Saturday 16 May 2015

भाषा शिक्षणातील प्रयोग

बहिरवाडी शाळेतल्या मुलांना भाषा शिकवताना केलेले प्रयत्न...

      अकोले (जि. अहमदनगर) तालुक्यातील बहिरवाडी या आदिवासीबहुल खेड्यातल्या प्राथमिक शाळेत मी शिकवितो. आदिवासी ठाकर, वडारी आणि ग्रामीण मराठी बोलणारे असे तीन निरनिराळ्या भाषिक समुहातली मुले शाळेत येतात. आम्हा शिक्षकांची, पाठ्यपुस्तकांची भाषा आणि मुलांची भाषा यात मोठे अंतर पडायचे. वडारी आणि ठाकरी दोन्ही भाषा मराठीपेक्षा बऱ्याच वेगळ्या आहेत. त्यात आदिवासी मुलांच्या भाषिक विकासावर आधीच अनेक गोष्टी परिणाम करत असतात. मुळातच आदिवासी मुलं लाजरीबुजरी. अडचणी लवकर सांगत नाहीत. ‘मन की बात’ बोलून दाखवत नाहीत. त्यात त्यांची चूक नाही. त्यांचे आई-वडील त्यांच्या जीवन संघर्षात अडकलेले.

डोंगरकाठी वस्ती. त्यांच्या जगण्याचे प्राधान्यक्रमच निराळे. रोज मजुरीने नाही गेले तर खायचीप्यायची भ्रांत. हे भूमिहीन शेतमजूर रोज उठून कुठेना कुठे कामाला निघून जाणार. मुले शाळेत गेली काय आणि नाही काय... दिवसदिवस मुलांशी बोलायला घरी-दारी, वस्तीत मोठे माणूस शोधून सापडणार नाही! वस्ती दिवसा ओस पडलेली. एखाद्या ओसरीवर अस्थिपंजर म्हातारी व्यक्ती तीही अंथरुणाला खीळलेली... जवळजवळ मुक्या मुक्या मुलं एकमेकांशी खेळत राहतात. ऐकायला नाही मिळाले तर बोलणार काय. दमूनभागून सायंकाळी मोठे लोकं घरी आले की लवकरच झोपी जाणार. सकाळी उठून पुन्हा दुष्टचक्र सूरु होते... मुलांशी बोलणे, हवे नको हे विचारणे असे नसतेच तिकडे. अशा अभावग्रस्त वातावरणात मुलांची भाषिक जडणघडण कशी होणार?

मग वाड्या-पाड्यातील मुलं केवळ नावाला शाळेत यायची. शाळेत ती रमायची नाहीत. नीट लिहू, वाचू शकायची नाहीत. आम्ही शिक्षकांनी मुलांच्या भाषा काही प्रमाणात का होईना शिकून घेतल्या. शाळेत आल्यानंतर मुलांशी त्यांच्या भाषेत बोलू लागलो. एक दिवस गैरहजर असलेल्या मुलाला

उदा. काल कोठे गेला होतास? असा प्रश्न न विचारता. त्याच्या भाषेत- सांग कुख गेला था नावं? असे विचारु लागलो. तसेच वडारी भाषेचे- 'जेवण केले का?' ऐवजी 'रोटी टींट्यांव?',  'इकडे ये' ऐवजी 'एक्कडदा' असे करत गेलो.

पाखरं, झाड-वेली, गाईगुरं अशा त्यांच्या भावविश्वातल्या गोष्टींविषयी मुलांना त्यांच्या भाषेत ‘बोलते’ करू लागलो. मस्त गप्पा मारू लागलो. विश्वास संपादन करत गेलो. चित्र हळूहळू बदलू लागले. मुलं मोकळी झाली. शांत, उदास, खिन्न, शून्यमनस्क अवस्थेत वर्गात येवून बसणारी मुलं जरा बदलू लागली. काही मुलं नाही बोलली तरी त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची हसरी लहर सहज दिसून यायची. या गप्पांमुळे मुलांच्या मनातील शिक्षकांविषयीची, शाळेविषयीची, तिथल्या विशिष्ट वातावरणाविषयी वाटणारी भीती, दहशत, दडपण काही प्रमाणात कमी झाल्याचे आमच्या लक्षात आले.

मुलांची भाषा ‘स्वीकारणे’, ही वरकरणी खूप साधी वाटणारी गोष्ट. पण यातून मोठा परिणाम दिसून आला. मुलांच्या भाषेला आम्ही स्वीकारले आणि मुलांनी आम्हाला आणि शाळेला स्वीकारले! वर्गात या मुलांशी आम्ही त्यांच्या भाषेत बोलू लागलो. तेव्हा प्रमाण भाषेजवळ जाणारे मराठी बोलता येणारी काही मुलं हसायची. पण नंतर न सांगता ते  आपोआप बंद झाले.

