Showing posts with label लेख. Show all posts
Showing posts with label लेख. Show all posts

Sunday, 17 January 2021

मुलांचे भावविश्व आणि बालसाहित्य

                                     गेल्या अनेक वर्षांपासून खुप सारं लेखन मुलांसाठी लिहलं गेलेले आहे. लीळाचरित्रात चक्रधरस्वामींनी रडणाऱ्या लहानगीला सांगितलेली गोष्ट, हे पहिलं उपलब्ध   बालसाहित्य. सानेगुरूजी, ग.दि.माडगूळकर, विंदा करंदीकर, दत्ता टोळ, अनिल अवचट, यदुनाथ थत्ते, मंगेश पाडगावकर, गिरीजा कीर,  भा. रा. भागवत, गो. नी .दांडेकर, महावीर जोंधळे, बाबा भांड, विजया वाड,राजीव तांबे पासून अगदी अलिकडे सुरेश सावंत, ल.म.कडू, एकनाथ आव्हाड, पृथ्वीराज तौर, दत्ता हलसगीकर, आबा महाजन, विशाल तायडे, फारूक काझी, नरेंद्र लांजेवार, बालाजी इंगळे अशा बालसाहित्यक लेखकांची आपल्याला समृद्ध परंपरा लाभलेली आहे.या साहित्यिकांच्या लेखणीने खुप दर्जेदार बालसाहित्य निर्माण झाले.आजही काही बालगीते, कविता आपल्या ओठांवर गुणगुणत राहतात.

                  मुलांचे भावविश्व समजून घेऊन त्यांच्यासाठी लिहिणं तसं अवघडच! अगदी उमलत्या वयात मुले चित्राच्या प्रेमात पडतात. निसर्गातील विविध घटनांबद्दल त्यांच्या मनात कुतूहल निर्माण होते. आकाशातील इंद्रधनुष्य पाहून मुले हरखून जातात. तर कधी विजेच्या कडकडाटासह मनात भीती धरून बसतात. भिरभिरणारी फुलपाखरे, चमचमणारा रातकिडा, पाण्यावरचे फुगे, अंगणातील चिऊताई हे सगळं आवडायला लागतात. चिमणी-कावळ्याच्या गोष्टीत मुले रमायला लागतात. आजूबाजूला घडणाऱ्या घटना, प्रसंग यांचे सूक्ष्म निरीक्षण करण्याची क्षमता लहान मुलांमध्ये निर्माण झालेली असते. त्यामुळे मुलांना भोवताल खुणावत असतो. एखाद मुलं लवकर बोलत नसेल तर जुनी माणसं म्हणायची त्याला बाजारात घेऊन जा.लवकर मुलं बोलेल. त्याच्या कानावर पडणाऱ्या विविध भाषा समजून घेऊन अर्थ लावण्याची त्याची क्षमता विलक्षण असते. त्यामुळे अगदी सुरुवातीच्या काळात मुलांना लिपी परिचय  होण्या अगोदरचे बालसाहित्य म्हणजे मौखिक असते. गाणी, गोष्टी यामधून मुलांचा भाषिक विकास होत असतो. मौखिक परंपरेने आलेले साहित्य आपण मुलांना सांगत असतो. त्या गोष्टी मुलांना आवडत असतात; पण आज संदर्भ बदलले आहेत. हे बदललेले संदर्भ लक्षात घेऊन मुलांसाठी गोष्टी लिहायला हव्यात. मुलांनी पाहिलेले नाही, अनुभवलेले नाही त्याबद्दल त्यांना गोडी वाटत नाही. अशा साहित्याच्या वाचनाने मुले तर्कशुद्ध विचार करू शकत नाहीत. त्यामुळे तहान लागलेला कावळा माठावर बसून खडे टाकतो. यापेक्षा तो कावळा कोल्ड्रिंकच्या दुकानात जाऊन कोल्ड्रिंक पीत बसतो. याबद्दल मुलांमध्ये कुतूहल निर्माण होते. अशा गोष्टी फँटसी जरी असल्या तरी  त्यामध्ये त्यांच्या आजूबाजूच्या परिसराचे संदर्भ यायला हवेत. त्यामुळे मौखिक परंपरेत काळानुसार बदलायला हवेत.

                           बालवयात मुलांना चित्रे मोहिनी घालतात. त्यासाठी उत्तम चित्रकथांच्या पुस्तकांची निर्मिती व्हायला हवी. मुलांसाठी चित्र काढणाऱ्यांची संख्या वाढायला हवी. मुले चित्रातील संदर्भ आपल्या जगण्याशी जोडून पाहत असतात. ते चित्रांविषयी भरभरून बोलतात. त्यांच्या भावविश्वाचा, परिसराचा विचार करून मुलांसाठी चित्र काढायला हवीत. आज-काल मुलांसाठी काढलेल्या चित्रांना मध्यमवर्गीय तोंडावळा दिसून येतो. मुलांचे जगणे, भावविश्व, परिसर त्याला अनुसरूनच चित्रांची निर्मिती करायला हवी. एखाद्या खेडेगावातील बाजार भरलेल्या चित्रांविषयी त्याच गावातील मुले भरभरून बोलतात.त्यामुळे त्यांच्या परीसारतील अनुभवविश्वावर चित्रकथांची पुस्तके तयार करायला हवीत.नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडियाने अशी चित्रकथांची पुस्तके उत्तम तयार केलेली आहेत. कार्टूनची चित्रे मुलांना खूप आवडतात. टीव्हीवरील कार्टूनच्या मालिका वेगळ्या भाषेत असूनही आवडीने पाहत असतात.त्यामुळे मुलांसाठी लिहिताना अशा चित्रांचा वापर करायला हवा.

आपण कुठल्या वयोगटासाठी लिहीत आहोत याची जाण ठेवून लेखकांनी बालसाहित्य लिहायला हवे. जेव्हा मुले कुमारवयात प्रवेश करतात. अशा वेळी त्यांना इसापनीती, परिकथा यापेक्षा साहस कथा, विज्ञान कथा आवडायला लागतात. म्हणून हॅरी पॉटर सारखे साहित्य वर्षानुवर्षे मुलांच्या मनावर अधिराज्य गाजवत राहते. एका विशिष्ट वयापर्यंत मुलांना अद्भुततेच आवड असते. परंतु किशोरवयीन मुलांना साहस कथांबद्दल आवड निर्माण होते.

