Friday, 9 May 2025

सर्जनशीलतेची रुजवात

 

लेखन म्हणजे मनातील भावना,मत व्यक्त करणे होय. मुलाचे भाषा शिक्षण घडत असताना मुलं स्वलिपीकडून स्वलेखनाकडे जात असते. त्यामुळे पहिली, दुसरीच्या मुलांना श्रुतलेखन अचूक यावे हा आग्रह धरणे योग्य आहे काय ?  प्राथमिक स्तरावर  मुलांचे भाषाशिक्षण कशा पद्धतीने घडून येते याचा शास्त्रीय दृष्टीकोन समजून घ्यायला हवा.या अनुषंगाने श्रुतलेखन हवे का स्वलेखन या विषयाचा घेतलेला धांडोळा ....

मुलं शाळेत येण्याअगोदर त्याचे भाषाशिक्षण नैसर्गिक पद्धतीने घडून येत असते. अनौपचारिकपणे ते कुटुंबात,परिसरात भाषा शिकत असते. त्याचे विचार,भावना ते व्यक्त करत असते. साधारणतः तीन-चार वर्षाचे मुलं आपल्या भावना एखादे चित्र काढून, भिंतीवर गिरगटून व्यक्त करत असते.हे त्याचे लेखनच असते.फक्त त्याच्याजवळ लिपी नसते. त्यामुळे ते चित्राच्या माध्यमातून व्यक्त होत असते. ते त्याचे व्यक्त होणे समजून घ्यायला हवे. याच कालावधीत श्रवणाच्या माध्यमातून त्याच्याकडे भाषेतील शब्दांचा संग्रह वाढत असतो. कोणत्या प्रसंगात कसे बोलावे हे मुलं आपसूकच शिकत असते. या कालावधीत मुलांना पुस्तके वाचून दाखवायला हवीत. मुलांसोबत चित्रांवर गप्पा मारायला हव्यात. यामुळे मुलांची वाचन -लेखन पूर्व तयारी होत असते.

मुलं जेव्हा पहिलीच्या वर्गात दाखल होते.तेव्हा मात्र त्याच्या नैसर्गिक भाषा शिकण्यात अडथळे यायला लागतात. त्याला सर्वप्रथम लिपीपरिचय करून देण्याचा व अक्षरांचे अवयव गिरविण्याची घाई केली जाते. काही मुले त्या गतीने शिकतात.काही मागे पडतात. ज्यावेळी मुलं वाचन शिकण्याच्या टप्प्यावर असेल त्यावेळी त्याला शब्दांचे,वाक्यांचे श्रुतलेखन करण्याचा आग्रह करणे योग्य होणार आहे काय ? आपल्या राज्यात साठपेक्षा जास्त बोली बोलल्या जातात. त्या त्या एक परिसराची बोलीभाषाही असते. उदा. महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात बोलल्या जाणाऱ्या परिसर भाषा, मराठवाडी बोली,कोकणी बोली,खानदेशी बोली अशा परिस्थितीमध्ये पहिली, दुसरीच्या, तिसरीच्या माध्यम भाषेत मुलांनी अचूक श्रुतलेखन करावे हा आग्रह धरणे योग्य होणार नाही. कारण इयत्ता तिसरीपर्यंत मुले वाचन शिकण्यासाठी धडपडत असतात. अशा वेळी त्यांना श्रुतलेखन करण्यास सांगावे;परंतु त्यांच्या बोलीतील शब्दांचा स्वीकार करून माध्यम भाषेतील श्रुतलेखनाकडे घेऊन जायला हवे.

खरे तर तिसरीपर्यंतच्या मुलांना श्रुतलेखनपेक्षा स्वलेखन करण्यास प्रेरित करायला हवे;कारण पूर्व प्राथमिक स्तरावर मुलं स्वलिपीतून लेखन करत असते.आता त्याला लिपीपरिचय झाल्यामुळे ते आपले विचार,मत त्या लिपीमधून मांडेल.अशा वेळी त्याने मांडलेले विचार त्याच्या बोलीत असतील तर ते स्विकारायला हवेत.असेच आतापर्यंतच्या अभ्यासक्रमात नमूद करण्यात आलेले आहे.त्यामुळे तिसरीपर्यंत तरी किमान स्वलेखनाला प्राधान्य द्यावे.त्यासोबत हळूहळू श्रुतलेखन घ्यावे.त्यामुळे मुलांची सर्जनशीलता खुडली जाणार नाही.




 

 

Monday, 13 January 2025

बोरगावला रंगले बाल साहित्य संमेलन

आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरगाव (काळे) या शाळेत सहावे बाल साहित्य संमेलन संपन्न झाले. या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणून विद्यार्थी, पालक यांच्याशी संवाद साधला. कवी कट्टाकट्टा, कथा वाचन ही सत्रे उत्तम झाली. सर्व सत्रांचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शाळेतील विद्यार्थ्यांनी केले. मुलांनी छान कविता, कथा सादर केल्या. 

