आर्यन इयत्ता आठवीत शिकतोय. दिवाळीच्या सुट्टीत त्यानं प्रकाशवाटा हे पुस्तक वाचलं. त्यानं या पुस्तकाचा लिहलेला परिचय......
पुस्तक परिचय-प्रकाशवाटा
•••••••••••••••••••••••••••••••••••
माझ्या दिवाळीच्या सुट्ट्या सुरू झाल्या होत्या.मी दिवाळीच्या सुट्टीत माझ्या आजोळी म्हणजे मामाच्या गावाला गेलो होतो. पप्पा अवांतर वाचन करण्यासाठी नेहमी प्रेरीत करत असतात. पुस्तक आयुष्याला कलाटणी देऊ शकतं, एक पान एखाद्याचं आयुष्य बदलू शकतं, एक वाक्य एखाद्याच्या आयुष्याचा ध्येय ठरू शकते.त्यासाठी रोज एक तरी पान वाचत जा! असा संदेश म्हणून पप्पांनी मला 'प्रकाशवाटा' हे पुस्तक वाचायला दिले.
मॅगसेसे पारितोषिक विजेते डाॅ. प्रकाश आमटे यांनी साकार केलेल्या स्वप्नांची गोष्ट प्रकाश वाटामध्ये शब्दबद्ध केलेली आहे. आनंद वनातले दिवस त्या बाहेरचे जग हेमलकसा येथील सुंदर आव्हानात्मक चित्र पुस्तकाच्या प्रारंभी उभे राहते. कसोटीचे प्रसंग आणि जीवावरचे प्रसंग अंग थरारून टाकतात.
आदिवासींना मुख्य प्रवाहात आणावं. त्यांची पिळवणूक थांबावी आणि त्यांना माणूस म्हणून जगण्याची संधी मिळवून द्यावी असं बाबांच्या मनात होतं. बाबांनी दाखवलेला विश्वास ताईची माया आणि मंदाचे भक्कम साथ यामुळे हे काम इथवर पोहोचलं. विकासच आणि लेखकाचे इंटरसायन्स आनंदनिकेतन मधून झालं आणि योगायोगाने मंदाही लेखकांना पसंद पडली. १९७२ साली दुष्काळ पडला होता. त्या खडतर दुष्काळात त्या दोघांचं लग्न झालं.
वैद्यकीय शिक्षण झाल्यावर लेखकांनी सपत्नीक आदिवासी भागात काम करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी हेमलकसा या अगदी छोट्याशा गावात कामाला सुरुवात केली. हेमलकशात कुठल्याच सोयीसुविधा नव्हत्या. वीज नव्हती, पाणी नव्हतं, राहण्याची जागा नव्हती, माणसंही नव्हती, होतं फक्त जंगल. हेमलकशातला सुरुवातीचा काळ लेखकांसाठी प्रतिकूल होता. मात्र त्या प्रतिकुल काळात त्यांनी आदिवासींच्या वेदना जाणून घेतल्या. आपण किती भाग्यवान आहोत की आपल्याला इतक्या सुख-सुविधा उपलब्ध आहेत. याचा पश्चाताप होतो की या सोयींचापण आपण नीट वापर करत नाहीत.
लेखकांनी आईबद्दलच्या आठवणी ही खूप छान पद्धतीने सांगीतल्या आहेत. लेखक आईला कधीच आई म्हणत नसत. लेखकांच्या आईंनी सांभाळ केलेली मुले त्यांच्या आईला ते 'ताई' म्हणायचे.त्यामुळे लेखकही त्यांच्या आईला ताई म्हणायचे.
आपल्याला मुलाला तिकडे रानावनात राहावं लागतंय. हेमलकशात काहीच सोयी नसल्याने तिकडे पंखा नाही. हे समजल्यावर लेखकांच्या आईनं घरी पंखा असूनही तो कधीच चालवला नाही. ही काळजी फक्त आईच करू शकते.
लेखक जरी अस्थिरोग तज्ज्ञ, नेत्रविकार तज्ञ नव्हते ;परंतु पेशंटचं दुःख बघून त्यांनी डोळ्यांवरही उपचार सुरू केले. त्यांच्या भावांने विकास आमटे यांनी ऑप्थॅल्माॅलाॅजीत एक हाऊस जॉब केला होता. तेव्हा त्यांनी मोतीबिंदूच्या अनेक शस्त्रक्रिया बघितल्या होत्या. आणि त्यासाठी असिस्टंट म्हणून कामही केलं होतं. अशा रीतीने लेखक साधे डॉक्टर असलेले पुढे तेथील लोकांसाठी सर्जन, ऑर्थोपेडिक सर्जन, डेंटिस्ट गायनॅकॉलॉजिस्ट असे सगळंच बनले.
तिथं आदिवासी समाजात खूप अंधश्रद्धा होती. ही अंधश्रद्धा त्यांनी औषधाच्या रूपात जागृत केली. मंत्राने नेहमीच विष उतरतं असा लोकांचा विश्वास असल्याने या श्रद्धेचा उपयोग करून घ्यायची कल्पना लेखकाला सुचली. त्यामुळे त्यांनी तो मंत्र तांत्रिकाडून शिकून घेतला, 'अरेरे विंचवा आहेस कुठे?' असा काहीतरी तो मंत्र होता तो टाकल्यावर मंत्र म्हणणाऱ्याकडे विष येतं आणि त्याने ते थूकून टाकायचं असं त्यांनी विकास यांना सांगितले. असा हा प्रयोग एकदा केला. तो यशस्वी झाला. मंत्राचा उपयोग झाला नाही तर अर्थातच ते औषध द्यायचे. म्हणून लेखक म्हणतात बऱ्याचदा काय होतं विंचू याणे नांगी मारली की त्याचं विष शरीरात उतरत नाही काही विषारी विंचूंचे विष शरीरात जातं. तर विंचू चावल्यावर माणूस घाबरून जातो.तर त्याची मानसिक स्थिती चांगली होण्यासाठी त्यांनी हा मार्ग काढला.
एकंदरीतच काय तर यातील प्रत्येक जण आदर्श आहेत. 'प्रकाशवाटा' हे आत्मकथन एका लेखकाचं आहे जो सपत्नीक आदिवासी भागात काम करण्याचा निर्णय घेतो. प्रकल्प चालू करतो. हे आत्मकथन प्रेरणादायी आहे. पुस्तक प्रत्येकांनी वाचायला हवं.
आत्मकथन - प्रकाशवाटा
लेखक - डॉ. प्रकाश आमटे
प्रकाशन - समकालीन प्रकाशन,पुणे
पुस्तक परिचय- आर्यन समाधान शिकेतोड
मूल्य - २०० पृष्ठे - १५५
┄─┅━━▣▣▣━━┅─┄
No comments:
Post a Comment