 जो समाज बालकुमारांची उपेक्षा करतो तो आपल्या भविष्याची उपेक्षा करतो असे बालसाहित्यक यदुनाथ थत्ते यांनी सांगितलेले आहे. बालमनाला सशक्त,साजनशील, कल्पक बनवण्याचे कार्य बालसाहित्य करत असते.मुलांना वयाच्या विशिष्ट टप्प्यावर जी समज निर्माण व्हायला हवी, ती समज निर्माण करण्याचे काम बालसाहित्य करत असते. बालसाहित्यातून भाषा, इतिहास, भूगोल, विज्ञान, कला, रंजन याबाबतची माहिती वेगळ्या पद्धतीने मिळते. बालसाहित्य बालमनाला संवेदनशील बनत असते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देण्याचे काम साहित्य करत असते. म्हणून लहान मुले काय बोलतात, कसे बोलतात, याचे निरीक्षण सुद्धा साहित्यनिर्मितीसाठी फलदायी ठरते. मुलांसाठी पुस्तके केवळ मनोरंजनासाठी नसतात. मुले  चिकित्सक, सर्जनशील विचार करतील असे कथानक, संवाद त्यांच्यासाठी लिहायला हवेत. मुलांनी एखाद्या घटनेवर, प्रसंगावर, पात्रांवर आपले मत मांडायला हवे. त्यांच्या जडणघडणीमध्ये पुस्तके खूप मोलाची भूमिका पार पाडतात. ग्रामीण-शहरी, आदिवासी, वंचित घटकांतील मुलांचे जगणे बालसाहित्यातून यायला हवे. सर्वांच्या भावविश्वाचे प्रतिबिंब साहित्यातून दिसायला हवे.

                         मोठ्यांनी मुलांसाठी लिहिलेले साहित्य याला आपण बालसाहित्य म्हणतो. त्याचबरोबर मुलांनी मुलांसाठी लिहिलेल्या साहित्याला बालसाहित्य म्हणून मान्यता मिळू लागली आहे. मुले कथा, कविता छान लिहू लागले आहेत. किशोरवयीन विद्यार्थी तर बालकादंबरी सारखा साहित्यप्रकार लिहित आहेत. समाजाच्या बालसाहित्याच्या धारणामध्ये आता बदल होत आहेत. इयत्ता सहावीच्या पाठ्यपुस्तकामध्ये सोनाली फुपरे या विद्यार्थिनीची झाड ही कविता आलेली आहे. शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या साहित्यकृती महाराष्ट्र शासनातचे राज्य वाड्मय पुरस्कारसुद्धा मिळालेले आहेत. मुले बालसाहित्यातील वेगवेगळे साहित्यप्रकार हाताळताना दिसत आहेत. मुलांनी लिहिलेल्या कथा,कविता दैनंदिनी,पत्रे,गीते यामध्ये त्यांच्या जगण्याचे प्रतिबिंब पडलेले दिसते. त्यामुळे बालसाहित्यात मुलांच्या भावविश्वाचे प्रतिबिंब पडले तर ते अधिक दर्जेदार व वाचनीय होते.

प्रकाशित- जीवन शिक्षण  (डिसेंबर २०२० )




 

 

Sunday, 13 March 2016

शाळा सिद्धी कार्यक्रम समजून घेऊया

शालेय मूल्यांकनाच्या माध्यमातून शालेय सुधारणा हेच लक्ष्य ठेवून महाराष्ट्रात समृध्द शाळा उपक्रमांतर्गत प्रायोगिक तत्वावर ७२ शाळांचे निर्धारकांकडून बाह्यमूल्यांकन येत्या मार्चअखेर करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे युजीसी नॅकच्या धर्तीवर महा-सॅकच्या माध्यमातून गुणवत्तावाढीसाठी बाह्यमूल्यांकनाच्या आधारे शाळांना मानांकन प्रदान करण्यात येणार आहे.
 
