Showing posts with label स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव. Show all posts
Showing posts with label स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव. Show all posts

Thursday, 19 August 2021

शंभुधन फुगलोंसा

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव

शंभुधन फुगलोंसा
---------------------------------------
विद्यार्थी मित्रांनो,आपल्या देशातून इंग्रज सहजासहजी गेले नाहीत. त्यांनी भारतीय जनतेवर अन्याय केले.त्यांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी कित्येक क्रांतीकारकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले.आज आपण आसाम राज्यातील अशाच एका क्रांतीकारकाची गोष्ट पाहणार आहोत. त्या क्रांतीकारकाचे नाव आहे शंभुधन फुगलोंसा.

शंभुधन फुगलोंसा हे एक आसामी क्रांतीकारक होते. त्यांचा जन्म आसाम राज्यातल्या माईब-लकेर गावात सन १८५० साली झाला.

शंभुधन फुगलोंसा हे लहानपणापासूनच इंग्रज 
अधिकाऱ्याचा उन्मत्तपणा व अत्याचार पाहत आलेले होते.हा अन्याय त्यांना सहन होत नव्हता. त्यांच्या मनात इंग्रजाबद्दल चिढ निर्माण झाली होती.या देशातून इंग्रजांना हाकालून द्यावे असे त्यांना वाटायचे.शंभुधन यांनी तरूण वयातच युद्धशास्त्राचे शिक्षण घेतले होते. त्यांनी समविचारी तरूण मित्रांच्या सहाय्याने तरूणांचे संघटन बनविले. शंभुधनांनी त्या सर्वांनाही सैनिकी शिक्षण दिले होते. इंग्रज अत्याचाराच्या विरोधात शस्त्राने प्रतिकार करण्याची मानसिकता त्यांचात ठासून भरली होती. त्यामुळे ठिकठिकाणी इंग्रजाविरोधात संघर्ष सुरू झाले होते.

इंग्रज सरकार शंभुधन फुगलोंसांना पकडण्याचा प्रयत्न करीत होते. परंतु त्यांनी आपल्या कचार जातीच्या आदिवासी सहकाऱ्यांच्या सहाय्याने इंग्रजांशी छापामार युद्ध सुरू ठेवले होते. ते भूमीगत राहून इंग्रजाविरोधात जनतेला चेतवित होते. मेजर वायडने शंभूधनना एका खेड्यात गाठले. शंभूधन आणि मेजर वायड यांच्यामध्ये तुंबळ युद्ध झाले. शंभुधनने मेजर वायडचा खातमा केला. 

इंग्रज अधिकाऱ्यांनी कूटनीतीचा अवलंब करून शंभुधनांना पकडण्याचा प्रयत्न केला. पण एका गद्दाराने इंग्रजांना शंभुधनाचा ठावठिकाणा दिला. मोठी सेना घेवून इंग्रज अधिकारी मेजर विल्यमने शंभुधनला घेरले. त्यांच्यामध्ये घनघोर युद्ध झाले. त्या युद्धात शंभुधनजी गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर आवश्यक ते उपचार वेळेवर न झाल्याने त्यांची शारिरीक स्थिती अधिकच बिघडली. शेवटी १२ जानेवारी, इ.स. १८८३ रोजी शंभुधन फुंगलोसा यांचा मृत्यू झाला.

Wednesday, 18 August 2021

जॅक्सनवर गोळ्या झाडणारे क्रांतिकारक अनंत कान्हेरे

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव
 
जॅक्सनवर गोळ्या झाडणारे क्रांतिकारक अनंत कान्हेरे
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

विद्यार्थी मित्रांनो,आपण भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहोत.स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांच्या गाथा आपल्याला प्रेरीत करत राहतील. आज  रत्नागिरीत जिल्ह्यातील अशाच एका क्रांतिकारकाची शौर्यकथा तुम्हाला सांगणार आहे.

