Saturday, 5 June 2021

संघर्षयात्री: श्री.आर.डी. सुळ गुरुजी (अण्णा)

भूम-परांडा या ग्रामीण भागात शिक्षणसंस्था उभारून ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकऱ्यांच्या मुलांसाठी शिक्षणाची सोय करून दिली. मुलांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. माणुसकीच्या नात्यातून माणसं जपली.अडचणीच्या काळात मदत करून अनेकांची आयुष्ये उभी केली. श्री. आर.डी. सुळ गुरुजी (अण्णा) यांना सहा जून रोजी पंच्याहत्तर वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांचा अमृतमहोत्सव साजरा करण्यात येत आहे.या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने……..

लहानपणीच श्री.आर.डी.सुळ गुरुजी यांच्यावरील आईचे छत्र हरवले होते. घरची परिस्थिती हलाखीची होती.अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये  स्वतःच्या व भावाच्या शिक्षणासाठी अतोनात कष्ट सहन केले.प्रसंगी  त्यांनी मजुरी केली,दुकानात काम करून स्वतःचे व भावाचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर स्वतः एका मुलांच्या वस्तीगृहात नोकरी करून स्वीकारली.भावाचे शिक्षण पूर्ण केले.त्यांचे बालपण जीवनातील संघर्षांत गेले.

 ग्रामीण भागातील मुलांनी शिकायला हवे. या तळमळीतून सत्तरच्या दशकात सुरुवातीला मुलांसाठी भूम या ठिकाणी वसतीगृह सुरु केले. त्यासाठीही त्यांना खूप कष्ट सहन करावे. पुढे एकोणीसशे एकाहत्तर साली भारतीय शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना केली.त्या काळी ग्रामीण भागात माध्यमिक शिक्षणाची सोय नव्हती. त्यासाठी या संस्थेच्या माध्यमातून भूम व परांडा या तालुक्यात शाळा सुरु केल्या. भूमआरसोलीचिंचपूरपरांडा या ठिकाणी शाळा सुरू केल्या. त्यावेळी खिशात फक्त एक रुपया असताना त्यांनी भूम येथील रवींद्र हायस्कूल ही शाळा सुरू केली होती. सुरुवातीला शिपायापासूनची सर्व कामे त्यांनी केली.आज या शाळेत जवळपास दीड हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यांच्या चारही शिक्षण संस्थांमध्ये पाच हजारापेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. 

 रविंद्र हायस्कूल भूम येथील शाळा भौतिक सुविधांनी संपन्न आहे. शाळेत सुसज्ज ग्रंथालय, प्रयोगशाळा, क्रीडांगण, संगणक कक्ष तयार करण्यात आलेला आहे. या शाळेत विविध प्रकारचे कार्यक्रम घेण्यासाठी मोठे सुसज्ज असे सभागृह उपलब्ध आहे. अण्णांचे झाडावर तितकेच प्रेम आहे. शाळेचा परिसर झाडांनी-वेलींनी हिरवागार झालेला आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी ते स्वतः लक्ष देत असतात. शाळेत वर्षभर विविध उपक्रम राबवित असतात. विद्यार्थ्यांना आपल्या भाषणातून प्रेरणादायी गोष्टी सांगत असतात. अण्णा विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांची व्याख्याने शाळेत आयोजित करत असतात.अण्णा शाळेतील शिक्षकांवर व विद्यार्थ्यांवर खूप प्रेम करतात. गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडचण येणार नाही यासाठी ते नेहमीच मदतीचा हात पुढे करतात.शाळेतून शिक्षण घेऊन गेलेल्या विद्यार्थ्यांना पुढे काही अडचण आल्यास ते मदत करतात. या शाळांमधून आतापर्यंत डॉक्टर, इंजिनीअर, वकील,शास्त्रज्ञ, विविध प्रशासकीय अधिकारी तयार झालेले आहेत.         

      माणसाचा सहवास लाभला शिवाय माणूस समजत नाही. अण्णांचा ज्यांना ज्यांना सहवास लाभला त्यांना त्यांना त्यांनी दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन केले. गोरगरीब कुटुंबातील मुलांना आपल्या शिक्षण संस्थेत नोकरी दिली. जातीपातीच्या पलीकडे जाऊन माणुसकीची नाती जपली. त्यांच्या सोज्वळ व प्रेमळ स्वभावामुळे संपूर्ण महाराष्ट्रात मित्र परिवार जमवला. त्यांचे अनेक प्रशासकीय अधिकारी जिवलग मित्र आहे ते प्रत्येक माणसाचा खूप आदर करतात.      

अण्णा कुटुंबवत्सल माणूस आहेत त्यांचा सुळ परिवार मोठा आहे. परिवारातील सर्वांना त्यांनी उच्च शिक्षण दिले. शिक्षणाचे महत्त्व त्यांनी पटवून दिले. त्यांची तिसरी पिढी आता परदेशात जाऊन शिक्षण घेत आहे. त्यांची तीन नातवंडे डॉक्टर झाले आहेत. मुलगा व सून डॉक्टर आहे. त्यांच्या दोन्ही मुली शिक्षिका झाल्या आहेत.त्यांनी सर्वांवर चांगले संस्कार संस्कार करून पुढील पिढीला आदर्श घालून दिला. एकत्रित कुटुंब पद्धतीचे महत्त्व पटवून दिले.  त्यांना सहा जूनला पंच्याहत्तर वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने अमृतमहोत्सव साजरा केला जात आहे. अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने त्यांच्यावर “संघर्षयात्री”  या गौरव ग्रंथाचे संपादन करण्यात येत आहे. या गौरवग्रंथाच्या लेखांमधून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंचा वेध घेण्यात आलेला आहे. त्यांचा संघर्षमय जीवन प्रवास प्रेरणा देणारा आहे.यावर आधारित सर्व लेख आहेत. लवकरच या गौरव ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. या गौरवग्रंथाला शुभेच्छा संदेश खासदार मा.सुप्रिया सुळे यांनी दिलेला असून या ग्रंथाचे संपादन साहित्यिक समाधान शिकेतोड यांनी केलेले आहे.                               

त्यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून उस्मानाबाद जिल्हा परिषदेवर तीन वेळा प्रतिनिधित्व केले. यावेळी त्यांनी गोरगरीब जनतेची सेवा केली.समाजातील प्रश्न सोडवत असताना एखाद्या प्रश्नाचा चिकित्सकपणे विचार करून त्याची अभ्यासपूर्ण मांडणी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यांना अडचणीत असलेल्यांना मदत करणे, सुखदुःखात सहभागी होणे आवडते. अडचणीच्या काळात  त्यांनी खूप लोकांना मदत केली त्यामुळे लोक त्यांना आदराने,प्रेमाने अण्णा म्हणतात. त्यांनी एकदा वेळा एका  राष्ट्रीय पक्षाच्या तिकिटावर आमदारकीची निवडणूक लढविली. अनेकदा अपयश पचवून राजकारण, समाजकारण, सहकार क्षेत्रात सकारात्मक व लोकोपयोगी कार्य करत राहिले.

अशा या माणूसपण जपणाऱ्या, वंचितांची दु:ख जाणणाऱ्या, शिक्षणाची गंगा ग्रामीण भागात नेणाऱ्या, सेवावृत्ती, संघर्षयात्री श्री. आर.डी. सुळ  गुरुजी (अण्णा) यांना अमृतमहोत्सवानिमित्त खूप खूप शुभेच्छा!

 

No comments:

Post a Comment