या शाळेत प्रयोगशील शिक्षिका अनिता जावळे यांनी तयार केलेले भाषा दालन पाहायला मिळाले. या भाषा दालनामध्ये विविध साहित्य प्रकारांमध्ये मुलांनी लिहिलेली पुस्तके होती. कथा, कविता, नाटक , जाहिरात, बातमी, संवाद, पक्षांविषयी माहिती अशा विविध साहित्य प्रकारातील पुस्तके विद्यार्थ्यांनी लिहिलेली होती. या पुस्तकांचे मुखपृष्ठ विद्यार्थ्यांनीच तयार केलेले होते. भाषा दालतील ही पुस्तके पाहून मुलांचे खूप कौतुक वाटले.अशा उपक्रमामुळे मुलांच्या भाषिक क्षमतांचा आपसुकच विकास होतो. 

शाळेतील सर्वच शिक्षकांचे खूप कौतुक वाटले. त्यांनी या साहित्य संमेलनाचे खूप छान नियोजन व आयोजन केलेले होते. शाळेचा परिसरही खूप सुंदर होता. वडाचे व पिंपळाचे झाड शाळेच्या सौंदर्यात भर घालत होतं. या दोन्ही झाडांभोवती मुलांना वाचन करण्यासाठी छान कट्टा तयार केलेला होता.

बाल साहित्य संमेलन या उपक्रमामुळे मराठी भाषेचा प्रचार, प्रसार, संवर्धन व अभिवृद्धी होण्यास मदत होते. मुलांच्या भाषिक क्षमतांचा विकास होतो. मुलांच्या अभिव्यक्तीला धुमारे फुटतात. मुलांना समाजभान येतं. मुलं पूरक वाचन करायला लागतात. त्यामुळे बाल साहित्य संमेलनाचे आयोजन करायला हवे.


Thursday, 2 January 2025

बालआनंद मेळावा


विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांचा विकास व्हावा, त्यांना जीवन व्यवहारातील कौशल्य अवगत व्हावी, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास व्हावा यासाठी शाळेत २१ डिसेंबर रोजी शाळेत बालआनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. 

या बालआनंद मेळाव्यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी खाद्यपदार्थांचे,भाजीपाल्यांचे विविध स्टॉल लावले होते. पालकांनी, गावकऱ्यांनी या स्टॉलला भेट देऊन खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला.विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक केले. 

विद्यार्थ्यांनी आपल्या खाद्यपदार्थांची, भाजीपाल्याची जवळपास 14 हजारांची विक्री केली. विक्री करत असताना विद्यार्थ्यांना हिशोबाचे ज्ञान मिळाले. नाणी व नोटा याबद्दल माहिती मिळाली. संवाद कौशल्य विकसित झाले.

अशा उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील अंगभूत गुणांचा विकास होतो. त्यामुळे असे उपक्रम शाळांमध्ये घ्यायला हवेत.
बालआनंद मेळाव्याचे उद्घाटन करताना शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व उपाध्यक्ष व सदस्य, मुख्याध्यापक. 

गावकऱ्यांनी बालआनंद मेळाव्याला भेट देऊन खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला. आपल्या पाल्यांची कौतुक केले.

आपापल्या शेतातील भाजीपाला विक्रीसाठी विद्यार्थ्यांनी आणला होता. विद्यार्थी भाजीविक्रेते बनले होते.

Tuesday, 3 December 2024

मुलाखत ऐकण्यात रंगली मुले

स्वामी विवेकानंद संस्थेचे अध्यापक विद्यालय धाराशिव येथील छात्राध्यापक अमोल घाटे यांनी आज महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक,श्री. समाधान शिकेतोड यांची मुलाखत घेतली. ही मुलाखत अतिशय प्रेरणादायी झाली. 

मुलाखतीच्या माध्यमातून शिकेतोड सरांनी त्यांचा शैक्षणिक प्रवास मांडला. शाळेत राहिलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. ज्ञानरचनावाद, विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास, सहशालेय उपक्रम, प्रकल्प, ग्रंथालय, वाचनाचे महत्त्व याबाबत त्यांनी सांगितले. 

अध्यापक विद्यालयातील छत्राध्यापक व शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ही मुलाखत प्रेरणादायी ठरली.मुलाखत ऐकताना शाळेतील विद्यार्थी मंत्रमुग्ध झाले होते. शाळेतील विद्यार्थ्यांना मुलाखतीचे तंत्र, मुलाखत कशी घ्यावी याबाबत माहिती मिळाली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्ष  श्रीमती रुक्मिणी बारकुल ह्या होत्या. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अध्यापक विद्यालयाचे प्राध्यापक श्री. भिमराव शिंदे  होते. या कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. श्री. योगेश कपाळे यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.

