Monday 17 August 2015

लेख

14 आँगस्ट 2015  
शुक्रवार
शाळेत निघाले.  दहा वाजताचा सुमार . सर्वांची शाळा, आँफिस कामाधंद्याला जाणाऱ्या लोकांच्या घाईने रस्ता ओसंडून वाहत होता. मी जटपूरा गेटच्या रस्त्याने चालले होते. छोटा बाजार चौक ओलांडून पुढे निघाले तर  रस्त्याने शाळकरी मुलांची वृक्षदिंडी निघालेली दिसली. मुलांच्या हातात घोषणा फलक होते आणि मुले दमदार आवाजात पर्यावरणाबाबत, झाडे लावणे, जोपासणेबाबतच्या आरोळ्या देत होती. मुलांना बघताच मला आनंदाचे,  प्रेमाचे भरते आले. माझ्या गाडीचा वेग मंदावला. मी मुलांकडे कौतुकाने बघत हळूहळू पुढे जाऊ लागले. उद्या 15 आँगस्ट . स्वातंत्र्यदिन. शासनाने या  दिवशी सर्व शाळांनी वृक्षारोपण करण्याचे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने ही दिंडी असावी बहुतेक. काही शाळांनी मिळून  काढलेली दिंडी दिसत होती   वेगवेगळ्ळे गणवेश तसे दर्शवीत होते.
मी मुलांकडे बघतच चालले होते. माझ्या मनात वेगवेगळ्या भावना विचार जात येत होते . जटपुरा गेटच्या जवळ  पोचताच  वाहतूक खोळंबलेली दिसली . गेटमधून वृक्षदींडीतील मुले बाहेर पडत होती त्यामुळे ट्रँफिक पोलिसांनी वाहतूक थांबवली होती. आता गाडी थांबल्यामुळे मी अधिक निवांतपणे मुलांकडे पाहिले . आता मला गहीवरून आले. डोळ्यांत अश्रू जमा होऊ लागले . मी ते थांबविण्याचा किंवा मला रडू फुटू नये म्हणून स्वतःला समजावण्याचा प्रयत्न केला. पृण आता ते माझ्या हातात नव्हते. लोक काय विचार करतील ? इतक्यातच माझ्या समोरच्या दुचाकीवरचा मुलगा वाहतूक खोळंबली म्हणून चरफडताना दिसला. पोलिस त्याला थांबण्यास सांगत होते पण त्याला मात्र पुढेच जायचे होते. जणू त्याला बाजूने जाणारी ही छोटी मुले दिसतच नव्हती . मला अधिकच भडभडून आले. मी दुपट्टा चेहे-यावर ओढून घेतला आणि दुपट्ट्याच्या आत विकल होऊन रडू लागले . मी इतर लोकांकडे बघू लागले . सर्वजण मला घाईत दिसले. ही मुले कोणता संदेश देत आहेत हे ऐकण्यासाठी त्यांच्याजवळ वेळ नव्हता . सर्वांचे लक्ष कदाचित् मनगटावरील घड्याळावर असावं. आँफीस, काँलेजमध्ये पोचायला उशीर व्हायला नको. निसर्गदत्त काळाचा विसर पडून मानवनिर्मित वेळेची गुलाम झालेली ही माणसं ! काळाच्या हाका यांना ऐकू येत नाहीत.......मला ठाऊक आहे, काळाबरोबर चालण्याचं सोडून घड्याळाच्या वेळेनुसार चालण्याची एक गुलामी सवय शाळेने लावली. मला हे आठवून अधिकच रडू फुटले.  जी सवय शाळेने लावलीय ती इमानेइतबारे पाळण्याचा प्रयत्न ही कामधंदा, आँफिस, कॉलेजला जाणारी माणसे करीत होती. त्यांना शाळेतच शिकविल्या गेलं होत, इकडे तिकडे लक्ष द्यायच नाही. आपला अभ्यास अन् आपण . बाकी कुठेच लक्ष घालायचं नाही. वर्गात बसून गुरूजी काय म्हणतात तेवढच ऐकायचं. गुरुजी शिकवत असताना बाजूला बसलेल्या माझ्या मित्राशी मी बोलायचं नाही. शंकाही विचारायची नाही. बाजूच्या मैत्रीणीला शंका विचारायची किंवा विचार विनीमय करण्याची किंमत मोजलीय मी दोनदा. एकदा तिसरीत