Showing posts with label भाषाशिक्षण. Show all posts
Showing posts with label भाषाशिक्षण. Show all posts

Tuesday, 22 September 2020

"वाचू आनंदे" कार्यक्रमांतर्गत रियाज ऑनलाईन कार्यशाळा

 मुलांच्या आयुष्यात गोष्टींना महत्वाचे स्थान असते.मुलांच्या भाषा विकासाचे व साक्षरता विकासाचे ते एक महत्त्वाचे साधन आहे.मुलांना त्या नियमितपणे सांगितल्या किंवा वाचून दाखविल्या पाहिजेत.मुलांना त्यातून आनंद मिळातो,भाषा कशी वापरली जाते ते समजते.मुलांचा भावनिक विकास होतो,त्यांच्या कल्पनाशक्तीला, सर्जनशीलतेला धुमारे फुटतात.मुलांना पुस्तक वाचण्याची गोडी लागते.याबाबत टि.बी.लुल्ला चॅरिटेबल फाऊंडेशन आणि टायनी टेल्स आयोजित 'वाचू आनंदे' ही ऑनलाईन कार्यशाळा दिनांक २६ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर या कालावधीत संपन्न झाली.

या कार्यशाळेत पालक,शिक्षक,शिक्षक प्रशिक्षक सहभागी झालेले होते.भाषाशिक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब लिबींकाई,गोष्टरंग टिम मधील प्रतिक्षा खासनीस,कल्पेश समेळ,महेंद्र वाळुंज यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. कार्यशाळेत स्वतः सक्रिय सहभागी होणे अपेक्षित होते.मार्गदर्शकांनी गोष्ट कशी सांगावी याचे सादरीकरण करून दाखवले.आवाजासाठीचे व्यायाम,आवाजाची पट्टी,चढ-उतार,स्वराघात,विरामचिन्हांचा वापर कसा करावा याबद्दल प्रात्यक्षिकासह समजून घेता आले. 

लहान मुलांना गोष्टी का सांगाव्यात.याबाबत ताराबाई मोडक यांनी सांगीतलेल्या बाबींची चर्चा करण्यात आली. या संदर्भातील संदर्भ साहित्य वाचायला मिळाले. वेगवेगळे लेख याबाबतची समज पक्की करण्यासाठी उपयुक्त ठरले.

लहान मुलांसाठी वयोगटानुसार पुस्तकांची निवड कशी करावी. मुलांना लेखी भाषेची जाण व्हावी यासाठी पुस्तकाचे सहभागी वाचन कसे घ्यावे. याबाबतचे काही पुस्तकांचे  प्रात्यक्षिक करून दाखवले.सहभागी वाचन करताना आवाजातील चढ उतार,आवाजाची पट्टी,आवाजाची गती व भावना वाक्यानुसार कशा ठेवायला हव्यात.याबाबत सर्वांकडून सराव करून घेण्यात आला.घरातील लहान मुलांनीही या गोष्टींचा आस्वाद घेऊन मजा घेतली. 

भाषाशिक्षण,बालसाहित्य आणि शिक्षणशास्त्र या सगळ्यांचा एकत्रित विचार करणारी कार्यशाळा होती.दररोज सहभागीसाठी स्वाध्याय दिला जात होता.प्रत्येकाला मेटाॅर त्याबद्दल मार्गदर्शन करत असत.या कार्यशाळेत खुप नविन शिकायला मिळालं.

समाधान शिकेतोड 
www.shikshansanvad.in

Monday, 29 June 2020

चित्रांना चष्मा लावला!

मुलांचं अनौपचारिकपणे भाषा शिकणं सुरू असतं. अनुकरण,विश्लेषण,तुलना,अनुमान करणे ह्या बाबी त्याच्या सुरू असतात.मुलं आपले विचार स्वतःच्या लिपीतून मांडतातही.ती कृती,त्याची स्वलिपी समजून घेण्याची गरज असते.त्याच्या भाषा शिकण्याकडं डोळसपणे पाहून मुलाला प्रोत्साहन देण्याची गरज असते.असाच एक परवाचा अनुभव. 

