महाराष्ट्रातील प्रसिद्ध बालसाहित्यिक, चरित्रकार, संशोधक, समीक्षक, विचारवंत डॉ. सुरेश सावंत यांचा गौरव ग्रंथ वाचण्याची खूप उत्सुकता होती. नांदेड येथील इसाप प्रकाशनाचे प्रकाशक श्री. दत्ता डांगे यांनी आचार्य डॉ. सुरेश सावंत हा गौरवग्रंथ मला पोस्टाने पाठविला. या गौरव ग्रंथाचे संपादन लेखक संदीप काळे यांनी केलेले आहे. हा गौरवग्रंथ इसाप प्रकाशनाने प्रकाशित केला असून प्रसिद्ध साहित्यिक श्रीपाल सबनीस यांची प्रस्तावना या गौरव ग्रंथाला लाभलेली आहे. प्रसिद्ध साहित्यिक, प्रकाशक बाबा भांड यांनी मलपृष्ठावर अभिप्राय देऊन या गौरव ग्रंथाची पाठराखण केलेली आहे. एक कृतीशील अध्यापक समाज विकासाचा ध्यास घेऊन समर्पण वृत्तीने कार्य करत किती समृद्ध समृद्ध आयुष्य जगू शकतो याचा प्रत्यय या ग्रंथातील प्रत्येक लेख वाचताना येतो. डॉ.सुरेश सावंत यांनी विद्यार्थी हितासाठी, मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी, साहित्य सेवेसाठी आयुष्य वेचलं. विद्यार्थ्यांसाठी निरंतर अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम, प्रकल्प राबविले. खूप मोठा मित्रपरिवार जोडला. या मित्रांच्या लेखामधून या डॉ. सुरेश सावंत याचं बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा परिचय होतो.
गेली अनेक वर्ष डॉ. सुरेश सावंत सरांचा
साहित्य क्षेत्रात वावर आहे. त्यांनी जवळपास चाळीस पुस्तकांचे लेखन केले आहे. यामध्ये कवितासंग्रह, किशोर कादंबरी, बालकथासंग्रह,
चरित्रे, संपादित काव्यसंग्रह, एकांकिका, अनुवादित बालकथा, संशोधन, समीक्षा,
लेखसंग्रह, गौरवग्रंथ संपादन केलेले आहे. त्यांच्या साहित्यकृतींना महाराष्ट्र
शासनाचे तसेच राज्यातील अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांच्या साहित्य क्षेत्रातील उत्तुंग कार्याविषयी रा. रं. बोराडे, फ. मु. शिंदे, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, डॉ. श्रीपाल सबनीस, डॉ. पी. विठ्ठल, नरेंद्र लांजेवार, नामदेव माळी, डॉ. जगदीश कदम, डॉ. भगवान अंजनीकर, प्राध्यापक दत्ता
भगत, ग. पि. मनूरकर, एकनाथ
आव्हाड, बालाजी सुतार, डॉ. किशोर सानप, प्रा. विश्वास वसेकर, प्रा.महेश मोरे, अंजली कुलकर्णी, प्राचार्य
डॉ.राम जाधव, राम शेवडीकर या
प्रसिद्ध साहित्यिकांनी त्यांच्या साहित्याविषयी भरभरून लिहिले आहे. त्यांच्या सहवासातील समृद्ध आठवणी सांगितलेल्या आहेत. डॉ. सुरेश सावंत सर एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांनी राजश्री
शाहू विद्यालयात उपक्रमशील अध्यापक, मुख्याध्यापक, प्राचार्य अशा वेगवेगळ्या भूमिकेतून रचनात्मक, सर्जनशील कार्य उभं केलं.
