Showing posts with label पुस्तक परिचय. Show all posts
Showing posts with label पुस्तक परिचय. Show all posts

Saturday, 28 January 2023

ज्याच्या हाती शून्य होते

आज मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त शाळेत परिपाठात ज्याच्या हाती  शून्य होते या प्रेरणादायी पुस्तकाचा परिचय दिला. पुस्तक परिचय मुलांना खूप आवडला. शाळेतील शिक्षकांनीही पुस्तक खूपच आवडले. आमच्यासाठही प्रती मागवा अशी त्यांनी विनंती केली.

ज्याच्या हाती शून्य होते या पुस्तकात यशाच्या शिखरावर पोहचलेल्यांच्या यशोगाथा आहेत. ही असान्य माणसं कधीकाळी सामान्य माणसं होती.त्यांनी कष्टाच्या व जिद्दीच्या बळावर उत्तुंग झेप घेतली. 

Sunday, 8 January 2023

उजेडाचं आभाळ:काजवा

लेखक पोपट काळे हे शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. शालेय शिक्षण विभागात एक प्रयोगशील,संवेदनशील अधिकारी म्हणून परिचित आहेत. त्यांचं काजवा हे आत्मकथन वाचलं. रावसाहेब भामरे या मित्रानं मला ते भेट दिलं होतं. तसं आत्मकथन हा माझा आवडता साहित्यप्रकार. 

जगण्यासाठी व शिक्षणासाठी त्यांनी केलेला संघर्षमयी प्रवास या आत्मकथनाच्या माध्यमातून मांडलेला आहे. हा संघर्ष वाचताना अंगावर रोमांच उभा राहतो. काजवा ही एका ऊसतोड मजुराच्या मुलाची  प्रेरणादायी आत्मकथा आहे. या आत्मकथनाला प्रसिद्ध साहित्यिक उत्तम कांबळे यांची प्रस्तावना लाभलेले आहे. प्राचार्य नागोराव कुंभार, पूर्व शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी या आत्मकथनाची पाठराखण केलेली आहे.

लेखकांच्या आई-वडीलांना घरच्या हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे ऊस-तोडणी मजूर म्हणून काम करावं लागतं.
लेखकाचे आई-वडील लेखकाला शिकण्यासाठी प्रेरित करतात. आई-वडील ऊस तोडणीसाठी गेल्यावर घरी जो जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो ते हृदयस्पर्शी अनुभव जिवाला चटका लावतात. 

सत्तर ऐंशीच्या दशकात लेखकांचं बालपण गेलं.या काळातील ग्रामीण व्यवस्थेचं, गावगाड्याचं सुंदर वर्णन लेखकांनी अनेक प्रसंगांमधून केलेलं आहे. ज्यांचा जन्म या दशकात झाला असेल त्यांना हे आत्मकथन वाचताना हे माझंच आत्मकथन आहे असं वाटत राहतं.  

लेखक अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वतःचं शिक्षण पूर्ण करतात. जुनी पुस्तके अर्ध्या किमतीत घेणं, घरी स्वतः स्वयंपाक करणं, चिंचा,बोरं,कवठं, चिंचोके विकून वह्या पुस्तकासाठी पैसे जमविणे, सरपण गोळा करणे, वडिलांना शेतीच्या कामात मदत करणे ही सारी कामे करत करत लेखकांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. शिक्षण पूर्ण करताना खूप खस्ता खाल्ल्या. अनेक समृद्ध जीवनानुभव घेतले. या अनुभवानीच लेखकाला समृद्ध केलं.

नोकरी लागल्यानंतर स्वतःला झोकून देऊन समर्पित भावनेने प्रत्येक पदावर काम केलं. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून राजपत्रित अधिकारी झाल्यावर पहिली नियुक्ती 'मुख्याध्यापक' म्हणून जिल्हा परिषदेच्या प्रशालेमध्ये झाली. त्या प्रशालेचं रुपडं बदलून टाकलं. त्यानंतर वेगवेगळ्या जिल्ह्यात शिक्षण विभागातील प्रशासकीय पदावर काम केलं. काम  करताना समाजसेवेचं, समाजसुधारण्याचं व्रत घेऊन काम केलं. शिक्षण व्यवस्थेत विधायक प्रयोग केले. 

शिक्षण व्यवस्थेत काम करताना चाकोरीच्या बाहेर जाऊन नवनवीन प्रयोग केले. विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी विविध उपक्रम, प्रकल्प राबविले. विभागीय गुणवत्ता विकास कार्यक्रम, नंदादीप प्रकल्प, कृतीयुक्त अध्यापन (ABL) या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला गती दिली. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमातील काही अनुभव लेखकांनी सांगितलेले आहेत. या कालावधीत त्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी विविध नाविन्यपूर्ण प्रयोग राबविले. 

प्रशासकीय पातळीवर काम करताना कुठलाही दबाव न   बाळगता, विवेकबुद्धीने विचार करून निर्णय घेतले. कोणत्याही आमिषाला बळी न पडता पारदर्शक पद्धतीने निर्णय घेतले. काम करताना  नैतिकता, मूल्य, तत्त्वाची तडजोड न करता प्रसंगी कठोर निर्णय घ्यावे लागले याबद्दलचे अनुभव लेखकांनी सांगितलेले आहेत.

या आत्मकथनातील अनुभव शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकालाच प्रेरणादायी, दिशादर्शक, मार्गदर्शक आहेत. या आत्मकथनातील  सहजसोपी वाटणारी भाषा, पारदर्शीपणा, सच्चेपणा मनाला भावतो. ज्यांचा जन्म सत्तर-ऐंशीच्या दशकात झालेला आहे. त्यांना हे आत्मकथन तर स्वतःच्या बालपणीच्या जगण्याचा उजाळा करून देतं. त्या काळातील समाजजीवनाचं हुबेहूब वर्णन या आत्मकथनामधून वाचायला मिळतं. प्रकाश पेरणाऱ्या  शिक्षणाधिकाऱ्याचं आत्मकथन 'काजवा' हे नक्की वाचायला हवं.  हे आत्मकथन साहित्य क्षेत्रात मैलाचा दगड ठरेल असा विश्वास वाटतो.

पुस्तक: काजवा (आत्मकथन)
लेखक: पोपट काळे
प्रकाशक: मनोविकास प्रकाशन पुणे
 मूल्य:३५० रू.
पृष्ठे: २७२
पुस्तक परिचय: समाधान शिकेतोड
┄─┅━━▣▣▣━━┅─┄

Saturday, 19 November 2022

प्रकाशवाटा

आर्यन इयत्ता आठवीत शिकतोय. दिवाळीच्या सुट्टीत त्यानं प्रकाशवाटा हे पुस्तक वाचलं. त्यानं या पुस्तकाचा लिहलेला परिचय......

पुस्तक परिचय-प्रकाशवाटा
•••••••••••••••••••••••••••••••••••
माझ्या दिवाळीच्या सुट्ट्या सुरू झाल्या होत्या.मी दिवाळीच्या सुट्टीत माझ्या आजोळी म्हणजे मामाच्या गावाला गेलो होतो. पप्पा अवांतर वाचन करण्यासाठी नेहमी प्रेरीत करत असतात. पुस्तक आयुष्याला कलाटणी देऊ शकतं, एक पान एखाद्याचं आयुष्य बदलू शकतं, एक वाक्य एखाद्याच्या आयुष्याचा ध्येय ठरू शकते.त्यासाठी रोज एक तरी पान वाचत जा! असा संदेश म्हणून पप्पांनी मला 'प्रकाशवाटा' हे पुस्तक वाचायला दिले.     

 मॅगसेसे पारितोषिक विजेते डाॅ. प्रकाश आमटे यांनी साकार केलेल्या स्वप्नांची गोष्ट प्रकाश वाटामध्ये शब्दबद्ध केलेली आहे. आनंद वनातले दिवस त्या बाहेरचे जग हेमलकसा येथील सुंदर आव्हानात्मक चित्र पुस्तकाच्या प्रारंभी उभे राहते. कसोटीचे प्रसंग आणि जीवावरचे प्रसंग अंग थरारून टाकतात.     

आदिवासींना मुख्य प्रवाहात आणावं. त्यांची पिळवणूक थांबावी आणि त्यांना माणूस म्हणून जगण्याची संधी मिळवून द्यावी असं बाबांच्या मनात होतं. बाबांनी दाखवलेला विश्वास ताईची माया आणि मंदाचे भक्कम साथ यामुळे हे काम इथवर पोहोचलं. विकासच आणि लेखकाचे इंटरसायन्स आनंदनिकेतन मधून झालं आणि योगायोगाने मंदाही लेखकांना पसंद पडली. १९७२ साली दुष्काळ पडला होता. त्या खडतर दुष्काळात त्या दोघांचं लग्न झालं.                         

वैद्यकीय शिक्षण झाल्यावर लेखकांनी सपत्नीक आदिवासी भागात काम करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी हेमलकसा या अगदी छोट्याशा गावात कामाला सुरुवात केली. हेमलकशात कुठल्याच सोयीसुविधा नव्हत्या. वीज नव्हती, पाणी नव्हतं, राहण्याची जागा नव्हती, माणसंही नव्हती, होतं फक्त जंगल. हेमलकशातला सुरुवातीचा काळ लेखकांसाठी प्रतिकूल होता. मात्र त्या प्रतिकुल काळात त्यांनी आदिवासींच्या वेदना जाणून घेतल्या. आपण किती भाग्यवान आहोत की आपल्याला इतक्या सुख-सुविधा उपलब्ध आहेत. याचा पश्चाताप होतो की या सोयींचापण आपण नीट वापर करत नाहीत. 

लेखकांनी आईबद्दलच्या आठवणी ही खूप छान पद्धतीने सांगीतल्या आहेत. लेखक आईला कधीच आई म्हणत नसत. लेखकांच्या आईंनी सांभाळ केलेली मुले त्यांच्या आईला ते 'ताई' म्हणायचे.त्यामुळे लेखकही त्यांच्या आईला ताई म्हणायचे.

 आपल्याला मुलाला तिकडे रानावनात राहावं लागतंय. हेमलकशात काहीच सोयी नसल्याने तिकडे पंखा नाही. हे समजल्यावर लेखकांच्या आईनं घरी पंखा असूनही तो कधीच चालवला नाही. ही काळजी फक्त आईच करू शकते. 

लेखक जरी अस्थिरोग तज्ज्ञ, नेत्रविकार तज्ञ नव्हते ;परंतु पेशंटचं दुःख बघून त्यांनी डोळ्यांवरही उपचार सुरू केले. त्यांच्या भावांने विकास आमटे यांनी ऑप्थॅल्माॅलाॅजीत एक हाऊस जॉब केला होता. तेव्हा त्यांनी मोतीबिंदूच्या अनेक शस्त्रक्रिया बघितल्या होत्या. आणि त्यासाठी असिस्टंट म्हणून कामही केलं होतं. अशा रीतीने लेखक साधे डॉक्टर असलेले पुढे तेथील लोकांसाठी सर्जन, ऑर्थोपेडिक सर्जन, डेंटिस्ट गायनॅकॉलॉजिस्ट असे सगळंच बनले.      

तिथं आदिवासी समाजात खूप अंधश्रद्धा होती. ही अंधश्रद्धा त्यांनी औषधाच्या रूपात जागृत केली. मंत्राने नेहमीच विष उतरतं असा लोकांचा विश्वास असल्याने या श्रद्धेचा उपयोग करून घ्यायची कल्पना लेखकाला सुचली. त्यामुळे त्यांनी तो मंत्र तांत्रिकाडून शिकून घेतला, 'अरेरे विंचवा आहेस कुठे?' असा काहीतरी तो मंत्र होता तो टाकल्यावर मंत्र म्हणणाऱ्याकडे विष येतं आणि त्याने ते थूकून टाकायचं असं त्यांनी विकास यांना सांगितले. असा हा प्रयोग एकदा केला. तो यशस्वी झाला. मंत्राचा उपयोग झाला नाही तर अर्थातच ते औषध द्यायचे. म्हणून लेखक म्हणतात बऱ्याचदा काय होतं विंचू याणे नांगी मारली की त्याचं विष शरीरात उतरत नाही काही विषारी विंचूंचे विष शरीरात जातं. तर विंचू चावल्यावर माणूस घाबरून जातो.तर त्याची मानसिक स्थिती चांगली होण्यासाठी त्यांनी हा मार्ग काढला.          
                             
एकंदरीतच काय तर यातील प्रत्येक जण आदर्श आहेत. 'प्रकाशवाटा' हे आत्मकथन एका लेखकाचं आहे जो सपत्नीक आदिवासी भागात काम करण्याचा निर्णय घेतो. प्रकल्प चालू करतो. हे आत्मकथन प्रेरणादायी आहे. पुस्तक प्रत्येकांनी वाचायला हवं. 
                                              
आत्मकथन - प्रकाशवाटा   
 लेखक - डॉ. प्रकाश आमटे    
 प्रकाशन - समकालीन प्रकाशन,पुणे  
पुस्तक परिचय- आर्यन समाधान शिकेतोड 
मूल्य - २०० पृष्ठे - १५५
┄─┅━━▣▣▣━━┅─┄


Monday, 7 November 2022

बालसाहित्य निर्मिती काळाची गरज

गेल्या आठवड्यात प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ आदरणीय डाॅ.अभय शहापूरकर यांना माझी मुलांसाठी लिहलेली पोपटाची पार्टी(बालकवितासंग्रह ) व जादूई जंगल (बालकादंबरी) ही पुस्तके भेट दिली होती. आपल्या व्यस्त वेळेतून त्यांनी ही पुस्तके वाचून छान लेखाच्या स्वरूपात अभिप्राय पाठवला आहे. यामुळे निश्चितच बालसाहित्याला पाठबळ व बालसाहित्यिकांना प्रेरणा मिळते.

