गेल्या अनेक वर्षांपासून खुप सारं लेखन मुलांसाठी लिहलं गेलेले आहे. लीळाचरित्रात चक्रधरस्वामींनी रडणाऱ्या लहानगीला सांगितलेली गोष्ट, हे पहिलं उपलब्ध बालसाहित्य. सानेगुरूजी, ग.दि.माडगूळकर, विंदा करंदीकर, दत्ता टोळ, अनिल अवचट, यदुनाथ थत्ते, मंगेश पाडगावकर, गिरीजा कीर, भा. रा. भागवत, गो. नी .दांडेकर, महावीर जोंधळे, बाबा भांड, विजया वाड,राजीव तांबे पासून अगदी अलिकडे सुरेश सावंत, ल.म.कडू, एकनाथ आव्हाड, पृथ्वीराज तौर, दत्ता हलसगीकर, आबा महाजन, विशाल तायडे, फारूक काझी, नरेंद्र लांजेवार, बालाजी इंगळे अशा बालसाहित्यक लेखकांची आपल्याला समृद्ध परंपरा लाभलेली आहे.या साहित्यिकांच्या लेखणीने खुप दर्जेदार बालसाहित्य निर्माण झाले.आजही काही बालगीते, कविता आपल्या ओठांवर गुणगुणत राहतात.
मुलांचे भावविश्व समजून घेऊन त्यांच्यासाठी लिहिणं तसं अवघडच! अगदी उमलत्या वयात मुले चित्राच्या प्रेमात पडतात. निसर्गातील विविध घटनांबद्दल त्यांच्या मनात कुतूहल निर्माण होते. आकाशातील इंद्रधनुष्य पाहून मुले हरखून जातात. तर
कधी विजेच्या कडकडाटासह मनात भीती धरून बसतात. भिरभिरणारी
फुलपाखरे, चमचमणारा रातकिडा, पाण्यावरचे
फुगे, अंगणातील चिऊताई हे सगळं आवडायला लागतात.
चिमणी-कावळ्याच्या गोष्टीत मुले रमायला लागतात. आजूबाजूला घडणाऱ्या घटना, प्रसंग यांचे सूक्ष्म निरीक्षण करण्याची क्षमता लहान मुलांमध्ये निर्माण
झालेली असते. त्यामुळे मुलांना भोवताल खुणावत असतो. एखाद मुलं लवकर बोलत नसेल तर
जुनी माणसं म्हणायची त्याला बाजारात घेऊन जा.लवकर मुलं बोलेल. त्याच्या कानावर
पडणाऱ्या विविध भाषा समजून घेऊन अर्थ लावण्याची त्याची क्षमता विलक्षण असते.
त्यामुळे अगदी सुरुवातीच्या काळात मुलांना लिपी परिचय होण्या अगोदरचे बालसाहित्य म्हणजे मौखिक असते. गाणी, गोष्टी यामधून मुलांचा भाषिक विकास होत असतो. मौखिक परंपरेने आलेले
साहित्य आपण मुलांना सांगत असतो. त्या गोष्टी मुलांना आवडत असतात; पण आज संदर्भ बदलले आहेत. हे बदललेले संदर्भ लक्षात घेऊन मुलांसाठी गोष्टी
लिहायला हव्यात. मुलांनी पाहिलेले नाही, अनुभवलेले नाही त्याबद्दल
त्यांना गोडी वाटत नाही. अशा साहित्याच्या वाचनाने मुले तर्कशुद्ध विचार करू शकत
नाहीत. त्यामुळे तहान लागलेला कावळा माठावर बसून खडे टाकतो. यापेक्षा तो कावळा
कोल्ड्रिंकच्या दुकानात जाऊन कोल्ड्रिंक पीत बसतो. याबद्दल मुलांमध्ये कुतूहल
निर्माण होते. अशा गोष्टी फँटसी जरी असल्या तरी त्यामध्ये
त्यांच्या आजूबाजूच्या परिसराचे संदर्भ यायला हवेत. त्यामुळे मौखिक परंपरेत
काळानुसार बदलायला हवेत.