अनंत लक्ष्मण कान्हेरे हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक सशस्त्र क्रांतिकारक होते. ते गणेश दामोदर सावरकर आणि विनायक दामोदर सावरकर यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या 'अभिनव भारत' या क्रांतिकारक संघटनेचे सदस्य होते. नाशिकचा कलेक्टर ए.एम.टी. जॅक्सन याची हत्या करणारे अनंत कान्हेरे हे खुदीराम बोस यांच्यानंतरचे सर्वांत तरुण वयाचे भारतीय क्रांतिकारक ठरले.

अनंत कान्हेरे यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील आयनी मेटे या गावात १८९२ मध्ये झाला. त्यांना दोन बहिणी आणि दोन भाऊ होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण इंदूर येथे तर माध्यमिक शिक्षण औरंगाबाद येथे झाले. त्यांच्या मोठ्या भावाचे नाव गणपतराव आणि धाकट्या भावाचे नाव शंकरराव होते.
कान्हेरे १९०३ मध्ये आपल्या काकांकडे पुढील शिक्षणासाठी औरंगाबादला गेले. त्यांचे भाऊ गणपतराव बार्शी येथे राहत होते. त्यांच्याकडे काही काळ राहून १९०८ मध्ये ते पुन्हा औरंगाबादला परत गेले. तेव्हा ते गंगाराम रुपचंद श्रॉफ यांच्या घरात भाड्याने राहत असत.गंगाराम यांचा येवल्यात टोणपे नावाचा एक मित्र होता.

 त्या काळात अनेक गुप्त क्रांतिकारी संस्था कार्यरत होत्या. नाशिकमधील एका गुप्त संस्थेचा टोणपे हे सदस्य होते. गणू वैद्य आणि गंगाराम एकदा नाशिकमधील गुप्त क्रांतिकारी संस्थेसाठी शस्त्रे खरेदी करण्यासाठी केले होते. या वैद्यांशी कान्हेरे यांची ओळख झाली. नंतर कान्हेरे यांनी त्या दिवसातील मैत्रीबद्दल ‘मित्र प्रेम’ नावाची कादंबरी लिहिली. कान्हेरे क्रांतिकारी गटांच्या कार्याकडे आकर्षित झाले. सावरकर बंधूनी नाशिक येथे अभिनव भारत संस्थेची स्थापना केली होती. कृष्णाजी गोपाळ कर्वे यांनी बाबाराव सावरकरांच्या मार्गदर्शनाखाली अशाच एका गुप्त गटाची स्थापना केली होती. या संस्थेचे दुसरे सदस्य विनायक नारायण देशपांडे होते. सावरकर बंधू, मदनलाल धिंग्रा यांच्याकडून स्फूर्ती घेऊन अनंत कान्हेरे ह्यांनी नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याला ठार मारण्याचे ठरविले.
त्याला कृष्णाजी गोपाळ कर्वे आणि विनायक नारायण देशपांडे अशा समवयस्क साथीदारांची जोड मिळाली.
जॅक्सनची मुंबई येथे वरच्या पदावर बदली करण्यात आली. त्याला नाशिक येथेच मारणे जास्त सोपे होते. २१ डिसेंबर १९०९ या दिवशी नाशकातल्या विजयानंद थिएटरमध्ये 'शारदा' या नाटकाचा प्रयोग जॅक्सनच्या निरोप समारंभासाठी ठरला होता. जॅक्सन मराठी भाषेचा आणि नाटकांचा चाहता असल्याने या प्रयोगास येणार होताच. नाटकाचा प्रयोग सुरू होण्याची वेळ झाली, सर्वजण आपापल्या जागेवर स्थानापन्न होत असताना अनंत कान्हेरे ह्यांनी जॅक्सनवर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या. जॅक्सन जागीच ठार झाला. अनंत कान्हेरे आपल्या जागेवरच शांतपणे उभे राहिले, त्यांना अटक करण्यात आली. कान्हेरे, कर्वे आणि देशपांडे यांच्यावर खटला भरण्यात आला. २० मार्च इ.स. १९१० रोजी तिघांनाही फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. १९ एप्रिल १९१० या दिवशी तिघांनाही ठाण्याच्या तुरुंगात फाशी देण्यात आले.

ठाण्याच्या तुरुंगात अनंत कान्हेरे यांचे स्मारक आहे. नाशिकमध्ये 'अनंत कान्हेरे' नावाचे क्रिकेटचे मैदान आहे.