Sunday, 1 December 2024

राजस्थानची शिक्षण पद्धती

NCERT राष्ट्रीय स्तरावर शैक्षणिक धोरणे आणि कार्यक्रम विकसित करते, तर SCERT त्यांच्या राज्याच्या गरजांनुसार धोरणे आणि कार्यक्रम विकसित करतात. एकंदरीत, NCERT आणि SCERT या दोन्ही संस्था भारतातील शिक्षणाच्या विकासात आणि संवर्धनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. SCERT राज्य स्तरावर काम करते. राज्याच्या विशिष्ट गरजांनुसार अभ्यासक्रम विकसन, शिक्षक प्रशिक्षण आणि शैक्षणिक संशोधनावर काम करते. या अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने राजस्थानमधील एससीईआरटीला भेट दिली.या ठिकाणचा परिसर पाहून पुण्यातील एससीईआरटीलाची आठवण आली. या परिसरात उंच उंच झाडे होती. स्वच्छ व सुंदर परिसर होता. सुरूवातीला आम्ही असेसमेंट सेलला भेट दिली. तेथील अधिकाऱ्यांनी असेसमेंट सेलच्या कामाची माहिती सांगितली.

अभ्यास दौऱ्यातील सदस्यांनी राजस्थानमधील SCERT ला भेट दिली.

 या सेलच्या माध्यमातुन राज्यांतील शिक्षकांच्या मदतीने विद्यार्थ्यांसाठी अध्ययन निष्पत्ती आधारित प्रश्नपेढी तयार केलेली आहे. ही प्रश्नपेढी वर्गनिहाय,विषयनिहाय, पाठनिहाय व पाठातील अध्ययन निष्पत्तीनिहाय तयार करण्यात आलेल्या आहेत. हे सर्व शाळा दर्पण पोर्टलवर ठेवण्यात आलेले आहे. प्रत्येक शिक्षक स्वत:च्या लॉगिनमधून या प्रश्नपेढीचा वापर करू शकतो. ब्लुमच्या अध्ययन पातळ्यांवर या प्रश्नांची रचना केलेली आहे. असेसमेंट सेलमार्फत शिक्षकांच्या सक्षमीकरणासाठी डाएटच्या माध्यमातुन कार्यशाळा आयोजित केल्या जातात. राजस्थानमध्ये ३३ जिल्ह्यात ३३ डायट कार्यरत आहेत. राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणात (NAS) राजस्थान राज्य पुढे दिसून येते. 
 SCERT मधील अधिकाऱ्यांशी चर्चा करताना अभ्यास दौऱ्यातील सदस्य

 राजस्थान राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या सहा विभागांच्या कार्यपद्धतीचे सादरीकरण संपन्न झाले. इथे शिक्षकांची प्रशिक्षणे गरजाधिष्ठीत असतात. शिक्षक ज्या प्रशिक्षणाची मागणी करतात अशीच प्रशिक्षण घेतली जातात. SCERT मध्ये अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तक निर्मितीचे काम चालते. इयत्ता पहिली ते पाचवीची पाठ्यपुस्तके एससीईआरटीमार्फत तयार केली जातात. सहावी ते बारावीपर्यंतची पाठ्यपुस्तके NCERT वापरली जातात. राजस्थान राज्यामध्ये हिंदी व इंग्रजी या फक्त दोन माध्यमांच्या शाळा आहेत. अलीकडे इंग्रजी माध्यमांच्या काही शाळा सरकार चालवत आहे. 
SCERT मधील अधिकाऱ्यांशी चर्चा करताना शिक्षण उपसंचालक मा.संजय डोरलीकर, सहाय्यक संचालक मा.सरोज जगताप शिक्षणाधिकारी मा.शबनम मुजावर

राजस्थानमध्ये अंगणवाडी शाळांना जोडण्यात आलेले आहेत. NCF वर खूप उत्तम काम झालेले आहे. संपूर्ण शिक्षण व्यवस्था कार्यप्रवण राहण्यासाठी तंत्रज्ञानाचा उत्तम प्रकारे वापर करण्यात येत आहे. मुलांच्या  संपादणूक पातळीवरून शाळांचे ग्रेडिंग करण्यात  आलेले आहे. 
 राजस्थान SCERT मधील अधिकारी सादरीकरण करताना

 दरवर्षी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमार्फत (DIET)मार्फत शैक्षणिक संशोधन केले जाते. शिक्षण उपसंचालक माननीय संजय डोरलीकर यांनी SCERT चे अतिरिक्त संचालक यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. बैठकीचे समन्वयन सहाय्यक संचालक सरोज जगताप मॅडम यांनी केले. अभ्यास दौऱ्यातील सदस्यांनी प्रश्न, मनातील शंका तेथील अधिकाऱ्यांना विचारल्या. शालेय शिक्षणातील अनेक बाबींवर महत्त्वाची चर्चा झाली.
 Assessment Cell SCERT Rajasthan