अभिप्राय

माझे स्नेही व बालसाहित्यिक श्री. समाधान शिकेतोड सरांनी त्यांची नुकतीच प्रकाशित झालेली दोन पुस्तके मला भेट दिली. त्यातले एक पुस्तक मुलांच्या गंमत गोष्टींचे “जादुई जंगल” हे राजहंस प्रकाशन संस्थेने प्रकाशित केले आहे. तसेच “पोपटाची पार्टी” हा बालकवितासंग्रह इसाप प्रकाशन नांदेड यांनी प्रकाशित केला आहे. ही दोन्हीही पुस्तके वाचली. ही दोन्हीही पुस्तके वाचत असताना मला मागील काळातील बालसाहित्य आठवले. त्यावेळेस ईसापनिती, पंचतंत्र ईत्यादींच्या कथा मुले आवडीने वाचत. त्यानंतर चांदोबा, कुमार, किलबिल, किशोर, फुलबाग आदी मासिकांनी बालसाहित्यात मोलाची भर टाकली. नंतरच्या कालखंडात बालसाहित्यात फार कांही भरीव लिखाण झाले नाही. कांही मराठी चित्रकथा (कॉमिक्स) आल्या परंतू त्यात सातत्य राहिले नाही.
मराठी बालसाहित्याचा प्रारंभ सानेगुरूजी, महादेवशास्त्री जोशी, आचार्य अत्रे, गंगाधर गाडगीळ यांचे साहित्याने झाला. त्यात समकालीन लेखक- भा.रा. भागवत , मंगेश पाडगांवकर, निर्मला माने एकनाथ आव्हाड ईत्यादींनी मोलांची भर घातली. परंतु साहित्याच्या क्षेत्रात बालसाहीत्य कायमच दुर्लक्षिलेले राहीले. वास्तविक बालसाहित्य हा अवघड साहीत्य प्रकार आहे. मुलांचे भावविश्व समजून, त्यांच्या पातळीवर जाऊन,त्यांना समजेल, आनंद देईल अशी साहित्य निर्मिती करणे हे आव्हानात्मक काम आहे.
बरेचदा आपण मुलांना गृहीत धरतो. त्यांचे स्वतंत्र अस्तित्व आहे, त्यांच्याही भाव-भावना आहेत, त्यांचेही वेगळे विचार असु शकतात हे आपण समजून घेत नाही. पालक त्यांना आपलाच एक अवयव (appendage) समजतात व आपले विचार, आवडी निवडी त्यांच्यावर लादण्याचा प्रयत्न करतात. हया सर्व गैरसमजुतीला छेद देत बालसाहित्य निर्माण करावे लागते.
चालु काळात मोबाईलचा वापर वाढला. कोरोना साथीमुळे ऑनलाईन शिक्षणासाठी मुलांच्या हातात मोबाईल आला व त्यांचा वाढलेला “स्क्रिन टाईम” मानसिक रोगटपणाला आमंत्रण देऊ लागला. त्याबाबत खुप चर्चा होते. वाचन संस्कृती कमी होण्यासाठी मोबाईलला जबाबदार धरले जाते. परंतु बालकांना आपण त्या आभासी जगातुन बाहेर आणण्यासाठी त्यांना आनंद देणारा सक्षम पर्याय, बाल साहित्याच्या रूपाने देऊ शकतो. त्यामुळे उत्तमोत्तम बाल साहित्य निर्मिती काळाजी गरज ठरते. 
साहित्याच्या क्षेत्रात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजन केले जाते. त्याचबरोबर विद्रोही साहित्य संमेलन, गुराखी साहित्य संमेलन, वंचितांचे, महिलांचे साहित्य संमेलन ईत्यादी नियमितपणे आयोजित केले जातात पण बालसाहित्य संमेलन अभावानेच दिसते. त्यासाठी समाजधुरीणांनी, साहित्यिकांनी, साहित्यप्रेमींनी आवर्जून प्रयत्न केले पाहीजेत. नपेक्षा बालके येणाऱ्या काळात वाचनानंदाला पारखे होतील. प्रस्थापित साहित्यकृतीत बालकांचे प्रतिनिधित्व आभावानेच दिसते.
श्री. शिकतोडे सरांनी बालसाहित्य प्रकार अत्यंत यशस्वीरित्या हाताळला आहे. शिक्षकी पेशात असलेने मुलाशी समरस होऊन, त्यांचे भावविश्व समजून, उमजून त्यांची ही मुलांना निखळ आनंद देणारी साहित्यनिर्मिती आहे. त्यांच्या “जादुई जंगल” हया पुस्तकात जंगलातील प्राण्यावर आधारीत कथा आहेत. लहान मुलांना प्राणी आपल्यासारखे बोलतात हयाचे खुप अप्रुप वाटते. तसेच जादुचेही खुप आकर्षण असते. ससे, माकड, जिराफ, वाघ-सिंह ईत्यादी प्राणी त्यांचे सखे-सोबती बनतात. मुलांना समजेल अशा सोप्या भाषेत व लहान वाक्यात या कथा लिहील्या आहेत. मुलांना निखळ आनंद देणारी ही साहित्यकृती आहे हे निश्चित ! पुस्तकात चित्रेही छान छापली आहेत, फक्त ती रंगीत असती तर अजुन उठावदार दिसले असते.
श्री. शिकेतोडे सरांचा बालकविता संग्रह “पोपटाची पार्टी” ही पुस्तिकाही सुंदर आहे. बालकवितांच्या जगात सरांच्या सिध्दहस्त लेखणीने मुलांना निखळ आनंद देण्याबरोबरच त्यांच्या समाजिक जाणिवही जागृत करण्याचा, त्यांना समाजाप्रती संवेदनशील बनविण्याचाही यशस्वी प्रयत्न केला आहे. बेडूक, खारूताई, माकड, चिऊताई, कावळा ईत्यादी परिचित प्राण्यासंबंधी छोटया गेय कविता, त्याचबरोबर ग्रामीण जीवनातील बालकांना मोहवून टाकणाऱ्या बैलगाडया, गुऱ्हाळ, जत्रा ईत्यादीवरही कविता आहेत. शेतकऱ्यांच्या कष्टप्रद जीवनावर, पोस्टमन, पोलीस यांचाही परिचय मुलांना समजेल अशा भाषेत करून दिला आहे.
दोन्ही पुस्तकांचे निर्मिती मुल्य उच्चदर्जाचे आहे. बालसाहित्याच्या क्षेत्रातील मोठी पोकळी हया दोन्ही पुस्तकामुळे कांही अंशी भरून निघेल अशी आशा आहे. भविष्यातही श्री. शिकेतोडे सरांच्या समर्थ लेखणीतून सकस बालसाहित्य निर्माण व्हावे अशी अपेक्षा व त्यासाठी त्यांना शुभेच्छा !

डॉ. अभय शहापूरकर

Sunday, 26 June 2022

सुट्टी एके सुट्टी-मंगेश पाडगावकर

सांग सांग बोलानाथ पाऊस पडेल काय? हे गाणे प्रत्येक बालकांच्या लहानपणीची समृद्ध आठवण आहे.मंगेश पाडगावकरांची अशी अनेक कविता,गीते बालमनाला मोहीनी घालतात.त्यांनी मुलांसाठी खूप लेखन केले.त्यांचे बालकवितासंग्रह प्रसिद्ध आहेत.

सुट्टी एके सुट्टी हा मंगेश पाडगावकर यांचा बालकवितासंग्रह. या बालकवितासंग्रहाच्या सुरूवातीलाच मुलांसाठीच्या कवितांबद्दलची भूमीका स्पष्ट केली आहे.या संग्रहात एकूण तेहतीस कविता आहेत.या बालकवितासंग्रहाची पहिली आवृत्ती मौज प्रकाशन,मुंबई यांनी १९९२ साली प्रकाशित केलेली असून या संग्रहाच्या आठ आवृत्त्या निघालेल्या आहेत.या कवितासंग्रहातील मनोवेधक चित्रे पुंडलिक वझे यांनी काढलेली आहेत. 

भाजी घ्या भाजी भाजी कविता खूपच मजेदार आहे.सगळ्या भाज्यांचे गंमतीदार वर्णन या कवितेत केलेले आहे.मुलांना नादमय शब्द खूप आवडतात.अशा नादमय शब्द असणाऱ्या ढिमिकि ढिम्,अडम तडम या कविता संग्रहात आल्या आहेत. उत्तर कंसात आहे सारखी कविता मुलांची जिज्ञासावृत्ती,चिकित्सकवृत्ती वाढविणारी आहे.माकड नटलं ही छोटीशीच कविता खूप मजेदार आहे.

अट्टा बट्टा
अट्टा बट्टा
माकड करतय 
नट्टा फट्टा 

शेळीचं लगीन,पावसाचं चित्र कशासाठी पोटासाठी या कविताही मुलांना आवडणार्‍या आहेत.पालकांनी मुलांसोबत या कविता वाचायला हव्यात. मुलांना वाचण्यासाठी हा बालकवितासंग्रह उपलब्ध करून द्यायला हवा.यामुळे मुलांना अवांतर वाचनाची गोडी लागेल,त्यांचे अनुभवविश्व समृद्ध होईल. 

बालकवितासंग्रह:सुट्टी एके सुट्टी
कवी: मंगेश पाडगावकर 
पुस्तक परिचय:समाधान शिकेतोड 
प्रकाशन:मौज प्रकाशन, मुंबई 
किंमत:- २५/- रू.
┄─┅━━▣▣▣━━┅─┄

Thursday, 12 May 2022

एक संघर्षगाथा: वादळवाट

वादळवाट हे आत्मकथन एका गरीब शेतकरी कुटुंबातील मुलाचं आहे. या आर्थिक विस्थापित कुटुंबाच्या वाट्याला आलेलं दुःख, दैना, हालअपेष्टा यामुळे खचून न जाता या शेतकऱ्याच्या मुलानं स्वत:च्या बळावर आकाशाला गवसणी घातली. विवेकवाद, माणुसकी, समता, बंधुता यांचा पुरस्कार करून अवघं आयुष्य कुटुंबाच्या, समाजाच्या कल्याणासाठी, उद्धारासाठी झिजवलं. असे संघर्षयात्री एम. डी. देशमुख यांची ही प्रेरणादायी जीवनगाथा आहे. ग्रंथाली प्रकाशनाने या पुस्तकाचे प्रकाशन केलेले आहे.

एका गरीब शेतकरी कुटुंबात अभावग्रस्त परिस्थितीत जन्मलेल्या एका संघर्षयात्रीची ही संघर्षगाथा आहे. लेखक एम.डी. देशमुख यांच्या वादळवाट या आत्मकथनातून गेल्या चाळीस वर्षाचा पट डोळ्यासमोर उभा राहतो. या पुस्तकाची  पाठराखण प्रसिद्ध साहित्यिक इंद्रजित भालेराव यांनी केलेली आहे. ते म्हणतात, ‘लेखक जगला त्या काळाची ही एक बखर आहे.’ खरोखरचं तत्कालीन समाजजीवन, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय जीवन या आत्मकथनातून मांडलेले आहे. प्रत्येक घटना, प्रसंग वाचताना वाचक अंतर्मुख, तल्लीन होऊन जातो. मी हे पुस्तक सलगपणे वाचून काढले.मी या साहित्यकृतीचा आस्वाद घेतला.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील बंकलगी, मोहोळ तालुक्यातील नरखेड ते उस्मानाबाद हा प्रवास लेखकाने आत्मकथनाच्या पहिल्या भागात मांडलेला आहे. लेखकाची घरची अत्यंत गरीब होती; घरात खायची मारामार होती.  अशा प्रतिकूल परिस्थितीत लेखकाला लेखकाची आई शिकण्यासाठी प्रेरणा देत होती. लेखक सांगतात, ‘आई म्हणायची जगाच्या पाठीवर कुठंही जा, शिक्षण घेतल्याबिगर राहू नको! शिक्षणंच तुला माणसात बसवंल.’ किती मोठं होतं  हे तत्वज्ञान. स्वतःच्या शिक्षणाची व्यवस्था व्हावी म्हणून लेखकाने आप्तस्वकीयांचे उंबरठे झिजवले परंतु पदरी अवहेलना, हालपेष्टा, अपमान व निराशाच आली. तुझ्या शिक्षणासाठी तुझे काका, उद्धवराव पाटील काहीतरी मार्ग काढतील म्हणून लेखकाला त्यांच्या आईनेच उस्मानाबादचा पाठविलं.

ते १९६० चे दशक होते. त्या काळात वाहतुकीच्या सोयी खूपच कमी होत्या. लेखकांकडे प्रवासासाठी पैसेही नव्हते, म्हणून लेखक नरखेड ते उस्मानाबाद पर्यंतचा मैलोनमैल प्रवास कित्येकदा अनवाणी पायानेच करतात. हा प्रवास नरखेडहून  देगाव, वाळूज, मुंगशी, सासुरे, रातंजन, मालेगाव, चिलवडी, राघुचीवाडी, उस्मानाबाद असा होत असे.  एवढा मोठा प्रवास अनवाणी पायाने ऊन-वारा कशाचीही तमा न बाळगता लेखकाने अनेक वेळा केलेला आहे. शिक्षणासाठी कशाचीही पर्वा न करता धाडसाने, हिंमतीने हा प्रवास केल्याचे दिसून येते. या प्रवासाचे वर्णन वाचताना मन भरून येते. हृदय हेलावून जाते. नरखेड ते उस्मानाबाद हा पायी  प्रवास लेखकाने नववीपासून शिक्षक म्हणून नोकरी लागेपर्यंत पायीच केलेला आहे. साठ-सत्तरच्या दशकातील समाजजीवनाचं मनमोहक, हृदयस्पर्शी वर्णन या प्रवासाच्या माध्यमातून वाचायला मिळतं. पुढील शिक्षणासाठी नरखेडहून पहिल्यांदाच उस्मानाबादला निघतानाचं वर्णन लेखक करतात..... तांबडं फुटताच सर्व उरकून तयार झालो. आईनं लवकर उठून दोन भाकरी थापल्या, अन् दाळीचा पेंडपाला केला होता. दादांच्या धोतराच्या धडुत्यात भाकरी बांधली. गोणपाटाच्या पिशवीत टाकली. आई काळजीनं म्हणाली,"रस्त्यात पाणी बघून तिथं भाकर खा. भूक मारू नको. जपून जा. पहिल्यांदाच चाललास. वाट चुकशील. विचारत विचारत जा. धाराशिव लांबच गाव. सांभाळून जा." या आत्मकथनातील लेखकाची भाषाशैली वाचकांच्या हृदयाचा ठाव घेते. 

