Saturday, 13 November 2021

NAS सर्वेक्षणातील अनुभव

काल राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (NAS) देशभरात संपन्न झाले. हे सर्वेक्षण इयत्ता तिसरी,पाचवी,आठवी या इयत्तासाठी होते.विद्यार्थ्यांना त्या त्या इयत्तेच्या अध्ययन निष्पत्ती प्राप्त झाल्या आहेत काय हे या चाचणीच्या संपादणूकीतून समजते.

 काल उस्मानाबाद तालुक्यातील उपळा या गावी NAS क्षेत्रिय अन्वेषक(FI)  म्हणून माझी नियुक्ती झाली होती. माझ्यासोबत या कामासाठी CBSE कडून एका निरीक्षकाचीही नियुक्ती झालेली होती. त्या गावातील इयत्ता आठवीच्या वर्गाची निवड या सर्वेक्षणासाठी झाली होती. NAS चाचणीसाठी अतिशय उत्तम नियोजन करण्यात आलेले होते. NAS ची चाचणी उत्तमरित्या संपन्न झाली. ही चाचणी झाल्यानंतर विद्यार्थी, शिक्षक व मुख्याध्यापक यांच्या प्रश्नावल्या भरून घेण्याचे काम सुरू होते.

वर्गामध्ये विद्यार्थी प्रश्नावली सोडवत होते. वर्गामध्ये मी पर्यवेक्षण करत होतो. OMR सीटवरील प्राथमिक माहीती भरण्यास कुणाला काही अडचण येत असल्यास त्यांना मार्गदर्शन करत होतो. अचानक पाठीमागील दारातून सात-आठ वर्षाचे दोन मुले अचानक वर्गात आली. ती घाबरलेली,भांबावरेली होती. मुले प्रश्नावली सोडविण्यात मग्न होती. त्या आलेल्या मुलांनी हाक मारली. 
" अरे तुझं वडील वारलेतं, तुझ्या आईनं तुला बोलवलंय."
हे  ऐकून सगळा वर्ग स्तब्ध झाला.तो मुलगाही शेवटीच बसला होता. मला काहीच सुचेना.तो मुलगा रडायला लागला.प्रसंगावधान राखून दोन्ही मुलांना मुख्याध्यापककडे पाठवले.घडलेली हकीकत सांगीतली.

 ज्या मुलांचे वडील वारले होते असे समलंय त्या  मुलाजवळ जाऊन त्याला धीर दिला. काही झालेलं नाही.....घाबरू नको असं सांगीतलं. प्रश्नावली सोडविण्यासाठी त्याला मदत केली.  त्यांनेही रडणे बंद करून परिस्थितीशी समायोजन साधण्याचा प्रयत्न केला. प्रश्नावली सोडू लागला.त्याच्यातला समंजसपणा कौतुकास्पद होता. त्याच्या जवळ जाऊन त्याला विचारलं " वडील आजारी होतं का?"
तो म्हणाला," हो...त्यांच्या पोटात पाणी झालं होतं".ऐकून खुपचं वाईट वाटलं. कोणत्याही भीषण संकटाला कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण तोंड दिले पाहिजे. मुलाच्या खंबीरवृत्तीचं,कणखरपणाचं कौतुक वाटलं. त्याने पटपट प्रश्नावली सोडविली. त्याला मुख्याध्यापकाच्या मदतीने घरी पाठविले.

शिक्षक,मुख्याध्यापकाकडून समजंल त्याचे वडील खूप दारू प्यायचे.त्यामुळेच त्यांचा मृत्यु झाला असावा.त्याला एक छोटा भाऊ होता.आई वडील शेतमजुरी करायचे.किती विदारक परिस्थिती क्षेत्रीय स्तरावर काम केल्यावरचं समस्या समजतात.संवेदशील माणूस यामुळे अस्वस्थ होतो.

No comments:

Post a Comment