॥पुस्तक परिचय॥
दिवाळी अंक 'किशोर'
•••••••••••••••••••••••••••••••
बालमित्रांना 'किशोर' मासिक खूपच आवडते. बालमित्र किशोर मासीकाची दर महिन्याला वाट पाहत असतात. यावर्षीचा किशोरचा दिवाळी खूपच छान आहे.चंद्रमोहन यांनी आकर्षक असं मुखपृष्ठ काढलेलं आहे.अंकातील चित्रे मनोवेधक आहेत. अंकातील कथा,ललित लेख,कविता यासाठी मुलांच्या भावविश्वातील चित्रे काढली आहेत.
अनिल अवचट,राजीव तांबे,प्रवीण दवणे,दासू वैद्य,दिलीप प्रभावळकर, महावीर जोंधळे, स्वाती राजे,वीरा राठोड,डाॅ.सुरेश सावंत,एकनाथ आव्हाड,घनश्याम देशमुख,फारूक काझी,उत्तम कोळगावकर,रेणू गावस्कर,श्रीकांत बोजेवार,विजय पाडळकर यासारख्या बालसाहित्यीकांच्या दर्जेदार बालसाहित्याची मेजवाणी बालमित्रांना या अंकातून मिळते.
विजय पाडळकर यांनी फ्रेंच भाषेतील 'द रेड बलून' या चित्रपटाचा उत्कंटावर्धक परिचय मुलांच्या भाषेत केला आहे. हा परिचय वाचल्यावर हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता वाढते. सध्या मुले मोबाईलवेडी झालेली आहेत.मोबाईलवर विविध गेम खेळतात.विशेषतः पब्जी गेमच्या विळख्यात मुले अडकली आहेत.या मुलांचे मोबाईल वेड सोडवून त्यांना खेळाकडे,पुस्तक वाचनाकडे कसे वळवले हे संजय भास्कर जोशी यांच्या ' पब्जीच्या कचाट्यातून मोबाईल गॅगची सुटका!' या कथेतून वाचायला मिळते.सध्याच्या वास्तव परिस्थितीवर प्रकाश टाकणारी कथा खूपच भावली. कोरोना काळात आई-बाबा पाॅझीटिव्ह आल्यावर धिरज कसं हिंमतीनं घर सांभाळतो.स्वतः स्वयंपाक करून आईबाबांना सांभाळतो. ही काळजाला चटका लावून जाणारी कथा खूपच छान पद्धतीने प्रविण दवणे यांनी मांडली आहे. गुलजार यांची ऑनलाईन क्लासरूम,दिलीप प्रभावळकर यांची पाहुणी,अनिल अवचट यांची देवराई,फारूक काझी यांची गंध,एकनाथ आव्हाड यांची दिवा कवितेचा,स्वाती राजे यांची मिनीचा वाढदिवस या कथा मनाला भावतात.मल्हार अरणकल्ले यांची 'मायचं चित्र' ही ग्रामीण बोलीतील कथा खुपच छान आहे. श्रीकांत बोजेवार यांची 'बिनशेवटाच्या गोष्टींची गोष्ट' ही वेगळ्या धाटणीची विनोदी कथा वाचताना उत्सुकता वाढत जाते.
शिवकन्या शशी यांनी खेळाडूंच्या संघर्षगाथा सांगीतलेल्या आहेत.आंतराष्ट्रीय खेळाडूंच्या या संघर्षगाथा प्रेरणादायी आहेत. जाई देवळकर यांनी राजस्थानमधील प्रवासवर्णनाचा अनुभव वाचल्यावर राजस्थानला एकदा भेट द्यावीच असे वाटते.
अनिल साबळे यांनी एका मेंढ्या राखणा-या मुलाला शाळेत दाखल करून शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा ह्रद्यस्पर्शी अनुभव 'रामा पुन्हा शाळेत जाऊ लागला' या कथेतून येतो.ही प्रेरणादायी कथा आपणा सर्वांनाच प्रेरणा देणारी आहे.
या अंकातील कविताही खूपच छान आहेत.दासू वैद्य यांची एक होता भातखाऊ, डाॅ.सुरेश सावंत यांची मीच माझा खोडरबर,वीरा राठोड यांची पुस्तकातल्या पानांमध्ये,मंदा नांदुरकर यांची किल्ला,उत्तम कोळगावकर यांची उड्डाण अशा अनेक कविता बालमनाला भावणा-या आहेत.
या अंकातील घनश्याम देशमुख यांची गंमतकोडी मुलांना चिकीत्सक,तार्किक विचार करायला लावतात. किशोरचा ऑक्टोबर-नोव्हेंबरचा हा जोडअंक दिवाळी अंक म्हणून प्रकाशीत झालेला आहे.प्रत्येक पालकाने हा अंक आपल्या पाल्याला आवर्जून वाचायला द्यावा.शाळेतील ग्रंथालयात हा अंक ठेवूयात.
पुस्तक परिचय : समाधान शिकेतोड
दिवाळी अंक २०२१: किशोर
संपादक: किरण केंद्रे
प्रकाशक : बालभारती,पुणे.
पृष्ठे १३२ वार्षिक वर्गणी : ५० रु.
┄─┅━━▣▣▣━━┅─┄
No comments:
Post a Comment