Showing posts with label जादुई जंगल. Show all posts
Showing posts with label जादुई जंगल. Show all posts

Friday, 2 December 2022

जादुई जंगल निर्मितीचा प्रवास

 मी जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून मुलांसोबत काम करत आहे. मुलांसोबत काम करण्याचा आनंद काही औरच असतो. मुलांसोबत गप्पागोष्टी करणे, त्यांना गोष्टी, सांगणे, कविता गाऊन दाखविणे,त्यांना पुस्तके वाचून दाखवणे, एखादी नाटिका बसविणे असे शालेय उपक्रम शाळेत राबवित असतो. मी सांगितलेल्या गोष्टी मुलांना खूप आवडतात. मुले गोष्टी सांगण्याचा आग्रह धरतात.

मी भूम तालुक्यात २००९ साली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामेश्वर या शाळेवर काम करत असताना मुलांना गोष्टी सांगायचो. मुलांना गोष्टी खूप आवडायच्या. त्यावेळी मी ‘जादूच्या सशाची’ गोष्ट मुलांना सांगितली होती. ती त्यांना खूप आवडली. दुसऱ्या दिवशी तीच गोष्ट मुलांनी सांगण्याचा आग्रह धरला. दुसऱ्या दिवशी मुलांना ती गोष्ट सांगितली. मुलांना मी मनात गोष्ट तयार करून सांगत होतो. दररोज गोष्ट सांगणे असे काही दिवस सुरू होते. एक दिवस मुलांना म्हटलं, “अरे आता गोष्ट संपली.”  पुढे काय? पुढे काय? याची मुलांना उत्सुकता लागली होती. त्यामुळे मुले मला दररोज गोष्ट सांगण्याचा आग्रह धरायची. पुढे नंतर मी जि. प. प्रा. शाळा हाडोंग्री या शाळेवर गेलो. त्या शाळेतही ‘जादूच्या सशाची’ गोष्ट मुलांना सांगितली. त्यांनाही ती खूपच आवडली. मग मी ठरवलं की आता लिहून काढूयात. मुलांसाठी लिहायला हवं असं नेहमी वाटायचं.   
      
   लेखन करताना किशोरवयीन विद्यार्थी हाच वाचकवर्ग डोळ्यासमोर ठेवून कादंबरी लिहायला सुरुवात केली. मुलांसाठी कादंबरी लिहिण्याचा हा माझाच पहिलाच प्रयत्न होता. एका जंगलात हा जादूचा ससा जादूच्या करामती करतो. नंतर तो त्या जंगलाचा सेनापती होतो. जंगलाचं रक्षण करतो असं कथानक घेऊन या कादंबरीचे लेखन सुरू केले.पुढे काही दिवस लेखन बंद होते. मनात राहून राहून असे वाटायचे की मुलांना हा विषय एवढा आवडलेला आहे. मग आपण लिहायला हवं. पण काही वर्ष लेखन बंदच राहिलं.  
     
कोरोनाच्या कालावधीत सर्व बंद होतं. सर्वजण घरातच होते. यावेळी कादंबरीचे राहिलेले लेखन पूर्ण केलं. त्याची संहिता राजहंस प्रकाशनकडे पाठविली. राजहंसच्या टीमने अथक परिश्रम घेऊन अल्पावधीतच सुंदर कादंबरीची निर्मिती केली. राजहंस प्रकाशनामार्फत ही कादंबरी प्रकाशित झाल्यानंतर खूप आनंद वाटला. राजहंसने पाठविलेल्या भेट प्रती पाहिल्यावर डोळ्यात आनंदाश्रू तरळले. हे पुस्तक खूपच छान झाले होते. आतील चित्रे व मुखपृष्ठ तर खूपच सुंदर होते. बालमनाला भावणारी त्यांच्या भावविश्वाला साद  घालणारी चित्रे चित्रकार योगीता धोटे यांनी काढलेली होती.

ही कादंबरी अल्पावधीतच  बालवाचक व साहित्यरसिक, साहित्यिक, समीक्षकांपर्यंत पोहोचली. अनेक शाळांमधील शिक्षकांनी ही कादंबरी आवडल्याचे फोनद्वारे कळविले. बऱ्याच शाळांमधील विद्यार्थ्यांनी ‘जादुई जंगल’ या बालकादंबरीचा पुस्तक परिचय लिहिला. परभणी जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या रायपूर शाळेतील तनुष्का काकडे, वैष्णवी मस्के यांनी या कादंबरीचा छान परिचय लिहिला. आमच्या जि.प.प्रा. शाळा राघुचीवाडी या शाळेतील भक्ती बेलदार हिने छान पुस्तक परिचय लिहिला आहे. अनेक विद्यार्थ्यांनी कादंबरी आवडल्याचे फोन करून सांगितले. पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला पालकांसोबत अनेक विद्यार्थी आलेले होते. त्यांना या पुस्तकापासून अवांतर वाचनाची, लिहिण्याची प्रेरणा मिळाली असेही काही विद्यार्थ्यांनी सांगितले.

शिक्षण क्षेत्रात रचनात्मक व गुणात्मक काम करणाऱ्या शिक्षक व अधिकार्‍यांनी या बालकादंबरीबद्दल खूप छान प्रतिक्रिया दिल्या आहेत. साहित्यिक बालाजी इंगळे, व्यंकटेश चौधरी, बालसाहित्यिक डॉ. सुरेश सावंत, फारुक काझी, विशाल तायडे, मुलांसोबत भाषाशिक्षणाचं काम करणाऱ्या मीनाताई निमकर, बालरोगतज्ज्ञ अभय शहापूरकर यांनीही कादंबरीचे कौतुक केले आहे. डॉ.सुरेश सावंत, संदीप वाघचौरे यांनी वर्तमानपत्रांमध्ये या कादंबरीचे समीक्षण लिहिले. मुग्धा मणेरीकर यांनी गोव्यातील गोवन वार्ता वर्तमानपत्रांतील तरंग पुरवणीत समीक्षण लिहलेले आहे.