याविषयी सविस्तर वाचा आजच्या लक्षवेधीत - डॉ.जगदीश पाटील सर, ८१४९४९८०२०

बाह्यमूल्यांकनातून मिळणार शाळांना मानांकन
 
विद्यापीठ अनुदान आयोग ज्याप्रमाणे महाविद्यालयांची तपासणी करून त्यांना मानांकन प्रदान करते, अगदी त्याचप्रमाणे राष्ट्रीय पातळीवर शाळासिध्दी हा उपक्रम राबविण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्यातही समृध्द शाळा या नावाने प्रायोगिक तत्वावर निवडक जि.प. शाळांचे बाह्यमूल्यांकन केले जाणार आहे. सध्या शाळांची गुणवत्ता तपासण्यासाठी जि.प. शाळांचा कल आयएसओ करण्याकडे आहे. महाराष्ट्रातील हजारो जि.प. शाळा आयएसओ झालेल्या आहेत. मात्र शाळा आयएसओ करण्यासाठी फी भरावी लागत असून त्याचा भुर्दंड शिक्षकांना बसत असूनही शिक्षक मोठ्या मनाने हा भुर्दंड सहन करीत आहेत. मात्र केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारद्वारे शाळासिध्दी उपक्रमांतर्गत शाळा तपासणी करून शाळांना मानांकन दिले जाऊन त्यांचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याने शाळांची गुणवत्ता आपोआपच सिध्द होणार आहे.
 गेल्या काही वर्षांपासून जि.प. शाळांमध्ये गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षणक्षेत्रातील प्रत्येक घटक झटत आहे. डिजीटल, ज्ञानरचनावाद, शैक्षणिक साहित्य निर्मिती, नवोपक्रम, प्रशिक्षण, प्रदर्शन, सादरीकरण, नाविन्यपूर्ण उपक्रम, अध्ययन-अध्यापन, कृतीशील अध्ययन पध्दती यासह विविध माध्यमांतून जि.प. शाळांच्या गुणवत्तेत वाढ होत आहे. या गुणवत्तेत आणखी भर पडावी यासाठी राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे मूल्यांकन व प्रमाणीकरण करून घेवून शाळांची गुणवत्ता आश्‍वासित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र स्कूल असेसमेंट व ऍक्रिडिटेशन कौन्सिल (एम-सॅक) स्थापन केले आहे. त्या माध्यमातून राज्यातील सर्व शाळांचे मूल्यांकन व प्रमाणीकरण केले जाणार आहे. राष्ट्रीय पातळीवरील शाळासिध्दी हा कार्यक्रम राज्यात समृध्द शाळा या नावाने प्रायोगिक तत्वावर ७२ शाळांमध्ये सुरू करण्याचे सूचित करण्यात आले आहे. प्रत्येक जिल्ह्यातील २०० उपक्रमशील शाळांपैकी उत्कृष्ट दोन शाळांची निवड जिल्हास्तरावर करण्यात आली आहे. या ७२ शाळांनी १० मार्चपर्यंत राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन आणि प्रशासन म्हणजेच न्यूपा नवी दिल्ली या वेबसाईटवर ऑनलाईन स्वयंमूल्यमापन केले आहे. त्यानंतर या शाळांचे निर्धारकांकडून बाह्यमूल्यांकन केले जाणार आहे. हे बाह्यमूल्यांकन कसे करावे? यासाठी निर्धारकांसाठी पवई मुंबई येथील एमटीएनएल प्रशिक्षण केंद्रात नुकतीच कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत महाराष्ट्रातून निवड करण्यात आलेल्या १३३ निर्धारकांचा सहभाग होता.
 राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशासन विद्यापीठ म्हणजेच न्यूपा हे मनुष्यबळ विकास मंत्रालय म्हणजेच एमएचआरडीच्या आश्रयाने शाळा मानके व मूल्यांकनाच्या कार्यक्रमाचे म्हणजे एनपीएसएसईचे नेतृत्व करीत आहे. प्रत्येक शाळेचे एक संस्थान म्हणून मूल्यांकन करणे आणि जबाबदारीने स्व-विकासाची संस्कृती विकसित करणे हे एनपीएसएसईचे ध्येय आहे. त्यामुळे शालेय मूल्यांकनाच्या माध्यमातून शालेय सुधारणा हेच लक्ष्य ठेवण्यात आले आहे. शाळांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यासाठी शाळा मानके व मूल्यांकन आराखड्यात म्हणजेच एसएसईएफमध्ये महत्वाचे निकष म्हणून मुख्य सात क्षेत्रांचा समावेश आहे. त्यात शाळेचे सामर्थ्य स्त्रोत : उपलब्धतता, पर्याप्तता व उपयुक्तता या क्षेत्राच्या माध्यमातून शाळेतील भौतिक सुविधा, मनुष्यबळ, अध्ययन-अध्यापन साहित्यांची उपलब्धतता व गुणवत्ता कशी आहे याची तपासणी शालेय आवार, क्रीडा उपकरणे व साहित्यासह मैदान, वर्गखोल्या व इतर खोल्या, वीज व विद्युत उपकरणे, ग्रंथालय, प्रयोगशाळा, संगणक, उतरता रस्ता, माध्यान्ह भोजन, स्वयंपाक खोली व भांडी, पेयजल, हात धुण्याची सुविधा, स्वच्छतागृह या बारा गाभा मानकांच्या आधारे केली जाणार आहे. अध्ययन-अध्यापन व मूल्यमापन या क्षेत्राच्या माध्यमातून शाळेतील अध्ययन-अध्यापन व मूल्यमापन किती परिणामकारक आहे याची तपासणी शिक्षकांना अध्ययनार्थीची जाण, शिक्षकांचे विषय व अध्यापनशास्त्रीय ज्ञान, अध्यापनाचे नियोजन, अध्ययनपूरक वातावरण निर्मिती, अध्ययन-अध्यापन प्रक्रिया, वर्ग व्यवस्थापन, अध्ययनार्थीचे मूल्यमापन, अध्ययन-अध्यापन साहित्याचा वापर, शिक्षकांचे स्वत:च्या अध्यापन-अध्ययन कृतींवरील चिंतन या नऊ गाभा मानकांच्या आधारे केली जाणार आहे. अध्ययनार्थींची प्रगती, संपादणूक व विकास या क्षेत्राच्या माध्यमातून शाळेतील विद्यार्थ्यांची अध्ययन प्रगती, अध्ययन निष्पत्तींची संपादणूक आणि सामाजिक विकास कसा आहे याची तपासणी अध्ययनार्थींची उपस्थिती, अध्ययनार्थींचा सहभाग व व्यग्रता, अध्ययनार्थींची प्रगती, अध्ययनार्थींचा वैयक्तिक व सामाजिक विकास, अध्ययनार्थींची संपादणूक या पाच गाभा मानकांच्या आधारे केली जाणार आहे. शिक्षक कामगिरी व व्यावसायिक विकासाचे व्यवस्थापन या क्षेत्राच्या माध्यमातून शाळेतील शिक्षक कामगिरीचे व्यवस्थापन व विकास कसा केला जातो याची तपासणी नवीन शिक्षकांचे उद्बोधन, शिक्षकांची उपस्थिती, जबाबदारी निश्‍चिती व कामगिरी लक्ष्यांची निश्‍चिती, अभ्यासक्रम अपेक्षांप्रती शिक्षकांची तयारी, शिक्षक कामगिरीचे पर्यवेक्षण, शिक्षकांचा व्यावसायिक विकास या पाच गाभा मानकांच्या आधारे केली जाणार आहे. शालेय नेतृत्व व व्यवस्थापन या क्षेत्राच्या माध्यमातून शाळेतील शालेय नेतृत्व व व्यवस्थापन कसे आहे याची तपासणी दूरदृष्टीचे विकसन व दिशा निश्‍चिती, बदल व सुधारणेचे नेतृत्व, अध्ययन-अध्यापनाचे