Showing posts with label बालसाहित्य. Show all posts
Showing posts with label बालसाहित्य. Show all posts

Tuesday, 31 October 2023

हाती ज्यांच्या शून्य होते:प्रेरणादायी पुस्तक

आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त हाती ज्यांच्या शून्य होते या पुस्तकाचा परिचय परिपाठाला करून दिला होता.परिचय ऐकून मुलांना पुस्तक वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली.

 हे खूप प्रेरणादायी पुस्तक आहे. मुलांना नक्की वाचायला द्यायला हवं.

Monday, 23 January 2023

विद्यार्थी साहित्य संमेलन येणेगूर

गटशिक्षण कार्यालय, उमरगा, अभिजात साहित्य मंडळ व उमरगा व रोटरी क्लब ऑफ उमरगा यांच्या संयुक्त विद्यमाने कॅप्टन जोशी स्मारक विद्यालय, येणेगूर या ठिकाणी दिनांक १९ जानेवारी रोजी ५ वे विद्यार्थी साहित्य संमेलन संपन्न झाले.

 नववीत शिकणारा वेदांत संतोष पाटील हा अध्यक्षस्थानी होता. त्याचे अध्यक्षीय भाषण खूप छान व अभ्यासपूर्ण झाले. प्रसिद्ध साहित्यिक डॉ. शेषराव मोहिते यांनी या साहित्य संमेलनाचे उद्घाटन केले. संमेलन आयोजनामागची भूमीका प्रसिद्ध साहित्यिक श्री.बालाजी इंगळे यांनी प्रास्ताविकातून मांडली.

नंतरच्या सत्रात विद्यार्थी कविसंमेलन संपन्न झाले. ३० बालकविंनी कविता सादर केल्या. आजूबाजूच्या परिस्थितीवर भाष्य करणाऱ्या कविता विद्यार्थ्यांनी सादर केल्या. कविता या विषयावर मुलांसोबत संवाद साधला. कविता कशी लिहावी,कवितेचे आकृतीबंध, बालसाहित्याचे वाचन करावे यावर चर्चा केली.नंतर कथानक सत्र संपन्न झाले.

विद्यार्थी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष श्री.महेश हारके सरांनी त्यांच्या शाळेत साहित्य संमेलनाचे नेटके आयोजन केलेले होते. प्रसिद्ध साहित्यिक श्री.बालाजी इंगळे व अभिजात साहित्य मंडळाचे सर्व सदस्य यांनी खूप सुंदर नियोजन केलेले होते.

विद्यार्थी साहित्य संमेलन हा उपक्रम राज्यस्तरीय उपक्रम व्हावा असे वाटते.या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांना वाव मिळतो. भाषिक अनुभव मिळतात. अध्ययन निष्पत्ती विकसीत होण्यास मदत होते. विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्व विकसनास मदत होते.

Friday, 2 December 2022

जादुई जंगल निर्मितीचा प्रवास

 मी जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून मुलांसोबत काम करत आहे. मुलांसोबत काम करण्याचा आनंद काही औरच असतो. मुलांसोबत गप्पागोष्टी करणे, त्यांना गोष्टी, सांगणे, कविता गाऊन दाखविणे,त्यांना पुस्तके वाचून दाखवणे, एखादी नाटिका बसविणे असे शालेय उपक्रम शाळेत राबवित असतो. मी सांगितलेल्या गोष्टी मुलांना खूप आवडतात. मुले गोष्टी सांगण्याचा आग्रह धरतात.

मी भूम तालुक्यात २००९ साली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामेश्वर या शाळेवर काम करत असताना मुलांना गोष्टी सांगायचो. मुलांना गोष्टी खूप आवडायच्या. त्यावेळी मी ‘जादूच्या सशाची’ गोष्ट मुलांना सांगितली होती. ती त्यांना खूप आवडली. दुसऱ्या दिवशी तीच गोष्ट मुलांनी सांगण्याचा आग्रह धरला. दुसऱ्या दिवशी मुलांना ती गोष्ट सांगितली. मुलांना मी मनात गोष्ट तयार करून सांगत होतो. दररोज गोष्ट सांगणे असे काही दिवस सुरू होते. एक दिवस मुलांना म्हटलं, “अरे आता गोष्ट संपली.”  पुढे काय? पुढे काय? याची मुलांना उत्सुकता लागली होती. त्यामुळे मुले मला दररोज गोष्ट सांगण्याचा आग्रह धरायची. पुढे नंतर मी जि. प. प्रा. शाळा हाडोंग्री या शाळेवर गेलो. त्या शाळेतही ‘जादूच्या सशाची’ गोष्ट मुलांना सांगितली. त्यांनाही ती खूपच आवडली. मग मी ठरवलं की आता लिहून काढूयात. मुलांसाठी लिहायला हवं असं नेहमी वाटायचं.   
      