असताना आणि एकदा पाचवीत असताना. तिसरीत असताना चड्डीत लघवी होतपर्यंत पडलेला मार मी विसरू शकत नाही केंव्हाच. हातच्याच्या बेरजेचे बाईंनी सोडवायला दिलेले गणित पाटीवर सोडवून पाटी बाजूच्या रांगेत बसलेल्या मैत्रीणीला दाखवून तुझे माझे सारखेच उत्तर आले का असे  खुणेणेच विचारण्याचा केलेला प्रयत्न आणि त्यावरून बाईंना आलेला अमर्याद राग. अन् पाचवीत असताना इंग्रजीच्या तासाला little lamb कविता गुरूजी समजावून सांगत असताना बाजूच्या मैत्रीणीला lamb शब्दाचा अर्थ सांगितल्यासाठी गालावर बसलेली सणसणीत चपराक भर दिवसा डोळ्यांपुढे तारे चमकवून गेली. मागील वर्षी माझी मुलगी केतकी आठवीत असताना तिची मैत्रीण उद्विग्न,  नाराज होती म्हणून तिचे शिक्षकाच्या शिकविण्याकडे लक्ष लागत नव्हते म्हणून केतकीने तिला शाब्दीक कोटी करून हसविण्याचा केलेला प्रयत्न . आणि गुरुजी शिकवताना मुली हसल्या म्हणून  दोघींनाही बसलेल्या गुरुजींच्या जोरदार चपराक, त्यानंतर माझ्या मुलीला वाटलेला अपमान. माझ्या मासिक पाळी सुरू झालेल्या मुलीवर घातलेला हात....आणि त्यानंतर तिच्या शाळेत जाऊन हेडमास्तरांना खडसावणे, आणि परवा माझा सातवीतील मुलगा सिद्धार्थने त्याच्या मित्राला वर्गात डिव्हायडर मागितले म्हणून त्याच्या कोवळ्या मांडीवर बसलेल्या छड्या आणि उमटलेले वळ......किंमत चुकवलीय मी आणि आता माझी मुले चुकवतायत. आणि ही रस्त्याने जाणारी मुले.......ती देखील ......... आज मोठ्या उमेदीने,  डोळ्यांत सुंदर स्वप्ने घेऊन रस्त्याने संदेश देत निघालेली ही मुले देखील उद्या अशीच मनगटावरील घड्याळावर नजर ठेऊन असतील आणि यांनादेखील दिसणार नाहीत  त्यांच्या बाजूने जाणाऱ्या कोवळ्या मुलांच्या डोळ्यातील स्वप्ने ...........
मला हे सारे आठवत होते. मला अधिकाधिक असहाय्य वाटत होते. डोळ्यातील पाणी खळत नव्हते. ......मी आता चेहे-यावरून दुपट्टा बाजूला केला. काही हरकत नाही.... मी रडताना दिसले तर ....कुणाजवळ एवढा वेळ होता बघायला? बाजूने जाणारी सुंदर गोड मुले आणि त्यांचा संदेशच ते पाहू, ऐकू शकत नव्हते तर माझ्याकडे काय लक्ष जाणार ?
मला नाना गोष्टी आठवत होत्या. मला ठाऊक होते, असल्या वृक्षदिंड्यांनी काहीएक बदल होणार नाहीये . ही वृक्षदिंडी मुलांनी थोडीच काढलीय ? त्यांना सांगितले तसे ती करत आहेत. या दिंडीत ती स्वतंत्र थोडीच आहेत? त्यांच्यावर त्यांच्या गुरुजींचे नियंत्रण आहे. गुरुजींचे सारे लक्ष मुलांच्या सुरक्षिततेकडे आहे. मुलांना शाळेच्या बाहेर घेऊन जाणे ही किती मोठी जोखीम वाटते शिक्षकांना ते मला माहितेय. मुलांना मोकळे सोडावे असे कोण्याच गुरुजींना वाटत नाही. त्यांना वाटते मुले मोकळी सोडली तर ती इतस्तताः विखुरतील, सैरावरा सुटतील, जिकडे तिकडे पांगतील. समाजाला, पालकांना देखील ते नको आहे म्हणून मुलांच्या मेंदूवर  गुरुजी नियंत्रण ठेवतात.  