Showing posts with label लाडू चिवडा उपक्रम. Show all posts
Showing posts with label लाडू चिवडा उपक्रम. Show all posts

Tuesday, 10 November 2026

दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या वंचितांच्या चेहऱ्यावर दिवाळीचा आनंद!

पुण्याच्या ‘द पुना मर्चंट ऑफ चेंबर्स’तर्फे धाराशिवमधील गरजू कुटुंबे आणि पालावरच्या शाळांतील विद्यार्थ्यांना लाडू-चिवड्याचे वाटप

 सणांचा आनंद समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावा आणि वंचितांच्या आयुष्यातही दिवाळीचा गोडवा फुलावा, या सामाजिक बांधिलकीतून पुणे येथील ‘द पुना मर्चंट ऑफ चेंबर्स’च्या वतीने राबविण्यात येणाऱ्या दिवाळी फराळ वाटप उपक्रमांतर्गत यंदा धाराशिव परिसरातील दुष्काळग्रस्त, गरीब व वंचित कुटुंबांना लाडू-चिवड्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे आर्थिक परिस्थितीशी झुंज देणाऱ्या कुटुंबांसह पालावरच्या शाळांतील विद्यार्थ्यांच्या दिवाळीत आनंदाची भर पडली.

या उपक्रमांतर्गत राघुचीवाडी येथील शेतमजूर व गरीब कुटुंबांना, येडशी येथील आदिवासी राजगोंड समाजवस्तीतील नागरिकांना तसेच धाराशिव शहरातील कुडमूडे (पांगुळ) जोशी समाजाच्या सांजा चौक परिसरातील पालावरच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.

‘द पुना मर्चंट ऑफ चेंबर्स’च्या वतीने दरवर्षी सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून लाडू-चिवडा वाटपाचा उपक्रम राबविला जातो. केवळ दिवाळीचा फराळ देणे एवढाच या उपक्रमाचा उद्देश नसून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सणांचा आनंद आणि आपुलकीची भावना पोहोचविण्याचा हा एक संवेदनशील प्रयत्न आहे.

या उपक्रमासाठी संस्थेचे कार्यकारिणी सदस्य दलाराम चौधरी, बन्सी करपे, हनुमान बिष्णोई, जितेंद्र चौधरी व परशुराम कोल्हे उपस्थित होते. राघुचीवाडी येथील पोलीस पाटील, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य केले.

पालावरच्या शाळांमधील वंचित घटकातील विद्यार्थ्यांपर्यंत हा उपक्रम पोहोचविण्यासाठी भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष डॉ. अभय शहापूरकर यांनी विशेष सहकार्य केले. प्रयोगशील शिक्षक व बालसाहित्यकार समाधान शिकेतोड यांनी या संपूर्ण उपक्रमाचे समन्वयन केले.

समाजातील वंचित घटकांच्या सण-उत्सवात सहभागी होत त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणारा हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचे आणि माणुसकीच्या नात्याचे सुंदर उदाहरण ठरला. दिवाळीचा खरा आनंद वाटण्यात असतो, हा संदेश या उपक्रमातून अधोरेखित झाला.