Tuesday, 17 August 2021

क्रांतिकारक मदनलाल धिंग्रा

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव

क्रांतिकारक मदनलाल धिंग्रा
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

मदनलाल धिंग्रा हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक क्रांतिकारक होते. इंग्लंडमध्ये शिकत असताना त्यांनी सर विलियम हट कर्झन वायली या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली. या घटनेचा भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील महत्तवाच्या क्रांतीकारी घटनांपैकी एक म्हणून उल्लेख केला जातो.

मदनलाल धिंग्रा यांचा जन्म अमृतसर येथे उच्च मध्यमवर्गीय कुटुंबात १८ सप्टेंबर १८८३ रोजी झाला. त्यांचे वडील एक प्रसिध्द डॉक्टर होते आणि बंधू बॅरिस्टर होते. मदनलाल यांचे शिक्षण अमृतसरला झाले. ते पंजाब विद्यापीठातून बी. ए. झाले व १९०६ मध्ये उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. तत्पूर्वी विद्यार्थीदशेतच त्यांचा विवाह झाला. इंग्लंडमध्ये त्यांनी स्थापत्य अभियांत्रिकीचा अभ्यास केला. तेथील वास्तव्यात त्यांचा स्वातंत्र्यवीर सावरकर, श्यामजी कृष्णवर्मा, हरदयाळ शर्मा वगैरे क्रांतिकारकांशी स्नेह जमला.

 ते होमरूल लीग व सावरकरांच्या अभिनव भारत या संस्थांचे सभासद झाले. त्यांच्या भावनाप्रधान मनावर खुदिराम बोस व कन्हैयालाल या क्रांतिवीरांच्या बलिदानाचा फार मोठा परिणाम झाला. त्यांनी सशस्त्र क्रांतिवीरास साजेसे शिक्षण घेतले. पुढे त्यांनी भारताच्या मंत्र्याचा स्वीय सहाय्यक कर्नल विल्यम कर्झन वायली याच्या खुनाचा कट केला. त्यांचा पहिला बेत फसला. पुढे १ जुलै १९०९ रोजी इंपीरियल इन्स्टिट्यूटच्या जहांगीर हाऊसमध्ये इंडियन नॅशनल असोसिएशनच्या सभेच्या वेळी त्यांनी कर्झन वायली यावर गोळ्या झाडल्या. त्या वेळी कोवास लालाकाका हाही मध्ये आला. दोघेही मरण पावले. कर्झन वायली खरेतर मदनलाल यांच्या वडिलांचा स्नेही होता. या खुनाबद्दल मदनलाल यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. पेन्टोनव्हिल (लंडन) तुरुंगात ते ‘भारत माता की जय’ च्या उद्‌घोषात फाशी गेले

फाशीवर जाण्यापूर्वीच्या शेवटच्या वक्तव्यात मदनलाल धिंग्रा यांनी असे म्हटले आहे "आत्म बलिदान कसे करावे ही एकच शिकवण सध्या हिंदुस्थानात देण्यायोग्य आहे. ही शिकवण देण्याचा एकच मार्ग म्हणजे स्वतःचे बलिदान करून मोकळे होणे होय. या जाणिवेने प्रेरित होऊन मी प्राणार्पण करत आहे व माझ्या हौतात्म्याचा मला अभिमान वाटत आहे. याच भारतभूचे संतान म्हणून मला पुनर्जन्म प्राप्त होवो व याच पवित्र कार्यात माझा देह पुन्हा पडो इतकीच ईश्वरचरणी माझी प्रार्थना आहे.भारतीय स्वातंत्र्याचा पक्ष विजयी होऊन, मानवजातीचे कल्याण व ईश्वराचे वैभव यांचा पुरस्कार करणारा स्वतंत्र भारतवर्ष जगात आत्मतेजाने तळपू लागेपर्यंत माझ्या जन्ममृत्यूचे हे चक्र असेच चालू राहावे अशी माझी परमेश्वराला प्रार्थना आहे.