राजस्थान राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे (RSCERT) एकूण सहा विभाग आहेत.
१) अभ्यासक्रम, सामग्री निर्मिती आणि मूल्यांकन विभाग 
२) शैक्षणिक सर्वेक्षण, संशोधन आणि धोरण दृष्टीकोन विभाग 
३) शिक्षक शिक्षण विभाग
४) माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञान सेवा विभाग 
५)समग्र विकास आणि सामाजिक न्याय विभाग 
६) नियोजन व्यवस्थापन आणि वित्त विभाग

त्यानंतर आम्ही एसटीआरटीने तयार केलेले कलांगण पाहण्यासाठी गेलो. त्या ठिकाणी राजस्थानचे सांस्कृतिक वैभव पाहायला मिळाले. राजस्थान मधील लोककला, लोकनृत्य, लोकसंस्कृती यांची चित्रशैली अतिशय सुंदर पद्धतीने भिंतीवर लावण्यात आलेली होती.
SCERT मधील कलादालनातील विविध चित्रशालीचे निरीक्षण करताना शिक्षणाधिकारी मा.शबनम मुजावर

दुपारच्या जेवणानंतर आम्ही उदयपूर मधील प्रताप गौरव केंद्र पाहण्यासाठी गेलो. प्रताप गौरव केंद्र राष्ट्रीय तीर्थ हे भारतातील राजस्थान राज्यातील उदयपूर शहरातील टायगर हिल येथील एक पर्यटन स्थळ आहे . वीर शिरोमणी महाराणा प्रताप समितीने सुरू केलेल्या या प्रकल्पाचा उद्देश आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने महाराणा प्रताप आणि परिसरातील ऐतिहासिक वारशाची माहिती देणे हा आहे.  
           महाराणा प्रताप गौरव केंद्राला भेट

या प्रकल्पात मेवाड राज्य आणि भारताच्या इतिहासाबद्दल माहिती देण्यात आली आहे. आपल्या भारत देशाला आक्रमणकर्त्यांनी कसे लुटले गेले ? इथल्या शुर राजपूत राजांनी त्यांच्याशी कसा संघर्ष केला. राजपूत राजांच्या त्यागाचा, बलिदानाचा, समर्पणाचा, राष्ट्रभक्तीचा दैदीप्यमान इतिहास या प्रकल्पामध्ये अनुभवायला मिळाला. शूरवीर रजपूत राजांच्या कर्तुत्वाचा गौरव जेव्हा गाईड आम्हाला सांगत होता तेव्हा अंगावर शहारे येत होते.
    महाराणा प्रताप गौरव केंद्राचा भव्य दिव्य परिसर

त्यानंतर आमची सिटी पॅलेस पाहण्यासाठी गेलो.उदयपूरमधील सिटी पॅलेस हा एक आकर्षक शैलीत बांधला गेलेला आहे. अरवली पर्वताच्या उंच टेकडीवर बांधलेला भव्यदिव्य पॅलेस पाहून डोळे दिपून जातात. राजपुत राजांच्या सर्व वस्तू या पॅलेसमध्ये जतन करून ठेवलेले आहेत. त्या काळातील सर्व नकाशे येथे पाहायला मिळतात. त्या काळातील चित्रशैली पाहून मन प्रसन्न होते. अशाप्रकारे अभ्यास दौऱ्याचा हा दिवस अतिशय आनंदामध्ये गेला. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेतील अधिकारी अभ्यास दौऱ्यातील सर्वांची खूप काळजी घेत होते. आम्ही प्रत्येकवेळी चांगल्या हॉटेलमध्ये उत्तम दर्जाच्या जेवनाचा आस्वाद घेतला.
      राजस्थानी थाळीचा आस्वाद घेताना

 राजस्थानमध्ये पर्यटन व्यवसाय खूपच भरभराटीला आलेला आहे. आम्हाला फिरताना प्रत्येक ठिकाणी परदेशी पर्यटक दिसत होते. एवढ्या मोठ्या प्रमाणात परदेशी पर्यटक पर्यटन करतात. ते जगताना शिकतात आणि शिकताना जगतात. त्यांचे जगणं आणि शिकणं एकच झालेलं आहे.
     राजस्थानमध्ये परदेशी पर्यटक खूप भेटी देतात.

 आपल्या भारत देशातील हे सांस्कृतिक वैभव आपण नक्कीच अनुभवायला हवं. महाराष्ट्रातील मुलांच्या शैक्षणिक सहली राजस्थानमध्ये आणायला हव्यात असे मनोमन वाटले.