लेखक सांगतात १९४५ साली शिमग्या-पाडव्याच्या दरम्यान माझा जन्म झाला. जन्मापासूनच दुष्ट नियतीने माझा छळ मांडला होता. वयाच्या तिसऱ्या वर्षी गंडमळा झाला व मानेला भली मोठी जखम झाली. वैद्य, देवऋषींनी इलाज केले. या आजारपणात लेखकाला खूप वेदना झाल्या. त्यातूनच पुढे तोंडाला व्यंग निर्माण झालं. लेखक म्हणतात, मला माझ्या सावलीची ही भीती वाटू लागली होती. लेखकाचं पहिलं दहा वर्षाचं बालपण बंकलगीत गेलं. पुढे कुटुंबाचं नरखेडला स्थलांतर झालं. तिथेही अभावग्रस्त जगणंच त्यांच्या वाट्याला आलं. संसारासाठी भांड्या-कुंड्याची जमवाजमव करताना आई - दादांची झालेली ससेहोलपट लेखकाला क्षणोक्षणी वेदना देत होती. लेखक सांगतात की आमच्यासाठी आई -दादांची धीराची वागणूक ही उद्याची नसणारी ठेव होती.

या आत्मकथनात सत्तर-ऐंशीच्या दशकातील ग्रामीण जीवनाचे अत्यंत मनोहारी वर्णन  लेखकाने केलेले आहे. गावातील बलुतेदारी पद्धतीविषयी लेखक सांगतात की ग्रामीण जीवनात शेतकऱ्यांसाठी बलुतेदारी खूपच पूरक व गरजेची होती. शेतकरी कष्टानं पिकवलेलं धान्य देऊन त्याला जगवत होता. बलुती त्यांच्या घरादारापासून शेताभाताच्या गरजा भागवत होती. शेतीप्रधान व्यवस्थेत दोघांचंही परस्परांसाठी तितकंच मोलाचं योगदान होतं. खेड्यापाड्यात गुण्यागोविंदानं नांदणारी ही संस्कृती जिथं तिथं पाहावयास मिळत होती. दरम्यानच्या काळात औद्योगिक क्रांतीनं हळुहळू लोकजीवन घेरलं. तिचे परिणाम तळागाळापर्यंत पोहचले. या बदलत्या वादळाची झळ ग्रामीण व्यवस्थेला बसली. अर्थव्यवस्थेनं वेगळंच वळण घेतलं. बलुतेदारीला घरघर लागली आणि या व्यवस्थेनंच तिचा बळी घेतला. त्यामुळे सामान्य शेतकऱ्यांची हानी झाली. सामान्य शेतकऱ्याच्या हानीमुळे आज ग्रामीण भागात बिगडलेल्या अर्थव्यवस्था पाहायला मिळते.                             

  लेखक बंकलगीत असताना कुंडलसंगमला संत गाडगेबाबांचे कीर्तन ऐकायला गेल्याची आठवण सांगतात. संत गाडगेबाबांच्या विचारांचा प्रभाव लेखकावर लहानपणीच पडलेला दिसून येतो. स्वच्छता, विवेकवाद, माणुसकी, विज्ञाननिष्ठा, वैज्ञानिक दृष्टिकोन, करुणा, वंचिताविषयी तळमळ असे सद्गुण लेखकाच्या अंगी आपसुकच रुजले गेले. त्यामुळे पुढे उस्मानाबाद जिल्ह्यात अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ एम. डी देशमुख सरांनी  नेटाने चालवलेली दिसून येते. लेखक अनेक वर्ष उस्मानाबाद जिल्ह्याचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष होते. त्याकाळात जातीपातींच्या कर्मठ रूढींना लेखकाने मानले नाही. लेखक एका ठिकाणी सांगतात की आमच्या घरातुन बाबूमामा वडापासून सर्व जाती-धर्माची माणसं आप परभाव न ठेवता वावरत होती. जाती धर्मापेक्षा माणूसपण जपण्याचा गुण आमच्या दादांच्याकडे अधिकच होता. तो संस्कार आम्हा बहीण-भावांच्या ठायी रुजला.                                                                                                                       लेखक गरीब देशमुख कुटुंबातून आलेले आहेत. मराठा समाजातील हुंडा, आहेर, लग्नकार्यात वारेमाप खर्च करणे या अनिष्ट प्रथांबद्दलचे काही प्रसंग मन हेलावून टाकतात. देशमुख असूनही आहेराला पैसे नसल्यामुळे होणारा अपमान त्यांच्या कोवळ्या मनाला डागणी देतो. लेखक सांगतात की गरिबीची लक्तरं वेशीवर टांगणाऱ्या ‘आहेर’ नावाच्या लग्नातल्या रुडीनं मला घायाळ केलं. सामाजिक विस्थापितांच्या दैन्य, दारिद्र्यची दाहकता जेवढी तीव्र असते, तितकीच ती आर्थिक विस्थापितांच्या वाट्याला आलेली असते. हीच परिस्थिती आजही बदलेली दिसून येत नाही. आजही मराठा समाजात या अनिष्ट रूढी परंपरा सुरू असलेल्या दिसून येतात. नवीन पिढीने तरी निदान बिगर हुंड्याचं लग्न करायला हवं. मराठा समाजातील हुंडा या अनिष्ट कृतीबद्दल लेखक सांगतात की त्याकाळात व आजही विशेषतः मराठा समाजात हंडा देण्या-घेण्याच्या प्रथांना वाजवीपेक्षा अधिक महत्त्व होते व आहे. जास्तीत जास्त हुंडा व करणीधरणी यावर प्रतिष्ठा मोजण्याची रूढीच होती. या खोट्या प्रतिष्ठेच्या रुढी-परंपरेला समाज बळी पडला. त्यासाठी कर्ज काढून बारेमाप खर्चाच्या ओझ्यानं कफल्लक होणं आलंच. समाजात या संबंधात एक म्हण रुढ झालेली ‘रीन फिटेल पण हीन फिटत नसतं.' ही हीनता येऊ नये म्हणून आपलं स्थावरही पणाला लावलं जायचं. आजही याचं आचार-विचाराचे भूत मराठा समाजाच्या मानगुटीवर स्वार आहे.                                                                      

  लेखक १९७० ला स्वतःचं लग्न साध्या पद्धतीने करून समाजासमोर आदर्श उभा करतात.लेखकानं जगण्याचं स्वतःचं एक आदर्श तत्वज्ञान अंगीकारण्याचा प्रत्यय  आत्मकथन वाचताना येतो. आज समाजातील तरूण यापासून काहीतरी शिकतील हा आशावाद बाळगायला हरकत नाही. आपल्या पत्नी विषयीचा आदरभाव, कृतज्ञता या आत्मकथनात पानोपानी  वाचायला मिळते. लेखक आपल्या पत्नीविषयी लिहितात की  कितीतरी काळ  तिला उपेक्षित  जीणं जगावं लागलं. तिच्या वाट्याला आलेले भोग तिनं संयमानं पचविले.  कधीच आक्रस्ताळेपणा केला नाही. संसाराच्या अंधारलेल्या वाटचालीत उषा आमच्या परिवारात पहाट होऊन आली होती. त्यामुळेच उज्वल प्रकाशकिरणांचा मागोवा घेणं सोपं झालं.                                                                           लेखक त्यांचे काका उद्धवरावदादांच्या आठवणी सांगतात. उद्धवरावदादांचा सहवास लेखकांना समृद्ध करून गेला.अडचणीच्या काळात ते उद्धवरावदादांचा सल्ला घेत असत.त्या काळातील राजकीय परिस्थितीचे, निवडणुकीचे, प्रचाराचे, प्रचारसभांचे अनेक प्रसंग खूप उत्तम पद्धतीने सांगितले आहे. लेखक सांगतात की  दादांनी आपल्या आयुष्यात समाजाप्रति  समर्पित केलं होतं. ‘सामान्यांचा कैवारी’ असाच त्यांचा लौकिक होता. त्यांनी दिलेलं सामाजिक व राजकीय योगदान सर्वमान्य होतं. मला त्यांच्या विचारांचा वारसा मिळाला. त्यांच्या सहवासात माझं आयुष्य उजळून निघालं. उद्धवरावदादांच्या कॅन्सरच्या आजारपणातील आठवणी हृदय पिळवटून टाकतात.

एम.डी. देशमुख सरांना संताजी,सचिन व संजय ही तीन मुलं. डॉ. संताजी, डॉ. सचिन व संजय या तिन्ही मुलांच्या जडणघडणीच्या काळातील आठवणी लेखकाने सांगितलेल्या आहेत. मुलांचे शिक्षण, त्यांचे लग्न, त्यांच्या व्यवसायात, नोकरीत स्थिरावणं याबद्दल आठवणी खूपच छान आहेत. डॉ. संताजी, डॉ. सचिन व सुना डॉ. संगीता व डॉ. शिल्पा यांनी सामाजिक बांधिलकी जपत रुग्णसेवेचा, गरीब व दुर्बल वंचितांना मदतीचा वसा घेतलेला आहे असे लेखक अभिमानाने सांगतात. आपल्या तिसऱ्या मुलाने संजयने क्रीडा शिक्षक म्हणून हॉलीबॉल खेळात राज्य स्तरावर केलेल्या चमकदार कामगिरीची तोंडभरून कौतुक करतात.                                                          घरात कुठलेही पाठबळ नसताना स्वतःच्या हिंमतीवर छत्रपती शिवाजी हायस्कूल या शाळेची स्थापना, मुख्याध्यापक संघाची स्थापना, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम याबद्दल लेखकाने आत्मकथनाचा शेवटच्या टप्प्यात हा प्रवास कथन केलेला आहे. या पन्नास-साठ वर्षाच्या संघर्षाच्या काळात ज्या ज्या व्यक्तीनं त्यांना मदत केली. त्यांचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख पानोपानी केल्याचं आढळतं. खास करून त्यांच्या विद्यार्थ्यांनींचा  उल्लेख ते  विद्यार्थी लेक असा करतात प्रसिद्ध साहित्यिक डॉ. वृषाली किन्हाळकर या त्यांच्या विद्यार्थिनी होत्या. त्यांनी एका कार्यक्रमात एम.डी.  देशमुख सरांचा आदराने उल्लेख केला होता हे आवर्जून सांगतात.   

       हे आत्मकथन एका शेतकरी आर्थिक विस्थापित कुटुंबातील मुलाचं आहे. एका गरीब शेतकऱ्याच्या मुलानं स्वतःच्या बळावर, हिंमतीवर आकाशाला गवसणी घातली. महाराष्ट्र शासनाचा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला. विवेकवादाचा, माणुसकीचा, विज्ञानाचा पुरस्कार करून माणसं जोडली. नाती टिकवली. अवघ्या कुटुंबाचे पालन पोषण करत संपूर्ण आयुष्य कुटुंब व समाजाच्या हितासाठी झिजवलं अशा एका संघर्षाची हृदयस्पर्शी कथा आहे. गेल्या पन्नास वर्षातील सामाजिक, सांस्कृतिक, भौगोलिक, राजकीय पट चित्रपटाप्रमाणे डोळ्यासमोर उभा राहतो. हे आत्मकथन मराठी साहित्यविश्वात मैलाचा दगड ठरेल असा विश्वास वाटतो.

आत्मकथन – वादळवाट

लेखक – एम.डी.देशमुख

प्रकाशन – ग्रंथाली प्रकाशन,मुंबई.

ग्रंथ परिचय – समाधान शिकेतोड

पृष्ठे – ४००

मूल्य – ४०० 








                                                                      

 

 

           

 

                        

Sunday, 10 April 2022

जादुई जंगल-पुस्तक परिचय

गोव्यातील गोवन वार्ता वर्तमानपत्राच्या तरंग पुरवणीत प्रसिद्ध झालेला जादुई जंगल या बालकादंबरीचा परिचय

पुस्तकाचे नाव - जादुई जंगल 
लेखक - समाधान शिकेतोड 
प्रकाशक - राजहंस प्रकाशन
पुस्तक परिचय - मुग्धा मणेरीकर 

लहान मुलांच्या दुनियेत शिरून त्यांचे भावविश्व अनुभवण्यासाठी जादुई जंगल हे एक उत्तम पुस्तक आहे. वयवर्षे चार पासून यातील लहान लहान गोष्टी मुलांना वाचून दाखवता येण्यासारख्या आहेत. जादुई जंगल ही लहान मुलांची गोष्ट असली तरी ती फक्त लहान मुलांपर्यंत मर्यादित आहे, असे नाही. वाचता येणारी मुले ते मोठी माणसे ही गोष्टअगदी आनंदाने वाचू शकतात. 
ही गोष्ट आहे एका जंगलाची. एक मोठे जंगल, त्यातील नद्या, डोंगर यांचे वर्णन अतिशय सुंदर आहे. या वर्णनांमध्ये एकसंधपणा आहे. एक कथा संपली तरी त्यातील वर्णने, संदर्भ पुढच्या कथेत हळुवारपणे येतात. यामुळे साहजिकच वाचक गोष्टीत गुंतला जातो. लहान मुलांना त्यांच्या विश्वात रमवणारे आणि मोठ्यांना सुद्धा काही काळ वास्तव विसरायला लावणारी ही वर्णने या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. 
जंगलात एक ससा येतो ज्याला जादू करायची कला अवगत असते आणि सुरु होते ही जादुई जंगलाची गोष्ट. सशाच्या करामती, त्याला लबाड प्राण्यांमुळे होणारा त्रास ते सगळ्या प्राण्यांची त्याला मिळणारी सोबत अशी ही लहानशीच गोष्ट असली तरी त्यातील कल्पकतेमुळे मुलांना आवडेल अशी आहे. 
प्राण्यांची शाळा, माकडांचा दवाखाना, जत्रा, कोकिळेने घेतलेले संगीताचे वर्ग आणि जोडीला जादू येणाऱ्या काही प्राण्यांच्या करामती अशा अनेक गंमती या पुस्तकात आहेत. 
जंगल वाचवण्यासाठी प्राण्यांनी तयार केलेली रोपवाटिका, त्यात वापरलेल्या बांबूच्या पाईपलाईन, प्राण्यांचा गुप्तहेर गट, माकडांना बांधून दिलेली घरे यामुळे मुलांना नेहमीच्या गोष्टींमधून देखील वेगळ्या दिशेने विचार करण्यासाठी लेखकाने चालना दिली आहे. कथेच्या शेवटी कोणताही बोध अधोरेखित करून लिहिण्याची गरजच यातील गोष्टींना नाही, कारण लेखकाने आपल्या लेखन कौशल्याने ते अलगदपणे कथेतच गुंफले आहेत. यामुळे मुलांना या गोष्टी वाचताना कंटाळा आजिबात येणार नाही व योग्य शिकवण मिळेल. 
सुटीत मुलांना वाचायला आवर्जून द्यावे अथवा मुद्दाम वाचून दाखवावे असे हे कल्पकतेने परिपूर्ण असे पुस्तक आहे. साधीशीच गोष्ट असली तरी ती रंगवून, मुलांच्या दृष्टिकोनातून विचार करून कशी लिहावी याचे हे पुस्तक म्हणजे उत्तम उदाहरण आहे. 
मुलांबरोबर वेळ घालवण्यासाठी, आईवडील व मुले एकत्र काय करू शकतात या प्रश्नाचे उत्तर म्हणजे जादुई जंगलचे वाचन. लहान मुलांबरोबर मोठ्यांना सुद्धा वाचनाचा आनंद देणाऱ्या या कथा या उन्हाळी सुट्टीत नक्कीच लोकप्रिय ठरतील.