मदनलाल धिंग्रा आणि सावरकर यांच्या जीवनावर मराठीत 'चॅलेंज' नावाचे नाटक आले आहे. पहिल्या दहा प्रयोगांना मोफत किंवा 'नाटक पहा आणि आवडेल तेवढे पैसे द्या' अशी सवलत आहे. नाटकाचे लेखन,दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केलेले आहे.

अशा या क्रांतिकारकाच्या बलिदानामुळेच आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त मनापासून प्रणाम.
स्त्रोत-विकीपिडीया


Monday, 16 August 2021

लक्ष्मी एस. स्वामीनाथन ऊर्फ लक्ष्मी सहगल

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव

लक्ष्मी एस. स्वामीनाथन ऊर्फ लक्ष्मी सहगल 
---------------------------------------
 लक्ष्मी सहगल यांचा जन्म २४ ऑक्टोबर १९१४ साली झाला. त्या पेशाने डॉक्टर होत्या.१९४३ साली त्यांनी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेत राणी लक्ष्मीबाई रेजिमेंटच्या कर्नल म्हणून जबाबदारी सांभाळली. लक्ष्मी सहगल या कॅप्टन लक्ष्मी या नावाने ओळखल्या जातात.

मद्रास उच्च न्यायालयामध्ये फौजदारी कायदा करणारे वकील एस. स्वामिनाथन हे त्यांचे वडील होत. लक्ष्मी यांनी १९३८ साली मद्रास मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएसची पदवी घेतली. एक वर्षानंतर त्यांना स्त्रीरोगतज्ज्ञ आणि प्रसूतिशास्त्रात पदविका मिळाली. चेन्नई येथे असलेल्या कस्तुरबा गांधी हॉस्पिटलमध्ये त्यांनी डॉक्टर म्हणून काम केले.

कॅप्टन लक्ष्मी या आझाद हिंद सेनेच्याच्या झाशी राणी पथकाच्या प्रमुख कॅप्टन होत्या. १९४३ ऑक्टोबर मध्ये यांना सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेच्या महिला पथकाचे प्रमुख पद देण्यात आले. या पथकात त्या वेळी १८५ स्त्री सैनिक होत्या. हा आकडा नंतर २ हजारवर पोचला. पिस्तूल, बंदूक, मशीनगन्स यासारखी शस्त्रे वापरण्याचे शिक्षण या स्त्रियांना दिले जाई. प्रारंभी या स्त्रियांना शुश्रूषा पथकात काम करण्याची संधी दिली जात असे. पण नंतर लक्ष्मी यांच्या विनंतीवरून सुभाष बाबू यांनी महिलांच्या दोन पथकांना आघाडीवर जाण्यास संधी दिली आणि हिंदुस्थान आणि ब्रह्मदेश यांच्या आघाडीवर झालेल्या युद्धात या स्त्रियांनी विजय मिळविला. नंतर आझाद हिंद सेना माघार घेत असता यांच्या फौजेने निकराचा लढा दिला आणि सुभाषबाबू यांना निसटून जाण्याची संधी दिली व मगच त्या ब्रिटिशांना स्वाधीन झाल्या. युद्धाच्या अखेरीला त्या जखमी सैनिकांची सेवा करीत होत्या त्यामुळे त्यांच्यावर खटला न भरता त्यांना सोडून देण्यात आले.

त्यानंतर बांगला देशात वैद्यकीय सुविधा आणि बचाव कार्यातही लक्ष्मी सहगल यांचा सहभाग होता. १९४७ च्या मार्चमध्ये लाहोरच्या प्रेम कुमार यांच्याशी त्यांनी लग्न केले. विवाह झाल्यानंतर ते कानपूर येथे स्थायिक झाले.तिथे त्यांनी आपली वैद्यकीय प्रॅॅक्टिस चालू ठेवली आणि भारताच्या फाळणीनंतर मोठ्या संख्येने आलेल्या शरणार्थींना मदत केली.