मुलांमध्ये ठासून भरलेल्या ऊर्जेला असे कोंडून ठेवणे ही साधारण घटना नाही. त्याचे परिणाम आपण सारे भोगत आहोत. इतके दिवस शाळेत कोंडून ठेवलेली उर्जा शाळेतून स्वतंत्र होताच स्फोट होऊन विकृत रुपात बाहेर पडते. आणि मग  माणसे निर्माण करतात समस्या . ऊर्जा अन् कार्याचा नियम शाळेत शिकलेली ही माणसे. ऊर्जा निर्माणही करता येत नाही अन् नष्ट ही करता येत नाही. बस ती फक्त रुपांतर करता येते अन् तिचा वापर करता येतो. विज्ञानाच्या पुस्तकातून नियम,  व्याख्या पाठ करून लिहिणारी आम्ही माणसे परीक्षेत पास होतो. शरीरात ठासून भरलेल्या ऊर्जेचा  वापर न करताच आणि त्याच्या बळावर लठ्ठ पगाराच्या नोकऱ्याही मिळवतो. अन् शरीरातील ऊर्जेचा प्रत्यक्ष वापर करणारी माणसे नापास होतात आमच्या शिक्षणव्यवस्थेत. शरीरातील   ऊर्जा क्रियारुपात वापरण्यासाठीच असते. प्रत्येक क्षणी मुले आपली ऊर्जा वापरू इच्छितात आणि आम्ही मोठी माणसे प्रतिक्षण ही ऊर्जा थोपविण्याचा प्रयत्न करतात . काही वर्षांपूर्वी किमान सहा वर्षे तरी ही ऊर्जा वापरण्याची मुभा होती. आता तर दोन अडीच वर्षाचं होत नाही तर कोंडून टाकलं जातं.  आत्ता आताच तर सुरू केलेला असतो ऊर्जेचा वापर.........लगेच झडपा बंद केल्या जातात .....असली सोडून नकली शिक्षणाच्या नावाखाली .....तथाकथित संस्काराच्या नावाखाली . ऊर्जेचा वापर करण्याची परवानगी नाकारलेली ही मुले मग या ऊर्जेचे रूपांतर सुंदर,  मनाला भावणा-या कार्यात  कसे करून दाखवतील ? मला ठाऊक आहे, या शिक्षकांच्या नियंत्रणाखाली निघालेल्या आणि निर्णयाचा अधिकार नसलेल्या मुलांच्या मनात शेकडो कल्पना आहेत. आत्मविश्वासही ठासून भरलेला आहे........आता असेल का?...... ठाऊक नाही.......... कदाचित शाळेने आतापर्यंत गळा घोटून टाकला असेल कल्पनाशक्तीचा आणि आत्मविश्वासाचा. तरी मुले तो शाबूत ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतीलच. मला ठाऊक आहे, या दिंडीने काहीच फरक पडणार नाही आहे माणसांच्या मानसिकतेत अन् ढासळलेल्या पर्यावरणात. कारण ही दिंडी मुलांनी काढली नव्हती . त्यांना आणले गेले होते. मुले बरी असतात हुकमत गाजवायला किंवा हवी तशी वापरायला.......आपल्या इच्छा आकांक्षा त्यांचेकडून पूर्ण करून घ्यायला. किंवा जे आपल्याला जमले नाही ते त्यांच्याकडून पूर्ण करून  किंवा  आपल्याला जमत नाही त्या गोष्टी मुलांना सांगणे सोपे असते. कारण मुले नकार देत नाहीत. ती बिचारी शक्तीने कमी पडतात. शिवाय मोठ्यांचे ऐकणे त्यांना आपले कर्तव्य वाटते म्हणून ती नकार देत नाहीत. अन्यथा त्यांना असल्या वांझोट्या गोष्टी , रिझल्ट,  म्हणजे अपेक्षित परिणाम न देणाऱ्या गोष्टी करणे त्यांना मुळीच आवडत नाही. मला ठाऊक आहे, हीच, दिंडी , म्हणजे लोकांना जागरूक करण्याची दिंडी केव्हा नि कशी काढायची याचे पूर्ण स्वातंत्र्य मुलांना असते; तर मला पूर्ण विश्वास आहे, रस्त्यावरील ही सर्व माणसे मुलांच्या या मोहिमेत सामील झाली असती. कारण मुलांमध्ये ती ताकद आहे, हातात घेतलेले आव्हान पूर्णत्वास नेण्याचे. पण.........पारतंत्र्यामुळे  ती हे करू शकत नाहीत.  .......... 