Saturday, 27 November 2021

चला किशोर वाचूया

॥पुस्तक परिचय॥
दिवाळी अंक 'किशोर'
•••••••••••••••••••••••••••••••
 बालमित्रांना 'किशोर' मासिक खूपच आवडते. बालमित्र किशोर मासीकाची दर महिन्याला वाट पाहत असतात. यावर्षीचा किशोरचा दिवाळी खूपच छान आहे.चंद्रमोहन यांनी आकर्षक असं मुखपृष्ठ काढलेलं आहे.अंकातील चित्रे मनोवेधक आहेत. अंकातील कथा,ललित लेख,कविता यासाठी मुलांच्या भावविश्वातील  चित्रे काढली आहेत.
अनिल अवचट,राजीव तांबे,प्रवीण दवणे,दासू वैद्य,दिलीप प्रभावळकर, महावीर जोंधळे, स्वाती राजे,वीरा राठोड,डाॅ.सुरेश सावंत,एकनाथ आव्हाड,घनश्याम देशमुख,फारूक काझी,उत्तम कोळगावकर,रेणू गावस्कर,श्रीकांत बोजेवार,विजय पाडळकर यासारख्या बालसाहित्यीकांच्या दर्जेदार बालसाहित्याची मेजवाणी बालमित्रांना या अंकातून मिळते.

विजय पाडळकर यांनी फ्रेंच भाषेतील 'द रेड बलून' या चित्रपटाचा उत्कंटावर्धक परिचय  मुलांच्या भाषेत केला आहे. हा परिचय वाचल्यावर हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता वाढते. सध्या मुले मोबाईलवेडी झालेली आहेत.मोबाईलवर विविध गेम खेळतात.विशेषतः पब्जी गेमच्या विळख्यात मुले अडकली आहेत.या मुलांचे मोबाईल वेड सोडवून त्यांना खेळाकडे,पुस्तक वाचनाकडे कसे वळवले हे संजय भास्कर जोशी यांच्या ' पब्जीच्या कचाट्यातून मोबाईल गॅगची सुटका!' या कथेतून वाचायला मिळते.सध्याच्या वास्तव परिस्थितीवर प्रकाश टाकणारी कथा खूपच भावली. कोरोना काळात आई-बाबा पाॅझीटिव्ह आल्यावर धिरज कसं हिंमतीनं घर सांभाळतो.स्वतः स्वयंपाक करून आईबाबांना सांभाळतो. ही काळजाला चटका लावून जाणारी कथा खूपच छान पद्धतीने प्रविण दवणे यांनी मांडली आहे. गुलजार यांची ऑनलाईन क्लासरूम,दिलीप प्रभावळकर यांची पाहुणी,अनिल अवचट यांची देवराई,फारूक काझी यांची गंध,एकनाथ आव्हाड यांची दिवा कवितेचा,स्वाती राजे यांची मिनीचा वाढदिवस या कथा मनाला भावतात.मल्हार अरणकल्ले यांची 'मायचं चित्र' ही ग्रामीण बोलीतील कथा खुपच छान आहे. श्रीकांत बोजेवार यांची 'बिनशेवटाच्या गोष्टींची गोष्ट' ही वेगळ्या धाटणीची विनोदी कथा वाचताना उत्सुकता वाढत जाते.

शिवकन्या शशी यांनी खेळाडूंच्या संघर्षगाथा सांगीतलेल्या आहेत.आंतराष्ट्रीय खेळाडूंच्या या संघर्षगाथा  प्रेरणादायी आहेत. जाई देवळकर यांनी राजस्थानमधील प्रवासवर्णनाचा अनुभव वाचल्यावर राजस्थानला एकदा भेट द्यावीच असे वाटते.

अनिल साबळे यांनी एका मेंढ्या राखणा-या मुलाला शाळेत दाखल करून शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा ह्रद्यस्पर्शी अनुभव 'रामा पुन्हा शाळेत जाऊ लागला' या कथेतून येतो.ही प्रेरणादायी कथा आपणा सर्वांनाच प्रेरणा देणारी आहे.

या अंकातील कविताही खूपच छान आहेत.दासू वैद्य यांची एक होता भातखाऊ, डाॅ.सुरेश सावंत यांची मीच माझा खोडरबर,वीरा राठोड यांची पुस्तकातल्या पानांमध्ये,मंदा नांदुरकर यांची किल्ला,उत्तम कोळगावकर यांची उड्डाण अशा अनेक कविता बालमनाला भावणा-या आहेत.
या अंकातील घनश्याम देशमुख यांची गंमतकोडी मुलांना चिकीत्सक,तार्किक विचार करायला लावतात. किशोरचा ऑक्टोबर-नोव्हेंबरचा हा जोडअंक दिवाळी अंक म्हणून प्रकाशीत झालेला आहे.प्रत्येक पालकाने हा अंक आपल्या पाल्याला आवर्जून वाचायला द्यावा.शाळेतील ग्रंथालयात हा अंक ठेवूयात.

पुस्तक परिचय : समाधान शिकेतोड

दिवाळी अंक २०२१: किशोर
संपादक: किरण केंद्रे
प्रकाशक : बालभारती,पुणे.
पृष्ठे १३२     वार्षिक वर्गणी : ५० रु.
┄─┅━━▣▣▣━━┅─┄

Friday, 28 May 2021

आनंदाने शिकण्याच्या दिशेने

आपल्या मुलांचे शिकणे अर्थपूर्ण व्हावे असे जगातल्या सर्वच मोठ्या माणसांना वाटते. त्यासाठी शिकण्याची प्रक्रिया ‘मूल’केंद्री असणे, मुलाच्या आजच्या आणि उद्याच्या जगण्याशी जोडलेली असणे आणि महत्त्वाचे म्हणजे ती आनंददायी असणे आवश्यक आहे हे आपण सारेच मानतो. काही प्रयोगशील शाळांचा अपवाद वगळता शिकण्यासाठी असलेल्या सध्याच्या व्यवस्थेत आपली बहुतांश मुले अर्थपूर्ण, सर्जनशील व आनंददायी शिक्षणापासून वंचित आहेत हेही आपण जाणतो. महाराष्ट्रात सृजन आनंद विद्यालय, ग्राममंगल, नाशिक आणि वर्ध्याची आनंदनिकेतन, अक्षरनंदन, क्वेस्ट अशा अनेक संस्था यासाठी सातत्याने काम आणि प्रयोग करीत आहेत. मात्र ही बालकेंद्री-व्यवस्था त्या त्या शाळेत शिकणार्‍या मुलांपुरतीच मर्यादित राहते ही वस्तुस्थिती आहे.

पालकत्वाच्या शैक्षणिक व सामाजिक अशा दोन्ही बाजूंचा वेध घेत शिकण्याच्या प्रक्रियेकडे सर्वकल्याणकारी दृष्टीने पाहत, त्यांतून नव्या दिशा शोधण्याचे व समाजासमोर मांडण्याचे काम पालकनीती मासिक 1987 पासून करीत आहे.  याच वैचारिक बैठकीच्या आधारे, पुण्यातील लक्ष्मीनगर झोपडवस्तीतील सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या वंचित अशा मुलांच्या आनंददायी शिक्षणाचे व विकासाचे स्वप्न साकार करण्याच्या उद्देशाने 1996 साली खेळघराचे काम सुरू झाले. कार्यकर्ते व मदत करणारी माणसे जोडत, घडवत, सर्वदूरच्या समविचारी संस्थांनी, व्यक्तींनी केलेले प्रयोग समजून घेत आणि स्वतःच्या अनुभवांतून शिकत ‘खेळघर’ नावाची पूरक शिक्षणाची एक व्यवस्थाच विकसित होत गेली. मुलांना आवाहन करणारा आणि म्हणूनच आनंददायी असणारा असा हा उपक्रम! लहान वयात जग समजून घेण्यासाठी मदत करणारा, खेळ आणि प्रेम, आधार आणि सुरक्षिततेची भावना देणारा! हे सारे असेल तर शिकणे आनंदाचे होणार हा विचार केवळ नावातच नाही तर खेळघराच्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींतून भेटतो.

महाराष्ट्रातील वंचित मुलांसाठी अशी अधिकाधिक खेळघरे उभी राहावीत म्हणून शिक्षक, पालक व कार्यकर्ते यांचेसाठी 2007 पासून ‘पालकनीती परिवार’तर्फे प्रशिक्षणे घेतली गेली. त्यातून आपल्याला समजलेले इतरांपर्यंत पोहोचवताना अधिक पक्के होत जाते याचा अनुभव कार्यकर्त्यांना येत गेला. नवी खेळघरे चालवू इच्छिणार्‍या कार्यकर्त्यांच्या हाताशी प्रशिक्षणात शिकलेल्या गोष्टी लिखित स्वरूपात असण्याची गरज पुढे आली आणि त्यातून ‘आनंदाने शिकण्याच्या दिशेने’ या पुस्तकाची निर्मिती झाली. पहिल्या आवृत्तीच्या विकसनाचे काम 5 वर्षे चालू होते. 2015 मध्ये प्रकाशित झालेली पहिली आवृत्ती वर्षभरात संपली आणि 2016 मध्ये दुसरी. मधल्या काळात नव्याने शिकलेल्या गोष्टींची भर घालत आत्ता 2021 मध्ये तिसरी आवृत्ती प्रकाशित झालीय. एकूण 380 पृष्ठांचा मजकूर, हाताळायला सोयीस्कर व्हावा म्हणून, दोन पुस्तिकांमध्ये विभागला गेला.

पहिल्या भागात खेळघराची संकल्पना, आपण कसे शिकतो, हे शिकणे आनंदाचे व्हावे यासाठी काय करता येईल, खेळ, कला आणि संवाद ही माध्यमे जाणिवांच्या आणि विचारांच्या विकासाला कशी चालना देतात, आणि ही माध्यमे वापरून जीवनकौशल्यांच्या विकासाची खेळघरातील रीत अर्थात उपक्रमांची तपशीलवार मांडणी केलेली आहे. दुसर्‍या भागात भाषा आणि गणित या अभ्यासविषयांतील संकल्पना मुलांच्या जीवनाशी जोडून घेऊन कशा शिकवल्या जातात ते सांगितले आहे. पुढच्या प्रकरणात शिकलेले तपासून पाहणे व त्यानुसार पुढची दिशा ठरवणे हे कसे घडते याबाबत म्हणजे मूल्यमापनासंदर्भात मांडणी आहे. शेवटी खेळघर सुरू करण्याच्या प्रक्रियेचे टप्पे दिलेले आहेत.

या पुस्तिकेची निर्मिती नवे खेळघर सुरू करणार्‍या कार्यकर्त्यांसाठी म्हणून झालेली असली तरी प्रस्तावनेत म्हटल्यानुसार शिकण्या-शिकवण्याच्या प्रक्रियेचा संवेदनशीलतेने विचार करणार्‍या प्रत्येकासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरू शकते, याची प्रचिती पुस्तक वाचताना येतेच.

या पुस्तकाची काही वैशिष्ट्ये अशी आहेत

1) संवादी भाषेतील सैद्धांतिक चर्चा

‘आपण कसे शिकतो’ या प्रकरणात आणि प्रत्येक भागाच्या सुरुवातीला त्या त्या विषयाशी संबंधित तत्त्व आणि सिद्धांताची चर्चा या पुस्तिकेत केलेली आहे. मात्र भाषा साधी, सोपी आणि संवादी आहे. रोजच्या व्यवहारातील समर्पक उदाहरणे दिलेली आहेत. यामुळे सिद्धांतांमधील जडता आणि क्लिष्टता खूप कमी होते आणि ते ओळखीचे आणि जवळचे वाटू लागतात.

2) शिकणे जगण्याशी जोडायचे… पण कसे?

