Saturday, 12 June 2021

माझी आई गोजरबाई

माझ्या आईची ही सेल्फी.सेल्फी घेतल्यावर आई खूश झाली.असाही फोटो काढला जातो.याच तिला अप्रूप वाटलं.मी आईला आक्का म्हणतो.प्रसिद्ध साहित्यिक उत्तम कांबळे यांचे  "आई समजून घेताना" हे पुस्तक वाचताना माझी आक्का मला आठवायची.

मला घडवण्यात तिने  खूप परिश्रम घेतले आहेत. आठवणीनं आजही डोळ्यात पाणी येते. शालेय शिक्षण घेत असताना घरची परिस्थिती बेताचीच होती.कोरडवाहू शेती काही साथ देत नव्हती. तेव्हा संसाराचा गाडा ओढताना तिला सहन कराव्या लागणार्‍या हालअपेष्टा आजही आठवतात. 

     मी शालेय जीवनात स्पर्धेत बक्षिसे मिळवली की आक्काला खूप आनंद व्हायचा. शेतातील ज्वारी उपटल्यावर तिच्या हातावर फोड यायचे.त्या फोडतील पाणी पाहून माझे डोळे भरून यायचे. आक्का कधी रोजगार हमीच्या कामावरची जायची.

तिनं एक शेळी पाळली होती.शेतात ती नेहमी तिच्यासोबत असायची. शेळीपालनापासून आक्का संसारातील आर्थिक अडचणी सोडवायची.आक्का कधी कधी  पंढरपूरला वारीला पण जायची.अभंग छान म्हणायची...आजही म्हणते.

जून उजाडला की जुनी पुस्तकं अर्ध्या किंमतीत घ्यायची. वह्या व इतर साहित्य ती दुकानातून उधार का होईना घेऊन द्यायची.अहोरात्र परिश्रम करणारी माऊली कधीच थकायची नाही तर ती सर्वासाठी झिजणं रहायची. 

मी बारावीत असताना हाताने स्वयंपाक करायचो.कधी कधी भाकरी तव्यावर जायची नाही.मग आक्का पिठ वळणी यावे यासाठी ज्वारीच्या पिठात गव्हाचं पिठ मिसळून द्यायची. 

अशा कितीतरी आठवणी आहेत ........

 आज सर्व शेती बागायत झालीय.शेतात आंब्याची बाग,ऊस आहे.पोरंग गुरूजी झाल्याचं समाधान पण आहे. 

यासाठी तिचं सर्वासाठी झिजणं हा फार मोठा त्याग आहे.

 


No comments:

Post a Comment