आदिवासी मुलांच्या भावविश्वात निसर्गाला विशेष स्थान असते.  त्यातील झाडे, वेली, फुले, पक्षी याबाबत मुलांचे सूक्ष्म निरीक्षण असते. आमच्या शाळेच्या परिसरात बहारदार निसर्ग आहे. आम्ही परिसर भेटीची संख्या मुद्दाम वाढवली. वरचेवर मुलांना घेऊन जंगलात जाऊ लागलो. आधी स्थानिक माहितगार माणसांच्या मदतीने मुलांना जंगलाची माहिती देत असू. आता आदिवासी समाजातील मुलंच स्वतःहून बोलू लागली. अलिबाबाच्या गुहेचा दरवाजा उघडल्यासारखं झालं. वाघ कुठे राहतो. त्याचा आवाज, पायाचे ठसे,( ठाकरी भाषेत ‘माग’ म्हणतात.) इतर जंगली प्राण्यांच्या सवयी, पक्षी, विषारी-बिनविषारी साप, पाखरं, मधमाशा, मुंग्या, औषधी वनस्पती, कंदमुळे-फळे कित्ती गोष्टी या मुलांना माहिती होत्या! ज्या आम्हा शिक्षकांच्या गावी नव्हत्या.

आता लाजरेपणा, बुजरेपणा सोडून स्वत:च्या भाषेत माहिती सांगायला पुढे येऊ लागली. भले ते वाचन, लेखन, पाठांतर किंवा वर्गातल्या इतर गोष्टींत मागे होती. परंतु या परिसर भेटीदरम्यान ते इतर मुलांना माहिती सांगत पक्ष्यांचे आवाज काढून दाखवत. डोहात उडी मारून पोहत, डोंगरांची नावे घेताना वाऱ्याच्या वेगाने धावत, माकडासारखे झाडावर चढून फळं काढताना,  कंदमुळं खोदून काढताना शाळेतील पहिल्या बेंचवर बसणारी, संगणक हाताळणारी, आपल्या ‘हुश्शारी’चा तोरा मिरवणारी मुलं आदिवासी मुलांमागे कधी फिरू लागली, हे त्यांना सोडा आम्हालाही कळले नाही! त्यातून आदिवासी मुलांना भारी आत्मविश्वास मिळत गेला.

आपल्याकडे असलेल्या माहितीला आणि भाषेलाही काहीतरी प्रतिष्ठा आहे, आपले जगणे जसेच्या तसे स्वीकारले जातेय, हे मुलांना सुखावणारे होते. त्यामुळे त्यांना शाळेची गोडी वाढली. शिक्षणात रस वाटू लागला. वरचेवर शाळेला बुट्टी मारणारी मुलं उत्साहाने शाळेत येऊ लागली. आता शाळा आणि घर यांना जोडणारा बोली ते प्रमाणभाषा असा पक्का भाषिक पूल बांधला होता. शाळेतल्या चार भिंतीआड असताना त्यांच्या मनातले फुलपाखरू रानावनात उडत-बागडत असे. आता आठवड्यातून एकदा शाळाच जंगलात भरायला लागली!

आदिवासी मुलांशी त्यांच्या अनुभाविश्वातल्या विषयांवर आधी आम्ही खूप बोलायचो. भरपूर गप्पा मारायचो. काही शब्द, वाक्ये लिहायला सांगायचो. प्रमाणभाषेची लिपी आणि मुलांची भाषेतली लिपी यात बरीच तफावत असायची. उदाहरणार्थ, दुस-या वर्गात ‘सामर्थ्य’ या शब्दाऐवजी ‘सामरथ्य’ किंवा ‘प्रसंग’ ऐवजी ‘परसंग,’ आशीरवाद, असे शब्द मुले लिहीत असत. सुरुवातीला ते स्वीकारून पुढे त्यांना हेच शब्द प्रमाणभाषेत कसे लिहायचे, हे सांगितले. (तुम्ही लिहिलेले पण बरोबर आहे, हे आवर्जून सांगायचो!) मुलांसमोर त्यांनी लिहिलेल्या मजकुरावर लाल पेनाने चुकीची फुली मारून कधी मुलांना नाउमेद केले नाही. दिलेल्या प्रश्नाचे उत्तर लिहितानाही मुलांनी लिहिलेलं उत्तर व्याकरणाचा काटेकोरपणा बाजूला ठेवून उत्तरं स्वीकारले. हळूहळू मुले लिहिती झाली. रानात हिंडायला गेल्यावर फळे-कंदमुळे खायला देणाऱ्या मुलांशी आता दोस्ती झालेली मुले त्यांना मदत करायला लागली होती. लेखन कौशल्य विकसित करताना त्यांची खूप मदत झाली. मुलांनी मुलांना शिकवण्याइतकी प्रभावी गोष्ट नाही, असे मला सतत वाटत आलेय.