बालवयात मुलांना चित्रे मोहिनी घालतात. त्यासाठी उत्तम चित्रकथांच्या
पुस्तकांची निर्मिती व्हायला हवी. मुलांसाठी चित्र काढणाऱ्यांची संख्या वाढायला
हवी. मुले चित्रातील संदर्भ आपल्या जगण्याशी जोडून पाहत असतात. ते चित्रांविषयी
भरभरून बोलतात. त्यांच्या भावविश्वाचा, परिसराचा विचार करून
मुलांसाठी चित्र काढायला हवीत. आज-काल मुलांसाठी काढलेल्या चित्रांना मध्यमवर्गीय
तोंडावळा दिसून येतो. मुलांचे जगणे, भावविश्व, परिसर त्याला अनुसरूनच चित्रांची निर्मिती करायला हवी. एखाद्या
खेडेगावातील बाजार भरलेल्या चित्रांविषयी त्याच गावातील मुले भरभरून
बोलतात.त्यामुळे त्यांच्या परीसारतील अनुभवविश्वावर चित्रकथांची पुस्तके तयार करायला
हवीत.नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडियाने अशी चित्रकथांची पुस्तके उत्तम तयार केलेली
आहेत. कार्टूनची चित्रे मुलांना खूप आवडतात. टीव्हीवरील कार्टूनच्या मालिका
वेगळ्या भाषेत असूनही आवडीने पाहत असतात.त्यामुळे मुलांसाठी लिहिताना अशा
चित्रांचा वापर करायला हवा.
आपण कुठल्या वयोगटासाठी लिहीत आहोत याची जाण ठेवून लेखकांनी
बालसाहित्य लिहायला हवे. जेव्हा मुले कुमारवयात प्रवेश करतात. अशा वेळी त्यांना
इसापनीती, परिकथा
यापेक्षा साहस कथा, विज्ञान कथा आवडायला लागतात. म्हणून हॅरी
पॉटर सारखे साहित्य वर्षानुवर्षे मुलांच्या मनावर अधिराज्य गाजवत राहते. एका
विशिष्ट वयापर्यंत मुलांना अद्भुततेच आवड असते. परंतु किशोरवयीन मुलांना साहस
कथांबद्दल आवड निर्माण होते.
जो समाज बालकुमारांची उपेक्षा करतो तो आपल्या
भविष्याची उपेक्षा करतो असे बालसाहित्यक यदुनाथ थत्ते यांनी सांगितलेले आहे.
बालमनाला सशक्त,साजनशील, कल्पक
बनवण्याचे कार्य बालसाहित्य करत असते.मुलांना वयाच्या विशिष्ट टप्प्यावर जी समज
निर्माण व्हायला हवी, ती समज निर्माण करण्याचे काम
बालसाहित्य करत असते. बालसाहित्यातून भाषा, इतिहास, भूगोल, विज्ञान, कला, रंजन याबाबतची माहिती वेगळ्या पद्धतीने मिळते. बालसाहित्य बालमनाला
संवेदनशील बनत असते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देण्याचे काम साहित्य करत
असते. म्हणून लहान मुले काय बोलतात, कसे बोलतात, याचे निरीक्षण सुद्धा साहित्यनिर्मितीसाठी फलदायी ठरते. मुलांसाठी पुस्तके
केवळ मनोरंजनासाठी नसतात. मुले चिकित्सक, सर्जनशील विचार करतील असे कथानक, संवाद
त्यांच्यासाठी लिहायला हवेत. मुलांनी एखाद्या घटनेवर, प्रसंगावर,
पात्रांवर आपले मत मांडायला हवे. त्यांच्या जडणघडणीमध्ये पुस्तके
खूप मोलाची भूमिका पार पाडतात. ग्रामीण-शहरी, आदिवासी,
वंचित घटकांतील मुलांचे जगणे बालसाहित्यातून यायला हवे. सर्वांच्या
भावविश्वाचे प्रतिबिंब साहित्यातून दिसायला हवे.
मोठ्यांनी मुलांसाठी लिहिलेले साहित्य याला आपण बालसाहित्य म्हणतो.
त्याचबरोबर मुलांनी मुलांसाठी लिहिलेल्या साहित्याला बालसाहित्य म्हणून मान्यता
मिळू लागली आहे. मुले कथा, कविता छान लिहू लागले आहेत.
किशोरवयीन विद्यार्थी तर बालकादंबरी सारखा साहित्यप्रकार लिहित आहेत. समाजाच्या
बालसाहित्याच्या धारणामध्ये आता बदल होत आहेत. इयत्ता सहावीच्या पाठ्यपुस्तकामध्ये
सोनाली फुपरे या विद्यार्थिनीची झाड ही कविता आलेली आहे. शालेय विद्यार्थ्यांना
त्यांच्या साहित्यकृती महाराष्ट्र शासनातचे राज्य वाड्मय पुरस्कारसुद्धा मिळालेले
आहेत. मुले बालसाहित्यातील वेगवेगळे साहित्यप्रकार हाताळताना दिसत आहेत. मुलांनी
लिहिलेल्या कथा,कविता दैनंदिनी,पत्रे,गीते यामध्ये त्यांच्या जगण्याचे प्रतिबिंब पडलेले दिसते. त्यामुळे
बालसाहित्यात मुलांच्या भावविश्वाचे प्रतिबिंब पडले तर ते अधिक दर्जेदार व वाचनीय
होते.
प्रकाशित- जीवन शिक्षण (डिसेंबर २०२० )
![]() |
No comments:
Post a Comment