नेतृत्व, शालेय व्यवस्थापनाचे नेतृत्व या चार गाभा मानकांच्या आधारे केली जाणार आहे. समावेशन, आरोग्य व सुरक्षा या क्षेत्राच्या माध्यमातून शाळा किती समावेशक व सुरक्षित आहे याची तपासणी समावेशन संस्कृती, विशेष गरजा असणार्‍या विद्यार्थ्यांचे समावेशन, शारीरिक सुरक्षितता, मानसिक सुरक्षितता, आरोग्य व स्वच्छता या पाच गाभा मानकांच्या आधारे केली जाणार आहे. उत्पादक समाज-सहभाग या क्षेत्राच्या माध्यमातून शाळेचे समाज अनुबंध किती उत्पादक आहेत याची तपासणी शाळा व्यवस्थापन अथवा शाळा विकास व्यवस्थापन समितीचे संघटन व व्यवस्थापन, शाळा सुधारणेत भूमिका, शाळा-समाज अनुबंध, अध्ययन स्त्रोत म्हणून समाज, समाज सक्षमीकरण या पाच गाभा मानकांच्या आधारे केली जाणार आहे. या प्रत्येक मुख्य क्षेत्राच्या मूल्यमापनात क्रमश: पायर्‍या येतात. या पायर्‍या शाळांना त्यांच्या कामगिरीच्या पातळीचा व्यावसायिक अंदाज बांधण्यासाठी एकत्रितपणे सहकार्य करतात. मूल्यमापन प्रक्रिया सुसंगत आणि पारदर्शी बनविण्यासाठी हा आराखडा महत्वाची भूमिका बजावणार आहे. शाळा मानके व मूल्यांकन आराखड्याचा भाग म्हणून शाळेस समग्र मूल्यांकन अहवाल देण्यास सुलभ व्हावे म्हणून शाळा मूल्यांकन दर्शन फलक विकसित करण्यात आला आहे. त्यामध्ये सुधारण्यासाठी अग्रक्रम ठरविलेल्या क्षेत्रांचा समावेश आहे. तसेच प्रत्येक शाळेसाठी ई-शाळा मूल्यांकन दर्शन फलक (ई-समीक्षा) देखील विकसित करण्यात आला आहे. शाळा कामगिरीच्या माहितीचा व वक्तशीर सार शाळा मूल्यांकन दर्शन फलक पुरविणार आहे. या फलकात विद्यार्थी व शिक्षक यांची पायाभूत माहिती, नियोजित सात क्षेत्रांचे मूल्यांकन आणि शाळा सुधारण्यासाठी सातत्यपूर्ण कृतीकार्यक्रम यांचा समावेश राहणार आहे. अशा प्रकारे शाळा मानके व मूल्यांकन आराखडा हा स्वयं व बाह्यमूल्यांकनासाठी एक धोरणात्मक साधन असून शाळा विकासासाठी आवश्यक क्षेत्र ओळखण्याचा त्याचा हेतू आहे.
 या सात क्षेत्राच्या माध्यमातून शाळांच्या बाह्यमूल्यांकनासाठी प्रायोगिक तत्वावर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून दोन अशा ७२ शाळा निवडण्यात आल्या आहेत. त्यात पुणे जिल्ह्यातील केंजळ ता.भोर व बाहुली ता.हवेली, अहमदनगर जिल्ह्यातील सुभाषवाडी व दत्तवाडी, सोलापूर जिल्ह्यातील सादेपूर ता.दक्षिण सोलापूर व इंगोलेवस्ती ता.मोहोळ, कोल्हापूर जिल्ह्यातील केनावडे ता.कागल व गलगले ता.कागल, सांगली जिल्ह्यातील लांडगेवाडी व सावलझ ता.तासगाव, सातारा जिल्ह्यातील आपशिंगे व लोधावडे ता.माण, रत्नागिरी जिल्ह्यातील भोके मटवाडी व पूर ता.संगमेश्‍वर, सिंधुदूर्ग जिल्ह्यातील दहीबाव ता.देवगड व हरकूल ता.कणकवली, मुंबई शहरातील आरईएस चारकोप कांदिवली व वामनराव हायस्कूल मुलुंड, मुंबई उपनगरातील आरपीएमएम स्कूल बांद्रा पूर्व व जि.प. शाळा, रायगड जिल्ह्यातील वाळके ता.मुरूड व झिराड ता.अलिबाग, ठाणे जिल्ह्यातील पिंपोली अंबरनाथ व सारंगपूरी, पालघर जिल्ह्यातील सावरपाडा व चंद्रनगर डहाणू, नाशिक जिल्ह्यातील पार्सूल ता.चांदवड व उंबरडे ता.मालेगाव, जळगाव जिल्ह्यातील निपाणी ता.पाचोरा व कोथळी ता.मुक्ताईनगर, धुळे जिल्ह्यातील निकुंभे व साळवे, नंदूरबार जिल्ह्यातील कलमाडी ता.शहादा व भागसरी ता.नंदूरबार, औरंगाबाद जिल्ह्यातील सातारा व शिवराई, परभणी जिल्ह्यातील धानोरा मोत्या १ ता.पूर्णा व अटोला ता.मानवत, जालना जिल्ह्यातील हरतखेडा व देलेगव्हाण ता.जाफ्राबाद, हिंगोली जिल्ह्यातील देवकरवाडी ता.सेनगाव व हनुमाननगर, बीड जिल्ह्यातील जरेवाडी ता.पाटोदा व राजूरी ता.बीड, लातूर जिल्ह्यातील मांजरी ता.लातूर व गांजूरवाडी ता.चाकूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील पखरूड ता.भूम व कावडेवाडी, नांदेड जिल्ह्यातील बोंधर ता.नांदेड व कोहळी ता.हादगाव, अमरावती जिल्ह्यातील खोलापूर ता.भातकुली व सोनगाव चांदूर रेल्वे, अकोला जिल्ह्यातील ब्राह्मी ता.मूर्तिजापूर व सांगलुड ता.अकोला, वाशिम जिल्ह्यातील तोंडगाव ता.वाशिम व पुहा ता.कारंजा, बुलढाणा जिल्ह्यातील हरसोडा ता.मलकापूर व साव ता.बुलढाणा, यवतमाळ जिल्ह्यातील उर्दू आपटी ता.मारेगाव व उर्दू जनुना ता.उमरखेड, नागपूर जिल्ह्यातील उर्दू सलाइ मोकासा ता.पारशिवणी व उर्दू झुनकी, वर्धा जिल्ह्यातील लाहोरी ता.समुद्रपूर व येरला ता.हिंगणघाट, चंद्रपूर जिल्ह्यातील खुटाळा व पिंपळगाव कोरपना, भंडारा जिल्ह्यातील खराशी ता.लखणी व हिंगणा ता.तुमसर, गोंदिया जिल्ह्यातील जेटबावडा ता.देवराई व हिरडा माळी ता.गोरेगाव, गडचिरोली जिल्ह्यातील तुलशी देसाईगंज व महागाव अहेरी अशा राज्यातील सर्व जिल्ह्यातील एकूण ७२ शाळांचा प्रायोगिक तत्वावर पहिल्या टप्प्यात समावेश करण्यात आला आहे. या प्रत्येक शाळांचे बाह्यमूल्यांकन शाळांना प्रत्यक्ष भेट देवून निर्धारकांकडून मार्चअखेर करण्यात येणार आहे. त्यानंतरचा अहवाल वेबपोर्टलचा वापर करून वेबसाईटवर सादर केला जाणार आहे.
 अशा प्रकारे शाळांनी केलेले स्वयंमूल्यमापन, निर्धारकांकडून करण्यात आलेले बाह्यमूल्यांकन, शाळा मूल्यांकनाचा एकत्रित अहवाल या माध्यमातून संपूर्ण राज्याचा एकत्रित अहवाल आणि त्यानंतर संपूर्ण देशाचा राष्ट्रीय पातळीवरील अहवाल अशा टप्प्याटप्प्याने होणार्‍या प्रक्रियेतून शाळांचे मानांकन ठरविले जाणार आहे. त्यामुळे जि.प. शाळांची गुणवत्ता वाढविण्यास आणखी मोलाची मदत होणार आहे. समृध्द शाळा हा उपक्रम शाळांच्या गुणवत्तावाढीसाठी लाभदायी ठरणार असल्याने शाळाविकासाचा आणखी एक टप्पा गाठला जाणार आहे. बाह्यमूल्यांकनातून शाळांना मिळणारे मानांकन ही शिक्षणक्षेत्रातील महत्वाची नांदी असून शाळांना एक प्रतिष्ठेचा दर्जा प्रदान करण्यासाठी महत्वाची भूमिका निभावण्याचे काम करणार आहे.
- डॉ.जगदीश पाटील सर, ८१४९४९८०२०

