Tuesday, 28 July 2015

तारे जमीन पे

दैनिक लोकसत्ता च्या शनिवारच्या 25 जुलैच्या  लोकरंग पुरवणीत अध्ययन अक्षमता असणाऱ्या मुलांबद्दल लेख वाचला.या मुलांच्या शिक्षणावर कोणीही गंभीरपणे विचार करताना दिसत नाही. त्या मुलांची पडताळणी करण्यासाठी जिल्ह्यात कुठेही केंद्र नाहीत. ही बाब वाचण्यात आल्यावर या प्रश्नाकडे गांभीर्याने बघायला पाहिजे असे वाटते. अशा मुलांच्या तपासणीसाठी राज्यात केवळ चारच केंद्र असून कसे चालेल?

      एल.डी.म्हणजेच लर्निंग डिसेबिलिटी यालाच अध्ययन अक्षमता म्हणतात. सर्वसाधारण मुलांच्या प्रमाणेच अशा मुलांना शिकण्यात अडथळे येतात. परंतु ही समस्या प्रयत्नाने दूर करता येऊ शकते. अशा मुलांची संख्याच अजून तरी निश्चित झालेली नाही. त्यामुळे त्यांच्या शिकण्यातील अडथळेही दूर झालेले नाहीत. अशी मुले भाषा व गणित विषयातील क्षमता कौशल्यांच्या विकासात मागे राहतात. काही मुलांची गणितातील गती चांगली असते.तर भाषा विषयातील गती मंद असते. काही मुलांचे याउलट असते.
डिसलेक्सिया, डिस्ग्राफिया, डिस्कॅल्क्युलिया असेही या विकारांना म्हणतात.

गाेरगरिबांच्या मुलांना एल.डी.चाचणी करणेही शक्य नाही. कारण अशा केद्रांची सोय जवळपास नाही व त्यासाठी शुल्क आकारले जाते. अशा मुलांची आकडेवारी राज्य सरकारने येत्या 15  ऑगस्ट पर्यत सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिल्याचे वाचण्यात आले.

अप्रगत विद्यार्थी विहीन महाराष्ट्र करण्यासाठी अशा मुलांना शोधून काढूच त्याच्यासाठी विशेष कृतीकार्यक्रम आखण्याची गरज आहे. कारण लेखन वाचन कार्यक्रमातून मुलांना आवश्यक क्षमतांचा विकास झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे अशा मुलांच्या आकलनशक्तीच्या सुधारण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न व्हायला हवेत.स्मरणशक्ती चांगली असूनही आकलनाच्या पातळीवर ह्या मुलांचा गोंधळ उडतोय.शिवाय भाषा व गणित या विषयाच्या बाबतीत भिन्न स्थिती आढळते.

   त्यामुळे शाळाबाह्य मुलांना ज्याप्रकारे शोधून काढले जात आहे. सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे.ही मुलेही शालेय शिक्षणाच्या प्रवाहात येत आहेत.
त्याच प्रकारे एल डी मुलांना शोधण्याचा प्रयत्न करायला हवा. तरच अप्रगत विद्यार्थी विहीन महाराष्ट्र होईल असे वाटते.