Sunday, 15 August 2021

देशाची पहिली लक्ष्मीबाई राणी चन्नम्मा

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव

 

देशाची पहिली लक्ष्मीबाई राणी चन्नम्मा

--------------------------------------------------------------------------------------

स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक राजांनी व संस्थानिकांनी आपले स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी इंग्रजांसोबत अनेक लढाया केल्या भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्याप्रमाणेच एका रणरागिनीने आपले शौर्य,धैर्य दाखवत इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते. त्या धाडसी शूरवीर होत्या कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर या संस्थानाच्या राणी कित्तुर चेन्नम्मा.

 कित्तुर चेन्नम्मा यांचा जन्म राजघराण्यातील धुळप्‍पा देसाई व पद्मावती यांच्या पोटी २३ ऑक्टोंबर १७७८ रोजी झाला. त्यांना लहानपणापासूनच  तिरंदाजी,अश्वारोहण, तलवारबाजीचे युद्ध अशा मर्दानी  कलांची आवड होती. या सर्व कलांमध्ये त्यांनी प्राविण्य मिळविले होते. राणी चन्नम्माला कानडी,मराठी,उर्दू या भाषा अवगत होत्या. पुढे कित्तुरचे संस्थानिक मल्लसर्ज यांच्याशी त्यांचा विवाह झाला. मल्लसर्ज राजा व राणी चेन्नम्माने राज्याचा कारभार उत्तम चालविला. राजांच्या मृत्यूनंतर इंग्रजांनी दत्तक वारस नामंजूर करून कित्तुर संस्थान खालसा करण्याचे ठरविले. दत्तक वारसा नामंजूर करून इंग्रज अधिकारी थॅकरे याने कित्तूर संस्थान ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. राणी चेन्नम्माने ब्रिटीशांच्या सैन्याला न घाबरता त्यांच्याशी दोन हात केले. या युद्धात राणीने पराक्रम गाजवला.ब्रिटिश अधिकारी थॅकरे या युद्धात मारला गेला. 

 स्वतःच्या दरबारातील काही व्यक्तींच्या फितुरीमुळे राणीला इंग्रजांनी कैद केले. राणीला कैद करुन बेलहोंगलच्या तुरुंगात ठेवले. तिथेच राणीचा मृत्यू झाला. भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील ऊर्जस्वल रक्तरंजित अध्यायाचा शेवट झाला.

 कित्तूर संस्थानातील राज्यकारभार राणीने समर्थपणे सांभाळला होता. रयतेच्या अडीअडचणी दूर करून जनतेच्या मनावर अधिराज्य गाजविले होते. बेळगावपासून ५० किमी अंतरावर कित्तूरचा किल्ला आजही राणी चन्नम्माची कहाणी सांगतो उभा आहे. या किल्ल्याला एक वेळ अवश्य भेट द्यायला हवी.

 राणी चन्नम्मा च्या कार्याची दखल घेत सन २००७ साली देशाच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते संसद भवनाच्या प्रांगणात राणी चन्नम्मा यांच्या दिमाखदार पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. राणी चन्नम्मा यांच्या स्मरणार्थ भारतीय रेल्वे मंत्रालयाने राणी चन्नम्मा एक्सप्रेस ही एक प्रवासी रेल्वे गाडी सुरू केली आहे. ती दररोज मिरज ते बंगळूर दरम्यान धावते. तसेच कर्नाटक राज्यात राणी चेन्नम्मा यांच्या नावाने एक विद्यापीठही आहे. 

 भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त या महासंग्रामातील वीरांला स्मरण करूया.त्यांना मनापासून प्रणाम करूया. ही त्यागाची,बलिदानाची गौरवगाथा आपल्या विद्यार्थ्यांना सांगूया.

 


No comments:

Post a Comment