उद्या स्वातंत्र्यदिन ! पारतंत्यात असलेली ही मुले मोठ्या आतुरतेने उद्याच्या दिवसाची वाट बघत आहेत. उद्या त्यांच्या प्रिय  देशाचा स्वातंत्र्यदिन आहे. उद्या रोजच्यापेक्षा काहीतरी वेगळे असणार आहे शाळेत आणि एका कृत्रिम गोष्टीत जी ती रोज भरडली जातात त्या 'शिकविणे' नावाच्या मगरमिठीतून सुटका होणार आहे त्यांची आणि मग मिळणार आहे निवांत सुट्टी ......
मी मुलांकडे बघितले, मुले चालण्याच्या ,  आरोळ्या देण्याच्या आणि  रस्त्याने जाणाऱ्या  या थंड पडलेल्या  माणसांच्या गर्दीमुळे ती थकली होती. खरे तर त्यांना जोरदार आरोळ्या द्यायच्या होत्या आणि दमदार पावले टाकत चालायचे होते, पण उमेदीची क्षमता संपलेल्या किंवा शाळेतील शिक्षणपद्धतीमुळे आत्मकेंद्री बनलेल्या या माणसांच्या गर्दीत ती ते करू शकत नव्हती . .....  शिवाय त्यांची निसर्गदत्त शारीरिक क्षमता देखील शाळेने मारून टाकलीय रोज रोज  दिवसभर एका जागी बसवून.   गंजून गेलेय शरीर वापर करण्याने आणि त्या परिणाम म्हणून भेटमिळाले आजार शेकडो. अन् बुद्धीचा वापर न करू देण्याने निर्माण झालीय मानसिक विकलांगता. .......दरवर्षी हजारोंच्या संख्येने डॉक्टर होऊन बाहे पडणारी आमची स्कॉलर मुले शोधू शकली नाहीत हे लहानसे  कारण..........साधारण गोष्ट नाही ही, ठासून भरलेल्या ऊर्जेला कार्यात परावर्तीत न करता ती ऊर्जा तशीच एका जागी कोंडून ठेवणे. मुले प्रयत्नांची शिकस्त करतात ही ऊर्जा वेडेवाकडे वळण घेऊन बाहेर पडू नये म्हणून .......पण त्यांच्याही नकळत ती धरतेच वेडेवाकडे रूप आणि निर्माण करतात समस्या मानवनिर्मित व्यवस्थेत सामील झाल्यानंतर जगताना आळशी , लोभी , क्रुर किंवा कधी कोणी  हीन दीन बनून माणसे निर्माण करतात समस्या .... गरज नसताना  त्या लेकराना शिकविली जातात पैशाच्या  नफ्या तोट्याची गणिते. मग प्रत्यक्ष व्यवहारात कोण सहन करेल पैशाचा तोटा ? आणि मग नफाच आवडू लागला तर मग आपणच पुन्हा ओरड करायची , माणसे भ्रष्टाचारी आहेत म्हणून ....मुलांनी कधी म्हटले होते, आम्हाला पैशाच्या नफ्यातोट्याची गणिते शिकवा म्हणून ? मुलांना तर रमायचे होते, मोकळ्या विस्तीर्ण आभाळाखाली, गर्द वृक्षांच्या राईत, रिमझिमणा-या किंवा धो धो कोसळणा-या पावसाच्या धारांत, पशूपक्षांचे आवाज ऐकत, मित्रांना गूज सांगत , आईच्या कुशीत, बाबांच्या मिठीत, नातलगांच्या मेळाव्यात.......गग केली असती मुलांनी निसर्गाच्या , पर्यावरणाच्या समतोलाची,  माणसांच्या नात्यांची 100% नफा देणारी गणिते.....पण या नैसर्गिक गणिताला स्थान नाही आमच्या शिक्षणात. डायरेक्ट पैशाचेच गणित. हे पैशाचे गणित तर लिलया सोडवले असते मुलांनी जर त्यांना निसर्गाचे, मानवी संबंधाचे गणित शिकण्याची संधी मिळती तर.....मला खात्री आहे, मुलांनी भागाकारच केला असता जगातील संपत्तीचा आणि वाटून घेतले असते समान वाटे ....पृथ्वीच्या पोटातून युरेनियम  न काढता...अणूबाँम्ब न बनवता........ कृत्रिम ऊर्जेसाठी त्याने केला असता वापर दुथडी भरून वाहणाऱ्या नद्यांचा आणि अमर्याद तेजाने तळपणा-या सूर्याचा. .....निश्चितपणे त्याने पृथ्वीच्या पोटातून काढला नसता कोळसा ,  कारण त्याला ठाऊक झाले असते, पृथ्वीच्या संरक्षणासाठी आहे तो कोळसा.
