स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव
क्रांतिकारक मदनलाल धिंग्रा
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
मदनलाल धिंग्रा हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक क्रांतिकारक होते. इंग्लंडमध्ये शिकत असताना त्यांनी सर विलियम हट कर्झन वायली या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली. या घटनेचा भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील महत्तवाच्या क्रांतीकारी घटनांपैकी एक म्हणून उल्लेख केला जातो.
मदनलाल धिंग्रा यांचा जन्म अमृतसर येथे उच्च मध्यमवर्गीय कुटुंबात १८ सप्टेंबर १८८३ रोजी झाला. त्यांचे वडील एक प्रसिध्द डॉक्टर होते आणि बंधू बॅरिस्टर होते. मदनलाल यांचे शिक्षण अमृतसरला झाले. ते पंजाब विद्यापीठातून बी. ए. झाले व १९०६ मध्ये उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. तत्पूर्वी विद्यार्थीदशेतच त्यांचा विवाह झाला. इंग्लंडमध्ये त्यांनी स्थापत्य अभियांत्रिकीचा अभ्यास केला. तेथील वास्तव्यात त्यांचा स्वातंत्र्यवीर सावरकर, श्यामजी कृष्णवर्मा, हरदयाळ शर्मा वगैरे क्रांतिकारकांशी स्नेह जमला.
ते होमरूल लीग व सावरकरांच्या अभिनव भारत या संस्थांचे सभासद झाले. त्यांच्या भावनाप्रधान मनावर खुदिराम बोस व कन्हैयालाल या क्रांतिवीरांच्या बलिदानाचा फार मोठा परिणाम झाला. त्यांनी सशस्त्र क्रांतिवीरास साजेसे शिक्षण घेतले. पुढे त्यांनी भारताच्या मंत्र्याचा स्वीय सहाय्यक कर्नल विल्यम कर्झन वायली याच्या खुनाचा कट केला. त्यांचा पहिला बेत फसला. पुढे १ जुलै १९०९ रोजी इंपीरियल इन्स्टिट्यूटच्या जहांगीर हाऊसमध्ये इंडियन नॅशनल असोसिएशनच्या सभेच्या वेळी त्यांनी कर्झन वायली यावर गोळ्या झाडल्या. त्या वेळी कोवास लालाकाका हाही मध्ये आला. दोघेही मरण पावले. कर्झन वायली खरेतर मदनलाल यांच्या वडिलांचा स्नेही होता. या खुनाबद्दल मदनलाल यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. पेन्टोनव्हिल (लंडन) तुरुंगात ते ‘भारत माता की जय’ च्या उद्घोषात फाशी गेले
फाशीवर जाण्यापूर्वीच्या शेवटच्या वक्तव्यात मदनलाल धिंग्रा यांनी असे म्हटले आहे "आत्म बलिदान कसे करावे ही एकच शिकवण सध्या हिंदुस्थानात देण्यायोग्य आहे. ही शिकवण देण्याचा एकच मार्ग म्हणजे स्वतःचे बलिदान करून मोकळे होणे होय. या जाणिवेने प्रेरित होऊन मी प्राणार्पण करत आहे व माझ्या हौतात्म्याचा मला अभिमान वाटत आहे. याच भारतभूचे संतान म्हणून मला पुनर्जन्म प्राप्त होवो व याच पवित्र कार्यात माझा देह पुन्हा पडो इतकीच ईश्वरचरणी माझी प्रार्थना आहे.भारतीय स्वातंत्र्याचा पक्ष विजयी होऊन, मानवजातीचे कल्याण व ईश्वराचे वैभव यांचा पुरस्कार करणारा स्वतंत्र भारतवर्ष जगात आत्मतेजाने तळपू लागेपर्यंत माझ्या जन्ममृत्यूचे हे चक्र असेच चालू राहावे अशी माझी परमेश्वराला प्रार्थना आहे.
मदनलाल धिंग्रा आणि सावरकर यांच्या जीवनावर मराठीत 'चॅलेंज' नावाचे नाटक आले आहे. पहिल्या दहा प्रयोगांना मोफत किंवा 'नाटक पहा आणि आवडेल तेवढे पैसे द्या' अशी सवलत आहे. नाटकाचे लेखन,दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केलेले आहे.
अशा या क्रांतिकारकाच्या बलिदानामुळेच आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त मनापासून प्रणाम.
स्त्रोत-विकीपिडीया
No comments:
Post a Comment