवानगी घेऊन लग्नवगैरेसाठी बाहेरगावी गेलेली. 1 मार्चपासूनच नवीन पहिल्या वर्गाची मुलं शाळेत दाखल होऊन इतरांसोबत आनंददायी ज्ञानरचना करत असलेली!!!
पाठांतराची रटरट नाही, स्मरणावर आधारित प्रश्नांची चौकट नाही, शिक्षकांची निष्फळ वटवट नाही, स्पर्धेत टिकण्याची कटकटही नाही!!!

वरील अनुभव नुसते ऐकीव नाहीत. मी व माझ्यासारख्या अनेक अधिका-यांची ही आँखोदेखी आहे. थोड्याफार फरकानं सगळ्यांचंच हेच मत आहे. थोड्याफार फरकानं सगळ्या शाळाही अशाच आहेत. एकच उणीव जाणवली. ती म्हणजे शाळेला संगणक प्रयोगशाळा नसणं. आरे शाळेमध्ये एकच संगणक आहे. त्याचाही वापर मर्यादितच. पण त्याशिवायही मुलं गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळवताहेत हे फार महत्वाचं!!  व्हनराव मँम यांना म्हणालो, "मँम,तुम्ही तुमच्या शाळेचं I. S. O. साठी रजिस्ट्रेशन केलं असेलंच. ते प्रमाणपत्र मिळवलेल्या इतर शाळांपेक्षाही वरचढ आहे ही शाळा! " त्या म्हणाल्या, "नाही ना. आमच्याकडे संगणक प्रयोगशाळा नाही, व्हर्च्युअल क्लासरूम नाही. कसं मिळणार आम्हाला I. S. O. प्रमाणपत्र??? " मी त्यांना त्यासाठी याची गरज असतेच असं नाही असं सांगितलं. भराडे मँम यावरही विचार करीत असतीलच याची खात्री आहे.

भराडे मँम, ग्रेट आहात आपण!  तुम्ही दाखवलेल्या वाटेवरून चालणारे शिक्षकही ग्रेट आहेत!!  त्यांच्या सुलभकीकरणातून घडलेल्या विद्यार्थ्यांचं भविष्य उज्ज्वल आहे!!!  सर्वांना माझा मनापासून सलाम!!!!

कार्यप्रेरणा प्रशिक्षणाचे सर्व साधनव्यक्तीही थोरच!  मिश्किल शैलीत उपरोधातून वर्मावर नेमकेपणानं बोट ठेवणारे श्री. नामदेव माळी (गशिअ), सडतोडपणे थेट संवाद साधणा-या श्रीमती ज्योती परिहार (गशिअ), हळव्या कवीमनाच्या स्त्रीवादी भुमिकेच्या श्रीमती तृप्ती अंधारे (गशिअ), ज्ञानरचनावादासाठी आयुष्य वेचणा-या, शब्दाशब्दात शिक्षणाबाबत कळवळा तळमळ असणा-या श्रीमती प्रतिभा भराडे, महाराष्ट्रभरातील धडपड करणा-या तरूण शिक्षकांचा प्रतिनिधी, शिक्षणाला तंत्रज्ञानाची जोड देणारा एक ध्येयवादी शिक्षक - बालाजी जाधव!  एकापेक्षा एक वरचढ!!!

आणि त्यातच प्रधान सचिव, शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन मा. श्री. नंदकुमार साहेब यांनी घेतलेला सुसंवादी ज्ञानरचनावादी तास!!! प्रशिक्षणाचा कळस!!!  त्यांच्यासोबत संवाद साधण्याचं आम्हाला लाभलेलं भाग्य!!!

खरोखरंच कार्यप्रेरणा देणारं, उत्तम आयोजन नियोजन असलेलं एक उत्कृष्ठ प्रशिक्षण!!!

~ श्री. फुसे आर.डी.
   शि.वि.अ. बनोटी
   पं.स.सोयगाव
   जि. औरंगाबाद

No comments:

Post a Comment