माझा मोठा आर्यन इयत्ता सहावीत आहे तर छोटा मुलगा कौस्तुभ चार वर्षाचा आहे.आर्यनने माझ्या 'पोपटाची पार्टी' या बालकवितासंग्रहातील काही कवितांवर चित्रे काढली होती.आर्यन खूप छान चित्रं काढतो. प्रत्येक कवितेला एक साजेसं छान चित्र त्यांना काढलं होतं.मलासुद्धा ती चित्रं खूप आवडली होती. 
 तो माझ्याकडे आला आणि म्हणाला, "पप्पा, बघा माझी चित्रं कशी करून टाकलीत कौस्तुभनं"

मी पाहिलं तर प्रत्येक चित्राच्या डोळ्यांभोवती कौस्तुभनं पेनने गोल केलं होतं.नंतर आम्ही सगळेजण जेवण करायला बसलो.तेव्हा मला त्या चित्रांची आठवण झाली.
त्याला प्रेमाने म्हटलं, "बाळा चित्रांच्या डोळ्यांना का गोल केलं बरं." 
तो म्हणाला, "मला करू वाटलं म्हणून केलं."
 मग त्याला विचारलं, पिल्लू सगळ्या चित्रांचे डोळ्यांनाच का बरं गोल केलं."
 मग तो म्हणाला, "पप्पा मी त्यांना चष्मा लावलाय" मग मात्र मला खूप आनंद वाटला कारण ती त्याची अभिव्यक्ती होती.त्यानं प्रत्येक चित्राला चष्मा काढला होता.त्याचं डोळे गिरगटून टाकणं तसं कुणालाचं आवडलं नव्हतं.एवढी सुंदर चित्रं खराब झाली.हीच भावना सर्वांच्या मनात होती.पहिल्यांदा त्याला थोडसं रागावलोही पण त्यानं प्रत्येक चित्राच्या डोळ्यालाचं गोल केल होतं.त्यांच्याशी गोड बोलून, त्याची उकल केल्यावर समजलं की ती तर त्याची अभिव्यक्ती होती.मुलं भाषा शिकत असतात फक्त आपण त्यांच्या प्रत्येक कृतीकडे डोळसपणे पाहायला हवं.
                 आर्यनने काढलेेली चित्रे 

Sunday, 10 May 2020

आला पाऊस,गेला पाऊस

मुलाचं भाषाशिक्षणाची सुरूवात कुटुंबातच अनौपचारिक सुरू झालेली असते.त्याच्या भाषिक विकासाकडं आपण डोळसपणे पाहायला हवं.याबाबत आजचाच एक अनुभव सांगतो.

माझा मुलगा कौस्तुभ हा चार वर्षांचा आहे.संध्याकाळची वेळ होती.सध्या अवकाळी पाऊस पडतोय. पाऊस पाहून कौस्तुभ "आला पाऊस,गेला पाऊस" म्हणत आनंदानं उड्या मारत होता.त्याचा आनंद पाहून त्याला जवळ घेतलं.पावसाची टिपटिप अधूनमधून चालू बंद होत होती.त्याला म्हटलं कौस्तुभ आपण गाणं म्हणू.गाणं काही ठरवलेलं नव्हतं.त्याच्याच दोन ओळी पुढे घेऊन गाणं सुरू झालं. मी पुढं दोन ओळी म्हणायच्या मग पाठीमागं तो म्हणायचा. 
आला पाऊस 
गेला पाऊस 
 
आभाळात आले ढग 
कौस्तुभ वर बघ 

आला पाऊस 
 गेला  पाऊस 

ढगातून पडलं पाणी 
कोस्तुभ म्हणतो गाणी 

आला पाऊस 
 गेला  पाऊस 
असं आमचं मस्तपणे चाललं होतं. तो माझ्यापाठीमागे म्हणत होता.पण स्वतःच्या नावाऐवजी तो मी शब्द वापरत होता.

आभाळात आले ढग 
मी वर बघ 

ढगातून पडलं पाणी 
मी म्हणतो गाणी 

असं तो माझ्यापाठीमागे म्हणायचा.हा बदल त्यानं स्वतःच केला होता.मीही त्याला तसंच म्हणू दिलं.पण पोरगं मराठीचं व्याकरण किती अनौपचारिकपणे शिकतंय हे मात्र समजलं. 

तो नामाऐवजी मी हा शब्द वापरत होता.म्हणजे सर्वनाम वापरत होता.चार वर्षाच्या मुलाला भाषिक रचना समजत होती. याचेही आश्चर्य वाटले.आपण तिसरी,चौथीत गेल्यावर औपचारिकपणे नाम,सर्वनाम शिकवतो.त्याची व्याख्या,उदाहरणे.किती किती व्याकरण शिकविण्यासाठी धडपड करतो.

मुलांचं भाषा शिकणं जर डोळसपणे पाहायची दृष्टी असायला हवी.मग व्याकरणाकडे मुलांना सहजपणे घेऊन जाता येईल. तेही घोकंमपट्टीशिवाय! मग घडेल सहज शिक्षण.