जगणे अधिक चांगले व्हावे म्हणून शिकायचे… तर शिकणे जगण्याशी जोडलेले हवे.  आपण सगळे हे तत्त्व म्हणून जाणतो. पण ते मुलांच्या आजच्या आणि उद्याच्याही (अपेक्षित) जगण्याशी कसे जोडून घ्यायचे याची दिशा आपल्याला या पुस्तकातून मिळते. शिक्षक, पालक किंवा मुलांना शिकवू इच्छिणार्‍या प्रत्येकाला एक प्रश्न वारंवार समोर येतो. मुलांना औपचारिक अभ्यास करण्याची इच्छा सहसा नसते. त्यात रस नसतो. मग सक्ती करावी लागते. बर्‍याचदा शिक्षा किंवा आमिषांचा आधार घ्यावा लागतो. मुलाला शिकण्याची इच्छा आहे का, रस आहे का, हे का आणि कसे पाहायचे? त्यासाठी ‘मूल समजून घेणे’, त्याचे मनापासून ऐकणे, त्याच्या बोलण्यात रस घेणे, त्याच्यावर विश्वास ठेवणे, कधी कधी त्याच्या शब्दांमागच्या विचारापर्यंत पोहोचणे… हे सगळे आपण कसे करू शकतो, त्यासाठी स्वतःच्या पूर्वसमजुती का आणि कशा तपासून पाहायच्या, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला या पुस्तकात मिळतात. शिकण्याची प्रक्रिया मुलांचे अनुभव, भावभावना आणि विचारांशी जोडलेली/ जुळलेली असेल, तर शिकणे मनापासून, न कंटाळता, आनंदाचे आणि परिणामकारक होते हे आपण जाणतोच.

भाषेतील व्याकरणासारखे घटक, गणितातल्या अमूर्त संकल्पना शिकायला मदत करतानाही मुलाच्या अनुभवांच्या आधारे तिथपर्यंत कसे सहज पोहोचता येते याच्या तपशीलवार रीती, पद्धती, उपक्रम आपल्याला या पुस्तकातील भाषा आणि गणित या दोनही विभागात मिळतील. मुलांना आवडणार्‍या अनेक खेळांच्या माध्यमातून (उदा. पत्ते) गणित कसे शिकवता येते हे वाचताना आपल्याला आपल्या वर्गातल्या/ घरातल्या गणितात मागे असणार्‍या मुलांना शिकवण्याच्या अनेक युक्त्या सापडतील.

3) शिस्त लावण्यासाठी नव्हे स्वयंशिस्त रुजवण्यासाठी

झोपडवस्तीत राहणार्‍या, पुणे महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिकणार्‍या मुलांबरोबर केलेले काम हा या पुस्तकाचा मूळ आधार आहे. अनेक प्रकारच्या वंचिततेला सामोरे जात वाढणार्‍या या मुलांबरोबर या विषयावर 20 वर्षे सातत्याने आणि संवेदनशीलतेने खेळघराने काम केलेले आहे. या अनुभवातून हाती आलेली शिस्त रुजवण्याची रीत केवळ शिक्षक, पालक, कार्यकर्ते यांच्यासाठीच नव्हे, तर माणसांसोबत राहणार्‍या प्रत्येक माणसाने समजून-शिकून घ्यावी आणि अंगीकारावी अशी आहे. ‘मुलांसाठी नाही तर मुलांबरोबर काम करणे, नियंत्रकाच्या भूमिकेतून बाहेर येणे, मुलांनी मोठ्यांचे ऐकावे असे वाटत असेल तर मोठ्यांनीही मुलांचे ऐकण्याची सवय लावून घेणे, वर्गाचे नियम सर्वांनी मिळून चर्चेतून तयार करणे, नियम केवळ मुलांसाठीच नव्हे तर मोठ्यांसाठीही असतात हे मान्य करणे आणि ते पाळणे’ हे या पुस्तकातील म्हणणे मुलांकडून शिस्तीच्या वागण्याची अपेक्षा करणार्‍या तुम्हा-आम्हाला स्वतःचे वागणे तपासून घ्यायला भाग पाडते.

4) चुकण्यातून शिकण्याकडे

मुलांच्या चुका ही आपल्यासाठी त्यांच्या शिकण्यात येणार्‍या अडचणी समजून सांगणारी वाट असते. ती कशी हे या पुस्तकात अनेक ठिकाणी दिलेल्या तपशीलवार उदाहरणांतून लक्षात येते. गणितासारख्या विषयात-अर्धवट समजलेले काय, समजले नाही ते नेमके काय, अजिबात समजले नाही की उपयोग करताना प्रश्न पडले – हे दिलेल्या उदाहरणांवरून सुस्पष्ट होते. मात्र भाषा आणि जीवनकौशल्यांच्या संदर्भातही मुलांनी केलेल्या चुका या त्यांच्याशी संवाद साधण्याच्या व त्यांना त्यातून शिकायला मदत करण्याच्या संधी असतात. त्या आपण कशा घ्यायच्या हे आपल्याला या पुस्तकातून शिकता येईल.

5) विचार, कृती आणि भावनांचा संवेदनशील समन्वय

या पुस्तकातील प्रत्येक ओळीमागे विचारांची पक्की बैठक आहे. सर्व गोष्टी आधी  अनुभवून नंतर लिहिल्या आहेत. त्याचबरोबर ठायी ठायी जाणवते ती या कामाकडे, मुलांच्या शिकण्याच्या प्रक्रियेकडे पाहण्याची संवेदनशीलता! सिद्धान्तांच्या बैठकीवर काम करताना आणि ते शब्दांत मांडतानाही मानवी भावभावनांचे भान सुटत नाही. प्रत्येक भागाच्या सुरुवातीला दिलेल्या अतिशय समर्पक अशा कविता वाचकांच्या विचारांना प्रेरणा देणार्‍या आणि जाणिवा जाग्या करणार्‍या आहेत.

6) वाचककेंद्री कलात्मकता

कृतीमागचा विचार, कामाची रीत, तपशील, सूचना या सार्‍यांच्या मांडणीत वाचकाला केंद्रस्थानी ठेवून साधलेली कलात्मकता दिसते. हा सारा अट्टहास केवळ पुस्तक सुंदर दिसण्यासाठी नाही. काही एक मजकूर वाचून झाला, की आपल्याला एक चित्र वा छायाचित्र भेटते. कधी ते वाचलेला मजकूर अधिक स्पष्ट करणारे किंवा त्याचा परिणाम दर्शविणारे असते, तर कधी मजकुरातल्या रिकाम्या जागा भरून काढणारे आणि कधी कधी तर त्याही पल्याडचे काही सांगू पाहणारे असते. रीत तपशिलात सांगून झाल्यावर साररूपाने दिलेल्या चौकटी, तक्ते किंवा आकृत्या आपल्याला वाचलेले समजून घ्यायला आणि पक्के करायला मदत करतात.

वंचित मुलांना आनंदाने, अर्थपूर्ण आणि सर्जनशील शिकण्याची संधी मिळावी हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याचा हा प्रवासही आनंददायीच आहे, असतो आणि होतो याची प्रचिती हे पुस्तक वाचताना आपल्याला येते. म्हणूनच पालकनीतीच्या खेळघराने तयार केलेले हे पुस्तक, मुलांना शिकवण्याचे आपले काम आनंदाने करू इच्छिणार्‍या प्रत्येकाचा विश्वासू सोबती होईल असा विश्वास वाटतो.

आनंदाने शिकण्याच्या दिशेने 

पृष्ठसंख्या- 380

किंमत- 850/-

सवलतीच्या दरात- 700/-

संपर्क- 9763704930

Sujata_Lohkare

सुजाता लोहकरे  |  sujata.saloni@gmail.com

लेखिका राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे येथून अधिकारी म्हणून स्वेच्छानिवृत्त असून सोलापूर जिल्ह्यातील करकंब येथील मतिमंद मुलांसाठीच्या ‘मैत्र फाऊंडेशन’ ह्या संस्थेच्या विश्वस्त आहेत.

Saturday, 27 June 2020

चांदण्यात भिजायचं राहून जाऊ नये,म्हणून !

माणसाला आयुष्यातला प्रत्येक क्षण समृद्ध करत असतो, फुलवत असतो. आपण सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा यासारख्या गोष्टीच्या मागं धावताना  असं समृद्ध होणं,फुलणं विसरून जात असतो.जीवनाचे महत्त्व समजून आपण प्रत्येक क्षण मनापासून जगावा,यासाठी डॉ.आ.ह.साळुंखे यांनी जीवनाचं हे साधं,सरळ तत्वज्ञान आपल्या आयुष्यातील छोट्या छोट्या प्रसंगातून,अनुभवातून 'चांदण्यात भिजायचं राहून जाऊ नये म्हणून!' या  पुस्तकातून मांडलेलं आहे.

बऱ्याच दिवसापूर्वी 'चांदण्यात भिजायचं राहून जाऊ नये म्हणून!' हे डाॅ.आ.ह.सांळुखे यांचे पुस्तक प्रयोगशील गटशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांनी हे पुस्तक मला भेट दिले होते. पुस्तक छोटं असल्यामुळे एका दमात वाचून काढले.हे पुस्तक आयुष्याकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करते. या पुस्तकामध्ये  लेखकाने आपल्या जीवनातील जगणं समृद्ध करणारे अनुभव,प्रसंग मांडलेले आहेत. 

लेखक सांगतात की पहिल्यांदा कन्याकुमारीला गेलो.भारतभूमीच्या दक्षिण सिमेवरील अखेरच्या भिंतीवर उभा होत तेव्हा तीन समुद्राच्या लाटा मला भिजवून चिंब चिंब करीत होत्या. हा प्रत्यक्ष अनुभव घेताना मी खरोखरच शहारून गेलो होतो. तो माझ्या आयुष्यातला एक आनंदाचा क्षण होता. पण मी एकोणसाठाव्या वर्षाऐवजी एकोणिसाव्या वर्षी कन्याकुमारीला जायला हवं होतं,असं लेखकाला वाटतं.

लेखक सांगतात की आपल्या मालकीच्या वस्तूंची संख्या वाढून आपलं जीवन खऱ्या अर्थाने समृद्ध होत नाही वस्तू मिळवण्याच्या नादात आपण जीवन जगण्याचं विसरून जाण्याचा धोका असतो. आपण आपलं अनुभवविश्व किती संपन्न केलं.आपल्याला सच्ची मैत्री किती मिळाली.आपण इतरांना किती जीव दिला. इतरांची किती कदर केली. इतरांना वाढवण्यासाठी किती आधार दिला. किती जणांच्या अश्रू पुसले. आपण अश्रू ढाळत असताना ते पुसण्यासाठी आसपास किती लोक होते. यांसारख्या गोष्टीचा हिशोब करून आपल्या जीवनाची समृद्धी मोजावी. वस्तूवर मालकी मिळवणं पुरेसं नाही,अत्यावश्यक नाही - त्या वस्तूसह वा प्रसंगी त्या वस्तूंच्या अभावीही जीवन उत्कटपणानं जगता येणं महत्त्वाचा आहे. जीवनाचा खराखुरा आनंद घेणं,जीवन अनुभवणं हा 'एरिक फ्राॅम' या मानसशास्त्राज्ञाचा  संदेश लेखक सांगतात.

लेखकांनी वरिष्ठ महाविद्यालयात बरीच वर्षे  संस्कृत विषयाचे अध्यापन केले. लेखक प्रसिद्ध विचारवंत,व्याख्याते,प्रसिद्ध साहित्य आहेत. सॉक्रेटिस,चार्वाक,पाणिनी यांच्या समृद्ध जीवन जगण्याची उदाहरणे लेखक सांगतात.विवेकवादी विचारांवर ठाम राहून आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत आपल्या भूमिकेशी एकनिष्ठ राहणारा सॉक्रेटिस,मानवजातीला ज्ञानाचा नवा प्रकाश मिळावा,तिचं माणूसपण उन्नत व्हावं.यासाठी ज्ञानाचा एक एक कण  मिळविण्यासाठी कसं झोकून द्यावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे प्रसिद्ध व्याकरणकार 'पाणिनी'. पाणिनी यांच्या समृद्ध जगण्याची उदाहरणे माणसाला समृद्ध बनवतात.

जीवन जगताना,अगदी सर्वसामान्य माणसं ही अनेकदा आपल्याला केवढा उज्वल प्रकाश आणि किती निर्मळ दृष्टी देऊन जातात.याबाबतचे प्रसंग लेखक सांगतात. माणसाच्या आयुष्यात चढ-उताराचे यश अपयशाचे अनेक प्रसंग येतात.चढापेक्षा उताराचा प्रवास क्लेशकारक वाटायला लागतो. अपयश पचवताना वेदना होतात;परंतु अशावेळी मनाचं संतुलन राखायला हवं.आपली जागा घेणा-या व्यक्तीमध्ये आपण आपलं प्रतिबिंब पाहू शकतो. ती व्यक्ती आपलाच प्रवाह अखंडित ठेवण्याचे काम करीत आहे.असं मानून तिचं आपण अभिनंदन करू शकतो. ज्याला जीवनाच्या उताराचा हा प्रवास आनंदानं,समाधानानं आणि उमेदीने करता येतो.त्यालाच जीवन खर्‍या अर्थाने कळलं असं म्हणता येतं! याबद्दलचा केरळ मधील एक अनुभव खूप छान पद्धतीने लेखकांनी मांडलेला आहे.

लेखक सांगतात की जीवन हे या विश्वातले किती सुंदर घटना आहे.हा या विश्वाच्या समग्र अस्तित्वाचा किती पवित्र आणि मंगल घटक आहे. या जीवनाला आधार देणार आपल्या शरीराचं हे इवलसं घरटं हे आनंदाचं केवढं प्रसन्न अधिष्ठान आहे! त्या घरट्याचा भाग असलेले निर्मळ मन आणि विवेकी बुद्धी हे सजीवाचं आणि खास करून माणसाचं केवढं मोठं वैभव आहे!

लेखकांनी त्यांच्या आयुष्यातील प्रेरणादायी घटना सांगितलेल्या आहेत. छोट्या छोट्या घटना,प्रसंग माणसाच्या जगण्याला कसे समृद्ध बनवतात. याचे मनाला भावणारे वर्णन लेखकांनी केले आहे. जगण्याचं साध तत्वज्ञान सागणारं हे पुस्तक नक्कीच वाचायला हवं.