   लेखन करताना किशोरवयीन विद्यार्थी हाच वाचकवर्ग डोळ्यासमोर ठेवून कादंबरी लिहायला सुरुवात केली. मुलांसाठी कादंबरी लिहिण्याचा हा माझाच पहिलाच प्रयत्न होता. एका जंगलात हा जादूचा ससा जादूच्या करामती करतो. नंतर तो त्या जंगलाचा सेनापती होतो. जंगलाचं रक्षण करतो असं कथानक घेऊन या कादंबरीचे लेखन सुरू केले.पुढे काही दिवस लेखन बंद होते. मनात राहून राहून असे वाटायचे की मुलांना हा विषय एवढा आवडलेला आहे. मग आपण लिहायला हवं. पण काही वर्ष लेखन बंदच राहिलं.  
     
कोरोनाच्या कालावधीत सर्व बंद होतं. सर्वजण घरातच होते. यावेळी कादंबरीचे राहिलेले लेखन पूर्ण केलं. त्याची संहिता राजहंस प्रकाशनकडे पाठविली. राजहंसच्या टीमने अथक परिश्रम घेऊन अल्पावधीतच सुंदर कादंबरीची निर्मिती केली. राजहंस प्रकाशनामार्फत ही कादंबरी प्रकाशित झाल्यानंतर खूप आनंद वाटला. राजहंसने पाठविलेल्या भेट प्रती पाहिल्यावर डोळ्यात आनंदाश्रू तरळले. हे पुस्तक खूपच छान झाले होते. आतील चित्रे व मुखपृष्ठ तर खूपच सुंदर होते. बालमनाला भावणारी त्यांच्या भावविश्वाला साद  घालणारी चित्रे चित्रकार योगीता धोटे यांनी काढलेली होती.

ही कादंबरी अल्पावधीतच  बालवाचक व साहित्यरसिक, साहित्यिक, समीक्षकांपर्यंत पोहोचली. अनेक शाळांमधील शिक्षकांनी ही कादंबरी आवडल्याचे फोनद्वारे कळविले. बऱ्याच शाळांमधील विद्यार्थ्यांनी ‘जादुई जंगल’ या बालकादंबरीचा पुस्तक परिचय लिहिला. परभणी जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या रायपूर शाळेतील तनुष्का काकडे, वैष्णवी मस्के यांनी या कादंबरीचा छान परिचय लिहिला. आमच्या जि.प.प्रा. शाळा राघुचीवाडी या शाळेतील भक्ती बेलदार हिने छान पुस्तक परिचय लिहिला आहे. अनेक विद्यार्थ्यांनी कादंबरी आवडल्याचे फोन करून सांगितले. पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला पालकांसोबत अनेक विद्यार्थी आलेले होते. त्यांना या पुस्तकापासून अवांतर वाचनाची, लिहिण्याची प्रेरणा मिळाली असेही काही विद्यार्थ्यांनी सांगितले.

शिक्षण क्षेत्रात रचनात्मक व गुणात्मक काम करणाऱ्या शिक्षक व अधिकार्‍यांनी या बालकादंबरीबद्दल खूप छान प्रतिक्रिया दिल्या आहेत. साहित्यिक बालाजी इंगळे, व्यंकटेश चौधरी, बालसाहित्यिक डॉ. सुरेश सावंत, फारुक काझी, विशाल तायडे, मुलांसोबत भाषाशिक्षणाचं काम करणाऱ्या मीनाताई निमकर, बालरोगतज्ज्ञ अभय शहापूरकर यांनीही कादंबरीचे कौतुक केले आहे. डॉ.सुरेश सावंत, संदीप वाघचौरे यांनी वर्तमानपत्रांमध्ये या कादंबरीचे समीक्षण लिहिले. मुग्धा मणेरीकर यांनी गोव्यातील गोवन वार्ता वर्तमानपत्रांतील तरंग पुरवणीत समीक्षण लिहलेले आहे.

