Wednesday 16 October 2019

मुलांचे प्रतिसादात्मक लेखन :माझा अनुभव

वाचनात आलेल्या मुद्द्याबाबत आपली सहमती किंवा असहमती लिहून दर्शवणे,वाचलेल्यावर आपली प्रतिक्रिया देणे, त्यावर  समीक्षात्मक लेखन करणे या लिखाणाला प्रतिसादात्मक लेखन म्हणतात. सर्जनशील लेखनाबरोबरच प्रतिसादात्मक लेखन करण्याची क्षमता मुलांमध्ये निर्माण व्हायला हवी.कारण लोकशाही समाजव्यवस्थेत एखाद्या घटनेवर आपले विचार प्रकट करता येणे फार महत्त्वाचे असते.मुलांनी वाचन साहित्यातून मुख्य मुद्दे शोधावेत,ते आपल्या अनुभवाशी जोडून,ताडून,पडताळून लिखाणात ते मांडायला हवेत.यासाठी त्यांना मदतीची आवश्यकता असते.अशा उपक्रमातून मुलांना मदत मिळाल्यास मुलांच्या लिखाणात नक्कीच सुधारणा घडून येते.
पार्श्वभूमी:- क्वेस्ट,युनिसेफ व महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT) पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषाशिक्षणाचा कोर्स करताना मुलांच्या प्रतिसादात्मक लेखनाबाबत मुलांसोबत काम करताना खूप काही नवीन शिकायला मिळाले.उस्मानाबाद शहरातील नगर पालिका शाळा क्र.१८ या  शाळेत दिनांक ९ ऑक्टोंबर ते २० ऑक्टोंबर २०१८ या कालावधीत मुलांसोबत काम केले.मुलांचे प्रतिसादात्मक लेखनासाठी इयत्ता सातवीच्या पाच विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. या पाच विद्यार्थ्यांनी माधुरी पुरंदरे यांच्या “सख्खे शेजारी” या पुस्तकावर प्रतिसादात्मक लेखन केले.
पुस्तकाबद्दल:-“सख्खे शेजारी” हे पुस्तक माधुरी पुरंदरे यांचे असून पुस्तकांमधील चित्रे माधुरी पुरंदरे यांनी काढलेली आहेत. शहरी संस्कृती मधील माणसाचं जगणं कशाप्रकारे आहे.याचे चित्र या पुस्तकांमधून उभे केले आहे.वेगवेगळे शेजारी त्यांच्या वागण्या,बोलण्याच्या,राहण्याच्या वेगवेगळ्या तऱ्हा, विविध घटना वेगवेगळ्या प्रसंगातून मांडल्या आहेत.पुस्तकाचे  सर्व कथानक केतकी या छोट्या मुलीभोवती फिरते.केतकी ही छोटी मुलगी,तिचं शेजाऱ्याबरोबर गप्पा गोष्टी करणं,नवं काहीतरी जाणून घेण्याची तिची जिज्ञासा याबद्दलचे पुस्तकातील प्रसंग भावतात. पुस्तकातील चित्र मुलांच्या भावविश्वातील आहेत.चंद्रसदन या इमारतीत ज्या ज्या घटना घडतात त्यातून केतकीचे भावविश्व समृद्ध होत जाते.याबद्दलचे विविध प्रसंग लेखिकेने उभे केले आहेत.स्वत: लेखिकेने या पुस्तकातील चित्रे रेखाटलेली आहेत.
कार्यपद्धती:-
१)           उस्मानाबाद शहरातील नगरपालिका शाळा क्रमांक -१८ मध्ये इयत्ता सातवीच्या वर्गातील पाच विद्यार्थ्यांची निवड केलेली होती.या मुलांची आवड, क्षमता,भावविश्व, पूर्वज्ञान पाहून सख्खे शेजारी या पुस्तकाची निवड केली होती.सर्व पाच मुलांना “सख्खे शेजारी” हे पुस्तक वाचण्यासाठी दिले.
२) सहवाचन:- या पुस्तकातील काही भाग मी स्वतः वाचत होतो.वाचलेल्या  भागावर, त्या गोष्टीच्या पुस्तकातील चित्रांवर चर्चा घडवून आणली जात असे.मुले अंदाज बांधून,तर्क करून बोलत होती.काही भाग मुले घरीहून वाचून येत असत.सर्वांना एकच पुस्तक दिल्यामुळे एकदाच पाच मुलांसोबत चर्चा सुरू असे.वाचन करताना त्यातील मजकूर व त्यांचे भावविश्व यांना जोडणारे  प्रश्न विचारून चर्चा केली.उदा. केतकी कोणकोणती  कामे करते? केतकी प्रमाणे तुम्ही कोणकोणती कामे करता?
३) सह वाचन झाल्यावर  पुस्तकावर चर्चा केली. या गोष्टीत कोणकोणती पात्रे आहेत?ती लिहा?गोष्टीची सुरुवात कशी झाली?केतकीला खरे शेजारी कोण वाटतात? असे प्रश्न विचारून पुस्तकावर चर्चा केली.त्यानंतर मुलांना त्या पुस्तकावर लेखन करण्यास सांगितले.
मुलांचे पहिले लेखन
मुलांचे या पुस्तकावरचे लेखन वाचले. सर्व मुलांनी लिहण्याचा  चांगला प्रयत्न केला होता.काही मुलांनी  पुस्तकातील गोष्ट सारांश रुपात लिहिण्याचा प्रयत्न केला होता.काही ठिकाणी अर्थामध्ये सुसंगती नव्हती. गोष्टीत काय काय झाले असते आठवण्याचा प्रयत्न मुलांनी केले केलेला होता. या लिखाणात सुसूत्रता दिसत नव्हती पहिला मसुदा मेंटॉर मीनाताई निमकर यांना पाठवल्यावर त्यांनीही काही सूचना दिल्या.त्यानुसार  पुस्तकातील प्रसंगाविषयी लिहा, हे पुस्तक वाचल्यावर तुम्हाला काय वाटले? गोष्टीतला कोणता प्रसंग आवडला? अशी मुलांशी चर्चा करून त्यांना दुसरे लेखन करायला  सांगितले.