पुस्तक-चांदण्यात भिजायचं राहून जाऊ नये म्हणून!
लेखक-डाॅ.आ.ह.साळुंखे 
प्रकाशन-ॠतुश्री प्रकाशन,बीड.
मुल्य- ५० रूपये.
पुस्तक परिचय- समाधान शिकेतोड 
www.shikshansanvad.in
┄─┅━━▣▣▣━━┅─┄

Monday, 22 June 2020

गोष्ट गुरुजी घडण्याची

आपल्या प्रतिकूल परिस्थितीशी झुंजत तो शिक्षक होतो. चाकोरीच्या बाहेर जाऊन,स्वतःला समृद्ध बनवत नाविन्यपूर्ण प्रयोग राबवितो.यंत्रणेतल्या चाकोरीला दोष देत बसण्यापेक्षा स्वतः सक्रिय होऊन अर्थपूर्ण शिक्षणाच्या वाटा धुंडाळतो.मनाशी ठरवलं तर प्रत्येकाला आपले आयुष्य असं घडवता येऊ शकतं हे सांगणारी एका प्रयोगशील गुरुजीच्या घडण्याची गोष्ट.

प्रल्हाद काठोळे यांच्या 'गोष्ट गुरुजी घडण्याची' हे पुस्तक वाचण्याची खूप दिवसापासूनची उत्सुकता होती. उस्मानाबाद येथे संपन्न झालेल्या ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये हे पुस्तक घेतले व वाचून काढले.तसं हे एका प्रयोगशील,संवेदनशील  शिक्षकाचं आत्मकथनचं आहे.प्रल्हाद काठोळे यांचा स्वतःला शिक्षक म्हणून घडवण्याचा प्रेरणादायी प्रवास मनाला खुप  भावला.

सह्याद्रीच्या कुशीत आणि तानसा अभयारण्याचा राखीव क्षेत्रात,वाडा आणि शहापूर तालुक्याच्या सीमेवर वसलेलं दाढरे लेखकाचं गाव. लेखकाने अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये हे प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं.लेखक सांगतात की भात लावणीच्या काळात तर घरात खायला काहीच नसायचं अनेकदा दादा परसातल्या काकड्या खाऊन दिवस काढायचा आणि शेतात काम करत राहायला पण तशाही अवस्थेत लहान भावंडांनी शिकावं असं त्याला मनापासून वाटायचं. सहावी ते दहावीचे शिक्षण नवोदय विद्यालयात झालं.प्रथम श्रेणीत सीबीएससी बोर्डातून दहावी उत्तीर्ण केली.त्यानंतर नवोदय विद्यालयातचं १२ वीला प्रवेश घेतला पण बारावी नापास हा शिक्का बसला.पुन्हा तालुक्याच्या काॅलेजात पुनर्प्रवेश  घेऊन बारावी व त्यानंतर डीएड पूर्ण केलं.मधल्या काळात पडेल ती कामे केली.भावासोबत कलिंगडाची शेती केली.आईसोबत भाजीविक्री केली.सुट्टीत मामासोबत शाळेला रंग देण्याचे काम केले.

शिक्षक म्हणून पहिली नियुक्ती जि.प.प्रा.शाळा घायपातपाडा येथे मिळाली.ही दोन वर्गखोल्या असलेली दोन शिक्षकी शाळा होती.वारली अदिवासी समाजाचा पाडा होता.इथंली मुलं म्हणजे जंगलची पाखरं.ही सगळी वारली मुलं जंगलात भटकायची.घरच्या बक-या,गायी चारायला न्यायची.हंगामानुसार मिळणारी फळं शोधत हिंडायची.या मुलांची उपस्थिती वाढावी म्हणून स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून मुलांना मोफत गणवेश दिले.केंद्रशाळेतील मुलींचा कबड्डीचा संघ तयार करून राज्यस्तरावर नेला.कमी वयात होणारी मुलींची लग्न,कुपोषण यावर काम केले.लेखकाने अनुभवातून,चिंतनातून प्रत्येक मुलं समजून घेत नाविन्यपूर्ण प्रयोग केले.पर्यवेक्षिय यंत्रणेसंबंधीचे अनुभव,स्वतःच्या जुन्या धारणा याबद्दल लेखक प्रामाणिकपणे सांगतात.

पुढे गावाजवळील घाटाळपाड्याला बदली झाली.इथेही वेगवेगळे उपक्रम राबवण्यात आले.जवळचं क्वेस्ट नावाची संस्था मुलांसाठी काम करायला लागली होती.त्यांचा 'बालभवन' नावाचा उपक्रम सुरू होता.क्वेस्टचे संचालक शिक्षणतज्ञ निलेश निमकर यांनी परिसरातील शिक्षकांचा अभ्यासगट तयार केला. इथं लेखकाला मुलांसोबत काम करण्याची दिशा मिळाली.अभ्यास गटांमध्ये वर्गात शिकवताना येणाऱ्या अडचणीवर चर्चा व्हायची.त्यासाठी वर्गातल्या गुणवत्तापूर्ण कामाच्या संदर्भात असलेल्या वेगवेगळ्या राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय संशोधन प्रकल्पाचे अहवाल समजून घेतले जायचे. अभ्यासगटात गणित,भूगोलतल्या संकल्पना, समजून घेतल्या. त्या पद्धतीने वर्गात मुलांसोबत काम केले. जुन्या धारणा गळून पडून नवीन प्रगत शिक्षणशास्त्राची ओळख लेखकाला होत गेली. लेखकाला ' अरविंद गुप्ताच्या कार्यशाळेत जाण्याची संधी मिळाली. विज्ञान खेळणी समजून घेऊन त्याच्या मदतीने मुलांसोबत काम केले. अभ्यासगटाच्या मदतीने पर्यावरणाशी संबंधित उपक्रमही राबविले.मुलांच्या शिक्षणाबाबत समज निर्माण व्हायला या अभ्यासगटाचा लेखकाला खूप फायदा झाला. पुढे अनेक प्रकल्प राज्य व राष्ट्रीय स्तरावर गेले.

लेखकाने अभ्यास गटाच्या प्रेरणेने 'मास्टर्स इन एलिमेंटरी एज्युकेशन' हा हा अभ्यासक्रम पूर्ण केला. टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या या अभ्यासक्रमाला देशभरातून काही मोजक्याच लोकांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळतो. हा अभ्यासक्रम पूर्ण करत असताना आलेले समृद्ध अनुभव लेखकाने सांगितले आहेत.राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिसंवादांमध्ये सहभाग घेतला. 'सारखी वाटणी' हा अपूर्णांकाचा अर्थ मुलांसाठी अधिक सहज असल्यामुळे शिकवताना त्याचा वापर नाविन्यपूर्ण पद्धतीने वापर केला. याचा नव्या पाठ्यपुस्तकांमध्ये सामावेश झाला. साध्या शिक्षकाने केलेल्या पद्धतशीर आणि शिस्तबद्ध कामाचा उपयोग राज्यपातळीवर होऊ शकतो.शाळा ही फक्त ज्ञानदानाचं केंद्र न राहता ज्ञान निर्मितीचे केंद्र होऊ शकते.याचं हे उत्तम उदाहरण. मित्राच्या  मदतीने दाढरे या स्वतःच्या गावात मुलांसाठी माध्यमिक शिक्षणाची सोय करून जीवनानुभवातून शिक्षण देणारे अनेक प्रयोग ते शाळेत राबविले.  

२००३ मध्ये ते जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक म्हणून रुजू  झाले.क्वेस्ट या शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेमुळे झालेली समृद्धी आणि 2012 मध्ये टाटा सामाजिक विज्ञान संस्थेतून प्राथमिक शिक्षण घेतलेले पदव्युत्तर शिक्षण यामुळे या सामान्य शिक्षकांच्या शिक्षण विषयक विचारात सकारात्मक बदल घडत गेले. या बदलातून त्यांनी विविध शिक्षण विषयक प्रयोग प्रत्यक्षात आणले. २०१३ मध्ये त्यांनी 'एपिस्टेमी ५ ' या आंतरराष्ट्रीय गणित परिषदेत त्याचं संशोधन हे प्रसिद्ध झालं होतं. हे प्रेरणादायी अनुभव शब्दबद्ध करण्यासाठी 'ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन' मुंबईने त्याने एका वर्ष मुदतीचे पाठ्यवृत्ती दिली त्यातूनच  गुरुजी घडण्याची गोष्ट हे सांगणारे पुस्तक प्रत्यक्षात आला आहे. या पुस्तकातील अनुभव प्रेरणादायी आहेत.शिक्षणक्षेत्रातील प्रत्येकानं हे पुस्तक वाचायला हवंच.

आमचं भाषाशिक्षणासंदर्भातील एक संपर्कसत्र क्वेस्टचं मुख्यालय सोनाळे येथे संपन्न झाले होते. त्यानिमीत्ताने प्रल्हाद काठोळे यांच्या दाढरे या गावी जाण्याचा योग आला होता.शिक्षणातील नाविन्यपूर्ण प्रयोगाबाबत आम्ही नेहमीच चर्चा करत असतो.विद्यार्थ्यांच्या हितासाठी अविरतपणे झिजणा-या मित्राचा अभिमान वाटतो.

पुस्तक परिचय 
पुस्तक- गोष्ट गुरूजी घडण्याची 
लेखक- प्रल्हाद काठोळे 
प्रकाशन- समकालीन प्रकाशन,मुंबई. 
किंमत- १५० रूपये
पुस्तक परिचय- समाधान शिकेतोड
┄─┅━━▣▣▣━━┅─┄

Tuesday, 5 May 2020

विद्यार्थी बनले चरित्रलेखक!

मुले आज खूप छान सर्जनशील लेखन करू लागली आहेत.शालेय विद्यार्थ्यांनी लिहलेल्या कवितासंग्रह,कथासंग्रह यांचे संपादन  प्रयोगशील शिक्षकांनी केलेले आहे. सोनाली फुपरे या इयत्ता सहावीच्या विद्यार्थींनीची 'झाड' ही कविता सहावीच्या पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यात आलेली आहे.मुलांच्या सर्जनशील लेखनासाठी उपक्रमशील शिक्षक राज्यात सातत्याने नाविन्यपूर्ण प्रयोग करत असतात.ग्रामीण प्रशाला माडज ता.उमरगा जि.उस्मानाबाद येथील उपक्रमशील शिक्षक बालाजी इंगळे यांनी 'झेप' या विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या चरित्र ग्रंथाचे संपादन केलेले आहे.प्रसिद्ध साहित्यिक तथा प्रयोगशील शिक्षक बालाजी इंगळे हे विद्यार्थ्यांच्या भाषा विकासासाठी सातत्याने नाविन्यपूर्ण प्रयोग राबवत असतात.

मुलांच्या भाषासमृद्धी साठी मुलांना वेगवेगळ्या वाङमय प्रकारांची ओळख करून देणे.त्यांना वेगवेगळ्या वाङमय प्रकारांच्या लेखनाकडे वळवणे गरजेचे असते.असाच एक रचनात्मक प्रयत्न बालाजी इंगळे यांनी केलेला आहे. वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने मुलांना चरित्रात्मक पुस्तके वाचायला दिली आणि त्यातून इयत्ता आठवी,नववीच्या मुलांपुढे चरित्रलेखनाचे प्रस्ताव ठेवला.मुलांनी सुरुवातीला वेगवेगळ्या चरित्रांचा अभ्यास केला.त्यावर मुद्दे काढले. लेखकांनी एखादे चरित्र लिहिताना कशा पद्धतीने मांडणी केलेली आहे. भाषा कशी वापरलेली आहे.याचा मुलांनी अभ्यास केला.चरित्रलेखन करण्यासाठी गावातील लोकांच्या मुलाखती घेतल्या.चरित्रलेखन करताना वेगवेगळे संदर्भग्रंथ हाताळले.या कामात वेळोवेळी बालाजी इंगळे यांनी विद्यार्थ्यांना मदत केली.पुस्तकाची मांडणी, मुखपृष्ठ तयार करणे,पुनर्लेखन करणे या सगळ्या बाबीमध्ये मुलांनी पुढाकार घेतलेला होता.

या चरित्र ग्रंथांमध्ये गावातील स्वातंत्र्य सेनानी,पोलीस,दानशूर व्यक्ती, इंजिनीयर,समाजसेवक यांचे चरित्रलेखन मुलांनी केलेले आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींच्या जीवनाचा,त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा,त्यांनी केलेल्या रचनात्मक कामाची मांडणी विद्यार्थ्याने चरित्रातून छान पद्धतीने केलेली आहे.शाहीर व स्वातंत्र्यसेनानी हनुमंतराव यशवंतराव बेलुरकर यांचे चरित्र वाचताना त्यांच्या वादळी जीवनाची चरित्रगाथा समोर येते.त्यांच्याबद्दल विद्यार्थी लिहितात 'अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी लोकजनशक्ती संघटित करण्याचे कौशल्य अंगी असल्याने वारकऱ्यांमध्ये वावरणारे हनुमंतराव हैदराबाद मुक्तिसंग्रामात प्रभावी,प्रखर भाषणे व वीरश्री पोवाडे गाऊन हजारो  श्रोत्यांचा फड जिंकताना दिसतात.' स्वातंत्र्यलढ्यात भाग घेऊन ते थांबले नाहीत तर माडज व परिसराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी त्यांनी हिरिरीने स्वतःला झोकून दिले.गोरगरीब शेतकरी कष्टकऱ्यांची दु:ख, प्रश्न शासनापुढे मांडण्याचा आयुष्यभर प्रयत्न केला.

समाजसेवक व स्वातंत्र्यसेनानी श्री.पंचाप्पा शांतीरप्पा परांडे,कर्तव्यदक्ष पोलीस स्व.नरेंद्र वसंत काळे,सैनिक दीपक गायकवाड स्पेशल फोर्स वन पोलीस रमेश पाटील,यांची चरित्रे मुलांनी खूप छान पद्धतीने लिहिलेले आहेत.सतीश विठ्ठलसिंह गहेरवार यांचे गावासाठीचे योगदान,आयबीएम कंपनीत इंजिनिअर असणारी साधना काळे हीच्या गावातल्या शाळेतील आठवणी वाचकाला भावतात. इंजीनिअर बालाजी फुगटे,अश्विनी माने यांच्या प्रतिकुल परिस्थितीवर मात करून यशाला कशी गवसनी घातली.याबद्दल त्यांचे व्यक्तिचित्र खुप छान रेखाटलेले आहे.

