Thursday 12 March 2015

फारूख काझी

फारूक काझी म्हणजे.....

मुळातच एक चळवळ्या माणूस. चौकटीतलं जगणं झुगारणारा. स्वछंदीपणानं आयुष्य जगणारा. लहानपणी शाळेचं वेळापत्रक याला मानावायचं नाही. इयत्ता पहिली ते तिसरी हा पठ्ठ्या शाळेत जायचा ते केवळ परीक्षेसाठी. पुढे चौथ्या वर्गात गेल्यावर सिद्धेश्वर झाडबुके नावाचे हाडाचे शिक्षक भेटले. त्यांनी शाळेच्या वेळेत उनाडक्या करत हिंडणा-या या महाशयांना शाळेची गोडी लावली. झाडबुके गुरुजींच्या व्यक्तीमत्त्वाचा पुढे इतका मोठा प्रभाव पडला की, फारुकनं तिथंच (चौथीत असताना) शिक्षक व्हायचं ठरवून टाकलं. पुढे झालंही त्याच्या मनासारखं. आज शिक्षक मित्रांना विचारलं तर नाईलाज होता...परिस्थितीच तशी होती... म्हणून शिक्षक झालो, असेही म्हणतील कदाचित. आज एखादी संधी मिळाल्यास बाहेर पडायला अनेकजण उत्सुक आहेत! त्याला कारणंही तशीचं आहेत. पण सांगायचं हे की, फारूक मात्र वाट चुकलेला नाहीये. तो ठरवून शिक्षक झालाय, आणि पुढेही शिक्षकच राहणार आहे.सांगोला (जि.सोलापूर) तालुक्यातल्या अनकढाळ गावातल्या शाळेत तो शिकवतो. नोकरीत आल्याला अजून दहा वर्षंही पूर्ण झालेली नाहीत. पण भरपूर मोठा अनुभव फारुकच्या पाठीशी आहे. आपल्याकडं असं आहे की, जो वयाने वाढत जातो. त्याला ‘अनुभवी’ म्हटलं जातं. पण फारुकच्या अनुभवाला धडपडीतून आलेली यशाची रुपेरी किनार आहे. शाळेत कार्यरत असताना सतत वाचन, नवीन काही समजून घेणं, नवनवीन प्रयोग करून पाहणं असं याचं आपलं सुरु असतं. सुरुवातीला परिस्थिती अनुकूल नव्हतीच. अनुकूलतेच्या दिशेनं वारे वाहू लागतील. मग आपण काहीतरी करायला लागू, अशी वाट पाहात हा स्वस्थ बसला नाही.भाषा शिक्षणाबाबतचा एक निराळा दृष्टिकोन त्याच्याकडे आहे. मुलांना भाषेशी खेळू द्यायचं. सतत काहीतरी ऐकवायचं, खूप-खूप बोलू द्यायचं, मग वाचणं-लिहिणं. वाचन करताना शाळेतल्या पुस्तकांत मुलं रमत नाहीत, असं लक्षात आलं. मुलांना अवांतर वाचनासाठी पुस्तकं उपलब्ध करून देण्याचं ठरवलं. त्यासाठी एक नामी शक्कल लढवली. गावातल्या प्राथमिक शाळेतशिकणा-या मुलांपासून कॉलेजात जाणा-या मुलांपर्यत प्रत्येकानं (शिक्षकानंदेखील) जमतील तितके पैसे जमवायचे आणि त्यातून वाचनालयाला पुस्तकं घेऊन द्यायची. गाव जेमतेम दीड हजार लोकवस्तीचं. गावात ‘आपलं वाचनालय’ सुरु झालं. शाळेच्या पटावर मुलं ४५. सुरुवातीला २०-२५ पुस्तकांवर सुरु झालेल्या वाचनालयात आजमितीस २५०च्या वर पुस्तकं जमलीत. भारत ज्ञान-विज्ञान समुदाय, पुणे येथील गरवारे बालभवन यांनी आणखी काही पुस्तकं भेट दिलीत. गावातल्या मुलांनीच वाचनालय चालवलंय. प्राथमिक शाळेपासून कॉलेजकुमारांपर्यंत आणि गृहिणी-पालक अशा सगळ्यांना वाचनालयाचा ‘लाभ’ मिळतोय. मुलांची मासिकं सुरु केली. मुलं आवडीनं वाचू लागली. पुस्तकांवर गप्पा, चर्चा, टीका असं सगळं मुलं अनुभवत होती. आणि यातून भाषा शिक्षण सुरु होतं आणि आजही आहे. या वातावरणाचा खुबीनं वापर करीत सगळ्या गावक-यांना ‘एक गाव एक गणपती’साठी या काझी सरांनी राजी केलं! गाव शाळेत आणि शाळा गावात नेली!वाचता-वाचता मुलांना लेखनाकडे वळविण्यासाठी ‘रानफूल’ नावाचं हस्तलिखित सुरु केलं. मुलांना स्वत:च्या भाषेत लिहिण्याची मुभा दिली. मुलं लिहिती झाली. ‘जीवन शिक्षण’ मासिकात याबाबत लेख आला. कौतुक झालं. त्यातून सरांना आणखीन हुरूप आला. गेल्या नऊ वर्षांपासून या ‘रानफुला’चा सुगंध दरवळतोय! आता मुलं स्वतः चित्रकथा तयार करतात. कविता करतात. अनुभव, प्रसंग लिहितात. पुस्तकं हाताळणं-वाचणं ते स्वतःच पुस्तकं बनविणं हा देखणा प्रवास मुलांच्या दृष्टीनं किती मजेशीर आणि आनंददायी असणार!