पोलिस आणि मुलांचे शिक्षक मोठ्या कष्टाने मुलांना सुरक्षितपणे गेटच्या बाहेर काढत होती. गुरुजी विनंती करत होते , लोकांना पाच मिनिटे गेटमध्ये गाडी न टाकण्याची ...पण लोक ऐकत नव्हते .....मला स्पष्ट दिसत होते, ही सगळी  माणसे आपल्या आयुष्याचे किमान दहा ते पंधरा वर्षे  शाळेत गेलेली होती. आणि गुरुजी त्यांना शाळेत नियंत्रणात ठेवत होती . गुरुजींच्या परवानगीशिवाय ती हातपाय हलवत नव्हती की तोंड उघडत नव्हती. पाणी , शी, सू, भूक या नैसर्गिक गरजाही गुरुजींच्या परवानगीशिवाय पूर्ण करू शकत नव्हती .तेव्हा गुरुजी मोठ्या अभिमानाने सांगत होती, माझ्या वर्गातील , शाळेतील मुले माझ्या आज्ञेच्या बाहेर नाही. बस एक नजर पुरेशी आहे......धाकाच्या बळावर करता येतं हे सहजपणे . कारण  मुले शक्तीने आणि वयाने लहान गुरुंजीपेक्षा.आणि आता   त्याच गुरुजींचे आर्जव  तत्कालीन विद्यार्थी  असलेल्या आजच्या या  माणसांना ऐकू जात नाही  आहे...आज्ञा तर दूरच  राहिली.......मग कशाला केला  होता हा आटापिटा धाकाच्या बळावर नियंत्रणात  ठेवण्याचा ? कधीतरी शक्य आहे ते ? फँसिझमची सुरूवात ही इथून झाली  घरातून , शाळेतून. मग समाजात पोचली. सर्वांना आवडते आपल्यापेक्षा कमजोरांना नियंत्रणात ठेवायला.......ज्यांना हे मानवी मनाचं, निसर्गाचं, नैसर्गिक सिद्धांताचं गणित   आकळते ती मानवी मूल्य  जाणू लागतात आणि आचरणात आणतात. मग त्यांना आवडत नाही, माणसांना नियंत्रणात ठेवणे.  तसे हे गणित सगळ्यांनाच आकळणार असते पण शिक्षणव्यवस्थेला धीर धरवत नाही..........शाळेतील आणि घरातीलही...........
मुलांना गेटमधून सुरक्षित बाहेर काढण्यात गुरुजी आणि पोलिस यशस्वी झाले. गेटमधून बाहेर पडून मुले  कस्तुरबा रोडच्या दिशेने वळू लागली  आणि खोळंलेली वाहतुक सुसाट सुटली.
मी गेटमधून बाहेर रस्त्याच्या  डाव्या कडेला गाडी लावली. माझे रडे थांबत नव्हते. जसजसे माझ्या मनात विचार येत जात होते तसतसे मला अधिकाधिक उमाळे येत  होते. मी गाडीवरून खाली उतरले मुलांना निरोप देण्यासाठी . तसा मला उशीर होत होता शासनाने ठरवून दिलेल्या वेळेत शाळेत  पोचण्यास. पण मला फिकीर नव्हती . मला घड्याळ्याच्या वेळेनुसार धावायचं नाहीच आहे.  मला काळासोबत चालायचे आहे.  जेव्हा मला हे सारे समजून घ्यायचे होते तेव्हाही मी घड्याळ बघत नव्हते .. दिवस रात्र एक करत होते. मिळणाऱ्या शासकीय  सुट्यांशीही मला देणे घेणे नव्हते.  घड्याळ माझ्या सोयीसाठी आहे .   मानवनीर्मित व्यवस्थांमध्ये    जगताना सुविधा व्हावी म्हणून.  पण म्हणून याचा अर्थ मला गुलाम व्हायचं नाहीय वेळेचं. मला कालसुसंगतच वागायला आवडते. घड्याळाच्या  वेळेची गुलाम झालेली माणसे अडचणीत  असणारांच्या  हाका ऐकू  शकत नाहीत.