http://www.deshdoot.com/enewspapers.php?region=Jalgaon&date=&id=130711

ज्ञानरचनावाद

ज्ञानरचनावाद काय आहे आणि काय नाही?

-नीलेश निमकर

गेल्या काही वर्षांत शिक्षणाच्या क्षेत्रात, विशेष करून प्राथमिक शिक्षणाच्या क्षेत्रात ज्ञानरचनावादाचा बराच बोलबाला आहे. रचनावाद, रचनावादी शिक्षणपद्धती असे शब्द वारंवार कानी पडतात. अनेकदा असे अनुभवास येते की या शब्दांचा अर्थ प्रत्येक जण आपल्याआपल्या सोयीने लावत असतो. शाळेत साधने वगैरे वापरून कृतियुक्त शिक्षण देणारे रचनावादाचे पुरस्कर्ते ‘आमच्या शाळेत आम्ही रचनावादी पद्धत वापरतो’ असे अभिमानाने म्हणताना दिसतात तर ‘रचनावाद येण्याआधी पासून आम्ही तुम्ही सांगता त्या गोष्टी करतच होतो, तुम्ही त्याला फक्त नाव दिलेत’ असे काहीजण म्हणताना दिसतात. काहीजण ‘वर्तनवाद’ विरुद्ध ‘रचनावाद’ अशी मांडणी करताना दिसतात. या मतमतांतरांमुळे बर्‍याच जणांचा गोंधळ होणे साहजिक आहे. त्यातून या विषयावर मराठीतून फारसे वाचायलाही मिळत नाही. म्हणून या लेखात रचनावादाची नेमकी संकल्पना काय आहे याची तोंडओळख करून देण्याचा प्रयत्न केला आहे. इथे एक बाब लक्षात घ्यायला हवी, ती म्हणजे, ही केवळ तोंडओळख आहे. या विषयाची व्याप्ती बरीच मोठी असल्याने अधिकचे वाचन करून, सहकार्‍यांशी चर्चा करून रचनावादाची पुरेशी सखोल समज बनवणे शिक्षक़ांसाठी अत्यावश्यक आहे.

रचनावाद हा मुलांच्या शिकण्याच्या प्रक्रियेवर प्रकाश टाकणारा एक सिद्धांत आहे. माणसाचे मूल कसे शिकते, या जुन्याच प्रश्नाचे नवे, अधिक विस्तृत उत्तर देण्याचा प्रयत्न रचनावादाने केला आहे. मात्र अजूनही या प्रश्नाचे परिपूर्ण उत्तर आपल्या हाती आले आहे असे नाही. मात्र नवनव्या संशोधनांतून या विषयीच्या आपल्या ज्ञानात नित्यनेमाने भर पडत आहे हे नक्की. मुलांच्या शिकण्याबाबत रचनावादाचे काय म्हणणे आहे हे पाहण्याआधी, आपण शिकण्याबाबतचे रचनावादाच्या आधीचे सिद्धांत काय होते हे पाहणे गरजेचे आहे.

कोरी पाटी सिद्धांत

‘मुलाचे मन म्हणजे कोरी पाटी त्यावर आपण हवे ते लिहू शकू’ (याचेच दुसरे रूप म्हणजे ‘मूल म्हणजे मातीचा गोळा’) असा सिद्धांत अनेक वर्षे रूढ होता. अजूनही त्याचे पडसाद कुठे क़ुठे ऐकायला मिळतातच. बाहेरच्या जगाचे प्रतिबिंब किंवा छाप मुलाच्या ‘रिकाम्या’ मनावर उमटणे म्हणजे मूल शिकणे अशी कल्पना अनेक दिवस सर्वमान्य होती. पण हळूहळू लक्षात आले की प्रत्येक मुलाला ‘आपल्याला हवे ते, हवे तसे, हवे तेव्हा’ शिकवता येईलच असे नाही. एकाच वातावरणात वाढणारी किंवा एकाच शिक्षकाकडून शिकणारी सगळीच मुले सारखी शिकत नाहीत. जर मुलांची मने म्हणजे कोर्‍या पाट्या असत्या तर मुलांच्या शिकण्यात असा फरक पडायचे कारण नाही !

