अभिप्राय
माझे स्नेही व बालसाहित्यिक श्री. समाधान शिकेतोड सरांनी त्यांची नुकतीच प्रकाशित झालेली दोन पुस्तके मला भेट दिली. त्यातले एक पुस्तक मुलांच्या गंमत गोष्टींचे “जादुई जंगल” हे राजहंस प्रकाशन संस्थेने प्रकाशित केले आहे. तसेच “पोपटाची पार्टी” हा बालकवितासंग्रह इसाप प्रकाशन नांदेड यांनी प्रकाशित केला आहे. ही दोन्हीही पुस्तके वाचली. ही दोन्हीही पुस्तके वाचत असताना मला मागील काळातील बालसाहित्य आठवले. त्यावेळेस ईसापनिती, पंचतंत्र ईत्यादींच्या कथा मुले आवडीने वाचत. त्यानंतर चांदोबा, कुमार, किलबिल, किशोर, फुलबाग आदी मासिकांनी बालसाहित्यात मोलाची भर टाकली. नंतरच्या कालखंडात बालसाहित्यात फार कांही भरीव लिखाण झाले नाही. कांही मराठी चित्रकथा (कॉमिक्स) आल्या परंतू त्यात सातत्य राहिले नाही.
मराठी बालसाहित्याचा प्रारंभ सानेगुरूजी, महादेवशास्त्री जोशी, आचार्य अत्रे, गंगाधर गाडगीळ यांचे साहित्याने झाला. त्यात समकालीन लेखक- भा.रा. भागवत , मंगेश पाडगांवकर, निर्मला माने एकनाथ आव्हाड ईत्यादींनी मोलांची भर घातली. परंतु साहित्याच्या क्षेत्रात बालसाहीत्य कायमच दुर्लक्षिलेले राहीले. वास्तविक बालसाहित्य हा अवघड साहीत्य प्रकार आहे. मुलांचे भावविश्व समजून, त्यांच्या पातळीवर जाऊन,त्यांना समजेल, आनंद देईल अशी साहित्य निर्मिती करणे हे आव्हानात्मक काम आहे.
बरेचदा आपण मुलांना गृहीत धरतो. त्यांचे स्वतंत्र अस्तित्व आहे, त्यांच्याही भाव-भावना आहेत, त्यांचेही वेगळे विचार असु शकतात हे आपण समजून घेत नाही. पालक त्यांना आपलाच एक अवयव (appendage) समजतात व आपले विचार, आवडी निवडी त्यांच्यावर लादण्याचा प्रयत्न करतात. हया सर्व गैरसमजुतीला छेद देत बालसाहित्य निर्माण करावे लागते.
चालु काळात मोबाईलचा वापर वाढला. कोरोना साथीमुळे ऑनलाईन शिक्षणासाठी मुलांच्या हातात मोबाईल आला व त्यांचा वाढलेला “स्क्रिन टाईम” मानसिक रोगटपणाला आमंत्रण देऊ लागला. त्याबाबत खुप चर्चा होते. वाचन संस्कृती कमी होण्यासाठी मोबाईलला जबाबदार धरले जाते. परंतु बालकांना आपण त्या आभासी जगातुन बाहेर आणण्यासाठी त्यांना आनंद देणारा सक्षम पर्याय, बाल साहित्याच्या रूपाने देऊ शकतो. त्यामुळे उत्तमोत्तम बाल साहित्य निर्मिती काळाजी गरज ठरते.
साहित्याच्या क्षेत्रात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजन केले जाते. त्याचबरोबर विद्रोही साहित्य संमेलन, गुराखी साहित्य संमेलन, वंचितांचे, महिलांचे साहित्य संमेलन ईत्यादी नियमितपणे आयोजित केले जातात पण बालसाहित्य संमेलन अभावानेच दिसते. त्यासाठी समाजधुरीणांनी, साहित्यिकांनी, साहित्यप्रेमींनी आवर्जून प्रयत्न केले पाहीजेत. नपेक्षा बालके येणाऱ्या काळात वाचनानंदाला पारखे होतील. प्रस्थापित साहित्यकृतीत बालकांचे प्रतिनिधित्व आभावानेच दिसते.
श्री. शिकतोडे सरांनी बालसाहित्य प्रकार अत्यंत यशस्वीरित्या हाताळला आहे. शिक्षकी पेशात असलेने मुलाशी समरस होऊन, त्यांचे भावविश्व समजून, उमजून त्यांची ही मुलांना निखळ आनंद देणारी साहित्यनिर्मिती आहे. त्यांच्या “जादुई जंगल” हया पुस्तकात जंगलातील प्राण्यावर आधारीत कथा आहेत. लहान मुलांना प्राणी आपल्यासारखे बोलतात हयाचे खुप अप्रुप वाटते. तसेच जादुचेही खुप आकर्षण असते. ससे, माकड, जिराफ, वाघ-सिंह ईत्यादी प्राणी त्यांचे सखे-सोबती बनतात. मुलांना समजेल अशा सोप्या भाषेत व लहान वाक्यात या कथा लिहील्या आहेत. मुलांना निखळ आनंद देणारी ही साहित्यकृती आहे हे निश्चित ! पुस्तकात चित्रेही छान छापली आहेत, फक्त ती रंगीत असती तर अजुन उठावदार दिसले असते.
श्री. शिकेतोडे सरांचा बालकविता संग्रह “पोपटाची पार्टी” ही पुस्तिकाही सुंदर आहे. बालकवितांच्या जगात सरांच्या सिध्दहस्त लेखणीने मुलांना निखळ आनंद देण्याबरोबरच त्यांच्या समाजिक जाणिवही जागृत करण्याचा, त्यांना समाजाप्रती संवेदनशील बनविण्याचाही यशस्वी प्रयत्न केला आहे. बेडूक, खारूताई, माकड, चिऊताई, कावळा ईत्यादी परिचित प्राण्यासंबंधी छोटया गेय कविता, त्याचबरोबर ग्रामीण जीवनातील बालकांना मोहवून टाकणाऱ्या बैलगाडया, गुऱ्हाळ, जत्रा ईत्यादीवरही कविता आहेत. शेतकऱ्यांच्या कष्टप्रद जीवनावर, पोस्टमन, पोलीस यांचाही परिचय मुलांना समजेल अशा भाषेत करून दिला आहे.
दोन्ही पुस्तकांचे निर्मिती मुल्य उच्चदर्जाचे आहे. बालसाहित्याच्या क्षेत्रातील मोठी पोकळी हया दोन्ही पुस्तकामुळे कांही अंशी भरून निघेल अशी आशा आहे. भविष्यातही श्री. शिकेतोडे सरांच्या समर्थ लेखणीतून सकस बालसाहित्य निर्माण व्हावे अशी अपेक्षा व त्यासाठी त्यांना शुभेच्छा !
डॉ. अभय शहापूरकर
No comments:
Post a Comment