Monday 8 June 2015

लेख

आभा भागवत या कलावंत मैत्रिणीने लिहिलेला हा लेख ATF MAHARASHTRAवरुन इथे देत आहे. अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारा लेख आहे. जरुर वाचा. मत नोंदवा.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा राजमार्ग - आभा भागवत

एक वर्षाच्या आसपासचं बाळ जेव्हा हातातली एखादी वस्तू एखाद्या पृष्ठभागावर घासून बघतं आणि त्यातून निर्माण होणाऱ्या ओरखड्यांची गंमत वाटून पुन्हा पुन्हा तीच कृती करून बघतं, तेव्हा त्यातून निर्मितीचा निखळ आनंद ते घेत असतं. आपल्याला कळतं की आता चित्र निर्मितीला बाळाची सुरुवात झाली. रेघोट्या स्वरूपाच्या या चित्रांसाठी शक्य ते सर्व पृष्ठभाग बाळ वापरून बघतं आणि नेमकं कशावर कशानी चित्र उठतं हे अचूक शोधून काढतं. आणि पुन्हा पुन्हा चित्र निर्मितीचा आनंद घेतं.

हे चित्रप्रवासातलं पाहिलं पाऊल मोठी माणसं कसं स्विकारतात त्यावर बाळाचे निर्मितीतला आनंद घेण्याचे क्षण अवलंबून असतात. काही पालक भिंत, जमीन खराब होते या भीतीपायी बाळाला रागावून, बारीक लक्ष ठेवून चित्र निर्मितीपासून परावृत्त करतात. तर काही ताबडतोब बाजारातून खडू आणून देतात आणि भिंतीवर कागद लावून किंवा एक कोपरा ठरवून त्याबाहेर काढू नकोस असं वारंवार बाळाला बजावतात. काहींना बाळानी काढलेल्या प्रत्येक रेघेचं, ठिपक्याचं विलक्षण कौतुक वाटतं आणि चित्र निर्मितीसाठी वाट्टेल ते करायला ते तयार होतात. भिंत, रंगीबेरंगी कागद, वह्या, जमीन, शरीर, अंघोळीचं पाणी, बाथरूम असे अनेक पृष्ठभाग आणि तेली खडू, पेन्सिली, स्केचपेन्स, ओले रंग, भाज्यांचे रंग, रांगोळीचे रंग, फूड कलर्स अशी अनेक माध्यमं हौसेहौसेनी पुरवतात. मनसोक्त वापरू देतात. मुलाला यातून अनेक प्रयोग करण्याच्या संधी मिळतात आणि ते शांत आणि आनंदी होतं. स्वतःला रमवण्यासाठी त्याला इतरांवर अवलंबून रहावं लागत नाही. आमच्या घराच्या भिंतीही अशाच मुलांच्या चित्रांनी सजलेल्या आहेत. उंची वाढतेय तसे छतावर चित्र काढण्याचे प्रयोग सुरु झालेत. मुलांना समजलेले, आवडलेले, जमलेले आकार, रचना, एखादया गोष्टीचं कार्य (function), लिपी, मुलांच्या मनातले विचार, कल्पना, भीती, आनंदाच्या भावना अशा असंख्य गोष्टींचं ते दृश्य स्वरूप आहे. फक्त मनगट वापरण्याऐवजी मोठ्या पृष्ठभागांवर खांद्यापासून संपूर्ण हात आणि शरीर वापरून चित्र काढल्यामुळे छोटया घरातून मोकळ्या रानात जाऊन जी ऊर्जा, उत्साह मिळतो तसंच घडतं. When the hand is free the mind too feels liberated.

मुलाला वाढताना सातत्यानी अशा संधी मिळत राहिल्या तर मूल खूपच सृजनशील आणि समाधानी बनतं. ज्या मुलांच्या या संधी काढून घेतल्या जातात त्यांची स्वतः प्रयोग करून शिकण्याची भूक भागत नाही आणि ती मुलं सतत आनंद देणाऱ्या कृतींच्या शोधात असतात. त्यांचा तो झगडाच बनतो. ज्येष्ठ कलासमिक्षक हर्बर्ट रीड म्हणतात "A child's Art is its passport to freedom". सुरुवातीच्या रेघोट्या हे मुलाच्या अंतर्मनातील छोट्या छोट्या गोष्टींचं दृश्य स्वरूप असतं. पालकांनी आपल्याला नेहमीच संपूर्ण स्वीकारावं अशी मुलाची नैसर्गिक गरज असते. मुलाच्या रेघोट्यांची अवहेलना करून, त्यांना कमी लेखून मुलाची अभिव्यक्ती चिरडायची आपली सवय काढून टाकली पाहिजे. मुलांची चित्रकला आहे तशी स्विकारणारे पालक आणि शिक्षकही हळू हळू भारतात निर्माण होत आहेत ही फार चांगली गोष्ट आहे. छोट्या मुलांना पाचही ज्ञानेंद्रियांचा वापर करून प्रत्येकच कृतीचा आनंद घेता येतो. पण मोठ्या माणसांची पंचेद्रिय वापरण्याची आणि त्यांची मुलाच्या वाढीतील भूमिका ओळखण्याची संवेदनक्षमता कमी अथवा नाहीशी झालेली असते. विशेषतः सुशिक्षित वर्गात हा प्रश्न गंभीर वळण घेत आहे. त्यामुळे शिक्षण व्यवस्थेनी लादलेली विषयांचे कप्पे करण्याची सवय बाजूला ठेवून छोट्या मुलाच्या कृतींकडे आपण परिपूर्ण प्रक्रिया म्हणून बघण्याची गरज आहे. चित्रकला हा या प्रक्रियेचा अविभाज्यच नव्हे तर अतिशय महत्वाचा हिस्सा आहे.

