पूर्वी प्रत्येक गावात तांबटकरी यायचे. गावातील प्रत्येकजणं पितळेच्या,लोखंडाच्या घागरी दुरूस्त करायला तांबटक-याकडे घेऊन यायचे.तांबटकरी गावतच दोन-चार दिवस मुक्काम करायचा. त्याच्या पालात त्यांच कुटूंब रायचं.
गळक्या घागरीला तांबटकरी झाळ द्यायचा.पितळेच्या घागरीच्या पत्र्याचे छोटे छोटे तुकड्याचे पाणी करून घागरीला झाळ दिला जायचा.आम्ही शाळा सुटली की नक्की तांबटक-याच्या पालापुढं जाऊन उभा राहायचो.तो कार्यमग्न असायचा.
पुर्वी आडातून पाणी शेंदताना घागर आदळून तिला ठोके पडायचे. हातपंपावरून पाणी आणताना कधी घागर निसटली की मोठा ठोका पडायचा.अशा ठोके पडलेल्या घागरी त्याच्या पालापुढं ढिगभर पडलेल्या असत.कधी कधी शाळेच्या शेजारीच त्याचा पाल असे. मग घागरी ठोकलेला आवाज शाळेत ऐकायला येत असे.
आज जीवन जगताना व्यवस्था कशी झालीय याचा प्रत्यय प्रत्येकाला पदोपदी येत राहतो. साध्या साध्या कामासाठी सामान्य माणसांची अडवणूक होते. नवकल्पना,सर्जनशील बाबी स्विकारायला,करून पाहायला कोण धजावत नाही. व्यवस्थेतील ह्या गळक्या व ठोके पडलेल्या घागरी पूर्ण क्षमतेने पाणी कसं भरू शकणार? म्हणून व्यवस्थेला ठोकणारा कुणीतरी तांबटकरी असतोच. असायलाही हवा.
No comments:
Post a Comment