उपक्रमशील शिक्षक बालाजी इंगळे यांनी हा प्रकल्प वर्षभर राबविला.यामधून मुलांना एका वाङमय प्रकाराची ओळख झाली.दोन विद्यार्थ्यांनी मिळून एक चरित्र लिहिले होते. त्यामुळे गटात काम करण्याची संधी मिळाली.या प्रकल्पामुळे मुलांच्या  भाषिक क्षमता,जीवन कौशल्य,एकविसाव्या शतकातील कौशल्य विकसीत होण्यास मदत झाली.मुलांनी प्रत्यक्ष जगण्यातुन अनुभव घेतले.व्यक्तिमत्व विकास हे भाषाशिक्षणाचे ध्येय आहे.या चरित्रलेखनाच्या प्रकल्पातुन मुलांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण झाली.

उपक्रमशील शिक्षक बालाजी इंगळे हे मराठी कवी, कांदबरीकार आहेत.झिम पोरी झिम ही कांदबरी,मेलं नाही अजुन आभाळ,मातरं,रंगीत रंगीत रानफुल हे कवितासंग्रह साहित्य रसिकांच्या पसंतीला उतरले आहेत.त्यांना महाराष्ट्र शासनाचा राज्य शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे.तसेच त्यांच्या साहित्याला महाराष्ट्र शासनाचा 'यशवंतराव चव्हाण उत्कृष्ट वाङमय निर्मिती' पुरस्कार मिळालेला आहे.

झेप-चरित्रलेखन 
संपादक- बालाजी मदन इंगळे 
प्रकाशन-निर्मिती प्रकाशन उमरगा. 
मुल्य- 20 रू.
प्रथम आवृत्ती- १५ ऑक्टोबर २०१६

पुस्तक परिचय- समाधान शिकेतोड  samadhanvs@gmail.com 
https://shikshansanvad.blogspot.com
┄─┅━━▣▣▣━━┅─┄

Thursday, 23 April 2020

चाकोरी सोडून स्वप्न पाहणारा माणूस.....

एक साधा हॉटेलवाला ते जगभर रेस्टॉरंट,पंचतारांकित हॉटेलची साखळी निर्माण करणारा उद्योगपती हा थक्क करणारा प्रवास "इडली, ऑर्किड आणि मी!" या आत्मकथनात डॉ.विठ्ठल व्यंकटेश कामत यांनी मांडला आहे.पाहिलेलं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी चाकोरीच्या बाहेर जाऊन सातत्याने वेगळं काहीतरी करून आपले ध्येय साध्य करणारा माणूस म्हणजे डॉ.विठ्ठल व्यंकटेश कामत.पर्यावरणाचा तोल सांभाळणारे सर्वोत्कृष्ट ऑर्किड हे हॉटेल उभं केलं.
लेखकाने आपल्या स्वप्नपूर्तीसाठी केलेला जिवनाचा संघर्मय,प्रेरणादायी प्रवास प्रामाणिकपणे,या आत्मकथनातून मांडला आहे.

 लेखकाच्या घरचा व्यवसाय हॉटेलचा होता.लेखकाची आई ईडली खूप छान बनवायची.ते इडली बनवण्याचे कसब लेखकाला चांगले जमले होते.या इडली मुळेच लेखकाला जगभर फिरण्याची संधी मिळाली. इग्लंड,इटली,जपान या देशात लेखकाने त्या देशातील लोकांना ईडलीची डीश बनवून दिली.आपल्या मुलाने स्वतःच्या हिंमतीने व्यवसाय उभा करावा.असे लेखकाच्या वडिलांना वाटत असे.त्यासाठी लेखकाने खूप प्रयत्न केले. मानापमान,निराशा,धोका,अपयश या सगळ्या गोष्टी वाट्याला आल्या. कधीकधी आभाळ कोसळलं,पण त्या कोसळलेल्या आभाळाच्या ढिगा-यावर उभा राहून यशाला  आपलंसं करणारा हा माणूस!

एक चांगला माणूस,यशस्वी उद्योजक  म्हणून डॉ.विठ्ठल कामत यांची ओळख या आत्मकथनातून होते.लेखकाच्या कुटुंबात त्यांच्यासह सहा भावंड होती. लहानपणीच्या खूप चांगल्या आठवणी लेखकाने सांगितल्या आहेत.लेखक बालपणीचे वर्णन करताना म्हणतात, "ग्रँड रोड स्टेशनजवळच्या गणेश प्रसादा मधला आमचं घर बऱ्यापैकी छोटं होतं.एक बेडरूम किचन आणि गॅलरी अशा ह्या घरात आई-वडिलां सकट आम्ही सहा भावंडं राहत होतो." आई विषयी लेखक म्हणतात, "प्रचंड उरक आणि प्रचंड ऊर्जेचा स्त्रोत म्हणजे माझी आई".

लेखकाचे वडील आठव्या वर्षी नातेवाईकांसोबत मुंबईला आले.या कोवळ्या वयात हॉटेलमध्ये त्यांनी कामाला सुरुवात केली.याबद्दल लेखक म्हणतात, "त्यांच्या आयुष्याची सुरुवात अशी कष्टाने झाली.त्यांनी आयुष्यभर कामाचा ध्यास घ्यावा, ह्यात नवल नाही. व्यंकटेश कामत या व्यक्तीमध्ये कमालीची सचोटी,कमालीची शिस्त,कमालीचा कामसूपणा होता".वडील दुसऱ्याच्या मदतीला धावून जात असत.लेखकाला वडिलांबद्दल आदरयुक्त भिती होती. आई-वडिलांबद्दल लेखक म्हणतात, "आई-वडील दोघेही देणारे होते, त्यांनीच आपल्या कृतीने एक आदर्श निर्माण केला."

मी तारुण्यात एका मुलीच्या प्रेमात पडलो होतो.बिअर प्याली होती.असे लेखक प्रामाणिकपणे सांगून टाकतात.लेखकाने बंगलोरला आपल्या एका नातेवाईकाच्या रेस्टॉरंटमध्ये नवनवीन प्रयोग करून बघितले.तेथिल रेस्टॉरंटचे निरीक्षणअभ्यास केला.आता त्यांना बाहेरचं जग खुणावू लागलं होतं.काहीही पैसे न घेता वडीलांच्या परवानगीने लंडन गाठलं.एका भारतीय रेस्टॉरंटमध्ये नोकरी सुरू केली.पुन्हा तिथेही डिश बनवण्यात नाविन्यपूर्ण प्रयोग केले.या रेस्टॉरंटमध्ये गि-हाईक दुपटीने वाढले. तिथेही छान खुसखुशीत इडली बनवली.लोकांना ती खूप आवडली. ब्रिटिश ग्राहकांच्या खाण्या-पिण्याच्या सवयी यांचा अभ्यास करून वेगवेगळ्या डीश बनवल्या.यामुळे  रेस्टॉरंटच्या मालकिनीने खुश होऊन माझ्या मुलीशी लग्न कर.असा प्रस्ताव लेखकासमोर ठेवला.त्याला नम्रपणे नकार देऊन काम सुरू ठेवले.तिथून पुढे लेखक इटलीला गेले.तिथेही पैशाची कमतरता भासत होती. हॉटेलच्या रूमच्या भाड्याएवढेच पैसे लेखकाजवळ होते.मग काय! त्यांनी स्वतःच्या रूमला ऑफिस बनवून शेजारच्या टूर्सवाल्यांना हॉटेलमधील स्टाफच्या मदतीने ज्यूस व थंड पाणी द्यायला सुरुवात केली.त्यात त्यांनी  भरपूर नफा कमावला.कुठे रेस्टॉरंटमध्ये नाचगाण्याचे प्रयोग केले.एक एक देश लेखक फिरत होते.प्रत्यक्ष जगण्यातल्या अनुभव घेत होते.लेखक म्हणतात,"जगण्यातल्या मुशाफिरीचा आणि उमेदवारीचा काळ खूपच कठीण होता.तितकाच थरारक होता.लेखक म्हणतात,तरूण  वयातल्या या अनुभवामुळे मी एक गोष्ट सांगतो, "तुमच्या पोटात भूक, डोक्यात लाज नसेल आणि मनगटात जिद्द असेल.तर तुम्ही कुठल्याही परिस्थितीतून मार्ग काढू शकतात."

लेखकाने सर्जनशीलता,कल्पकता वापरून वाटचाल सुरूच ठेवली होती. प्रत्येक कल्पनेचा पाठपुरावा केला. प्रचंड मेहनत घेतली.कुठलाही दुरभिमान बाळगला नाही.लेखक म्हणतात,"मी स्वतःला बिजनेसमन म्हणत नाही. मी आहे आंत्रप्रिनर. आंत्रप्रिनर म्हणजे चाकोरी सोडून स्वप्न पाहणारा माणूस.

लेखकाचा लोकसंग्रह दांडगा आहे. निरपेक्ष वृत्तीने प्रत्येकावर प्रेम करणे, चांगुलपणा दाखवणे यामुळे त्यांनी  माणसं जोडली.लेखक म्हणतात, "चांगुलपणा देण्याने कमी होत नाही उलट देण्यानं वाढतो.आयुष्यात तुम्हाला कधी कुठे उपयोगी पडेल हे सांगता येत नाही."


आत्मकथन जगण्याला बळ देणारे  आहे.आपल्यासोबत इतरांनाही मोठे  करणारा माणूस,निसर्गाशी मैत्री ही जीवनपद्धती असणारा माणूस,या  आत्मकथनातून अनुभवायला मिळातो.आत्मकथन वाचताना मन भरून येतं.प्रत्येकालाच आयुष्याच्या कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर खाच-खळगे यांना सामोरे जावं लागतं.या जीवन प्रवासात माणूसपण जपून प्रगती करत राहणं फार महत्त्वाचं असतं.प्रत्येकानं हे आत्मकथन वाचायला हवं.

इडली ऑर्किड आणि मी! - डॉ. विठ्ठल व्यंकटेश कामत
मॅजेस्टिक प्रकाशन ठाणे
मुल्य दोनशे रुपये
आवृत्ती-चौतीसावी 

पुस्तक परिचय
समाधान शिकेतोड
samadhanvs@gmail.com

Sunday, 19 April 2020

समिक्षण बालसाहित्याचे .......

 
गेल्या अनेक वर्षांपासून खुप सारं लेखन मुलांसाठी लिहलं गेलेले आहे.सानेगुरूजी,ग.दि.माडगूळकर,अनिल अवचट,यदुनाथ थत्ते,मंगेश पाडगावकर,भा.रा.भागवत,रा.रं.बोराडे,महावीर जोंधळे,बाबा भांड,विजया वाड,राजीव तांबे पासून अगदी अलिकडे सुरेश सावंत,एकनाथ आव्हाड,दत्ता हलसगीकर,आबा महाजन,विशाल तायडे,फारूक काझी,नरेंद्र लांजेवार,बालाजी इंगळे अशा बालसाहित्यक लेखकांची आपल्याला समृद्ध परंपरा लाभलेली आहे.या साहित्यिकांच्या लेखणीने खुप दर्जेदार बालसाहित्य निर्माण झाले.आजही काही बालगीते,कविता आपल्या ओठांवर गुणगुणत राहतात.असा बालसाहित्याचा समृद्ध ठेवा असतानाही मुलांना नेमकं काय वाचायला द्यायला हवं? असा प्रश्न पडतोच.बालसाहित्याच्या अभ्यासक,मुलांसाठी सातत्याने लिहणा-या प्रा.विद्या सुर्वे-बोरसे यांनी स्वतःच्या मुलांसोबत वाचनाच्या केलेल्या प्रयोगावर आधारीत सुंदर असे मुलांसाठी बालसाहित्य समिक्षण केलेले आहे.

मुलं कथा,कविता,चरित्र वाचायला प्रेरित होतील अशा पद्धतीने लेखिकेने मांडणी केली आहे.बाबा भांड यांच्या "गोष्ट महाराजा सयाजीरावांची" या किशोर कांदबरीचा सारांश मुलांना ही किशोर कांदबरी वाचण्याची उत्सुकता वाढवितो.लेखिका आग्रहाने सांगतात की आपल्या घरच्या ग्रंथालयात माधुरी पुरंदरे यांची पुस्तके असलीच पाहिजेत.'वाचू आनंदे' व 'लिहावे नेटके' ही माधुरी पुरंदरे यांची पुस्तके आपल्याला भाषासमृद्ध बनवतात. वाचायचं कशासाठी? याबद्दल माधुरीताई सांगतात," साधं आणि अगदी खरं उत्तर आहे आनंदासाठी...पुस्तकं कल्पनेच्या अद्भूत राज्यात घेऊन जातात,आपल्यालाही स्वप्न दाखवतात,स्वप्न पाहायला शिकवतात आणि मग खरी करण्यासाठी बळंही देतात...पुस्तकं केवळ आपण न पाहिलेलं जग आपल्याला दाखवतात असं नव्हे,तर आपण पाहत असलेलं,ज्या जगामध्ये आपण असतो, ते जगही पाहायला आणि समजून घ्यायला शिकवतात."

कान असुन बहिरा कोण?
इथेच आहे पण दिसत नाही?
लढला बरं डोकं...अगदी फटाफट. ज्योती कपिले यांच्या कोड्यांच्या पुस्तकांबद्दल सांगीतलेले आहे.भाषिक  कोडी,तार्किक कोडी,शब्द कोडी मुलांना चिकित्सक व सर्जनशील विचार करायला लावतात.

