आयुष्याच्या
प्रवासात अनेक व्यक्तीचा समृद्ध सहवास आपल्याला लाभत असतो. अशा सात्विक, संवेदनशील, सर्जनशील
माणसांच्या सहवासातील अनुभव, प्रसंग समृद्ध करून जातात, जगण्याला बहर आणतात. अशी माणसं माणसाची जात उन्नत व्हावी, यासाठी चाकोरीबाहेर जाऊन काम करतात. अशा
माणसांसोबत काम करण्याची संधी मिळणे म्हणजे भाग्याचं!
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण
संस्थेतील वरिष्ठ अधिव्याख्याता, एक अभ्यासू व्यक्तिमत्व आदरणीय डॉ. इब्राहीम नदाफ
यांच्यासोबत गेली चार-पाच वर्षे काम करण्याची संधी मिळाली.शिक्षणशास्त्राचे जाणकार, मराठी, इंग्रजी, कन्नड, बंजारी अशा अनेक भाषांवर
प्रभुत्व असणारे प्रयोगशील अधिकारी आदरणीय डॉ. इब्राहिम नदाफ यांच्यासोबत काम
करताना खूप शिकायला मिळाले.शिक्षक सक्षमीकरण करताना अध्यापनशास्त्रातील शास्त्रीय
दृष्टीकोन समजून घेता आला.अध्ययन निष्पतीवर मुलांसोबत कसे काम करावे याबाबत प्रत्यक्ष
कृतींच्या अध्ययन अनुभवाचा एक व्हिडीओ तयार करण्यात आला होता. यामधून अध्ययन निष्पतीवर
कसे एकात्मिक पद्धतीने काम करावे हे समजायला मदत झाली होती.
ते गेली चार- पाच वर्ष उस्मानाबाद डायटमध्ये वरिष्ठ
अधिव्याख्याता या पदावर कार्यरत होते. याच कालावधीत वर्षभर प्राचार्य म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय
कार्य केले. उस्मानाबाद जिल्हा आकांक्षीत जिल्हा आहे. या जिल्ह्याची गरज ओळखून
जिल्ह्यात खूप रचनात्मक कार्य केले. माननीय आयुक्त शिक्षण यांनी आकांक्षीत जिल्ह्याला
दिलेल्या निर्देशाप्रमाणे जिल्ह्यात शैक्षणिक विकासाचे कार्य केले.शिक्षण
परिषदांच्या माध्यमातून शिक्षकांना समृद्ध केले. जिल्ह्यातील मुलांच्या अध्ययन
निष्पत्तीत वाढ व्हावी यासाठी या राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (NAS) चाचण्यांचे आयोजन
केले.
जिल्ह्यातील मुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी विविध
प्रकल्प, उपक्रम राबविले. शाळेत संशोधन, उपक्रम, प्रकल्प राबविण्यासाठी
त्यांनी शिक्षकांना नियमितपणे मार्गदर्शन केले.शाळांच्या यशोगाथा लिहण्यासाठी
शिक्षकांना प्रेरणा दिली. प्रयोगशील शिक्षकांच्या यशोगाथांमधून इतरांनाही प्रेरणा मिळावी
यासाठी वेध या विशेषांकाचे संपादन केले. कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांचे
उत्तम संघटन करून त्यांना ऊर्जा दिली. याच कालावधीत त्यांनी डाएटच्या कामावर
आधारित सिद्धी, लक्ष्य, वेध, स्पंदन चार विशेषांकाचे संपादन केले. या विशेषांकाच्या
निर्मितीमध्ये मला कार्यकारी संपादक म्हणून काम करण्याची त्यांच्यासोबत संधी
मिळाली.खूप नवीन शिकता आले.
इंग्रजी विषयातील गुणवत्तावाढीसाठी विविध पथदर्शी प्रकल्प,उपक्रम राबविले. माननीय
डॉ.इब्राहीम नदाफ हे राज्याच्या विविध
राज्यस्तरीय शैक्षणिक समित्यांवर तज्ञ म्हणून कार्यरत आहेत. इंग्रजी विषयाचे विषय
समितीचे सदस्य म्हणूनही त्यांनी अनेक वर्षे बालभारतीमध्ये काम केले आहे. ते नेहमीच
गुणवत्तेचा ध्यास घेऊन मुलांच्या हितासाठी चिंतन करत असतात. त्यांच्या व्यावसायिक
व व्यक्तिगत आयुष्यात अनेक संकटे, अडचणी आल्या तरी ते खंबीरपणे आपले कार्य करत
राहिले.ते नुकतेच एका आजारातून बरे झालेले आहेत.त्यांना आरोग्यसंपन्न आयुष्य लाभो
हीच सदिच्छा! त्यांच्या प्रकृती व प्रवृत्ती बद्दल सांगायचे झाल्यास मला कविवर्य
वसंत बापट यांची बाभूळझाड ही कविता आठवते.
‘अस्सल लाकूड भक्कम गाठ
ताठर कणा टणक पाठ
वारा खात गारा खात....बाभूळझाड उभेच आहे!
अशा गुणी अधिकाऱ्याची बदली सोलापूर डायट येथे झालेली आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याचा गौरव करून पुढील कार्यासाठी मनापासून शुभेच्छा.
No comments:
Post a Comment