अनेक शाळेत ही बालकादंबरी मुलांसोबत वाचली जात आहे. शाळाशाळांमधून या कादंबरीचे प्रकटवाचन, अभिवाचनाचे कार्यक्रम सुरू आहेत. अगदी सात-आठ वर्षाची मुलंही एकदा हे पुस्तक हातात आलं की सोडायला तयार होत नाहीत. हे मी प्रत्यक्ष अनुभवलं आहे. मुलं ‘जादुई जंगल’ या कादंबरीच्या प्रेमात पडत आहेत याचा मनस्वी आनंद होत आहे. जंगलातील गमतीजमती मुलांना खूप आवडत आहेत. या कादंबरीचा पुढचा भाग केव्हा येणार याबद्दलही अनेक मुलांनी विचारणा केली आहे. या निमित्ताने मुलांना बालसाहित्याची  गोडी लागत आहे. या बालकादंबरीची पहिली आवृत्ती केवळ आठ महिन्यातच संपली आहे. या सर्व प्रवासात खूप नवीन शिकायला मिळालं.बालवाचकांच प्रेम मिळालं.अजून काय हवं!

 


Monday, 7 November 2022

बालसाहित्य निर्मिती काळाची गरज

गेल्या आठवड्यात प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ आदरणीय डाॅ.अभय शहापूरकर यांना माझी मुलांसाठी लिहलेली पोपटाची पार्टी(बालकवितासंग्रह ) व जादूई जंगल (बालकादंबरी) ही पुस्तके भेट दिली होती. आपल्या व्यस्त वेळेतून त्यांनी ही पुस्तके वाचून छान लेखाच्या स्वरूपात अभिप्राय पाठवला आहे. यामुळे निश्चितच बालसाहित्याला पाठबळ व बालसाहित्यिकांना प्रेरणा मिळते.