लक्ष्मीकांत देशमुख यांच्या दूरदर्शन हाजीर हो ऽऽ,नरेंद्र लांजेवार यांच्या कथांकुर,बालानुभव यांच्याबद्दल बालमित्रांना उत्सुकता वाढविणारी माहिती लेखिकेने सांगितली आहे.स्वाती राजे यांच्या 'रस्ता','पाऊस'या पुस्तकातील कथानक लेखिका रंजक पद्धतीने मांडतात.अशी पुस्तके मुलांसोबत वाचल्यावर,मुले संवेदनशीलपणे विचार करायला लागतात.स्वतःची मते,प्रतिक्रिया व्यक्त करतात.मुलांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार येऊ लागतो.लोकशाही व्यवस्थेतला एक सुजाण नागरिक घडण्यास मदत होते.

अहिराणी ही महाराष्ट्रातील एक महत्त्वाची बोलीभाषा आहे.या बोलीतील "मन्हा मामाला गावले जाऊ" या कवितासंग्रहाचा छान परिचय करून दिला आहे.पाठ्यपुस्तकातुनही महाराष्ट्रातील  वेगवेगळ्या भागातील बोलींची ओळख करून दिली जात आहे.मुलांना हा भाषिक समृद्ध ठेवा यामुळे समजायला मदत होईल.

मदन हजेरी यांचा 'पुस्तकांची पेटी' हा कथासंग्रह,सुभाष विभुते यांची 'नाथा' ही बालकादंबरी,मालविका देखणे यांची 'डिटेक्टिव्ह हर्षदच्या कथा' या बद्दल लेखिकेने बालमित्रांच्या  वाचनाची उत्सुकता,उत्कंठा वाढविली आहे.महाकवी ग.दि.माडगूळकर आठवले की "नाच रे मोरा" ही कविता आठवल्याशिवाय राहत नाही.त्यांची अजरामर गीते,बालकविता ऐकत ऐकतच प्रत्येकाचं बालपण सरलं आहे. त्यांच्या समग्र बालसाहित्याचा परिचय बालमित्रांना लेखिकेने करून दिला आहे. 

बालभारती कडून प्रकाशित होणा-या 'किशोर' मासिकातील निवडक साहित्यांचे खंड तयार करण्यात आले आहेत.या खंडातील नामवंत साहित्यिकांच्या कथा,कविता,एकांकिका,चरित्र या बालसाहित्याचा परिचय करून दिला आहे. 

मुलांसाठी सातत्याने लेखन करणारे पृथ्वीराज तौर,एकनाथ आव्हाड यांच्या कथा,कविताबद्दल लेखिकेने सांगीतले आहे. पृथ्वीराज तौर यांनी जगभरातील बालसाहित्यक बालमित्रांना मराठीत अनुवादीत करून दिले आहे. 

प्रतिमा इंगोले यांचा बालकुमांरासाठी लिहलेला 'सख्यांच्या गोष्टी'मधील ह्रद्यस्पर्शी चित्रण आलेले आहे.प्राणीमात्रांवर प्रेम करावे.हा संदेश यातून मिळतो.राजीव तांबे यांची  'गंमत शाळा',अनिल अवचट यांच्या 'सृष्टीत गोष्टी',दिलीप प्रभावळकर यांचे 'बोक्या सातबंडे' या साहित्याबद्दल बालमित्रांच्या मनात कुतूहल निर्माण होते.

  चंद्रकांत खोत यांनी मालवणी भाषेत लिहलेल्या 'चणिया मनिया बोर' या बालकथा ह्या वेगळ्या धाटणीच्या आहेत.यातील कथानकांची उकल बालमित्रांना लेखिकेने करून दिली आहे. प्रसिद्ध साहित्यिक रा.रं बोराडे यांच्या 'संकल्पाचे दारी' ही  किशोर कांदबरी बालमित्रांमध्ये जिद्द,मैत्री,कष्ट  यांची रूजवणूक करते.याबद्दल सांगितलेले आहे.अशोक पाटील यांचा 'आभाळमिटी' हा बालकवितासंग्रह तसेच रा.ग.हर्षे यांचे श्री क्षेत्र नाशिक हे प्रवासवर्णन वाचण्याची उत्सुकता बालमित्रांना लागते.

आज मुलांच्या सर्जनशीलतेला,कल्पकतेला धुमारे फुटलेले आहेत.मुले छान छान कविता,कथा लिहीत आहे.सहावीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकात सहावीच्याच विद्यार्थीनीची कविता आली आहे.काही मुलांना महाराष्ट्र शासनाचे राज्य वाड्मय पुरस्कार मिळाले आहेत.मुलांच्या साहित्याची दखल लेखिकेने घेतली आहे.नामदेव माळी,तृप्ती अंधारे,डाॅ.निता उपासनी,डाॅ. पृथ्वीराज तौर यांनी मुलांच्या कवितांचे  संपादन करून  कवितासंग्रह काढलेले आहेत. यांचा परिचय लेखिकेने करून दिला आहे. किरण केंद्रे या पुस्तकाची पाठराखण करताना म्हणतात,"साहित्याची गोडी बरोबर आस्वादाची आणि पर्यायाने समिक्षेची दृष्टी विकसीत करण्यात या पुस्तकाची मुलांना मदत होईल."मुलांनी काय वाचावे? यासाठी लेखिकेने काही पुस्तकांची यादी शेवटी दिली आहे. 

लेखिका वरिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापिका असुन मुलांसाठी सातत्याने लेखन करत असतात.विद्यार्थी,शिक्षक,पालक,शिक्षण क्षेत्रात काम करणा-या सर्वांनी हे पुस्तक नक्कीच वाचायला हवे. 

बालसाहित्यक:आकलन आणि समिक्षा 
प्रा.विद्या सुर्वे-बोरसे 
किंमत  २२० रू
स्पर्श प्रकाशन,राजापूर 

पुस्तक परिचय 
समाधान शिकेतोड
samadhanvs@gmail.com

आनंददायी आणि दर्जेदार बालकविता : पोपटाची पार्टी

मुलांना मजेशीर, रोमहर्षक, उत्कंठावर्धक, अद्भुत, अफलातून असं वाचायला आवडतं. संस्कारक्षम, नैतिक मूल्ये असं वाचायला आवडत नाही असं नाही. पण हे सगळं अद्भूततेत दडलेलं मुलांना आवडतं. म्हणजे सरळ सरळ संस्काराचं तुम्ही सांगत असाल तर मुलं दुर्लक्ष करतात. किंवा त्यांना ते आवडत नाही. भावत नाही. म्हणून बालसाहित्यिकांसमोर आवाहन असते की मजेशीर, रोमहर्षक, उत्कंठावर्धक, अद्भुत, अफलातून तर लिहायचे आहे; पण संस्कार , मूल्य पण सोडायचे नाहीत. आणि आपला मजकूरही वाचनीय झाला पाहिजे. अशा कसोटीवर बरेच बालसाहित्यिक उतरतात. पण बरेचजण चाचपडत राहतात. 
ज्यांचा पहिलाच बालकविता संग्रह नुकताच प्रकाशित झाला असे  कवी समाधान शिकेतोड यांनी या कसोटीवर उतरण्याच्या वाटेवर चालण्यास सुरूवात केली आहे, ही समाधानाची बाब आहे.

'पोपटाची पार्टी' हे काव्यसंग्रहाचे शीर्षकच मुलांमध्ये उत्सुकता निर्माण करणारे आहे. पोपटाची पार्टी असेल अशी अशा उत्सुकतेने मुले वाचायला सुरुवात करतात आणि त्यांची उत्सुकता वाढत जाते. शाळेतून आला एक बेडूक, पहिला दिवस, गंमत जंमत, पोपटाची पार्टी, कावळा आणि कोकाकोला, खारुताई आणि माकड, डाळींची सभा, कुकरची शिट्टी अशा कवितांमधून ही उत्सुकता आणखीनच वाढत जाते मुलांना उत्कंठावर्धक आणि मजेशीर लेखन हवे असते ते या कवितांमधून मुलांना वाचायला मिळते. वेगवेगळ्या कल्पना आणि निखळ आनंद नेमक्या शब्दात पकडण्या मध्ये इथे कवी यशस्वी झाले आहेत.

निखळ आनंद देणाऱ्या जशा बालकविता या संग्रहामध्ये आहेत तशाच शेतकरी बापाच्या कष्टाविषयीची जाणीव व्यक्त करणाऱ्या कविता, आपल्यासाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या खास व्यक्तींबद्दलची कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या कविता, मुलांना स्वतःच्या कर्तव्याची नकळत जाणीव करून देणार्‍या कविता या संग्रहामध्ये आहेत.

बालसाहित्यामध्ये  ग्रामीण पार्श्वभूमी असलेले साहित्य खूप कमी प्रमाणात आलेले आहे पण कवी समाधान शिकेतोड यांनी लिहिलेल्या या काव्यसंग्रहामध्ये ग्रामीण पार्श्वभूमीवर लिहिलेल्या काही बालकविता अतिशय सुंदर रित्या उतरलेल्या आहेत. बैलगाडी, गुऱ्हाळ, अमराई, झाडावरची मजा, जत्रा इत्यादी कवितांमधून ग्रामीण भागातील अतिशय सुंदर आणि आनंददायी वातावरण त्यांनी या कवितांमध्ये मांडले आहे. तसेच गारपीट आणि औत या दोन कवितांमधून शेतकरी बापाची परिस्थिती आणि मनस्थिती ही मुलांना समजेल - उमजेल आणि भावेल अशा शब्दात कवीने ताकतीने मांडली आहे. या कवितांमधून कवी फक्त व्यथा मांडत नाहीत तर आपल्या शेतकरी बापाला मदत करण्याची हिम्मत मुलांना ते कवितेमधून देतात. 'गारपीट' या कवितेच्या शेवटी ते लिहितात -

मीच माझ्या बापाला 
हिम्मत आहे देणार 
स्वार्थी हाताची 
मदत नाही घेणार.

जत्रा या कवितेमध्ये जत्रेचे हुबेहूब चित्र कवी उभे करतात. पण कवितेच्या शेवटी जत्रेमध्ये सगळ्या जाती धर्माची माणसे कशी एकत्र येतात हा संदेश नकळत ते मुलांना द्यायला विसरत नाहीत. या कवितेच्या शेवटी ते लिहितात - 

 सगळ्या जाती धर्माची माणसं 
जत्रेत एकत्र येतात 
प्रेम देत एकमेकांना 
आपापल्या घरी जातात.

समाजासाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या पोस्टमॅन, पोलीसदादा, वैज्ञानिक, शेतकरी बाप यांच्याबद्दलची कृतज्ञता आपल्या मनात असायला हवी हे आपल्या कवितेमधून ते अगदी सहजपणे नमूद करून जातात. वैज्ञानिक अहोरात्र कष्ट, अभ्यास करून मानवजातीच्या कल्याणासाठी कसे काम करतात याची जाणीव या कवितेतून मुलांना कवी करून देतात; आणि या सगळ्या कर्तृत्ववान माणसांची आठवण आपण कशी ठेवावी हे कवितेच्या शेवटी सांगताना ते लिहितात - 

असे असतात वैज्ञानिक 
ज्यांची आठवण करावी 
त्यांच्या कर्तृत्वाची गोष्ट 
मनामनात स्मरावी.

मुलांना सरळ-सरळ संस्कार रुचत नाहीत याची जाणीव कविला आहे. म्हणूनच अगदी नकळतपणे मुलांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देणाऱ्या कविता त्यांनी लिहिलेल्या आहेत. यामध्ये झाड, स्वच्छता दूत, जग जिंकण्यासाठी, वाचनाची आवड आणि चिऊताई या कवितांचा समावेशा आहे. उन्हाळ्याच्या दिवसात चिमणी पाणी पिण्यासाठी अंगणात आल्यानंतर ती कशी कासावीस होते याचे चित्रण 'चिऊताई' या कवितेत कवी करतात आणि शेवटी महत्वाचे दोन वाक्य कवितेमध्ये लिहून जातात. ती अशी - 

दाणा-पाणी देऊन 
त्यांची काळजी घेऊ 
मानवतेची पताका 
उंच उंच नेऊ.

त्याच प्रमाणे 'झाड' या अल्पाक्षरी कवितेमध्ये कवी अगदी सहजपणे लिहून जातात-  

झाड लावू 
एक तरी 
सावली मिळेल 
खरी खरी 

झाड झाड 
लावू लावू 
ग्रीन इंडिया 
पाहू पाहू.

कवी समाधान शिकेतोड यांनी या संग्रहातील केवळ अठ्ठावीस कवितांच्या माध्यमातून बाल विश्वातील असे वेगवेगळे विषय अतिशय संयतपणे हाताळले आहेत. या संग्रहातील भाषा अतिशय साधी - सोपी आणि संवादी अशी आहे. कुठेही पाल्हाळ लावलेले नाही. नेमकेपणाने जे सांगायचे आहे ते निवडक आणि चपखल अशा शब्दांमध्ये त्यांनी मांडलेले आहे. मुलांना कशा पद्धतीने आणि काय वाचायला आवडते याची नेमकी नस कवीला सापडलेली आहे. त्यामुळे या कविता मुलांसाठी अतिशय आनंददायी, दर्जेदार आणि शेवटी काहीतरी मुलांना देणाऱ्या अशा आहेत. प्रमोद दिवेकर यांनी काढलेले कविता संग्रहाचे मुखपृष्ठ अतिशय देखणे आणि मुलांना आवडणारे असे झाले आहे. तसेच या बालकविता संग्रहाची पाठराखण किशोर मासिकाचे संपादक किरण केंद्रे यांनी अतिशय मोजक्या पण प्रभावी शब्दांमध्ये केली आहे. या देखण्या पुस्तकाच्या रूपाने छान छान कविता मुलांना दिल्याबद्दल कवी समाधान शिकेतोड यांचे हार्दिक अभिनंदन आणि त्यांच्या पुढील लेखनास हार्दिक शुभेच्छा.

      - पुस्तकाचे नाव - पोपटाची पार्टी (बालकविता संग्रह)
      - कवी समाधान शिकेतोड
      - इसाप प्रकाशन, नांदेड
      - पृष्ठे- ३२, किंमत- ६० रू.  

पुस्तक परिचय - बालाजी मदन इंगळे
मो. 9881823833.