सेहगल यांनी सन १९७१ मध्ये कम्युनिस्ट पक्षात प्रवेश केला. त्या भारतीय राज्यसभेच्या सदस्याही होत्या.
आझाद हिंद सेनेत काम करण्याबरोबरच वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रात कॅप्टन सेहेगल यांनी भरीव कामगिरी केली.
हृदय विकाराचा तीव्र झटका आल्याने कॅप्टन लक्ष्मी यांना दि. १९ जुलै २०१२ रोजी कानपूर येथील मेडिकल सेंटर रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना कृत्रिम श्वासोच्छवासावर ठेवण्यात आले. सोमवार दिनांक २३ जुलै २०१२ ला सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.


Sunday, 15 August 2021

देशाची पहिली लक्ष्मीबाई राणी चन्नम्मा

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव

 

देशाची पहिली लक्ष्मीबाई राणी चन्नम्मा

---------------------‐-----------------------------------------------------------------

स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक राजांनी व संस्थानिकांनी आपले स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी इंग्रजांसोबत अनेक लढाया केल्या भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्याप्रमाणेच एका रणरागिनीने आपले शौर्य,धैर्य दाखवत इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते. त्या धाडसी शूरवीर होत्या कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर या संस्थानाच्या राणी कित्तुर चेन्नम्मा.

 कित्तुर चेन्नम्मा यांचा जन्म राजघराण्यातील धुळप्‍पा देसाई व पद्मावती यांच्या पोटी २३ ऑक्टोंबर १७७८ रोजी झाला. त्यांना लहानपणापासूनच  तिरंदाजी,अश्वारोहण, तलवारबाजीचे युद्ध अशा मर्दानी  कलांची आवड होती. या सर्व कलांमध्ये त्यांनी प्राविण्य मिळविले होते. राणी चन्नम्माला कानडी,मराठी,उर्दू या भाषा अवगत होत्या. पुढे कित्तुरचे संस्थानिक मल्लसर्ज यांच्याशी त्यांचा विवाह झाला. मल्लसर्ज राजा व राणी चेन्नम्माने राज्याचा कारभार उत्तम चालविला. राजांच्या मृत्यूनंतर इंग्रजांनी दत्तक वारस नामंजूर करून कित्तुर संस्थान खालसा करण्याचे ठरविले. दत्तक वारसा नामंजूर करून इंग्रज अधिकारी थॅकरे याने कित्तूर संस्थान ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. राणी चेन्नम्माने ब्रिटीशांच्या सैन्याला न घाबरता त्यांच्याशी दोन हात केले. या युद्धात राणीने पराक्रम गाजवला.ब्रिटिश अधिकारी थॅकरे या युद्धात मारला गेला. 

 स्वतःच्या दरबारातील काही व्यक्तींच्या फितुरीमुळे राणीला इंग्रजांनी कैद केले. राणीला कैद करुन बेलहोंगलच्या तुरुंगात ठेवले. तिथेच राणीचा मृत्यू झाला. भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील ऊर्जस्वल रक्तरंजित अध्यायाचा शेवट झाला.

 कित्तूर संस्थानातील राज्यकारभार राणीने समर्थपणे सांभाळला होता. रयतेच्या अडीअडचणी दूर करून जनतेच्या मनावर अधिराज्य गाजविले होते. बेळगावपासून ५० किमी अंतरावर कित्तूरचा किल्ला आजही राणी चन्नम्माची कहाणी सांगतो उभा आहे. या किल्ल्याला एक वेळ अवश्य भेट द्यायला हवी.

 राणी चन्नम्मा च्या कार्याची दखल घेत सन २००७ साली देशाच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते संसद भवनाच्या प्रांगणात राणी चन्नम्मा यांच्या दिमाखदार पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. राणी चन्नम्मा यांच्या स्मरणार्थ भारतीय रेल्वे मंत्रालयाने राणी चन्नम्मा एक्सप्रेस ही एक प्रवासी रेल्वे गाडी सुरू केली आहे. ती दररोज मिरज ते बंगळूर दरम्यान धावते. तसेच कर्नाटक राज्यात राणी चेन्नम्मा यांच्या नावाने एक विद्यापीठही आहे. 

 भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त या महासंग्रामातील वीरांला स्मरण करूया.त्यांना मनापासून प्रणाम करूया. ही त्यागाची,बलिदानाची गौरवगाथा आपल्या विद्यार्थ्यांना सांगूया.