Wednesday, 5 August 2026

शालेय आरोग्य तपासणी

"आरोग्य हीच खरी संपत्ती" असे म्हटले जाते. कोणत्याही देशाचा विकास हा तिथल्या नागरिकांच्या, विशेषतः बालकांच्या आरोग्यावर अवलंबून असतो. भारतासारख्या विकसनशील देशात ग्रामीण भागातील मुलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. हेच उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून केंद्र सरकारने 'राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान' (NRHM) अंतर्गत जिल्हा परिषद शाळांमध्ये 'शालेय आरोग्य तपासणी'  हा अत्यंत स्तुत्य उपक्रम सुरू आहे. ग्रामीण भागातील मुलांचे आरोग्य सुदृढ राखण्यासाठी ही योजना एक वरदान ठरत आहे

आज आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राघुचीवाडी या शाळेची शालेय आरोग्य तपासणी संपन्न झाली. यावेळी आरोग्यअधिकारी यांनी प्रत्येक मुलाची आपुलकीने विचारपूस करून आरोग्य तपासणी केली. या मुलांना तपासणी करणाऱ्या डॉक्टर मॅडम अत्यंत प्रेमाने,आपुलकीने प्रश्न विचारून त्यांच्या आरोग्याबद्दल माहिती घेत होत्या. बऱ्याच मुलांचे वजन,उंची कमी असल्याचे दिसून आले. ज्या मुलांना काही आजार आहेत, त्यांना ग्रामीण रुग्णालय धाराशिव येथे पुढील उपचारासाठी जाण्याची शिफारस केली. 

मुलांमध्ये हिमोग्लोबिनची वाढ व्हावी, यासाठी शेंगदाण्याचे लाडू खाणे, सर्व जीवनसत्वे मिळण्यासाठी पोषक आहार घेणे खूप महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी काही पालकांशी संपर्क केला, विद्यार्थ्यांच्या किरकोळ आजाराबाबत पालकांना माहिती दिली. विद्यार्थ्यांना सकस आहार देण्याबाबत मार्गदर्शन केले. 

विद्यार्थ्यांचे शारीरिक आरोग्य चांगले असल्यास तर विद्यार्थ्यांची अभ्यासातील प्रगती चांगली होते. निरोगी शरीरात निरोगी मन वास करीत असते. त्यासाठी शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य निरोगी असायला हवे. आमच्या शाळेत विद्यार्थ्यांच्या आरोग्याचे खूप काळजी घेतली जाते. विद्यार्थ्यांना पिण्यासाठी वॉटर फिल्टरचे शुद्ध पाणी दिले जाते.

No comments:

Post a Comment