वर्तनवादाचा सिद्धांत - स्वरूप आणि मर्यादा
मुलांच्या शिकण्याबाबतच्या अजून एका सिद्धांताचे अधिराज्य शिक्षणाच्या क्षेत्रात अनेक वर्षे राहिले. तो म्हणजे वर्तनवादाचा सिद्धांत. आजही शिक्षणशास्त्राच्या अभ्यासक्रमात हा सिद्धांत विस्ताराने अभ्यासला जातो. मानसशास्त्र म्हणजे मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ही व्याख्या लोकांना भोंगळ वाटायला लागली कारण मनाच्या अस्तित्वाचा व स्वरूपाचा पुरावा देणे शक्य नव्हते. बारकाईने बघितले तर आपण एखाद्याच्या मनाबाबत जे आडाखे बांधतो ते त्याच्या वर्तनाच्या आधारे बांधतो. (उदाहरणार्थ, नितीनचे मन उदास आहे याचा आडाखा आपण ‘तो तोंड पाडून बसलाय’ ‘बोलत नाहीये’ असे त्याचे वर्तन पाहून बांधतो! कारण वर्तनाचे त्रयस्थपणे निरीक्षण करता येते.) त्यामुळे मग ‘वर्तनाचा अभ्यास करणे म्हणजे मानसशास्त्र’ अशी व्याख्या केली जाऊ लागली. या व्याख्येच्या शास्त्रीय असण्याचा दबदबा इतका होता की मानसिक अवस्था वा प्रक्रियांबद्दल बोलणे अशास्त्रीय गणले जाऊ लागले. वर्तनाचा अभ्यास करण्याच्या काळात प्राण्यांचे वर्तन अभ्यासण्याचे अनेक प्रयोग मानसशास्त्रज्ञांनी केले आणि प्राण्यांचे वर्तन आपल्याला हवे तसे बदलता येते हे सिद्ध करून दाखवले. वर्तनात बदल घडवण्याचे त्यांचे साधन होते बक्षिसे आणि शिक्षा ! एखादे वर्तन केल्यावर बक्षीस मिळाले तर प्राणी ते वर्तन पुन्हा पुन्हा करतो आणि शिक्षा मिळाली तर ते वर्तन करत नाही अशी ही ढोबळ व सहज दिसणारी मांडणी होती आणि म्हणून मग ‘मुलाच्या वर्तनात शिक्षकाला अपेक्षित बदल घडणे म्हणजे शिकणे’ अशी आपल्याला सुपरिचित असलेली शिकण्याची व्याख्या अस्तित्वात आली. वर्तनातील हा बदल कायमस्वरूपी टिकावा यासाठी पुन्हा पुन्हा सराव करणे गरजेचे आहे हेही लक्षात आले. प्राणिल स्वरूपाच्या गोष्टी मूल कसे शिकते हे सांगण्यात वर्तनवाद कमालीचा यशस्वी झाला. मात्र माणसाच्या मुलाचे शिकणे प्राण्यांपेक्षा कमालीचे गुंतागुंतीचे असते. त्याचे समग्र स्पष्टीकरण वर्तनावादाच्या आधारे करणे कठीण होऊ लागले.

मूल मातृभाषा (खरे तर परिसर भाषा म्हणायला हवे !) कशी शिकते हे सांगताना वर्तनवादी सिद्धांत अगदीच तोकडा पडू लागला. माणसाची भाषा ही एक अत्यंत गुंतागुंतीची चिन्हप्रणाली आहे. जगातल्या खर्‍या वस्तू, क्रिया, भावना, वस्तूचे गुणधर्म असे बरेच काही शब्दांच्या चिन्हांनी आपण दाखवत असतो. भाषेतील शब्द आणि तिच्या व्याकरणाचे नियम वापरून आपण मनातल्या मनात विचार करू शकतो. मातृभाषेचे नियम, व्याकरण, जटिल वाक्य-रचना एखादे दोनतीन वर्षांचे मूल कसे शिकते, भाषा वापरून आपण विचार कसा करू शकतो, याचे उत्तर वर्तनवादी सिद्धांताला देता येईना.

आकलनवाद

वर्तनवादी शास्त्रज्ञ भाषेकडे आणि विचारप्रक्रियेकडे फक्त एक वर्तन म्हणून पाहत असत. कारण विचार-प्रक्रिया अभ्यासायची तर मनाचे आणि मानसिक प्रक्रियांचे अस्तित्व मान्य करायला लागणार आणि ते नाकारूनच तर वर्तनवादाची सुरुवात झाली होती! या प्रश्नावर तोडगा म्हणून आकलनवादी विचार मांडले गेले. ‘मूल भाषा कशी शिकते, हे केवळ अभिसंधान प्रक्रिया वापरून स्पष्ट करणे अशक्य आहे’ अशी मांडणी नोआम चॉम्स्कीसारख्या भाषातज्ज्ञाने केली. माणसाची विचारप्रक्रिया म्हणजे वर्तन नाही, तर विचारप्रक्रियेचा प्रभाव वर्तनावर पडतो. विचार- प्रक्रिया ही मानसिक पातळीवर चालणारी क्रिया असल्याने, आकलनवादासोबत मानसिक-अवस्था व मानसिक-प्रक्रिया यांना मानसशास्त्राच्या अभ्यासात परत स्थान मिळाले. इथे एक लक्षात घेतले पाहिजे की आकलनवाद्यांनी वर्तनवाद पूर्णपणे नाकारलेला नाही, मात्र तो शिकण्याची समग्र प्रक्रिया उलगडण्यास तोकडा आहे, असे सप्रमाण दाखवून दिले आहे.