लोकसहभागातून शाळा समृद्ध केली. वाचन
चळवळ बळकट व्हावी, वाचन संस्कृती वाढीस लागावी यासाठी त्यांनी शाळेत सुसज्ज असे ग्रंथालय निर्माण केले. शाळेतील
ग्रंथालयासाठी स्वतः एक लक्ष रुपयांची पुस्तके भेट दिली. मुलांच्या
अभिव्यक्तीच्या विकासासाठी ग्रंथालयावर आधारित अनेक उपक्रम, प्रकल्प
राबविले. यामुळेच शाळेतील मुले
लिहिती झाली. शाळेत बालसाहित्यिक निर्माण झाले. प्रत्येक मूल भाषिकदृष्ट्या
समृद्ध व्हावं, यासाठी भाषाशिक्षणाचे वेगवेगळे नाविन्यपूर्ण प्रयोग केले. विद्यार्थ्यांसाठी वैविध्यपूर्ण उपक्रम राबविले. वाचनकट्टा, अभिव्यक्ती फलक, वाढदिवशी पुस्तक भेट, शालेय हस्तलिखित, वर्गवार वाचनपेटी, फिरते वाचनालय, लेखक आपल्या
भेटीला, व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा, रद्दीतून ग्रंथालय, मागेल त्याला
मागेल ते पुस्तक, नव्या पुस्तकांचे जाहीर स्वागत, शोध प्रतीभाकळ्यांचा, माझा शिक्षक: चरित्रनायक, रोजनिशी:माझी सखी, विज्ञान किर्तन असे अनेक उपक्रम त्यांनी आपल्या शाळेत
राबविले. या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण
होण्यास मदत झाली. या गौरव ग्रंथातील
सर्वच लेख खूपच प्रेरक आहेत. डॉ. सुरेश सावंत यांनी लिहित्या
हातांना बळ दिले नवोदित. नवोदित लेखक, कवींना लिहिण्यासाठी मदत, मार्गदर्शन करून प्रेरित केले. त्यांनी जवळपास शंभरपेक्षा जास्त नवोदित लेखकांच्या
पुस्तकांना प्रस्तावना देऊन नवोदित लेखकांच्या लिखाणाची पाठराखण केलेली आहे.नवोदितांना पुस्तक
प्रकाशनासाठी मुद्रणदोष तपासण्यापासून संपादन करण्यापर्यंत त्यांनी हातभार लावलेला
आहे. स्वतः अखंड लिहीत राहून नवोदित लेखकांना उभं केलं आहे. नव्याने लेखक व्हायचे स्वप्न पाहणाऱ्यांचे ते आधारवड
झाले. म्हणूनच प्रसिद्ध साहित्यिक रा. रं. बोराडे त्यांना
लेखक घडवणारा लेखक असे म्हणतात. या गौरव ग्रंथातील प्रत्येक लेख वाचताना
त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या अनेकविध पैलूंची ओळख होते. शिक्षणाच्या, समाजाच्या
प्रगतीसाठी, उन्नतीसाठी त्यांनी वैविध्यपूर्ण सर्जनशील कार्य केलेले आहे. त्यांनी
शासनाच्या विविध संस्थांवर,समित्यांवर काम केलेले आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य व
संस्कृती मंडळ, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ,
मराठवाडा साहित्य परिषद, मराठवाडा मुख्याध्यापक संघ, अविष्कार साहित्य मंडळ, शंकरराव
चव्हाण व्याख्यानमाला इत्यादी संस्थांच्या माध्यमातून शिक्षण, संपादन, लेखन समाजप्रबोधन
या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले. त्यांच्या
एकूणच अध्यापनसेवेची, उपक्रमशीलतेचे, लेखन कर्तुत्वाची, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील
योगदान अमूल्य आहे. प्रसिद्ध साहित्यिक व प्रकाशक बाबा भांड या गौरव ग्रंथाची पाठराखण करताना म्हणतात, “ एक
समृद्ध व्यक्तिमत्त्व, स्वतंत्र विचाराचे चिंतक, ग्रंथ चळवळीचे आधारस्तंभ, लेखक
आणि सकारात्मक कार्याचा खजिना जनहितासाठी खुला करणारे डॉ. सुरेश सावंत
यांच्या समृद्ध व्यक्तिमत्त्वाची विविध रूपे समोर आली आहेत.” शिक्षण
क्षेत्रात,साहित्यिक चळवळीत काम करत असताना कुटुंबवत्सल कुटुंबप्रमुख म्हणूनही
भूमिका त्यांनी पार पाडली आहे. त्यांच्या सौभाग्यवती प्रो.डॉ.मथु सुरेश सावंत
यांचा लेख त्यांच्या जीवनातील प्रेरक घटना, प्रसंगावर प्रकाश टाकतो. कठीण
प्रसंगातही कसे धीरोदात्तपणे सामोरे जाऊन आपले कार्यमग्न जीवन त्यांनी सुरु ठेवले
याबद्दल त्यांनी या लेखात सांगितलेले आहे
या गौरव ग्रंथात डॉ. सुरेश सावंत यांच्या कार्य कर्तृत्वाचा गुणगौरव करणारे जवळपास
पंचेचाळीस लेख असून त्यांच्या काव्यलेखनाचा परामर्श घेणारे विशेष बारा लेख आहेत. गौरव
ग्रंथाचे मुखपृष्ठ अतिशय वेधक व सुंदर आहे.शिक्षणक्षेत्रात काम करणाऱ्या
प्रत्येकाने हा गौरव ग्रंथ वाचायलाच हवा. ही साहित्यकृती संग्रही ठेवायलाच हवी.
ग्रंथ परिचय : समाधान शिकेतोड
आचार्य डॉ सुरेश सावंत (गौरव ग्रंथ) : संपादक संदीप काळे
प्रकाशक : इसाप प्रकाशन,नांदेड.
मूल्य : ५०० रु.
No comments:
Post a Comment