अभिप्राय

माझे स्नेही व बालसाहित्यिक श्री. समाधान शिकेतोड सरांनी त्यांची नुकतीच प्रकाशित झालेली दोन पुस्तके मला भेट दिली. त्यातले एक पुस्तक मुलांच्या गंमत गोष्टींचे “जादुई जंगल” हे राजहंस प्रकाशन संस्थेने प्रकाशित केले आहे. तसेच “पोपटाची पार्टी” हा बालकवितासंग्रह इसाप प्रकाशन नांदेड यांनी प्रकाशित केला आहे. ही दोन्हीही पुस्तके वाचली. ही दोन्हीही पुस्तके वाचत असताना मला मागील काळातील बालसाहित्य आठवले. त्यावेळेस ईसापनिती, पंचतंत्र ईत्यादींच्या कथा मुले आवडीने वाचत. त्यानंतर चांदोबा, कुमार, किलबिल, किशोर, फुलबाग आदी मासिकांनी बालसाहित्यात मोलाची भर टाकली. नंतरच्या कालखंडात बालसाहित्यात फार कांही भरीव लिखाण झाले नाही. कांही मराठी चित्रकथा (कॉमिक्स) आल्या परंतू त्यात सातत्य राहिले नाही.
मराठी बालसाहित्याचा प्रारंभ सानेगुरूजी, महादेवशास्त्री जोशी, आचार्य अत्रे, गंगाधर गाडगीळ यांचे साहित्याने झाला. त्यात समकालीन लेखक- भा.रा. भागवत , मंगेश पाडगांवकर, निर्मला माने एकनाथ आव्हाड ईत्यादींनी मोलांची भर घातली. परंतु साहित्याच्या क्षेत्रात बालसाहीत्य कायमच दुर्लक्षिलेले राहीले. वास्तविक बालसाहित्य हा अवघड साहीत्य प्रकार आहे. मुलांचे भावविश्व समजून, त्यांच्या पातळीवर जाऊन,त्यांना समजेल, आनंद देईल अशी साहित्य निर्मिती करणे हे आव्हानात्मक काम आहे.
बरेचदा आपण मुलांना गृहीत धरतो. त्यांचे स्वतंत्र अस्तित्व आहे, त्यांच्याही भाव-भावना आहेत, त्यांचेही वेगळे विचार असु शकतात हे आपण समजून घेत नाही. पालक त्यांना आपलाच एक अवयव (appendage) समजतात व आपले विचार, आवडी निवडी त्यांच्यावर लादण्याचा प्रयत्न करतात. हया सर्व गैरसमजुतीला छेद देत बालसाहित्य निर्माण करावे लागते.
चालु काळात मोबाईलचा वापर वाढला. कोरोना साथीमुळे ऑनलाईन शिक्षणासाठी मुलांच्या हातात मोबाईल आला व त्यांचा वाढलेला “स्क्रिन टाईम” मानसिक रोगटपणाला आमंत्रण देऊ लागला. त्याबाबत खुप चर्चा होते. वाचन संस्कृती कमी होण्यासाठी मोबाईलला जबाबदार धरले जाते. परंतु बालकांना आपण त्या आभासी जगातुन बाहेर आणण्यासाठी त्यांना आनंद देणारा सक्षम पर्याय, बाल साहित्याच्या रूपाने देऊ शकतो. त्यामुळे उत्तमोत्तम बाल साहित्य निर्मिती काळाजी गरज ठरते. 
साहित्याच्या क्षेत्रात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजन केले जाते. त्याचबरोबर विद्रोही साहित्य संमेलन, गुराखी साहित्य संमेलन, वंचितांचे, महिलांचे साहित्य संमेलन ईत्यादी नियमितपणे आयोजित केले जातात पण बालसाहित्य संमेलन अभावानेच दिसते. त्यासाठी समाजधुरीणांनी, साहित्यिकांनी, साहित्यप्रेमींनी आवर्जून प्रयत्न केले पाहीजेत. नपेक्षा बालके येणाऱ्या काळात वाचनानंदाला पारखे होतील. प्रस्थापित साहित्यकृतीत बालकांचे प्रतिनिधित्व आभावानेच दिसते.
श्री. शिकतोडे सरांनी बालसाहित्य प्रकार अत्यंत यशस्वीरित्या हाताळला आहे. शिक्षकी पेशात असलेने मुलाशी समरस होऊन, त्यांचे भावविश्व समजून, उमजून त्यांची ही मुलांना निखळ आनंद देणारी साहित्यनिर्मिती आहे. त्यांच्या “जादुई जंगल” हया पुस्तकात जंगलातील प्राण्यावर आधारीत कथा आहेत. लहान मुलांना प्राणी आपल्यासारखे बोलतात हयाचे खुप अप्रुप वाटते. तसेच जादुचेही खुप आकर्षण असते. ससे, माकड, जिराफ, वाघ-सिंह ईत्यादी प्राणी त्यांचे सखे-सोबती बनतात. मुलांना समजेल अशा सोप्या भाषेत व लहान वाक्यात या कथा लिहील्या आहेत. मुलांना निखळ आनंद देणारी ही साहित्यकृती आहे हे निश्चित ! पुस्तकात चित्रेही छान छापली आहेत, फक्त ती रंगीत असती तर अजुन उठावदार दिसले असते.
श्री. शिकेतोडे सरांचा बालकविता संग्रह “पोपटाची पार्टी” ही पुस्तिकाही सुंदर आहे. बालकवितांच्या जगात सरांच्या सिध्दहस्त लेखणीने मुलांना निखळ आनंद देण्याबरोबरच त्यांच्या समाजिक जाणिवही जागृत करण्याचा, त्यांना समाजाप्रती संवेदनशील बनविण्याचाही यशस्वी प्रयत्न केला आहे. बेडूक, खारूताई, माकड, चिऊताई, कावळा ईत्यादी परिचित प्राण्यासंबंधी छोटया गेय कविता, त्याचबरोबर ग्रामीण जीवनातील बालकांना मोहवून टाकणाऱ्या बैलगाडया, गुऱ्हाळ, जत्रा ईत्यादीवरही कविता आहेत. शेतकऱ्यांच्या कष्टप्रद जीवनावर, पोस्टमन, पोलीस यांचाही परिचय मुलांना समजेल अशा भाषेत करून दिला आहे.
दोन्ही पुस्तकांचे निर्मिती मुल्य उच्चदर्जाचे आहे. बालसाहित्याच्या क्षेत्रातील मोठी पोकळी हया दोन्ही पुस्तकामुळे कांही अंशी भरून निघेल अशी आशा आहे. भविष्यातही श्री. शिकेतोडे सरांच्या समर्थ लेखणीतून सकस बालसाहित्य निर्माण व्हावे अशी अपेक्षा व त्यासाठी त्यांना शुभेच्छा !

डॉ. अभय शहापूरकर