ज्ञानरचनावाद

मानसिक पातळीवरील कल्पना प्रक्रिया यांचा अभ्यास करणे मानसशास्त्रात पुन्हा एकदा दाखल झाल्यावर, शिकण्याची प्रक्रिया काय आहे हे उलगडून दाखवण्याला बराच वेग आला. त्यातूनच ज्ञानरचनावादाची कल्पना पुढे आली. मूल आपल्या मनातील जगाबाबतच्या धारणा आणि परिसरातून मिळणारा अनुभव यांच्यातील आंतरक्रियेतून स्वत:च्या ज्ञानाची रचना करत असते असा रचनावादाचा मध्यवर्ती विचार आहे. मूल आपल्या ज्ञानाची रचना कशी करते यावर ज्ञानरचनावाद बराच प्रकाश टाकतो. मूल अगदी जन्मापासून अवतीभोवतीचे जग समजून घेण्याचा प्रयत्न करते. वस्तू मुठीत पकडणे , तोंडात घालणे, वस्तू एकटक न्याहाळणे ही मुलाची जग समजून घेण्याची धडपड आहे असे ज्ञानरचनावादात मानले जाते. एकदा का मुलाला भाषा अवगत झाली की ज्ञानाची रचना करण्याला मोठीच गती मिळते. शब्दांच्या आधारे मूल नव्या नव्या धारणा बनवते आणि अनुभव वाढला की बनलेल्या धारणा मोडून पुन्हा नव्याने बनवते. ‘पुरुष’ या शब्दाची एका मुलाची धारणा वाढत्या अनुभवाबरोबर कशी बदलत जाऊ शकते, याचे पियाजेंनी दिलेले उदाहरण आपण पाहू या. अर्थातच एका अतिशय गुंतागुंतीच्या प्रक्रियेचे हे काहीसे ढोबळ वर्णन आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.

१. सुरुवातीला ‘बाबा’ या शब्दाचा अर्थ पुरुष या शब्दासारखाच असतो. त्यामुळे सर्व पुरुषांसारख्या दिसणार्‍या व्यक्तींना मूल बाबा म्हणते.

२. हळू हळू त्यातून आजोबा, दादा असे वयानुसार पडणारे काही गट वेगळे होतात. मग त्या त्या वयोगटातील व्यक्तींना मूल दादा वा आजोबा म्हणू लागते. या टप्प्यावर पुरुष या धारणेत किमान आजोबा, बाबा व दादा असे तीन गट आहेत.

३. काका, मामा अशी नाती लक्षात येऊ लागली म्हणजे मुलाची पुरुष या गटाची धारणा अधिक विस्तारते.

४. हळू हळू वाढत्या अनुभवाबरोबर पुरुष या शब्दाची मोठ्या माणसांच्या धारणेसारखी धारणा मूल बनवते.

मुलाने संकल्पना बांधण्याची ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. आता वर्तनवादी दृष्टिकोनातून वरील घटना पाहायची झाली तर बाबा, दादा, आजोबा या शब्दांचे (खरे तर आवाजांचे) अभिसंधान वेगवेगळ्या वयाच्या व्यक्तींशी होते व त्यातून मूल हे वेगवेगळे शब्द उच्चारते असे म्हणावे लागेल. पण असे सुटे सुटे शब्द उच्चारणे हे काही मुलाची नात्यांबाबतची समग्र समज दाखवत नाही. मुलाच्या शिकण्याची प्रक्रिया उलगडण्यासाठी वर्तनवाद तोकडा पडतो म्हणजे काय याची या उदाहरणावरून कल्पना यावी.
महत्त्वाचा मुद्दा असा की ज्ञानरचनावादात मुलांच्या अनुभवाला शिकण्याच्या प्रक्रियेत मध्यवर्ती स्थान आहे. समृद्ध अनुभवांखेरीज मुले ज्ञानाची रचना करणार नाहीत असा ज्ञानरचनावादाचा विश्वास आहे. म्हणूनच अनेकदा हाताने करून शिकणे प्रभावी ठरते असा आपला अनुभव आहे. मात्र ज्ञानरचनावादी दृष्टीने शिकवण्यासाठी नेहमीच काही तरी हाताने करणे गरजेचे आहे हापण एक गैरसमज आहे. किंवा हाताने काहीतरी करायला दिले म्हणजे ज्ञानरचनावादी दृष्टीने शिकवले असे होत नाही. ज्ञानरचनावादी दृष्टिकोन विकसित झाला म्हणजे शिक्षकांच्या शिकवण्यात एक नेमकेपणा येतो, प्रत्येक मुलाची ज्ञानरचनेची प्रक्रिया वेगळी असल्याचे लक्षात आल्याने शिकवण्यात जी लवचीकता येते हे महत्त्वाचे आहे.

अजून एक महत्त्वाचा मुद्दा ज्ञानरचनावादातून पुढे येतो. तो म्हणजे मुलांच्या धारणा एकदम बनत नाहीत तर त्या बनतात, मोडतात आणि पुन्हा नव्याने बनतात. त्यामुळे आपण जसे सांगू तसेच्या तसे मूल ग्रहण करेल अशी अपेक्षा करणे चुकीचे ठरते. इयत्ता आठवीत मुलाने तयार केलेली सूर्यमालेसारखी अणूची धारणा (म्हणजे मधे केंद्रक आणि भोवती फिरणारे इलेक्ट्रॉन अशी) आणि प्रत्यक्ष अणूची रचना यात मोठेच अंतर आहे. पण म्हणून आपण आठवीच्या मुलाची धारणा चुकीची म्हणत नाही. तर अणूची संकल्पना समजून घेण्यातली ती एक अनिवार्य पायरी मानतो. म्हणजेच ज्ञानरचनावादात मुलांच्या तथाकथित चुकांकडे शिकण्यातली एक पायरी म्हणून बघितले जाते.

आत्तापर्यंत केलेल्या विवेचनावरून कुणी विचारेल, ‘जर मूल स्वत:च ज्ञानाची रचना करणार असेल तर शिकवणार्‍यांचे काय काम?’ मात्र हा ज्ञानरचनावादाचा विपर्यास होईल. ज्ञानरचनावादात मोठ्यांसोबतच्या आंतरक्रियेलाही महत्त्वाचे स्थान आहे. ज्ञानरचनावाद ही संकल्पना जशीजशी विकसित होत गेली तसेतसे मोठ्यांच्या सहभागाचे महत्त्व अधिकाधिक पुढे आले. भाषा हे महत्त्वाचे साधन बर्‍याच प्रमाणात मोठ्यांशी झालेल्या आंतरक्रियेतूनच मुलांना मिळते. मूल ज्या समाजात वाढते त्या समाजातून मिळालेली भाषा हा मुलांच्या ज्ञानरचनेतील महत्त्वाचा घटक आहे.