मुलांचे दुसरे लेखन
दुसऱ्या मसुद्यात मुलांनी लेखिकेबद्दल लिहिले.माधुरी पुरंदरे यांची कोणकोणती पुस्तके आहेत. त्यांची शिवानीने नावे लिहली होती.शिवानीने लिहिलंय “माधुरी पुरंदरे यांनी लिहिलेली अनेक पुस्तके मी वाचणार आहे”.सर्वच मुलांनी पूर्वीपेक्षा जास्त लेखन केलेले होते.संग्राम लिहितो की “पूर्वीसारखी माणसं आता पाहायला मिळत नाहीत”. विठ्ठल लिहितो “शेजारी कुटुंबासारखे असतात.त्यांचा आदर करावा”. प्रणव लिहितो, “मला या पुस्तकातून खूप काही समजलं.आपण कसं वागावं,कसं बोलावं,मोठ्याचं ऐकावं”. हे पुस्तक लिहिल्याबद्दल तो लेखिकेला धन्यवाद देतो.मुलांनी जुना काळ व आताचा काळ याची तुलना केली आहे.ही गोष्ट कशाविषयी आहे हे त्यांना नेमकेपणानं लिहिले होते.हे पुस्तक वाचून माधुरी पुरंदरे यांची पुस्तके वाचण्याची त्यांची उत्सकता वाढलेली होती.हे पुस्तक इतरांनी का वाचावं हे त्यांना निटपणे सांगता आले नव्हते.  मुलांच्या लेखनात अजून काय काय सुधारणा करता येतील.याबद्दल माझ्या मेटॉर मीनाताई निमकर  यांचे मार्गदर्शन घेतले.त्यानुसार मुलांशी चर्चा केली.
मुलांचे तिसरे  लेखन       
मुलांनी तिसरे लेखन विस्ताराने केले आहे.पुस्तकातील घटना,प्रसंग यांची जोड त्यांनी त्यांच्या आयुष्यात घडलेल्या घटना,प्रसंगाशी लावून पाहिलेली आहे.प्रणव  शेजाऱ्याबद्दलचा एक छान प्रसंग सांगतो.माझ्यासोबत असाच एक प्रसंग घडला होता.मी खूप लहान होतो.मी पहिलीला होतो.मम्मी,पप्पा व एक बहिण बाहेर गेले होते.मी व बहिण घरी होतो.मी हात धुण्यासाठी बाथरूममध्ये गेलो व पाय घसरून पडलो.तेव्हा मला माझ्या शेजाऱ्यांनी दवाखान्यात नेले.म्हणून मी आज जिवंत आहे.विठ्ठलनेही एक छान प्रसंग शेजाऱ्यांबद्दल सांगितला आहे.त्याची शेजारी अम्मू त्याचा खूप लाड करत होती.अम्मुच्या आठवणी त्याने सांगितल्या आहेत.
१) हे पुस्तक वाचायला हवं.असं मुलांनी सांगितलेले आहे.लेखिका स्वत: चित्रकार आहेत.ही चित्रे मुलांना खूप आवडलेली आहेत.हे मुलांनी त्यांच्या लेखनात लिहिलेले आहे.
२) गोष्टीतील महत्त्वाच्या घटना क्रमबद्द लिहिलेल्या आहेत.त्या घटना आपल्या लहानपणीच्या घटनाबरोबर जोडून लिहिल्या आहेत.
३) इतरांनी हे पुस्तक का वाचायला हवे?हे सांगण्याचा प्रयत्न सर्वांनी केला आहे.पण नेमकेपणाने सांगता आलेले नाही.
मुलांनी केलेले पहिले लेखन व शेवटचे लेखन यामध्ये बरीच सुधारणा झालेली दिसून येते.मुलांसोबत काम करण्याचा हा प्रवास समृद्ध करणारा होता.मुलांनीही याचा खूप आनंद घेतला.वाचलेल्या मजकुरावर आपलं स्वत:चे मत बनवून लेखन करण्याच्या संधी मुलांना द्यायला हव्यात.यासाठी पद्धतशीरपणे नियोजन करून मुलांना अध्ययन अनुभव द्यायला हवेत.
                                                                                   