‘तुमच्या भाषेत, शब्दांत व्यक्त व्हा’ असे आवाहन मुलांना केले. त्यांच्या भाषेत मुक्तपणे व्यक्त व्हायला भरपूर वाव, चुका करायला मुभा दिल्याने मुलं हळूहळू व्यक्त होऊ शकली. शब्द-वाक्य-वाक्ये-परिच्छेद हा प्रवास आमचा उत्साह वाढवणारा होता. आदिवासी समाजातील मुले ठाकरी भाषेत, भटक्या विमुक्त जमातीतील मुले तेलगुमिश्रित वडारी भाषेत, मराठा मुले त्यांच्या ग्रामीण ढंगातल्या भाषेत लिहिती झालीयेत. एरवी सातव्या वर्गांपर्यंत शिकल्यावरही प्रमाणभाषेत निबंधलेखन ५-१० ओळींत संपविणारी ही मुलं. आता त्यांच्या भाषेत व्यक्त होताना पान-दीड पानभर मजकूर लिहिताहेत. पाच-दहा वाक्यांत त्यांचे ‘भांडवल’ आता संपत नाही. आवडीच्या विषयावर लिहायला सांगितल्यावर मुलांनी भरभरून लिहिलेय. ‘आमची बाराखडी’ हस्तलिखित म्हणजे मुलांना भाषेच्या अंगणात मूक्तपणे व्यक्त व्हायची भरपूर संधी देणारी त्यांची हक्कशीर जागा. मुलांनी लिहिलेले निबंध आम्ही पाठ्यपुस्तकातल्या पाठाला पर्यायी पाठ म्हणून शिकवले. मुलांना कोण आनंद व्हायचा. लेखक म्हणून त्या मुलाचे किंवा मुलीचे नाव घ्यायचो. त्या मुलांचा आत्मविश्वास दुणावत असे. काही मुलांचे ललित निबंध नियतकालिकांत छापून आले. आपण लिहिलेला मजकूर छापून आलेला पाहून मुले मनोमन सुखावली. लेखक म्हणून मानधनाचे चेक मुलांच्या नावावर घरी आले! मुले आणि घरवाले किती आनंदून गेले असतील. नवे काही शिकायचा आनंद यापेक्षा वेगळा काय असतो?

‘माझे शिवार’ या विषयावरील हस्तलिखिताच्या अंकात मुलांनी शिवाराशी असलेले भावनिक नाते छानपैकी शब्दबद्ध केलेय. प्रत्येक मुलाच्या भावविश्वात शिवाराला विशेष स्थान असले तरी लेखनाचा विषय म्हणून मुलांनी शिवाराकडे कधीच पाहिले नव्हते. शिवार हा विषय मुलांनीच चर्चेतून निवडला. शिवारावर लिहायचे म्हटल्यावर विद्यार्थ्यांनी नेहमीच्या परिचयाच्या गोष्टींकडे निराळ्या नजरेने पाहायला सुरुवात केली. गाव-शिवाराबद्दल त्यांचं कुतूहल जागं झालं. शिक्षकांनी मुलांसमवेत शिवारफेरी मारली. त्यानंतर कोणी शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या मुलाखती घेतल्या. कोणी कृषिसेवा केंद्र्चालकांशी संवाद साधला. कोणी तलाठ्याच्या दप्तरातून नोंदींची जंत्री जमवली. कोणी आपल्या शेतकरी बापाविषयीच्या भावनांना शब्दरूप दिलं. त्याला भेडसावणाऱ्या समस्यांना हात घालण्याचा प्रयत्नही केला. शेती, माती, नाती, पिके-पाणी, रान, गाईगुरं अशा ‘परिचया’च्या शिवाराकडे पाहण्याचा नाव दृष्टीकोन मुलांना लिहिण्यातून मिळाला.

‘सांग मा पाखरां मारीत न्हाई,  झाडा तोडीत न्हाई’  असे आपल्या निबंधात लिहिणाऱ्या सागर खडके या आदिवासी मुलातील बदल त्याला पर्यावरणाबाबत आलेले भान सांगून गेला. मुलांनी गाव परिसरात बोलले जाणारे शेकडो शब्द जमवले आहेत. त्यांना प्रमाणभाषेतले शब्द लिहून लहानसा शब्द कोश तयार झाला आहे. ग्रामीण ,आदिवासी भागात उत्सव, सण, समारंभात म्हटल्या जाणाऱ्या लोकगीतांचे संकलन मुलांनी केलेय. भरपूर वाक्प्रचार, शब्दप्रयोग, शिव्या असे साहित्य  लिहून ठेवलेय. यातले काही शब्द काही लोकगीते तर त्या त्या वयोवृद्ध व्यक्तींबरोबर मरणपंथाला लागलेले आहेत. त्याचे जतन संवर्धन यानिमित्ताने होतेय. कृषी संस्कृतीशी संबंधित अनेक शब्द आज मराठी शब्दकोशात नाहीत. आम्ही मुलांच्या मदतीने परिसरातील कृषी पारिभाषिक शब्दांचा शब्दकोश तयार करायच्या प्रयत्नात आहोत. या सगळ्यातून मुले केवळ धडे कविता शिकून त्याखाली दिलेले प्रश्नोत्तरे न लिहिता मुळातून भाषा काय आहे? तिचा लहेजा आणि तिचे सौंदर्य जाणून घेत आहेत. मज्जा येतेय.

~~~भाऊसाहेब चासकर,
बहिरवाडी, अकोले, जि.नगर.
bhauchaskar@gmail.com

No comments:

Post a Comment