पुस्तकातल्या धडे-कविता शिकविणा-या अनेक शाळा आजही आहेत. पण निरनिराळ्या गोष्टींकडं चिकित्सकपणे पहायला शिकविणारी फारुक सरांची शाळा आहे. व्यसनाधीनतेविषयी बोलायचं होतं खरं. पण त्याची सुरुवात केली शाळेच्या परिसरातल्या कच-यापासून! कचरा गोळा करायचा. झाडाची पानं, कागद, गुटख्याच्या पुड्या, काड्या असं त्यातील घटकांचं वर्गीकरण केले. त्याचे निष्कर्ष गावातल्या चावडीवरच्या फळ्यावर लावण्यात आले. त्याची गावात मोठी चर्चा झाली. गुटख्याच्या पुड्या पडायच्या बंद झाल्याने शालेय परिसर गुटखामुक्त झाला. एक छोटंसं सर्वेक्षणही झालं. व्यसनांमुळं आरोग्यावर कोणते घातक परिणाम होतात, हेही मुलांपर्यंत पोचलं.हे झालं गाव आणि शाळेतलं. शिक्षकांची केंद्र संमेलने म्हणजे एक कंटाळवाणा प्रकार असतो. शिक्षकांना तर ती शिक्षाच वाटत असते. संमेलने अधिकाधिक सृजनशील कशी होतील, यासाठी फारूक आणि मित्रमंडळीचा प्रयत्न असतो. एकनाथ गुरव या धडपडणा-या शिक्षकाची त्यासाठी मोठी मदत होते. शिक्षकांकडून प्रश्नावली भरून घेऊन त्यांना नेमके काय हवे? त्याचा शोध घेतला. गायन, अभिनय, चित्रवर्णन यासह निरनिराळ्या स्पर्धा, शैक्षणिक साहित्य निर्मिती, नाट्यभिनय कार्यशाळा असे खूप सारे उपक्रम राबविले जाताहेत. त्यातून शिक्षक समृद्ध होताहेत.हे सगळं करतानाच जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या समविचारी शिक्षकांना सोबत घेऊन ‘अंकुर’ नावाचा गट तयार केला. सांगोला येथील माता-बालक उत्कर्ष प्रतिष्ठान आणि ‘अंकुर’च्या संयुक्त विद्यमाने भाषा, गणित अध्यापन कसं करावं? याबाबत कार्यशाळा घेतल्या. शिक्षणतज्ज्ञ लीलाताई पाटील नेहमीच गटातल्या शिक्षकांच्या धडपडीचं कौतुक करताना त्यांना मार्गदर्शन करीत असतात. उपक्रमशील शाळांना भेटी देणं, शिक्षणातले नवे प्रवाह समजून घेणं, पुस्तकं वाचणं, त्यावर चर्चा करणं असं काहीना काही सतत सुरूच असतं. गटातल्या शिक्षकांनी भाषा विषय निवडून बारीकसारीक गोष्टींचा विचार करीत त्यावर वर्षभर काम केलं. ठराविक दिवसांनी भेटणं, चर्चा करणं, अनुभव शेअर करणं असं सुरु होतं. वादही व्हायचे. पण त्यातूनच ‘तुझ्या गळा माझ्या गळा’ यासारखं गीत शिकवायला या गटातल्या शिक्षकांनी सपशेल नकार दिला!“हे ‘धाडस’ आलं कुठुन?” फारुकला एकदा विचारलं. तो म्हणाला “गटातील सर्व शिक्षकांनी खूप चिकित्सक पद्धतीनं भाषेच्या पाठ्यपुस्तकांचा अभ्यास केलाय. आमचं असं मत झालं की, हे गाणं शिकवायला काही औचित्यच नाहीये. आम्ही केवळ गाणं शिकवायला नकार दिला नाही, तर पुरकपाठ, वाचनपाठ तयार केले, कविता रचल्या. त्या शिकवल्या. केवळ विरोध न करता निराळ्या वाटेनं चालण्याचं बळ आणि दिशा ‘अंकुर’नंच आम्हा सगळ्यांना दाखलीय.” तीन वर्षापूर्वी शिक्षण हक्क कायदा आला नव्हता. तेव्हा गटातल्या शिक्षकांनी शिक्षण अधिका-यांकडे प्रश्नपत्रिका बनविण्याची परवानगी मागितली होती. कारण हेच होतं की, नेहमीच्या सरकारी प्रश्नपत्रिकांत मुलांना स्वतःचे विचार व्यक्त करायला जागाच नाही. ‘घोका आणि ओका’ हेच यातून होतं. बस्स. तेव्हा ती परवानगी मिळाली नव्हती. आता कायद्यानंच सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाची संकल्पना स्वीकारल्यानंतर ती आपोआप मिळालीय. शिक्षकांच्या समृद्धीसाठी ‘अंकुर’सारख्या गटांचे महत्त्व मोठे आहे.सामाजिक सामीलकी मानणा-या ‘अंकुर’मधल्या शिक्षक मित्रांनी आणखीन एक ‘जरा हटके’ उपक्रम राबवला. सातवीपर्यंत जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलेल्या ग्रामीण भागातील, गरीब-होतकरू २० मुला-मुलींना अभ्यासाव्यतिरिक्त काही तरी वेगळं, पोषक देण्यासाठी मुक्त विद्या केंद्र सुरु केलं. ज्या शिक्षकात जे कौशल्य आहे, त्याने ते फावल्या वेळात मुलांशी शेअर करायचे. संगीत, संगणक, बाहुलीनाट्य, खेळ, वाचन असं बरचं काय काय सुरु होतं. याखेरीज कला, कार्यानुभव, बागकाम, श्रमदान, एका खेळात प्रावीण्य मिळवणं, मूक्त अभिव्यक्ती, सुसंगतपणे विचार मांडणे, क्षेत्र भेटी यातून मुलांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देण्याचं काम शिक्षकांनी केलं. ‘अंकुर’ आणि माता-बालक उत्कर्ष प्रतिष्ठानच्या परस्पर सहकार्यातून सांगोल्यात वर्षभर हा उपक्रम सुरु होता. अर्थात हे सामुहिक काम असलं तरी केंद्राचा कार्यकारी प्रमुख म्हणून फारूक सरांनीच काम पाहिलं. शिक्षकांवर आज टीका होतेय की, यांच्याकडे सामाजिक बांधीलकी नाही, हे आत्मकेंद्रित झालेत. या टीकेला राज्यातील ठीकठीकाणचे शिक्षकांचे गट, मंच कोणताही गाजावाजा न करता कृतीतून असं चोख उत्तर देताहेत. ‘अंकुर’ त्याचं एक बोलकं, मूर्तिमंत उदाहरण आहे, इतकंच.रविवार लोकसत्ताच्या ‘बालरंग’मधून फारुकनं मुलांसाठी कथालेखन केलेय. अध्यापनाच्या अनुभवांवर आधारित ‘आनंदवन’ ही लेखमाला शिक्षणवेध मासिकात प्रसिद्ध झालीय. ‘साप्ताहिक साधना’मध्ये ‘प्रिय अब्बू’ लेखमाला प्रसिद्ध झाली आहे. याशिवाय ‘पहिली ते चौथीच्या भाषा विषयाच्या पाठ्यपुस्तकांचा स्रीवादी दृष्टिकोनातून अभ्यास’ या विषयावर फारुक संशोधन करतोय. बाहेरच्या देशात शिक्षण क्षेत्रात झालेली संशोधनं एक तर शिक्षकांनी किंवा शिक्षणात कामकरणा-यांनी केलीत. आपल्याकडे तळातला अनुभव घेणारा शिक्षक खूप समृद्ध असतो. पण ते काही लिहीताना दिसत नाहीत. त्यांनंच लिहितं व्हावं, अशी फारुकची मनोमन इच्छा आहे. लीलाताई पाटलांची पुस्तकं झपाटल्यासारखी वाचल्यावर स्वत:मधल्या वेगळ्या शिक्षकाची ओळख फारुकला झाली. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन शिक्षण पंढरीचा वारकरी झालेला फारूक काझीसारखा शिक्षक शिक्षण क्षेत्रात चांगलं काही घडावं, यासाठी मनोभावे काम करतो आहे. तन-मन-धनाने. म्हणतात ना धडपड करणा-यालाच यश साथ देतं. ते खरंच आहे. नवीन काही निर्माण करण्यासाठी स्वप्नं पाहावी लागतात आणि ते वास्तवात आणण्यासाठी झटावंदेखील लागतं. तेच तर फारूक करतोय. एक बाकी खरं. जमीन सुपीक करण्यासाठी केवळ मशागत करून उपयोगाचे नाही. प्रत्येक दाण्यानं गाडून घेण्याची तयारी ठेवावी लागते. अंकुरण्यासाठी. तशी तयारी सगळ्यांनीच दाखवायली तर ‘अंकुर’चा ‘संसर्ग’ सगळीकडे होईल. फारुकनं ती दाखवली. म्हणून तर ‘चौकटीत’ राहून ‘चौकटीबाहेरचं’ काम तो करू शकला. ही तर केवळ सुरुवात आहे. अजून या नव निर्माणच्या शिलेदाराला बरेच अंतर चालायचे आहे.असते

....भाऊ चासकर atf वरून साभार

फारुक चं शिकण्याच्या वाटेवरचं आनंदवन जरुर वाचा.

No comments:

Post a Comment