मी गाडीवरून उतरून दिंडीतील मुलांकडे बघू लागले. मुले गांधीजींच्या पुतळ्याला वेढा घालून कस्तुरबा रोडने पलटत होती मला अधिकच भडभडून येत होते . मी लोकलाज न  बाळगता दोन्ही हात जोडून  मुलांना अभिवादन केले.  मला ओरडून ओरडून सांगावेसे वाटते , कुठे चूक होतेय ती. केशसुतांची तुतारी कविता मला आता समजतेय नि शाळेने मला  माझ्या  शाळकरी वयातच समजावण्याचा प्रयत्न केला होता . काय गरज होती ? मला त्या वयात कविता नसत्या करता आल्या माझ्या  कल्पनेनुसार , माझ्या स्वप्नांनुसार?  
मला आता ओरडून ओरडून   सांगावेसे वाटते जगाला,  चूक कुठे झाली ते.  2011 पासून हाच प्रयत्न करतेय . होमी भाभा रिसर्च सेंटर , मुंबई येथे, चंद्रपूरमध्ये पार  पडलेल्या  अखिल भारतीय साहित्य संलनात, पुण्यातील शिक्षक साहित्य संमेलनात, मागील वर्षीच्या ATF साहीत्य संमेलनात आणि शक्य होईल तिथे तिथे. मला कशाच रूची नाही.  ना पायाभूत चाचण्यांमध्ये, ना शासनाच्या महवाकांक्षी सरल योजनेमध्ये . मला ठाऊक आहे, काहीच फरक पडणार नाही आहे याने. सरलमध्ये माहिती मुले   थोडीच भरत आहेत?  मला ठाऊक आहे , जरा मोठी मुले हे काम आनंदाने आणि आवडीने करतील कारण त्यांचीच माहिती आहे ती . आपल्या धाकट्या भावंडांची पण भरतील माहिती . नव्हे, तो मुलांच्या शिकण्याचाच भाग असला पाहिजे.  तेंव्हाच तर जाणिवपूर्वक शिक्षण  होईल.
मी अशा शाळांची स्वप्ने  पाहाते, जिथे  मुले ठरवू  शकतात सारं काही आणि   शिक्षक असतात  सहकार्यासाठी, प्रेम देण्यासाठी , विश्वास ठेवण्यासाठी नि संधी साधने उपलब्ध करून देण्यासाठी . मला ठाऊक आहे , अशा स्वातंत्र्यात मुले बसत नाहीत एका ठिकाणी सगळे. सगळी आपापल्या कामात व्यस्त असतात . पण ती शिकत असतात खरोखरच .भास नसतो तो मुले शिकत असल्याचा. आणि सामूहिकपणे करावयाच्या  कार्यासाठी एकत्रही येतात अन् ते काम यशस्वी करूनच सोडतात . मी अनुभवतेय हे दहा वर्षांपासून.
मुले  कस्तुरबा रोडने वळली. मी  डोळ्यांतील अश्रू पूसत गाडी काढली. शाळेच्या  रस्त्याला लागले . शाळेची मुले आतुरतेने वाट बघत असतात . मला या मुलांची  पाठीवरील जड  दप्तरापासून, त्या जीवघेण्या होमवर्कपासून , न  समजणा-या अभ्यासापासून आणि गुरुजींच्या नियंत्रणापासून मूक्त करायचे आहे, तसे कागदोपत्री झाले आहेत काही कायदे मुलांच्या बाजूने . पण ते अंमलात येत नाही आहेत म्हणून मला द्वाही घुमवायची आहे. माझ्या हातात whatsapp ची तुतारी आहे आता.. इथे फोडलेली किंकाळी पार साता समुद्रापलिकडे जाते. मला सांगायचे आहे लोकांना , चूक इथेच झाली आहे .मोठ्यांनी लहान मुलांशी वागण्यात. दुरूस्ती इथेच करायची आहे . मग होणार नाही कुणी मालक नि कुणी गुलाम आणि कुणी लाचार नि कुणी मग्रूर.

खरे  तर  मला  हे  सारे 14 आँगस्टलाच पूर्णपणे  टायपायचे होते. पण कामाच्या रगाड्यात जमलेच नाही. भारताचा    स्वातंत्र्यदिन आला नि गेला. मी टायपतच आहे 14 पासून  जसा वेळ मिळाला  तसा.  मनातलं लिहायला पुरेसा वेळ मिळत नाही म्हणून डोकं फार दुखतं. मला अजूनही बरंच लिहायचंय. पण...... मला वैताग आलाय नुसता....लोकांना खरेच अजून कळला नाही स्वातंत्र्याचा अर्थ ? आता तरी कळेल?
मी वाट पहातेय मुलांच्या स्वतंत्र होण्याची .....मला आशा आहे........

-वैशाली गेडाम

No comments:

Post a Comment