Saturday, 16 October 2021

समाधान शिकेतोड यांच्या चला कोरोनामुक्त होऊया पुस्तकाचे प्रकाशन संपन्न

लातूर विभागाचे शिक्षण उपसंचालक मा.डॉ.गणपत मोरे, मराठवाडा साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष मा.श्री.नितीन तावडे, सेवानिवृत्त वरिष्ठ अधिव्याख्याता मा.श्री.नवनाथ धुमाळ, वरिष्ठ अधिव्याख्याता मा.डॉ.दयानंद जटनुरे या मान्यवरांच्या हस्ते समाधान शिकेतोड लिखित चला कोरोनामुक्त होऊया या पुस्तकाचे प्रकाशन आज जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील सभागृहात संपन्न झाले. 

याप्रसंगी शिक्षण उपसंचालक मा.डाॅ.गणपत मोरे यांनी या पुस्तकाबद्दल आपले प्रेरणादायी विचार व्यक्त करून लेखकाचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री.बळीराम चौरे यांनी पुस्तक प्रकाशनास ऑनलाइन उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

चला कोरोनामुक्त होऊया पुस्तकातून कोरोनाबद्दल जनजागृतीपर संदेश देण्यात आलेला आहे. कोरोना या आजारावर मात करण्यासाठी समाधान शिकेतोड यांनी चारोळीच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन केलेले आहे. सध्या लसीकरण सुरू आहे. लोकांनी लस घ्यावी, पर्यावरणाचे संरक्षण करावे, सार्वजनिक स्वच्छतेबाबत जागरूकता बाळगावी, आपत्तीच्या काळात प्रशासनाला साथ द्यावी, माणुसकीची जपणूक करावी,मुलांचे शिक्षण सुरू ठेवावे अशा विविध विषयांवर या चार ओळीच्या कविता आहेत. या कवितांच्या माध्यमातून जनजागृती घडावी. असा मनोदय लेखकांनी व्यक्त केलेला आहे.

समाधान शिकेतोड हे उपक्रमशील अध्यापक आहेत. शैक्षणिक क्षेत्रातील एक चिंतनशील व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित आहेत. त्यांची माझा विद्यार्थी, पोपटाची पार्टी ही पुस्तके प्रकाशित आहेत. बालसाहित्यीक म्हणूनही ते परिचित आहेत.बालकांसाठी सातत्याने ते लिहीत असतात. विद्यार्थ्याच्या गुणवत्ता विकासासाठी ते सातत्याने नावीन्यपूर्ण उपक्रम राबवित असतात. 

कोरोना मुक्त होऊया या पुस्तकाला प्राथमिक विभागाचे शिक्षण संचालक मा.श्री.दिनकर टेमकर यांनी शुभेच्छा संदेश दिलेला आहे. प्रसिद्ध साहित्यिक मा.श्री.व्यंकटेश चौधरी यांनी पुस्तकाच्या मलपृष्ठावर अभिप्राय देऊन या पुस्तकाची पाठराखण केलेली आहे. या पुस्तकाचे मुखपृष्ठ पुणे येथील प्रसिद्ध चित्रकार श्री.संतोष धोंगडे यांनी काढलेले आहे.नांदेड येथील निर्मल प्रकाशन या प्रतिथयश प्रकाशनाकडून हे पुस्तक प्रकाशीत झालेले आहे.

याप्रसंगी लेखक समाधान शिकेतोड यांनी पुस्तक निर्मितीचा प्रवास सांगितला. या पुस्तकातील मजकुर जनजागृतीसाठी सर्वजण वापरू शकतात. असे त्यांनी सांगीतले. मान्यवरांनी पुस्तकाबद्दल विचार व्यक्त केले. मा.डॉ.दयानंद जटनुरे यांनी या पुस्तकावर सविस्तर भाष्य केले. मराठवाडा साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष मा.नितीन तावडे, सेवानिवृत्त वरिष्ठ अधिव्याख्याता मा.नवनाथ धुमाळ यांनीही या प्रसंगी विचार व्यक्त केले. 

या कार्यक्रमाला जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,उस्मानाबाद येथील अधिकारी व कर्मचारी, शिक्षण विभागातील अधिकारी, मराठवाडा साहित्य परिषदेचे पदाधिकारी, साहित्यिक, शिक्षक, उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाॅ. रुपेशकुमार जावळे यांनी केले.श्री.हनुमंत पडवळ यांनी बहारदार सूत्रसंचालन केले.आभार प्रदर्शन अधिव्याख्याता मा.नारायण मुदगलवाड यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ.रुपेशकुमार जावळे,श्री.तानाजी खंडागळे, श्री.नेताजी चव्हाण यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment