Sunday 30 August 2015

खुलं आभाळ

'खुलं आभाळ' लेखमालेतील शेवटचा लेख
30 ऑगस्ट 2015

उपेक्षित कला
- आभा भागवत

अल्बर्ट आईनस्टाईननी म्हटलंय, "Creativity is Intelligence having fun." कल्पकता म्हणजे बुद्धीचे खेळ असतात. ज्या सृजनशील मुलांना शिक्षण व्यवस्था निकामी ठरवते तीच मुलं बुद्धिचातुर्याशी खेळतात. हा खेळ अजून सतर्कपणे, अभ्यासपूर्णतेनी खेळायला हवा. प्रतिभेचे ज्यांना सतत धुमारे फुटत असतात त्यांच्यात एक प्रकारची अस्वस्थता असते. ती विश्रांती घेऊ देत नाही. सतत नाविन्याच्या शोधात रहायला भाग पाडते. निर्मितीची प्रचंड उर्जा कलाकारात असते. शंभर कल्पना सुचतात पण त्यातील एखाद दोनच प्रत्यक्षात आणता येतात. दिवसाचे तास, वर्षाचे दिवस वाढावेत आणि सगळ्या कल्पना साकारता याव्यात अशी आर्त तळमळ कलाकाराला वाटते. कुठल्याही चौकटी घालून घ्यायला, बंदिस्त व्हायला कलाकार तयार नसतात. सतत लगाम खेचणाऱ्या अनेक सामाजिक व्यवस्था आणि सांस्कृतिक बंधनं यात अडसर ठरू शकतात. खुल्या अभिव्यक्तीचा आस्वाद घेण्यासाठी चित्रकलेच्या क्षेत्रात प्रचंड पायाभरणीची गरज आहे. याला पोषक वातावरण अजूनही आपण निर्माण करू शकलो नाही आहोत याची खंत वाटत राहते.

व्यक्ती, घर, शाळा, संस्था, समाज, राष्ट्र या सर्व पातळ्यांवर क्रांती घडण्याची गरज आहे. अर्थकारणाचे बळी होत अन्याय सहन करत जी अगतिकता आपण आज अनुभवतो त्यातून बाहेर येण्यासाठी कलेचा उपयोग झाला पाहिजे. कारण कलेमध्ये न बिचकता, परिणामकारक पद्धतीनी विषयाची मांडणी करण्याची जी ताकद आहे त्यात चळवळ उभी करण्याचं सामर्थ्य आहे. उलथा पालथ करण्याची क्षमता आहे. लहान वयापासूनच ही वृत्ती ओळखून तिला योग्य दिशा देणं आवश्यक आहे. साचेबद्ध विचारसरणीतून स्वतःला मुक्त करण्यासाठी कलेचा वापर झाला पाहिजे. यासाठी केवळ कलाकार निर्माण होऊन पुरणार नाही तर कलेची आणि कलाकरांची जाण असणारी, प्रोत्साहन देणारी, संधी देणारी माणसं तयार व्हायला हवीत. यातूनच एका सुरक्षित वर्तुळातून बाहेर पडून आव्हानं स्वीकारणारे कलावंत निर्माण होतील. कलाकार असं म्हणतात की, "जोपर्यंत आम्ही केलेल्या कामाचा आर्थिक मोबदला मागत नाही तोपर्यंत आमचं काम सर्वांना आवडतं." ही विचारसरणी मोठया प्रमाणात बदलायला हवी. एका नवीन, टवटवीत, स्वच्छ नजरेनी कलाविश्व तोलून पाहून त्यातल्या त्रुटी काढून टाकण्यासाठी सर्वांनी सजगतेनी कृतीशील व्हायची गरज आहे.

जगात इतर अनेक न सुटलेली कोडी आणि माणसाच्या मूलभूत गरजा भागत नाहीत अशी परिस्थिती असताना, "काय तुम्ही चित्रकला घेऊन बसलायत?" अशी प्रतिक्रिया येणं साहजिक आहे. कारण कलेचा वापर करण्याच्या अनेक शक्यता आपण अजमावलेल्याच नाहीत. काही जणांचा तो जीवनाचा मार्गच असू शकतो इतकी कला महत्वाची आहे. आधी पोटोबा मग विठोबा अशी म्हण असली तरीही कलोपासनेत आयुष्य व्यतीत करून जिवाचीही पर्वा न करणारे कलाकार देखिल कमी नाहीत.

तंत्रज्ञान युगातील प्रगतीमुळे बहुजनांच्या हातात कॅमेऱ्यासारखं माध्यम सहज येणं हे दृश्य कलाकारांसाठी फार मोठं आव्हान आहे. कॉम्पुटरवर उपलब्ध इमेज एडिटिंग टूल्स आणि मीडियामुळे ज्ञानात पडणारी भर यांच्या परिणामांतून चित्रकाराला स्वतःचा बचाव करणं भाग आहे. त्यापुढे जाऊन स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी वेगळा विचार करणारे कलाकार तयार व्हायला हवेत. ही निर्मिती नुसती वरवर वेगळी वाटणारी असून चालणार नाही. ज्यांना आयुष्यात काही तात्विक पाया निर्माण करता येईल आणि त्याचं प्रतिबिंब त्यांच्या कलाकृतीत दिसेल त्यांनाच नवनिर्मिती सुचेल. हा विषय इतका गहन, लवचिक आहे की त्याला कुठलीही सरळ उत्तरं नाहीयेत. पुढे हे प्रश्न आणि उत्तरंही बदलत जाणारेत. तरीही अखेरीस फरक कशानी पडतो? तर आयुष्य तुम्ही कुठल्या मूल्यांवर जगता? तुम्ही विचार कसे करता? तुमच्या आयुष्याची तात्विक बैठक काय? आणि तुम्ही किती प्रामाणिकपणे काम करता?