                           समाधान शिकेतोड
                        sshiketod@maa.ac.in                                                                                

3 comments:

  1. मुलांमध्ये प्रतिसादात्मक लेखन करण्याची क्षमता निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमातून मुलांना मदत मिळून मुलांच्या लिखाणात नक्कीच सुधारणा घडून येतात खुपच छान सर्

    ReplyDelete
  2. सर खुप छान पद्धतीने आपण येथे आपला अनुभव कथन केला आहे. मराठी माध्यमातील शाळांमध्ये मुलांना इतक्या समृद्धतेने विकसित केले जात आहे ही बाब मनाला आनंद देणारी आहे. आपण व आपल्या सोबत असलेल्या संस्थांनी हा सुरू केलेला उपक्रम निश्चितच मराठी शाळांमधील मुलांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणेल.

    ReplyDelete
  3. समाधानजी,
    खुपच छान ऊपक्रम!
    आम्हा घरी धन ..शब्दवाटु धन शिक्षणजगता यासम हा उपक्रम.के.प्रा.शा.नूतन भोकर येथे आम्ही विद्यार्थ्यांतील सृृृृजनाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.कु.श्वेता चव्हान ह्या सातवीतील मुलीने बंजारा भाषेत वृृृक्षारोपन,वृृृृसंवर्धन या विषयावर कविता लिहली.मा.ग.शि.अ.नी ती मा.ceo ना पाठवली आमची प्रतिभा या फलकावर त्यांनी प्रसिद्व केली.
    हा उपक्रम आम्ही शाळेत घेण्यासाठी वातावरण तयार करु

    ReplyDelete