आज प्राचार्य महोदयासोबत “शाळाबाह्य
मुलांची शोधमोहीम” या बैठकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयमध्ये उपस्थित होतो. एक
मार्च पासून शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्याची मोहीम सुरू राहणार आहे. या मुलांचा
शोध या मोहिमेतून घेतला जाणार आहे.या बैठकीमध्ये या विषयावर चिंतन झाले.शासन
निर्णयावर चर्चा करण्यात आली.या मोहिमेतून तीन ते अठरा या वयोगटातील शाळाबाह्य
मुलांना शालेय शिक्षणाच्या प्रवाहात आणले जाणार आहे.
खरंतर शाळाबाह्य मुलांना शालेय शिक्षणाच्या प्रवाहात आणणे यासाठी
अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत;परंतु आजही दुर्दैवाने सर्व मुले शालेय शिक्षणाच्या
प्रवाहामध्ये आलेली नाही. यासाठी एक सामाजिक चळवळ उभी राहायला हवी. प्रत्येक
व्यक्तीने संवेदनशील मनाने या प्रश्नाकडे पाहायला हवं. तरच खऱ्या अर्थानं
शाळाबाह्य मुलांचा प्रश्न सुटेल असं वाटतं. शाळाबाह्य मुलं कुठे आहेत. या
ठिकाणांचा शोध घेणे, शाळाबाह्य मुलांच्या समस्या
समजून घेणे, शाळाबाह्य मुलांच्या पालकांच्या समस्या समजून
घेणे, शाळाबाह्य मुलांच्या पालकांचे प्रबोधन करणं. शिक्षणाचे
महत्त्व त्यांना पटवून देणे. यासारख्या गोष्टी करण्याची गरज आहे.
आपल्या आजूबाजूला जी मुलं शाळेत जात नाही अशा मुलांना शालेय
शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी समाजानं संवेदनशील मनाने प्रयत्न करण्याची गरज
आहे. सरकारी पातळीवर शाळाबाह्य मुलांना शिक्षण मिळावे यासाठी नियमितपणे प्रयत्न
सुरूच असतात. त्यांच्यासाठी अनेक योजना राबविल्या जातात;परंतु तरीही ही मुले शालेय
शिक्षणापासून दूर राहतात. यासाठी "बालरक्षक" नावाची एक चांगली चळवळ सुरू
झालेली आहे. याचा खूप आनंद वाटतो.या चळवळीच्या माध्यमातून वीट भट्टी, खाण कामगार, भीक मागणारी मुले या मुलांना शालेय
शिक्षणाच्या प्रवाहात आणले गेलेले आहे.
स्थलांतरित मुलांची समस्या आजही सुटलेली नाही असे आपल्याला दिसून
येते. जेव्हा
आपण प्रवास करत असतो, तेव्हा आपल्याला दिसतं की ट्रक मधून
जेव्हा ऊस तोडणी कामगार जात असतात. तेव्हा त्यांच्यासोबत ही मुले आपल्याला बसलेली
दिसतात. केविलवाण्या चेहऱ्याने ही मुलं त्या ठिकाणी बसलेली दिसतात. ऊसतोडणीसाठी
ज्या वेळेस त्याचे पालक उसाच्या फडात जातात तेव्हा ही लहान लहान मुलं तिथंच खेळत
असतात.काही मुले आपल्या लहान भावंडाचा सांभाळ करतात.काही मुले बस स्थानक,रेल्वे स्थानक,यात्रा
याठिकाणी फिरताना दिसतात.अशा मुलांना शाळेत दाखल करायला हवे.चला तर मग संवेदनशील
मनाने हा प्रश्न समजून घेऊन शाळाबाह्य मुलांना शाळेत दाखल करूया.
No comments:
Post a Comment