अनेक शाळेत ही बालकादंबरी मुलांसोबत वाचली जात आहे. शाळाशाळांमधून या कादंबरीचे प्रकटवाचन, अभिवाचनाचे कार्यक्रम सुरू आहेत. अगदी सात-आठ वर्षाची मुलंही एकदा हे पुस्तक हातात आलं की सोडायला तयार होत नाहीत. हे मी प्रत्यक्ष अनुभवलं आहे. मुलं ‘जादुई जंगल’ या कादंबरीच्या प्रेमात पडत आहेत याचा मनस्वी आनंद होत आहे. जंगलातील गमतीजमती मुलांना खूप आवडत आहेत. या कादंबरीचा पुढचा भाग केव्हा येणार याबद्दलही अनेक मुलांनी विचारणा केली आहे. या निमित्ताने मुलांना बालसाहित्याची  गोडी लागत आहे. या बालकादंबरीची पहिली आवृत्ती केवळ आठ महिन्यातच संपली आहे. या सर्व प्रवासात खूप नवीन शिकायला मिळालं.बालवाचकांच प्रेम मिळालं.अजून काय हवं!

 


Tuesday, 5 April 2022

समाधान शिकेतोड यांच्या जादुई जंगल बालकादंबरीचे प्रकाशन संपन्न झाले

राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक, बालसाहित्यिक समाधान शिकेतोड यांच्या जादुई जंगल या बालकादंबरीचे प्रकाशन शिवगौरी हॉल या ठिकाणी लातूर विभागाचे शिक्षण उपसंचालक डॉ.गणपत मोरे, प्रसिद्ध साहित्यिक,डॉ.बालाजी इंगळे, वरिष्ठ अधिव्याख्याता, डॉ. दयानंद जटनुरे,मराठवाडा साहित्य परिषद अध्यक्ष नितीन तावडे,अधिव्याख्याता नारायण मुदगलवाड, यांच्या हस्ते संपन्न झाले. 

जादुई जंगलातील गंमतीजमती सांगणारी, रोमहर्षक,मनोरंजक  बालकादंबरी राजहंस प्रकाशनामार्फत प्रकाशित झालेली आहे.योगीता धोटे यांनी या बालकादंबरीचे आकर्षक मुखपृष्ठ तयार केलेले असुन कांदबरीसाठी सुंदर चित्रे काढलेली आहेत. ही बालकादंबरी एकशे चौतीस पृष्ठांची असुन मुलांच्या भावविश्वाला मोहिनी घालणारे प्रसंग,घटना,गंमतीजमती मन हरखून टाकतात.

समाधान शिकेतोड यांनी माझे विद्यार्थी हेच माझ्या साहित्य लेखनाची प्रेरणा आहे असे प्रतिपादन केले. जादूई जंगल या बालकांदबरीच्या निर्मीतीचा प्रवास त्यांनी उलगडून सांगीतला. या पुस्तक प्रकाशनाच्या प्रसंगी प्रसिद्ध साहित्यिक डॉ.बालाजी इंगळे यांनी या बालकादंबरीवर सविस्तर भाष्य केले. या कादंबरीत मुलांना आवडणारे भावविश्व रेखाटण्यात आलेले आहे. कादंबरीची भाषाशैली,रचना, कथानक उत्तम असून पुढे काय घडणार याबद्दल मुलांमध्ये उत्सुकता निर्माण करणारे आहे. ही कांदबरी नक्कीच बालकांच्या पसंतीला उतरेल. मराठी साहित्य विश्वात ही बालकादंबरी निश्चितच आपले वेगळे स्थान निर्माण करेल असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. या कांबरीला साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार मिळातील असा आशावादही व्यक्त केला.

शिक्षण उपसंचालक डॉ.गणपत मोरे यांनी या प्रसंगी प्रत्येकाने वाचन करायला हवे. वाचन संस्कृती रुजवायला हवी. असे आवाहन केले. समाधान शिकतोड यांची बालकादंबरी नक्कीच मैलाचा दगड ठरेल असा विश्वास व्यक्त केला. मुलांना सकस व दर्जेदार बालसाहित्य वाचनासाठी उपलब्ध करून द्यायला हवे असे आवाहन केले.

समाधान शिकेतोड हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राघुचीवाडी या ठिकाणी प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. मुलांसाठी ते सातत्याने नाविन्यपूर्ण लेखन करत असतात. यापूर्वी त्यांचा पोपटाची पार्टी हा बालकवितासंग्रह वाचकांच्या पसंतीला उतरलेला आहे. विद्यार्थ्यांच्या भाषा विकासासाठी ते सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम, प्रकल्प राबवित असतात.

या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला शिक्षण विभागातील अधिकारी, मराठवाडा साहित्य परिषदेचे पदाधिकारी, सदस्य, शिक्षक पालक, विद्यार्थी तसेच साहित्य रसिक उपस्थित होते.यावेळी मराठवाडा साहित्य परिषदेच्यावतीने बालसाहित्यिक समाधान शिकेतोड यांचा त्यांच्या रचनात्मक कार्याबद्दल विशेष सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन प्रा.अरविंद हंगरगेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन हनुमंत पडवळ यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मराठवाडा साहित्य परिषदेचे सदस्य रुपेशकुमार जावळे, अरविंद हंगरगेकर, हनुमंत पडवळ, तसेच तानाजी खंडागळे, विवेकानंद कदम,नेताजी चव्हाण,प्रवीण बनकर यांनी परिश्रम घेतले.