Sunday 20 October 2019

साधना साप्ताहिकाचा बालकुमार दिवाळी अंक-२०१९

भारतातील वेगवेगळ्या सहा राज्यातील मुलांच्या प्रेरणादायी गोष्टीरूप लेख यावर्षीच्या साधना साप्ताहिकाच्या बालकुमार दिवाळी अंकात आलेले आहेत. मुलांना वाचण्यासाठी हा अंक नक्की देऊया.

गेल्या तीन-चार वर्षांपासून मुलांना साधना साप्ताहिकाचा बालकुमार दिवाळी अंक भेट देत आलेलो आहे.यावर्षी उस्मनाबाद शहरातील नगर परिषद शाळा क्रमांक-१८ या शाळेतील इयत्ता सातवीच्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना यावर्षीचा बालकुमार दिवाळी अंक भेट दिला.गेली बारा वर्ष अतिशय सातत्याने साधनाने बालकुमार दिवाळी अंक काढले आहे.या सर्व अंकांमधून प्रसिद्ध साहित्यिक,वैज्ञानिक, बालसाहित्य विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मुलांसाठी लेखन केले आहे.जयंत नारळीकर, रघुनाथ माशेलकर,अनिल अवचट,भारत सासणे,उत्तम कांबळे,सोनाली कुलकर्णी अशा अनेक मान्यवरांनी मुलांसाठी लिहलेले आहे.

गेल्या दोन वर्षापासून एक वेगळी थीम घेऊन दिवाळी अंक काढले आहेत. सन २०१७-२०१८ साली ज्यांची,कीर्ती ख्याती आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली आहे.या सहा वेगवेगळ्या देशातील सहा बालकुमार यांचे पराक्रम सांगणारे गोष्टीरूप प्रेरणादायी लेख दिवाळी अंकात होते.

या वर्षीचा बालकुमार दिवाळी अंक भारतातील सहा राज्यातील सहा मुलामुलींवर काढला आहे.यामध्ये पाण्याबद्दल जनजागृती करणारी कर्नाटकची गर्विता गुलाटी,स्वतःची पेंटिंग स्टाईल असणारा मध्यप्रदेशचा शौर्य महानोत, छोट्या तांडयातून एव्हरेस्टवर जाणारी तेलंगणाची पूर्णा मलावत,बाल तबलावादक महाराष्ट्राचा तृप्तराज पांड्या,पंधराव्या वर्षी एम.एस्सी करणारी उत्तर प्रदेशची सुषमा वर्मा,अनाथांसाठी "उम्मीद" संस्था चालवणारा पश्चिम बंगाल वली रेहमानी या सहा मुलांच्या प्रेरणादायी गोष्टीरूप लेख या वर्षीच्या दिवाळी अंकात आलेले आहेत.

कर्नाटकमधील गर्विताने वयाच्या पंधराव्या वर्षी Why West?( वाया घालवायचे) ही संस्था स्थापन केली.वाया जाणाऱ्या पिण्याच्या पाण्यासाठी 200 हॉटेलमध्ये मित्र-मैत्रिणीच्या मदतीने "अर्धा ग्लास प्लीज" ही मोहीम यशस्वीपणे राबविली.गेल्याच वर्षी स्विझरलँड येथे "ग्लोबल चेंज मेकर" या विचार विषयावर संपन्न झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत गर्विताची निवड झाली होती.गर्विता आणि तिची संस्था पाणी वापराबाबत जनजागृती करत आहे.
मध्य प्रदेशातील अवघ्या पाच वर्षाचा चित्रकार शौर्य महानंद हा भारताचा जॅक्सन पोलॉक आहे असं म्हणावं लागेल. शौर्याचे तोंड भरून कौतुक प्रख्यात व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांनी केले आहे.शौर्य स्वतःची पेंटिंग स्टाईल असणारा जगातील सर्वात लहान चित्रकार म्हणून ओळखला जातो.वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी त्याच्या चित्राचे मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये प्रदर्शन भरले होते.शौर्य आता बारा वर्षाचा आहे.त्याच्या चित्रांची जगभर प्रदर्शने भरत असतात.आत्तापर्यंत त्याने चित्राच्या प्रदर्शनांमधून ६२ हजार डॉलर्स इतकी कमाई केली आहे.

पूर्णा मलावत ही तेलंगणाच्या निजामाबाद जिल्ह्यातील पाकला तांड्यावरील आदिवासी मुलगी.तिचे आईवडिल शेतमजुरी करायचे.घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे तिने शासनाच्या निवासी आश्रम शाळेत प्रवेश घेतला.या ठिकाणी तिची गिर्यारोहणासाठी निवड झाली.खडतर प्रशिक्षण पूर्ण केले सलग ५२ दिवस चढाई करून माऊंट एव्हरेस्ट सर केले.जगातील सात खंडातील  सात उंच शिखरे सर करण्याचे ध्येय ठेवले आहे.तिच्या या संपूर्ण प्रवासावर पूर्णा नावाचा चित्रपट तयार करण्यात आला आहे.अगदी लहान वयात स्वर आणि लय समजणारा प्रतिभाशक्ती लाभलेला,झाकीर हुसेन यांनी शाबासकी दिलेला महाराष्ट्रातील उत्कृष्ट बाल तबलावादक, तृप्तराज पांड्याचा भारत सरकारचा 'बालशक्ती' पुरस्कार नुकताच मिळालेला आहे. सगळ्यात लहान वयातील तबला  वादकाचं गिनिज बुक रेकॉर्ड त्याच्या नावावर आहे. प्रतिभा पण प्रतिभासंपन्न,जिद्दी असणाऱ्या तृप्तराज स्वतःच ब्रीदवाक्य आहे. 
I am passionate for passion.

अलौकिक बुद्धिमत्ता लाभलेली उत्तर प्रदेशातील सुषमा वर्मा पंधराव्या वर्षी M.sc झाली. लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर तिने सर्वांना चकित करून सोडलं होतं.घरात अठरा विश्व दारिद्र्य, आईवडील निरक्षर होते. तरीही तिने जिद्दीने यशाचे शिखर पादाक्रांत केले.जपानच्या संस्थेकडून IQ बाबत तिला निमंत्रण आलं.यामध्ये सर्व मुलांमध्ये ती पहीली आली.अगदी कोवळ्या वयात सामाजिकतेचे भान घेऊन देशासाठी देशबांधवासाठी समाजसेवेचे व्रत घेणारा,व्यवस्थेतील घडामोडीवर परखडपणे मत मांडणारा,संवेदनशील समाजसेवक,सत्यधर्माचा पुजारी पश्चिम बंगालचा वली रहमानी होय.अनाथ मुलांसाठी वलीने "उम्मीद"नावाचे  अनाथालय चालवतोय. वलीचे काम प्रेरणादायी आहे.

या सहा मुलांच्या प्रेरणादायी गोष्टीरूप लेख यावर्षीच्या बालकुमार दिवाळी अंकांमध्ये आलेले आहेत. हा बालकुमार दिवाळी अंक आपण मुलांना भेट देऊया.पालकांनी आपल्या मुलांना यामधील लेखांचे मुलांसोबत वाचन करायला हवे.मुलांना हा अंक वाचायला द्यायला हवा.या प्रेरणादायी गोष्टी मुलांना नक्कीच प्रेरणा देतील.चला आपण बालकुमार दिवाळी अंक भेट देऊया.

          समाधान शिकेतोड
  samadhanvs@gmail.com

No comments:

Post a Comment