तसेच एखाद्या मुलाची ज्ञानाची सध्याची धारणा लक्षात घेऊन तिथून कोणत्या नव्या धारणेपर्यंत मूल मोठ्यांच्या मदतीने पोहचू शकेल याचा अंदाज शिकवणार्‍याला घ्यावा लागतो.

ज्ञानरचनावादाचे काही पैलू आपण पाहिले. ते एका दृष्टिक्षेपात पुढीलप्रमाणे मांडता येतील.

१. मुले आपल्या ज्ञानाची रचना स्वत: करतात. या रचनेसाठी त्यांना विविध समृद्ध अनुभव मिळणे गरजेचे आहे.

२. ‘हाताने करून शिकणे’ हा ज्ञानरचनावादातील महत्त्वाचा भाग आहे.

३. मुलांच्या चुकांकडे त्यांच्या शिकण्यातली महत्त्वाची पायरी म्हणून पाहायला हवे. ज्ञानरचनावादात मुलांच्या व्यक्तिगत विचाराला आदराचे स्थान आहे.

४. मुलांच्या ज्ञानरचनेत मोठ्यांच्या सहभागाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मुलाला शिकण्याच्या विशिष्ट टप्प्यावर काय आणि कशी मदत करावी याचे भान शिकवणार्‍या माणसाला असावे लागते.

ज्ञानरचनावाद हा शिकण्याबाबतचा सिद्धांत बराच प्रगत असला तरी तो शिकण्याच्या प्रक्रियेचे समग्र वर्णन करत नाही. शिकण्याच्या इतर सिद्धांतांप्रमाणेच तोही एक आंशिक सिद्धांत आहे. पण मुलांच्या शिकण्याचे बरेच नवे आयाम या सिद्धांतामुळे आपल्यासमोर आले हे खरे. शिकवताना शिक्षकाला अनेक सिद्धांतांचा एकत्र आधार घेऊन शिकवावे लागते. हे वास्तव लक्षात घेता शिकण्याबाबतचे सर्वच सिद्धांत अभ्यासून, पचवून डोळसपणे शिकवता येणे हे चांगल्या शिक्षकाचे लक्षण आहे.

1. पिंजर्‍यात बंद असणार्‍या एखाद्या उंदराला ‘कळ दाबल्यावर अन्न मिळते’ हे अपघाताने समजले, तर तो हवे तेव्हा कळ दाबून अन्न मिळवायला शिकतो. कळ दाबणे हे वर्तन अन्नाच्या बक्षिसामुळे उंदीर पुन्हा पुन्हा करतो. काही काळाने जर वारंवार कळ दाबून अन्न मिळाले नाही तर तो कळ दाबणे बंद करतो. कळ दाबणे आणि अन्न मिळणे यात जो संबंध जोडला जातो त्याला अभिसंधान किंवा Conditioning असे म्हणतात.वर्तनवाद्यांच्या मते अभिसंधान ही शिकण्यातील प्रमुख प्रक्रिया आहे.

2. तीन वर्षांच्या आयुषचे हे वाक्य पाहा - ‘इथे झुरळ मरले आहे बघ.’ या क्रियापदाचे ‘मरले’ असे भूतकाळातील रूप केले आहे. अर्थातच त्याच्या आसपासचे कोणीच हे रूप वापरत नाही. सगळेजण ‘झुरळ मेले’ असे रूपच वापरतात. मात्र लहानग्या आयुषच्या मनात मराठीचे व्याकरण आकार घेते आहे, त्यामुळे त्याने बसले, उठले यासारखे मरले असे रूप बनवले आहे. कोणीही कधीही न वापरलेले हे क्रियापदाचे रूप आयुषला कसे सुचले याचे स्पष्टीकरण वर्तनवादी सिद्धांताच्या आधारे देता येत नाही.

3. सहावीच्या वर्गात गुरुजींनी ऋण संख्या शिकवल्या, पूर्णांक संख्यांची बेरीज-वजाबाकी शिकवली आणि मुलांना उदाहरणे सोडवायला दिली. त्यांना असे दिसले की बर्‍याच जणांचा ऋण संख्यांच्या बेरीज-वजाबाकीत तर गोंधळ उडालाच, पण गंमत म्हणजे ४-३ =? यासारख्या उदाहरणातही मुलांनी चुका केल्या होत्या. इयत्ता सहावीत येईपर्यंत सहजपणे येणार्‍या वजाबाकीत मुलांनी का चुका केल्या ? आतापर्यंत नैसर्गिक संख्याच्या आधारे वजाबाकीची जी धारणा मुलांनी बनवली होती ती पूर्णांक संख्यांच्या वजाबाकीच्या नियमांमुळे मोडून पडली आणि त्यामुळे आता वजाबाकीची नवीन धारणा बनेपर्यंत मुलांचा स्वाभाविकपणेच गोंधळ झाला. ही नवी धारणा बनेपर्यंत मुलांना वेळ द्यायला हवा असे ज्ञानरचनावादावर विश्वास असणारा शिक्षक़ म्हणेल.

4. उदाहरणार्थ एखादे मूल अपूर्णांक शिकते आहे. अपूर्णांकांची मूलभूत कल्पना (आकृती पाहून अपूर्णांक लिहिणे वगैरे), अपूर्णांकाचे वाचन, लेखन या बाबी त्याला स्वतंत्रपणे येत असल्या तरी दोन अपूर्णांकांमधला लहान मोठेपणा ठरवायला त्याला लगेच जमेल असे नाही. काही दिवस निरनिराळ्या अपूर्णांकांच्या जोड्यांवर शिक्षकांच्या मदतीने, शैक्षणिक साधने वापरून काम केले म्हणजे मग लहान-मोठेपणा ठरवणे मुलांना शक्य होऊ लागते.

शिक्षण तज्ज्ञ निलेश निमकर यांचा लेख