चित्रकलेचं शिक्षण घेणं म्हणजे चित्र या भाषेचा शब्दसंग्रह आणि व्याकरण शिकणं. रियाज किंवा सराव करत त्यावर प्रभुत्व मिळवण्यासाठी काही वर्ष खर्ची घालत आयुष्यभर चित्रांची भाषा शिकत रहाणं. पुढे माध्यमावर इतका उत्तम ताबा येतो की यातलं तंत्र वापरण्यासाठी कष्ट घ्यावे लागत नाहीत. तंत्र अंगात मुरलेलं असतं. त्यापुढे मात्र तुमच्या कलाकृतीला अर्थ येतो तो विचारांनी, अंगिकारलेल्या तत्वांनी आणि सामाजिक भानानी. त्यामुळे तंत्र विकसित होण्याच्या प्रक्रियेपेक्षा विचार प्रगल्भ होण्याची गती जास्त हवी आणि आयुष्यभर चालू हवी. कमर्शियल आर्टकडचा ओढा कमी होऊन कलेच्या गाभ्याकडे नेणारं शिक्षण मिळालं पाहिजे. खरं तर कमर्शियल आणि फाईन आर्ट असे तुकडे करणं हे सुद्धा अनैसर्गिक आहे. मुळातच शिक्षणानी केलेले विषयांचे कप्पे योग्य नाहीत. होलिस्टिक अप्रोच जिथे असण्याची गरज आहे तिथे आपण जास्त जास्तच तुकडे करत चाललोय असं नाही वाटत?

कला ही सध्या सर्वात जास्त जाहिरात क्षेत्रात वापरली जाते. जे खरं नसतं ते तुमच्या गळ्यात पाडण्यासाठी खोटा वर्ख चढवून समोर आणलं जातं. त्यातून फक्त होणारा फायदा मोजला जातो, नुकसानाकडे चलाखीनी दुर्लक्ष करून. जाहिरात क्षेत्र म्हणजे सौंदर्यशास्त्राचा प्रेक्षकावर खेळलेला एकतर्फी डाव. ते चक्क आपल्या दृक संवेदनांचा छळ करतात. १३व्या शतकातील सूफी कवी रुमी म्हणतात, "I am not this hair, I am not this skin, I am the soul that lives within." पण नजरेला आधी जे दिसेल त्याचाच मोह होतो, इतर सर्व संवेदनांचा विसर पडतो. सामान्य माणसाच्या दृश्य संवेदनांचं शोषण जाहिरात व्यवसाय करतो. जर कलाकार स्वतःला यापासून लांब ठेवू शकले तरच काहीतरी क्रांतिकारी हालचाल होऊ शकेल. यासाठी anti-aesthetic चळवळच सुरु केली पाहिजे. सौंदर्यानुभव अशा काही प्रभावी पद्धतीनी वापरायचा की त्याचा परिणाम खोलवर होऊन ग्राहक त्या विशिष्ट उत्पादनांच्या वापरापासून परावृत्त होतील. याप्रकारची काही प्रभावी animations, प्रवाहविरोधी चित्रपट बघायला मिळतात. पण चित्रकारांमध्ये हा विचार अभावानेच दिसतो. कलाकारांनी हे मनावर घेतलं तर समाजमनावर जणू राज्यच करणारं जाहिरातीचं जग खूप बदलांना चांगलं वळण देऊ शकेल. बंगलोरमध्ये काही चित्रकारांनी कलेचा उपरोधात्मक वापर करून उघड्या गटारांभोवती चित्र काढली, शिल्प केली आणि पडून राहिलेल्या कामांची आठवण करून दिली. जाळीच्या गटाराचं कोळ्याचं जाळं, बास्केट बॉलचं नेट, पाण्याच्या डबक्यात मगर, चिखलात मोठ्ठा साप, साठलेल्या पाण्यात कागदाच्या नावा अशी कला sarcastically वापरली आहे.

कलाकार हा इतका अस्सल असतो की तो दुसऱ्याला आवडावं म्हणून काही करण्याच्या पलीकडे गेलेला असतो. "का?" या प्रश्नाचं उत्तर "मला हवंय म्हणून" असंच असतं. इतक्या स्वच्छ विचारांनी, बाह्य परिणामांचा दबाव न बाळगता फार कमी जणं काम करू शकतात. कलाकार दबाव नाकारूनसुद्धा उत्तम, समाधानकारक काम करू शकतो. कलाशिक्षणासारख्या अतिशय संवेदनशील विषयात आमूलाग्र बदल व्हायला हवेत. अस्सल कलेची होणारी उपेक्षा आधी कलाकारांनीच थांबवायची गरज आहे. त्यानंतर सामान्य माणसाला जागं करण्याचा अधिकार कलाकारांना मिळेल.
- आभा भागवत

No comments:

Post a Comment