Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Saturday, 27 June 2015

पायाभूत चाचणी

सर्वांना नमस्कार.

आपण जुलैअखेरीस राज्यभर पायाभूत चाचणी घेणार आहोत. मुलांना काय येते, कोठे मदतीची गरज आहे ते शोधण्यासाठी या चाचण्या आहेत. शिक्षकांनी आपापल्या वर्गात त्या घ्यायच्या आहेत.  या चाचणीचा बाऊ होणार नाही, वातावरण आश्वासक असेल, प्रात्यक्षिक-लेखी प्रश्न सोडवताना मुलांना मजा येईल, आणि एखादी न येणारी गोष्ट चाचणी देता-देता मूल सहज शिकेल अशी अपेक्षा आहे.

मुलांची गणिताची समज, कौशल्ये, विचारक्षमता तपासण्यासाठी काही वेगळ्या प्रकारचे प्रश्न यात आहेत. मुलांना कदाचित या प्रकारच्या प्रश्नांचे अनुभव याआधी मिळाले नसतील. त्यामुळे त्या प्रकारच्या प्रश्नांचा चाचणीपूर्वी जरूर सराव करून घ्यावा. म्हणजे मुलांना त्या गोष्टी चाचणीत करता येतील. या चाचण्या अजिबात गोपनीय नाहीत. चाचणीतील विशिष्ट प्रश्नांची उत्तरे पाठ करून घेऊ नयेत, इतकेच.

संख्यांची समज तपासताना केवळ संख्येचे वाचन लेखन तपासून पुरत नाही. ती संख्या म्हणजे नेमके किती, ते शतक-दशक-एकक प्रतीके वापरून दाखवता आले पाहिजे. तुमच्या शाळेत नेहमी जी प्रतीके वापरली जात असतील, उदा. काड्यांचे गठ्ठे-सुटे, मणी-माळा, दहाच्या व एकच्या नोटा, दांडे-सुटे, ती जास्त संख्येने जमवून ठेवा. जी प्रतीके तुम्हाला सोयीची वाटतील ती वापरा. एक, दहा, शंभर, हजारच्या खोट्या नोटा जमवा अथवा कार्डांवर लिहून मुलांच्या मदतीने तयार करा. प्रतीके वापरून संख्या तयार करणे, जमिनीवर अथवा पाट्यांवर आखलेल्या घरांमध्ये ती मांडणे व त्यानुसार संख्या अंकात लिहिणे याचा पुन्हा सराव घ्या.

या चाचणीत पुढील प्रकारचे प्रात्यक्षिक, मनात विचार करून उत्तर लिहिण्याचे किंवा लेखी प्रश्न असतील.
- ऐकलेली संख्या प्रतीके वापरून दाखवणे, अंकातील संख्या वाचून प्रतीके देणे, प्रतीके पाहून संख्येचे नाव सांगणे.
- आयतातील चौकटी मोजून गुणाकार लिहिणे.
- मोजपट्टीच्या सहाय्याने लांबी मोजणे, टेलरिंग टेपच्या सहाय्याने लांबी, परिमिती मोजणे.
- कोनमापकाच्या सहाय्याने कोन मोजणे व दिलेल्या मापाचा कोन काढणे.
- कंपासच्या सहाय्याने वर्तुळ काढणे.
- रंगवलेला भाग अंश छेद रूपात व दशांशात लिहिणे, सांगितलेला अपूर्णांक रंगवणे.

यासारख्या गोष्टींचा चाचणीपूर्वी सराव घ्या.

लेखी चाचणीतील प्रश्नही थोडे निराळ्या प्रकारचे असू शकतील. इयत्ता दुसरी व तिसरीच्या मुलांसाठी एक एक प्रश्न वाचत तो प्रश्न समजावून सांगा व मग सोडवायला सांगा. उत्तराचा क्ल्यू न देता प्रश्न समजावा. अगदी आठवीपर्यंतच्या मुलांना गरज असेल तेथे प्रश्न वाचून दाखवा. उत्तरामध्ये मांडणी, रीत, शुद्धलेखन यातले काहीही तपासायचे नाही. फक्त गणिताची समज तपासायची आहे. त्यामुळे उत्तर आले किंवा नाही आले इतकेच पहायचे आहे.

मुलांना वरील प्रकारचे अनुभव देऊन चाचणीपूर्वी जरूर सराव घ्या. पण इतके लक्षात ठेवा की चांगला रिझल्ट दाखवण्यासाठी आपण ही चाचणी घेत नाही. आपण कोठे आहोत ते पाहून पुढील काम आखण्यासाठी घेत आहोत. चाचण्या अंतिम झाल्या की तुमच्याशी त्या येथे शेअर करेनच. रिझल्ट चांगला यावा यासाठी त्यातीलच प्रश्नांची उत्तरे पाठ करून घेऊ नका. चाचणीतील प्रश्न पहा, संख्या बदलून, प्रश्न बदलून त्या प्रकारचे प्रश्न सोडवून घ्या. मुलांची समज वाढू द्या.

नंदकुमार
प्रधान सचिव,
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
महाराष्ट्र राज्य

Post Top Ad

Your Ad Spot

ज्ञानरचनावाद