Tuesday, 20 December 2022

मला डाॅक्टर व्हायचंय!

आमच्या केंद्रातील जि.प.प्रा.शाळा पिंपरी या शाळेची सहल कोकणात गेलीय.त्यामुळे शाळा बंद राहू नये.यासाठी आमच्या शाळेतील शिक्षकांनी तिन दिवस ती शाळा सांभाळावी अशी तात्पुरती व्यवस्था केली होती. आज पहिला दिवस माझा होता. यापुर्वीही अनेकदा त्या शाळेवर शिक्षक परिषदेच्या निमित्ताने जाण्याचा योग आला आहे.

आज त्या शाळेवर पोहचलो. दोन तीन मुले दिसली.बरीच मुले सहलीला गेलेली असल्यामुळे शुकशुकाट होता. सुरूवातीला मुलांसोबत गप्पागोष्टी केल्या.नंतर त्यांना थोडा अभ्यास सांगीतला. त्यातील दोन मुले मन लावून स्वयंअध्ययन करत होती. आहाना ही पहिलीत शिकणारी चुणचुणीत मुलगी. तीला सांगीतलेला अभ्यास दहा-पंधरा मिनीटात पूर्ण करून परत अभ्यास मागायला यायची. ती बोलकी व मनमिळाऊ स्वभावाची होती.
तिला विचारलं, " तु का नाही गेलीस,सहलीला "
"माझा भैय्या अमन गेलाय, माझं पैसे भरलं नाहीत." ती म्हणाली.
दुसरा एक धिरज नावाचा दुसरीतील मुलगा
 होता.
 त्यालाही विचारलं, " सहलीला का नाहीस गेलास." 
" माझे पप्पा शेतकरी आहेत.सहलीचे पैसे नव्हते भरायला." तो म्हणाला. 
माझ्या काळजात चर्र sss झालं खुपच वाईट वाटलं. मला माझे शालेय जीवन आठवलं. मला सहलीला जायला कधीच पैसे मिळाले नाहीत. आर्थिक परिस्थिती खूपच हालाखिची होती.अगदी मी डी.एड करत असतानासुद्धा मला सहलीला जाण्यासाठी पैसे नव्हते. माझे आई वडील दुसर्‍याच्या शेतात मजूरी करायचे. त्यांनी खुप कष्ट करून मला शिकवलं. हा सगळा प्रवास धीरज ऐकत होता.तो भावूक झाला होता. आता त्याला सहलीला न गेल्याची अजिबात खंत वाटत नव्हती. धडपड करून आपणही सरांसारखं काहीतरी बनावं असा भाव त्याच्या चेहर्‍यावर दिसत होता.त्याला विचारलं तुला काय व्हायचंय? तो म्हणाला, "मला डॉक्टर व्हायचंय."

दिवसभर मुलांसोबत छान गप्पा मारल्या. मुलांनी स्वयंअध्ययन केलं. मुलांना पाठ्यपुस्तकातील नवीन काही शिकवलं नाही.पण त्यांना आत्मविश्वास,धैर्य दिलं. प्रतिकूल परिस्थितीतून वाट काढण्याचं बळ दिलं. आहाना व धीरज मला कायम लक्षात राहतील. 

शेवटी मुलं म्हणाली, " सर तुम्ही उद्याबी या"
एकाच दिवसात किती नातं दृढ झालं होतं. मुलांसोबत आजचा दिवस छान गेला.

No comments:

Post a Comment