चार - सहा महिन्याची बाळं पाळणाघरांत पाठवली जातात आणि तिथेच त्यांना चुकीच्या पद्धतीनी चित्रकलेची ओळख होते. Apple च्या outline मध्ये red कलर भरायला देतात अवघ्या ९ महिन्याचा बाळाला. आणि त्यातून A for Apple असं मूल शिकेल अशी इच्छा असते. होतं असं की छापलेल्या चित्राकडे दुर्लक्ष्य करून मुलाच्या अजून पुरेशा विकसित न झालेल्या बोटांच्या पकडीनी चित्रावर रेघोट्या मारून मूल त्याहून छान काहीतरी करायला पळतं. घाईनी चुकीची माध्यमं आणि चुकीच्या अपेक्षा समोर ठेवून मुलांच्या विकासात आपण अडथळेच निर्माण करतो. त्यापेक्षा मूल आपणहून स्वतःच्या गरजेनी जेव्हा चित्रकलेचा शोध लावेल तेव्हा त्यातली मजा त्याला पूर्णपणे चाखता येईल यावर मोठ्यांनी विश्वास ठेवायला हवा. हा छोटासा शोध मोठ्यांना जरी नविन नसेल तरी मुलानी पहिल्यांदाच अनुभवलेला असल्यामुळे त्याचं मूल्य खूप मोठं आहे.

दीड-दोन वर्षाच्या चिमुकल्यांना अल्फाबेट्स समजावीत म्हणून वहीत छापलेल्या A to Z आकारांवरून टीचर मुलाचं बोट हातात पकडून त्या आकारावर ओल्या रंगांनी ठिपके काढत फिरवतात. सुमारे अर्धा तास सगळ्या मुलांची ही activity होते. आणि मग त्याचं मूल्यमापन करून मुलाची कशी आमच्या शाळेत येऊन प्रगती झाली याची पालकांना खात्री करून देतात तेव्हा त्यातलं शिक्षणमूल्य, सौंदर्यंमूल्य, प्रक्रियामूल्य, बोधमूल्य अशा असंख्य मुलभूत मूल्यांपासून ते मूल वंचित रहातं याची जाणीवही अनेक शाळांना नसते. अशा सुमार कृतींपेक्षा मूल नुसतं खेळलं तरी त्याचा शिकण्याचा प्रवास सुरु राहील. चित्रकला हा विषय तर लहान मुलांना शिकवायची गरजच काय? मूल स्वतःहून शिकत असतं याचा आपल्याला विसरच पडत चाललाय की काय?

४-५ वर्षाची मुलं व्जेव्हा गोष्टी रचून सांगायला लागतात तेव्हा त्यांची गोष्ट सांगता सांगताच अनेक वेळा बदलते. त्यांचे कल्पनांचे, भाषेचे प्रयोग चालू असतात. हीच गोष्ट जर लिहायला सांगितली तर त्यातली लवचिकता नाहीशी होते आणि १०० कल्पनांऐवजी त्यातील केवळ एकच व्यक्त होते. ही प्रयोग करण्याची मोकळीक शिक्षणामुळे हिरावून घेतली जाते का काय? छापील आकारात रंग भरायला दिल्यावर सफरचंद याहून वेगळं सुद्धा काढता येऊ शकेल ही शक्यता नाकारून टाकणं हा मला तर गुन्हाच वाटतो. जसं त्रिकोणी डोंगर, त्यातून डोकावणारा सूर्य, त्यातून वाहणारी नदी, एखादं ठराविक घर, झाड, मराठी चार अंकासारखे पक्षी हे चित्र कित्येकजण डोळे झाकून काढू शकतात. हा चित्रकला रसग्रहणातला मोठा अडथळा आहे. सगळ्यांनी ठरवून ही साचेबंद चित्र बघणं, काढणं, शिकवणं जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत आपली चित्रकलेतील अभिरुची तयार होणार नाही. चित्रकलेचं सौंदर्यमूल्य जाणून घेण्यासाठी प्रचंड पायाभरणीची अजूनही गरज आहे. आपल्या सौंदर्यसंवेदना जोपर्यंत आपण जागृत करत नाही आणि असुंदर गोष्टींच्या स्विकाराला विरोध करत नाही तोपर्यंत चित्रकलेत क्रांती होऊ शकणार नाही. शिक्षणात, व्यवहारात, समाजात, कौटुंबिक चौकटीत चित्रकलेला दुय्यम दर्जा प्राप्त होण्यामागे उपेक्षित सौंदर्यमूल्यच कारणीभूत आहे असं वाटतं.

मनसोक्त चित्र काढणं हा मुलांचा अधिकार आहे. अधिकार प्राप्त करण्यासाठी मुलं काहीच करू शकणार नाहीत इतकी ती निर्बल आहेत. हा हक्क मोठया माणसांनी आपणहून मुलांना दिला पाहिजे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची ही सुरुवातीची पावलं असतील.
---------------

कसा वाटतोय जरूर कळवा

                                   ~  ATF वरून साभार

No comments:

Post a Comment