Thursday, 13 August 2026

विराजला पुस्तकं मिळाली

शालेय पाठ्यपुस्तकांवर मुलांचे खूप प्रेम असते. शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांना पाठ्यपुस्तके मिळाली की मुले खूप खुश होतात. सध्या शिक्षण हक्क कायद्याने सर्व मुलांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. काही शाळेत नवीन प्रवेश वाढल्याने काही मुलांना पाठ्यपुस्तके वेळेत मिळत नाहीत. अशावेळी पाठ्यपुस्तकांचे समायोजन करून अशा मुलांना वेळेत पाठ्यपुस्तके  उपलब्ध करून देणे गरजेचे असते.

 वर्गातील सर्व मुलांकडे पुस्तके आहेत; परंतु माझ्याकडे नाहीत ही भावना मुलांच्या मनामध्ये न्यूनगंड तयार करते. मुलांकडे पुस्तके नसणे हा त्याच्या शिक्षणातील मोठा अडथळा ठरतो. हा अडथळा दूर करणे, शिक्षण व्यवस्थेतील सर्वांचे काम आहे; परंतु काही मुलांना पुस्तके वेळेत मिळत नाही ते वास्तव आहे.

आमच्या शाळेत इयत्ता तिसरीच्या वर्गात इंग्रजी  माध्यमांच्या शाळेतून एक विद्यार्थी आलेला आहे. पुस्तके तर जून महिन्यातच सर्वांना दिली गेली त्यामुळे त्याच्याकडे इयत्ता तिसरीची पुस्तके नव्हती. शाळेतील कोणत्या मुलांना पुस्तके नाहीत याबद्दल मी मुलांना आपुलकीने विचारून ती पुस्तके मी तुम्हाला मिळवून देतो असे आश्वासन दिले होते. त्यामुळे विराज मला येऊन विचारायचा," सर मला पुस्तके कधी देता?" 
मी त्याला "उद्या देतो" म्हणून उत्तर द्यायचं. सकाळी सकाळी शाळेत आलो, माझी गाडी पहिली की तो माझ्याकडे पळत यायचा. केविलवाणा चेहरा करून एकच प्रश्न विचारायचा,"सर, मला पुस्तकं कधी देता?"
मी त्याला तेच उत्तर द्यायचो "उद्या आणतो." 

मी त्याला पुस्तके देऊ शकत नाही याचे मला खूप वाईट वाटायचे. इयत्ता दुसरीची पुस्तके कुठे मिळतील का? याचा मी शोध घेत होतो; परंतु पुस्तके मिळत नव्हती. तालुक्याला शोध घेतला, तिथे पुस्तके नव्हती. मुख्याध्यापकांना, केंद्रप्रमुखांना पुस्तकाबाबत बोलत होतो. सहकारी शिक्षकांना बोलत होतो. आपल्याला इयत्ता तिसरीचा एक संच हवा आहे. 

काल पुन्हा त्याने मला विचारले, "सर मला पुस्तके कधी देता?" मला ओशाळल्यासारखं वाटलं. मला व्यवस्थेचा खूप राग येत होता. व्यवस्थेतल्या प्रशासकीय त्रुटीमुळे विद्यार्थी पुस्तकापासून वंचित राहत आहेत. याचे खूप वाईट वाटत होते. त्यानंतर मी केंद्रप्रमुखांना फोनवर बोललो. मुख्याध्यापकांना बोललो. काहीही करून आपल्याला विराजला पुस्तके द्यायचे आहेत. इतर शाळेत आपण सर्वजण मिळून फोन करूयात. 

दुपारी अचानक मुख्याध्यापकांनी तिसरीचा संच पाठविला. तो संच घेऊन आमच्या शाळेतील संवेदनशील शिक्षक सचिन कांबळे सरांचे मित्र आले होते. सचिन कांबळे सरांनी त्यांच्या मित्राकडून ही पुस्तके मिळवल होती. हा पुस्तकांचा संच पाहून विराज खूप खुश झाला होता. त्याला तो पुस्तकाचा संच दिला. त्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. मलाही आता खूप बरं वाटत होतं. विराज म्हणाला,"सर तुमचा नंबर द्या" 
मी म्हटलं "कशाला....,
तो म्हणाला, "असंच..."
त्याला म्हटलं, "आपण भेटतोच की दररोज...."
त्याला माझ्याबद्दल खूप आपुलकी वाटत होती. शिक्षकाला मुलाचं प्रेम मिळणं, शिक्षकाबद्दल विद्यार्थ्यांना आपुलकी, आत्मीयता वाटणं. हे खूप महत्त्वाचं असतं. त्याच्यासोबत एक फोटो घेतला. आज मला खूप मस्त वाटत होतं.

 आपल्या स्वतःच्या मुलाला पाठ्यपुस्तके नसतील तर काय होईल?  याचा विचार मनात यायला हवा. तर मग आपण धडपड करून पाठ्यपुस्तके मिळून देतोच. बाकी विराजला पाठ्यपुस्तके मिळाल्याचा आनंद खूप वेगळा होता.

No comments:

Post a Comment